वार – १ : काळ मोजण्याचे एक नैसर्गिक लहान व मूलभूत एकक. वार हे पंचांगाच्या पाच अंगांपैकी एक अंग असून पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणाऱ्या कालावधीला वार, दिवस किंवा दिन म्हणतात. पुनःपुन्हा येणाऱ्या सात दिवसांच्या संचातील म्हणजे आठवड्यातील एक दिवस. दुसऱ्या दिवसांपासून वेगळा ओळखू येण्यासाठी प्रत्येक दिवसाला नाव देण्याची पद्धत पडली आणि या नावाला वा दिवसाला वार म्हणतात. सातही वारांचे क्रम व त्यांच्या नावांचे सर्वसाधारण अर्थ जगभर एकच असल्याचे आढळते.

वार मोजताना पृथ्वीची प्रदक्षिणा अवकाशातील कोणत्या घटकाच्या म्हणजे कशाच्या सापेक्ष मोजण्यात येते, त्यानुसार वाराच्या कालावधीत थोडा फरक पडतो. सूर्याच्या लागोपाठच्या दोन याम्योत्तर संक्रमणांमधील काळाला स्पष्ट सौर दिन म्हणतात. डिसेंबरमध्ये त्याचा कालावधी २४ तास ३० सेकंद तर सप्टेंबरात २३ तास ५९ मिनिटे ३९ सेकंद एवढा असतो आणि सौर तबकडीद्वारे हा फरक कळतो. म्हणून वाराचा हा प्रकार वापरीत नाहीत. खऱ्या सूर्याच्या सरासरी वेगाने खगोलीय विषुववृत्तावरून जाणाऱ्या काल्पनिक सूर्याला माध्य सूर्य म्हणतात. अशा माध्य सूर्याच्या संदर्भात मिळणाऱ्या वाराच्या कालावधीला माध्य सौर दिन म्हणतात व घड्याळांतील वेळा याप्रमाणेच असतात. संपात बिंदूच्या लागोपाठच्या दोन याम्योत्तर संक्रमणांमधील काळाला (२३ तास ५६ मिनिटे ४.०३०५४ सेकंद) नाक्षत्र दिन म्हणतात. ठराविक दिशेच्या संदर्भातील वाराचा कालावधी नाक्षत्र दिनाहून ०.००८४ सेकंदाने मोठा असतो. याला वेगळे नाव नाही वा याचा व्यवहारात उपयोग होत नाही. पृथ्वीच्या अक्षीय परिभ्रमणाच्या काळात तीन प्रकारच्या कारणांनी असा फरक होतो.  ऋतुनुसार होणारा फरक  बहुतांशी वारे आणि भरती-ओहोटी या कारणांनी होतो . यामुळे जुलैपेक्षा मार्चमध्ये दिवस ०.००१ सेकंदाने मोठा असतो.  पृथ्वीचा गाभा व कवच यांतील हालचालींच्या परस्पर परिणामामुळे अचानकपणे  वाराच्या कालावधीत बदल होतो हा फरक अत्यल्प असून अनियमितपणे होतो व काही वर्षे टिकून राहतो. विशेषेकरून समुद्रातील वेलीय (भरती-ओहोटीशी निगडीत) दीर्घकालीन परिणामाने एका शतकात दिवसाचा कालावधी ०.००१ सेकंदाने वाढतो.  पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांचेही दिवस आहेत. (उदा., गुरूचा एक दिवस पृथ्वीवरील ९ तास, ५० मिनिटे व ३० सेकंदांचा असतो).

आठवड्यातील सात दिवसांना वेगवेगळी नावे दिली आहेत. त्यांचा प्रचलित क्रम ठरविण्यासाठी सूर्य, चंद्र व पाच ग्रह हे अधिपती मानले असून त्यांच्या एका सूर्यप्रदक्षिणेला लागणाऱ्या कालमानानुसार त्यांचा क्रम ठरविला. तो क्रम शनी, गुरू, मंगळ, रवी, शुक्र, बुध व चंद्र असा येतो. दिवसाच्या २४ होरांपैकी प्रत्येक होरेचा अधिपती या क्रमाने निश्चित केला आणि सूर्योदयी  येणाऱ्या होरेचा अधिपती त्या दिवसाचा स्वामी मानून त्याचे नाव त्या वाराला मिळाले. हिंदुधर्मीय वार सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत मानतात. अरब व काही ज्योतिषशास्त्रज्ञ दुपार ते दुपार धरतात. चिनी, ज्यू व काही मुसलमान लोक वार सायंकाळ ते सायंकाळ मानतात. मात्र बहुतेक ठिकाणी वार मध्यरात्र ते मध्यरात्र असा मानला जातो.

ग्रीक व रोमन साम्राज्यांत भविष्यकथन करताना खाल्डियन लोकांनी वार रूढ केले. रामायणमहाभारत या ग्रंथांत वारांचा उल्लेख नाही मात्र वार भारतात इ.स. पू. १००० ते ५०० दरम्यान प्रचलित झाले असावेत. गुप्तकाळात (चवथे वा पाचवे शतक) वार सर्रास वापरात होते. पारशी लोकांत तीस दिवसांचे तीस वार आहेत. चीनमध्ये ६० वारांचे चक्र असून त्यांकरिता ६० नावेही आहेत. मात्र या नावांचा ग्रहांशी संबंध नाही.

भारतीय पुराण ग्रंथात वारांची व्रते व विधिनिषेध सांगितले आहेत. वारांविषयी अनेक लोकसमजुती आहेत. मुहूर्त-ग्रंथ व या समजुतीनुसार वार शुभाशुभ मानले जातात. उदा., गुरुवार शुभ, तर मंगळवार अशुभ मानतात, पण रविवार शुभ अथवा अशुभ समजला जात नाही. तथापि कोणत्याही वाराचे दोष रात्री बाधक होत नाहीत. रविवार ते शनिवार या वारांच्या उपास्य देवता अनुक्रमे पुढीलप्रमाणे मानल्या जातात, सूर्य, शिव, गणपती व गौरी, विष्णू व विठ्ठल, दत्त, देवी आणि मारुती.

पहा : दिवस पंचांग.

ठाकूर, अ. ना.

Close Menu
Skip to content