उचले – भामटे : एक भारतीय विमुक्त जमात. भारतीय विमुक्त जमातींच्या अनुसूचित जातीजमातींत फक्त भामट्यांचा उल्लेख असला, तरी उचले-भामटे, कामाठी, घंटीचोर, खिसेकातरू, गाठचोर, इ. नावांनीही ओळखले जातात. महाराष्ट्र्, मध्य प्रदेश, कर्नाटक इ. राज्यांतून हे लोक आढळतात. 

काळा किंवा निमगोरा रंग, खुजी पण दणकट शरीरप्रकृती ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये आहेत. स्त्रियांना अलंकारांची आवड असून डाव्या हातावर व तोंडावर त्या गोंदून घेतात. कोणत्याही जातीच्या किंवा धर्माच्या लोकांना ते आपल्यात सामावून घेतात. लहानपणीच जमातीत घेतलेल्या मुलास कोन्नड व मुलीला कोन्नडी म्हटले जाते. 

चोरी, उचलेगिरी, घरफोडी, खिसे कापणे इ. कामांत हे लोक पटाईत असतात. लहानपणीच ते मुलांना चोरीचे शिक्षण देतात. चाकू, सुऱ्या, वाघनखे, आकडे इ. हत्यारांचा ते वापर करतात. त्यांच्यातील काहीजण शेतीही करतात. भामट्यांत छत्री भामटा (गुजरातमधून आलेले) व मराठी भामटा असे दोन प्रकार आहेत. छत्री भामटे संमिश्र हिंदी, मराठी व गुजराती भाषा बोलतात. त्यांची बाजगर, चौहान, गहलोत, काचवाला इ. कुळनामे आहेत. मराठी भामटे मराठी भाषा बोलतात. त्यांची गुडेकर, कवठी, बैलखारे इ. कुळनामे आहेत.  

भामट्यांत दोन कुळी असून एकाच कुळीत विवाह होत नाहीत. मुलींची लग्‍ने लहान वयातच होतात. चोरी करण्यात निष्णात झाल्याशिवाय पुरुष लग्‍नाला योग्य मानला जात नसे. विधवाविवाह व विवाहविच्छेद जातीत मान्य आहेत. 

त्यांच्या प्रत्येक वस्तीत वयाने ज्येष्ठ असलेला भामटा नाईक असतो. त्याला पाटील, ताळमड, तालदरू, कट्टिमनी इ. नावे आहेत. जमातींमधील तंटेबखेडे तो मिटवितो. भामट्यांमध्ये सांकेतिक भाषा व सांकेतिक खुणाही आढळतात. बहिरोबा, भवानी, यल्लमा इ. देवतांची ते पूजा करतात. मृताला ते पुरतात किंवा जाळतात.

मुटाटकर, रामचंद्र