ओपेनहायमर, जूलियस रॉबर्ट : (२२ एप्रिल १९०४ — १८ फेब्रुवारी १९६७). अमेरिकन सैद्धांतिक भौतिकी विज्ञ. अमेरिकेच्या पहिल्या अणुबाँब योजनेचे संचालक. त्यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांचे शिक्षण हार्वर्ड, केंब्रिज (इंग्लंड) व गॉटिंगेन (जर्मनी) येथील विद्यापीठांत तसेच लंडन व झुरिक येथे झाले. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ व कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन्ही संस्थांत संयुक्तपणे अध्यापनाचे कार्य केले (१९२९ — ४७). या काळात त्यांनी केलेल्या संशोधनाचा व विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा अमेरिकेतील भौतिकी विषयाच्या विकासावर फार मोठा प्रभाव पडलेला होता.

त्यांचे प्रमुख संशोधन कार्य पुंज (क्वांटम) सिद्धांत, विश्वकिरण (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणारे अतिशय भेदक किरण), अणुकेंद्रीय संरचना, मूलकण व सापेक्षता सिद्धांत यांविषयी होते.

त्यांची १९४३ — ४५ मध्ये लॉस अलॅमॉस रिसर्च लॅबोरेटरीच्या संचालकपदावर नेमणूक झाली. येथेच त्यांनी काही ख्यातनाम शास्त्रज्ञांच्या मदतीने पहिल्या अणुबाँबची योजना तयार केली व ॲलामोगोर्डो येथे त्याची यशस्वी चाचणी घेऊन अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली. १९४७ साली प्रिन्सटन, न्यू जर्सी येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडी या संस्थेच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली व तेथेच त्यांनी मृत्यूपावेतो कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था भौतिकी व गणित या विषयांचे केंद्रस्थान म्हणून अतिशय नावारूपास आली.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर त्यांनी अणुऊर्जेच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रणाचा वारंवार पुरस्कार केला. १९४७ — ५३ या काळात ते अमेरिकेच्या अणुऊर्जा मंडळाच्या सर्वसाधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. परंतु पूर्वी कम्युनिस्ट असलेल्या अनेक व्यक्तिंशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे अमेरिकन सरकारने १९५४ मध्ये ओपेनहायमर यांच्या संबंधांमुळे अमेरिकन सरकारने १९५४ मध्ये ओपेनहायमर यांचा सुरक्षा दाखला देशाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द केला. एका खास मंडळापुढे त्यांची चौकशी झाल्यानंतर देशद्रोहीपणाच्या आरोपातून त्यांची मुक्तता झाली, तथापि अणुऊर्जेसंबंधीच्या सल्लागारपदावरून त्यांना दूर करण्यात आले. चौकशी मंडळाच्या या निर्णयावर अनेक शास्त्रज्ञांनी तसेच सरकारी व्यक्तींनी अत्यंत कडक टीका केली व त्यामुळे ओपेनहायमर यांना त्यांची सामाजिक प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचा निर्णय घेणे सरकारला भाग पडले.

केनेडी सरकारने १९६३ मध्ये ५०,००० डॉलरचे फेर्मी पारितोषिक ओपेनहायमर यांना त्यांचे सैद्धांतिक भौतिकीतील बहुमोल संशोधन, शास्त्रीय व प्रशासकीय क्षेत्रांतील त्यांचे असामान्य नेतृत्व तसेच अणुबाँबच्या विकासाकरिता व अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगासाठी त्यांनी केलेले कार्य यांकरिता देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ अमेरिका व इतर अनेक देशांतील विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या बहाल केल्या. लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो, अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे व इतर अनेक शास्त्रीय संस्थांचे ते सदस्य होते. विज्ञानाचे आधुनिक जगातील कार्य या विषयावरील द ओपन माइंड (१९५५) व सायन्स अँड द कॉमन अंडरस्टँडिंग (१९५४) हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. ते प्रिन्सटन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.