ए-गॅमा-ग्लोब्युलिनीमिया : रक्तप्लाविकेतील (रक्ताच्या द्रव भागातील) गॅमा-ग्लोब्युलीन या प्रथिनघटकाची कमतरता असलेल्या अवस्थेला ए-गॅमा-ग्लोब्युलिनीमिया असे म्हणतात.

     रक्तातील प्रथिनपदार्थांचे विद्युत् संचारण (द्रवात लोंबकळत असलेल्या कणांचे विद्युत् क्षेत्राच्या प्रभावाखाली संचारण करण्याच्या) पद्धतीने अथवा रासायनिक प्रतिरक्षा (रोग प्रतिकारात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याच्या) पद्धतीने विश्लेषण केले असता त्यांपैकी १५ ते २० टक्के प्रथिने गॅमा-ग्लोब्युलीन या स्वरूपात आढळतात. गॅमा-ग्लोब्युलिनांचे अनेक प्रकार असून त्यांच्यामुळेच प्रतिपिंडे (जंतू, त्यांची विषे व इतर विशिष्ट पदार्थ यांना विरोध करणारे रक्तात तयार होणारे पदार्थ) तयार होत असली पाहिजेत असे मानतात. जंतुनाशक, विषाणुनाशक (व्हायरसनाशक) आणि इतर बहुतेक प्रतिपिंडे गॅमा-ग्लोब्युलीन या स्वरूपात असतात. प्रत्येक प्रतिजनाविरूध्द (जंतू, विष अगर इतर विशिष्ट प्राणिज वा वनस्पतिज पदार्थांविरुद्ध) विक्रिया असलेली प्रतिपिंडे विशिष्ट अशा गॅमा-ग्लोब्युलीन स्वरूपाची असावी असे मानले जाते. संसर्गाचा प्रतिकार या प्रतिपिंडांमुळेच होतो. सर्व प्रकारांची गॅमा-ग्लोब्युलिने प्रतिपिंडात्मक असतात अथवा सर्व प्रतिपिंडे गॅमा-ग्लोब्युलिनांचीच असतात असे नसले, तरी प्रतिपिंडाचा व गॅमा-ग्लोब्युलिनांचा निकटचा संबंध असतो असे निश्चित दिसते. जवळजवळ ५० ते ५५ टक्के गॅमा-ग्लोब्युलीन आंतरकोशिका (पेशींच्या मधल्या) द्रवात असते. रक्ताच्या जाती ज्यामुळे ठरविण्यात येतात ते रक्तसमूहनी (रक्तातील कोशिकांचे गठ्‌ठे करणारे) घटकही गॅमा-ग्लोब्युलीन स्वरूपीच असतात.

नवजात बालकाला आईच्या अपरेमार्फत (वारेमार्फत) गॅमा-ग्लोब्युलिनांचा पुरवठा होतो. ती सु. १५ ते २० दिवस पुरतात. जन्मानंतर ३ ते १२ आठवड्यांच्या मुदतीत बालकाच्या शरीरात गॅमा-ग्लोब्युलिने तयार होऊ लागतात. ती शरीरातील लसीकाभ ऊतके (जाळीसारखी रचना असलेल्या व मोकळ्या जागांत पांढऱ्या कोशिका असलेले कोशिका समूह) आणि प्लविकाकोशिका यांपासून उत्पन्न होतात.

एकूण रक्त प्रथिनांपैकी गॅमा-ग्लोब्युलिनांचे प्रमाण ०·४० अथवा रक्तरसातील (रक्त गोठताना त्यातील वेगळ्या होणाऱ्या निवळ द्रवातील) त्याचे प्रमाण दर शेकडा १०० मिग्रॅ. इतके उतरले, तर ए-गॅमा-ग्लोब्युलिनीमिया हा विकार दिसतो.

या विकाराचे जन्मजात, अर्जित, गौण आणि अल्पकालिक असे प्रकार आहेत.

      जन्मजात विकार आनुवंशिक असून तो लिंगसंबंधित सुप्त जीनांशी [आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणाऱ्या गुणसूत्रांवरील एककांशी, → जीन] संबध्द असतो आणि फक्त पुरुषांतच दिसतो. काही जन्मजात दोषांमुळे गॅमा-ग्लोब्युलिन पुरेसे तयारच होत नाही, ही या प्रकारची संप्राप्ती (विकाराचे कारण) आहे. या विकारात संसर्ग- प्रतिकारशक्ती कमी पडल्यामुळे लहानपणीच जंतुसंसर्ग होण्याची भीती असते. अगदी क्षुल्लक जंतुसंसर्गही मारक होऊ शकतो. अशा मुलांच्या शरीरातील लसीकाभ ऊतकांची पूर्ण वाढच झालेली नसते. अशा व्यक्तींमध्ये ⇨ कोलॅजेन रोग  फार प्रमाणात दिसतात.

अर्जित, गौण आणि अल्पकालिक प्रकार स्त्री व पुरुष या दोघांमध्येही होऊ शकतो. रक्तातील एकूण प्रथिनांचे प्रमाणच कमी पडणे, यकृत विकार, लसीकार्बुदे (लसीकाभ ऊतकाची प्रमाणाबाहेर वाढ) आणि लसीका-श्वेतकोशिकार्बुद (लसीकाभ ऊतकाची प्रमाणाबाहेर वाढ आणि पांढऱ्या कोशिकांची बेसुमार वाढ) या विकारांत हा प्रकार दिसतो. रक्ताधान (शिरेतून रक्त देणे), प्लाविकाधान वगैरे गोष्टींचा उपयोग विशेषत:  अर्जित प्रकारात चांगला होतो.

संदर्भ : 1. Boyd, W. A Text book of Pathology, Philadelphia, 1961.

         2. Hunter, D. Ed. Principles of Internal Medicine, New York, 1962.

ढमढेरे, वा. रा.