ऑफियूरॉयडिया : हा एकायनोडर्माटा संघातील एल्युथेरोझोआ उपसंघाचा वर्ग आहे. या वर्गातील प्राण्यांचे शरीर ताराकार, बाहू साधे किंवा

कंटकयुक्त भंगुरतारा, मुखपृष्ठ दृश्य : (१) बाहू, (२) कंटक, (३) मुख, (४) जनन-स्यूनाच्या चिरा.

 शाखित असतात. बाहू केंद्रबिंबापासून निराळे दिसतात. बाहूचा कंकाल (सांगाडा) मजबूत असून चरणार अस्थिकांचा (ज्यांवर नळीसारखे बारीक पाय असतात अशा अरीय क्षेत्रांवरील हाडांचा) झालेला असतो. चरणार प्रसीता (नळीसारखे बारीक पाय ज्यात असतात अशा अरीय खाचा) नसतात. नालपादांचा (नळीसारख्या बारीक पायांचा) ऱ्हास होऊन त्यांच्या पिंडिका (बारीक उंचवटे) होतात. त्यांना तुंबिका (नालपादावरील बारीक फुगवटे) नसतात. आहारनाल (अन्नमार्ग) केंद्रबिंबात असतो. काहींत तो बाहूतही आढळतो. केंद्रबिंबाच्या परिणाहात (घेरात) दहा जनन- श्वसन (प्रजोत्पादन आणि श्वासोच्छ्‌वास यांकरिता उपयोगी पडणारे) कोष्ठ (पिशव्या) असतात.

केंद्रबिंब गोल किंवा पंचकोनी असून त्याच्यापासून सारख्या अंतरावर पाच (काहींत सहा किंवा सात) लांब, टोकाकडे निमुळते, काटे असलेले (किंवा काटे नसलेले) बाहू असतात. युरिॲलिडा समूहात बाहू शाखित असून त्यांचे गुंतागुंतीचे जाळे बनते. गॉर्गोनोसेफॅलस ॲस्ट्रोफायटन  यांमध्ये बाहू शाखित असतात.

केंद्रबिंबाचे अपमुखपृष्ठ (मुखपृष्ठाच्या विरुद्ध असणारे पृष्ठ) गुळगुळीत असते. काहींत त्याच्यावर काटे किंवा कणिका (बारीक कण) असतात. अपमुखपृष्ठ अनियमित आकाराच्या लहान पट्टांनी आच्छादलेले असते.

प्रत्येक बाहू अनेक खंडांचा झालेला असतो. प्रत्येक खंडाच्या मुखीय व अपमुखीय पृष्ठावर एकेक व पार्श्वबाजूंना एकेक याप्रमाणे चार कॅल्शियममय पट्ट असतात. चरणारक्षेत्रे (ज्यांच्यावर नालपाद असतात अशी अरीय क्षेत्रे) व चरणारप्रसीता नसतात.

प्रत्येक चरणारअस्थिका ही बाह्यखंडाशी जुळणारी असते. दोन चरणारअस्थिका संयुक्त होऊन त्यांचा मणका बनतो. मणक्यांशी स्‍नायू जोडलेले असतात. त्यामुळे ते सर्व बाजूंना हालू शकतात.

तंत्रिका तंत्रात (मज्जातंतूच्या व्यूहात) तंत्रिका वलय व त्याच्यापासून शरीराच्या निरनिराळ्या भागांत जाणाऱ्या तंत्रिका यांचा समावेश होतो.  तंत्रिका वलय दुहेरी असते.

अपमुखीय पृष्ठावर, खाचेत जलवाहिक तंत्राचे नाल-वलय असते. सामान्यतः एक मॅड्रेपोराइट (चापट, वाटोळे, पृष्ठावर खोबणी असलेले व आरपार छिद्रे असलेले तकट) असतो पण काहींत पाच मॅड्रेपोराइट असतात. तो मुखपृष्ठावर असतो. नालपाद पिंडिकांइतके लहान व संवेदी असतात. त्यांना तुंबिका नसतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नालपादांचा (पिंडिकांचा) उपयोग होत नाही. बाहूच्या प्रत्येक खंडात मुखीय पृष्ठावर नालपादांची एक जोडी असते.

सूक्ष्म प्राणी, कुजणारे जैव पदार्थ हे यांचे अन्न होय. विशेष प्रकारच्या नालपादांनी हे अन्न मुखापर्यंत नेले जाते. मुखाभोवती काटे असतात, त्यांचा चाळणीसारखा उपयोग होतो. जठर पिशवीसारखे असते. आहारनाल मुखातून बाहेर येऊ शकत नाही. गुदद्वार व आंत्र (आतडे) नसते.

जननग्रंथीतील (वृषणातील अथवा अंडाशयातील) शुक्राणू व अंडाणू जनन-स्यूनात (जननेंद्रियांशी संबंध असणाऱ्या पिशवीत) येतात. प्रत्येक जनन-स्यून बाहूच्या तळाशी चिरेने उघडते. ऑफियूरॉयडिया वर्गातील काही प्राणी उभयलिंगी (नराची व मादीची जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणारे प्राणी) असतात. काही जरायुज (पिल्लांना जन्म देणारे) असून जनन-स्यूनाचा उपयोग भ्रूणधानीसारखा (अंडी अथवा भ्रूण ठेवण्याकरिता असणाऱ्या पिशवीसारखा) करतात.

तुटलेल्या भागाचे पुनरुत्पादन होते. सर्व बाहू तुटले असता फक्त केंद्रबिंबापासून बाहूंचे पुनरुत्पादन होत नाही पण एखादा बाहू जरी शिल्लक असला तरी इतर बाहूंचे पुनरुत्पादन होते.

पहा : एकायनोडर्माटा भंगुरतारा.

जोशी, मीनाक्षी