मुसलमानी अंमल, भारतातील (मोगल पूर्वकाळ) : हिंदुस्थानच्या इतिहासातील मुसलमानी अंमलाखालील ७१२ ते १५२६ हा सु. आठशे वर्षांचा काळ मोगलपूर्व काळ किंवा दिल्ली सलतनत म्हणून ओळखला जातो. आठव्या शतकातील अरबांच्या स्वाऱ्यांपासून सामान्यतः मुसलमानांचे हिंदुस्थानात आगमन झाले. अरब व मुसलमान यांचा हिंदुस्थानशी फार जुना संबंध आहे. या लोकांनी वायव्य दिशेकडून अनेक स्वाऱ्या करून येथे सत्ता प्रस्थापित केली. अरबांनी हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वाऱ्या केल्या . मुहंमद पैगंबरांच्या प्रेरणेने अरबांनी पहिली स्वारी ६३६ मध्ये मुंबईजवळ ठाणे येथे केली. यानंतर त्यांनी भडोच, चौल इ. ठिकाणी अनेक स्वाऱ्या केल्या. हिंदूंनी त्या परतवून लावल्या. इराकचा सुभेदार अल् हज्जाज याने मोठ्या फौजेसह मुहंमद कासिमला सिंधच्या दाहर राजाविरूद्ध धाडले. ७१२–१३ च्या सुमारास कासिमने दाहरचा पराभव करून सिंध व मुलतान जिंकले, परंतु त्यापेक्षा जादा प्रदेश त्यांना पादाक्रांत करता आला नाही. सिंध आणि मुलतान येथेच अरबांचे वर्चस्व प्रस्थापित झाले कारण कच्छ, सौराष्ट्र, काश्मीर, पश्चिम राजपुताना येथील चालुक्य, प्रतीहार, कर्कोटक इ. वंशांतील राजांनी या स्वाऱ्यांना प्रतिकार केला.

अरबांच्या स्वाऱ्यांमुळे हिंदुस्थानात इस्लाम धर्माची बीजे रावली गेली. हिंदुस्थानशी संबंध आल्यामुळे हिंदू आचार-विचार, साहित्य, तत्त्वज्ञान इ. गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम झाला. भारतीयांकडून त्यांनी शासनव्यवहार, संगीत, वैद्यक, गणित, ज्योतिष, वास्तुकला वगैरे आत्मसात केले. भिन्न भिन्न विषयांवरील हजारो संस्कृत ग्रंथ त्यांनी अरबी भाषेत भाषांतर करून घेतले. अरबांनी अप्रत्यक्षपणे भारतीय तत्त्वज्ञान, संख्याशास्त्र, ज्योतिष व अन्य शाखांतील ज्ञानाचा यूरोपात प्रसार केला. अरबांनी सिंधूमधील हजारो हिंदूंना बाटविले. [⟶ अरबांच्या भारतावरील स्वाऱ्या].

राजकीय घडामोडी : तुर्कांनी अफगाणिस्तानातील हिंदू राज्यावर आक्रमणे केली. जवळजवळ २२० वर्षे प्रतिकार केल्यानंतर ८७० मध्ये तुर्कांच्या लुटारू टोळीचा पुढारी याकूब बिन लेयात याने हिंदू-अफगाणिस्तानातील हिंदू राज्य नाहीसे केले. काबूल येथे राज्य करणाऱ्या लाल याला काबूल सोडावे लागले. अशा तऱ्हेने अफगाणिस्तानातील हिंदू राज्याचा शेवट झाला.

मध्यंतरी काही वर्षे हिंदुस्थानात मुसलमानांच्या स्वाऱ्या थांबल्या होत्या परंतु दहाव्या शतकाच्या अखेरीस मुसलमानांचे हल्ले काबूल-पेशावरच्या दिशेने होऊ लागले. दहाव्या शतकाच्या मध्यास गझनी येथे राज्य करणाऱ्या गझनी घराण्यातील सबक्तगीनने राज्य वाढविण्यास सुरुवात केली. सबक्तगीन प्रबळ होत असल्याचे पाहून पंजाबच्या जयपाल राजाने त्याच्यावर अयशस्वी स्वारी केली. त्यानंतर सबक्तगीनने पंजाबवर स्वारी करून लमधान आणि पेशावर हस्तगत केले. गझनी सुलतानांची राजवट हिंदुस्थानच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानावी लागेल कारण तेव्हापासून मुसलमानांची भारतावर सतत आक्रमणे सुरू झाली. या घराण्यातील ⇨ महमूद गझनी हा धर्मवेडा व महत्त्वाकांक्षी होता. त्याने १००१ ते १०२७ पर्यंत हिंदूस्थानवर सतरा वेळा स्वाऱ्या केल्या. पहिल्या स्वारीत त्याने जयपालचा पराभव करून सिंधूच्या पश्चिमेकडील सर्व मुलूख खालसा केला. त्याने मुलतान, अटक, स्थाणेश्वर, मथुरा, कनौज, सोरटी सोमनाथ यांवर स्वाऱ्या करून तेथील इमारती व मंदिरे उद्‌ध्वस्त केली हिंदुस्थानातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती लुटून नेली व पंजाब कायमचा जिंकला. महमूद गझनी हा हिंदुस्थानातील तुर्की सत्तेचा संस्थापक असून त्याने भावी इस्लामी सत्तेचा पाया घातला आणि पुढील सुलतानांचा मार्ग सुलभ करून ठेवला. महमूदाच्या वारसदारांची ११८६ पर्यंत पंजाबवर सत्ता होती. लवकरच गझनीचे राज्य कर्त्या पुरुषांच्या अभावामुळे मोडकळीस येऊन, गझनीच्या वायव्येस असलेल्या घोर प्रांतातील घराणे बाराव्या शतकात गझनीच्या मुसलमानांची सत्ता झुगारून स्वतंत्र झाले [⟶ गझनी घराणे].

घोर घराण्यातील शिहाबुद्दीन ⇨ मुहम्मद घोरी हा शूर होता. महमूद गझनीनंतर हिंदूस्थानावर एकामागून एक अशा लागोपाठ स्वाऱ्या करणारा पुरुष हाच होय. राज्यविस्तार करण्याच्या हेतूनेच त्याने स्वाऱ्या केल्या होत्या. ११७५ मध्ये त्याने हिंदुस्थानवर पहिली स्वारी करून मुलतान पादाक्रांत केला. ११७६ ते १२०५ पर्यंत त्याने व त्याच्या सेनापतींनी गुजरात, पंजाब, ग्वाल्हेर, मीरत, दिल्ली, बुंदेलखंड, बिहार आदींवर अनेक स्वाऱ्या केल्या. तेथील हिंदूंची मंदिरे उद्‌ध्वस्त केली. ⇨ मुहम्मद घोरीनंतर त्याने नेमलेला हिंदुस्थानातील त्याचा सुभेदार ⇨ कुत्बुद्दीन ऐबक याने १२०६ मध्ये दिल्ली येथे गुलाम घराणे स्थापन केले. ऐबक हा दिल्लीचा पहिला सुलतान. त्यावेळेपासून दिल्लीच्या तख्तावर मुसलमानांचा अंमल सुरू झाला. त्याने मीरत, बनारस, कालिजंर, काल्पी इ. ठिकाणे काबीज करून दिल्ली हे राजधानीचे ठिकाण केले. ऐबकने स्थापन केलेल्या गुलाम घराण्याने दिल्ली येथे १२०६ ते १२९० पर्यंत राज्य केले. या घराण्यात शम्सुद्दीन अल्तमश, रझिया सुलतान, घियासुद्दीन बल्बन इ. कर्तबगार सुलतान होऊन गेले. या घराण्यातील सुलतान क्रूर व धर्मवेडे होते. त्यांनी हिंदूंचा छळ करून सैन्याच्या जोरावर पंजाब, संयुक्त प्रांत, बिहार, बंगाल व सिंध येथे सत्ता प्रस्थापित केली.

गुलाम घराण्यानंतर खल्जी घराण्यातील सुलतानांनी १२९० ते १३२० पर्यंत दिल्ली येथे राज्य केले. जलालुद्दीन खल्जी हा खल्जी घराण्याचा संस्थापक. सुरुवातीचे खल्जी हे कर्तबगार असले तरी क्रूर व जुलमी होते. ⇨ अलाउद्दीन खल्जी याने १२९० ते १३०१ दरम्यान गुजरात, रणथंभोर, चितोड, माळवा, मारवाड, जालोर इ. ठिकाणी सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थानात देवगिरीचा रामचंद्रदेव, तेलंगणचे काकतीय राजे, कर्नाटकचे होयसळ राजे, आणि दक्षिणेकडील पांड्य घराणे यांविरुद्ध स्वाऱ्या केल्या. दक्षिण हिंदुस्थानात स्वारी करून इस्लामी धर्माचा प्रसार करणारा हा पहिला सुलतान. वायव्य सरहद्दीवरून आलेल्या मोगलांच्या स्वाऱ्यांना त्याने प्रतिकार केला. खल्जी घराण्याच्या काळात हिंदुस्थानात जितका मुसलमान सत्तेचा विस्तार झाला, तेवढा पूर्वी झाला नव्हता. खल्जी सुलतानांनी उत्तर हिंदुस्थानात सत्ता स्थापून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत आपल्या सत्तेचा प्रभाव पाडला.

खल्जी घराण्याचा ऱ्हास होत असता तुघलक घराण्याचे प्राबल्य वाढले. या घराण्यातील सुलतानांनी १३२० ते १४१२ पर्यंत राज्य केले. घियासुद्दीन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. या घराण्यात एकूण नऊ सुलतान होऊन गेले. घियासुद्दीनचा मुलगा जौनखानाने वरंगळवर दोनदा स्वारी करून तेथील हिंदू राजाचा पराभव केला. घियासुद्दीन तुघलकनंतर गादीवर आलेला ⇨ मुहम्मद तुघलक हा जुलमी व क्रूर होता. त्याने दिल्लीची राजधानी मोडून देवगिरी (दौलताबाद) येथे राजधानी हालविली. मुहम्मद तुघलकच्या कारकीर्दीत सबंध उत्तर व दक्षिण हिंदुस्थानात मुसलमानांचा अंमल असला, तरी त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे राज्य विस्कळीत झाले होते. शेवटचे तुघलक सुलतान दुर्बळ निघाल्यामुळे दिल्लीच्या दरबारात यादवी होऊन पंजाब, बंगाल, गुजरात, माळवा, खानदेश हे प्रांत स्वतंत्र झाले. १३९८ मध्ये समरकंदचा राजा ⇨ तैमूरलंगने हिंदूस्थानवर स्वारी केली. मुहम्मद तुघलकाचा पराभव करून त्याने दिल्लीत स्वतः ला बादशाह म्हणून जाहीर केले. अमाप संपत्ती लुटून, जाळपोळ करून तो परत गेला. पुढे खिज्रखान या सय्यद घराण्याच्या संस्थापकाने मुहम्मदास पकडले व त्याची राजधानी हस्तगत केली (१२१०). मुहम्मदाच्या मृत्यूनंतर १४१२ मध्ये हे घराणे नामशेष झाले. [⟶ तुघलक घराणे]

  यानंतर पुढील सु. पन्नास वर्षे दिल्ली येथे सय्यद घराण्यातील सुलतानांची नाममात्र सत्ता होती. १४१४ ते १४५१ दरम्यानच्या काळात या घराण्यात चार सुलतान होऊन गेले. खिज्रखान सय्यद हा या घराण्याचा संस्थापक. सय्यद सुलतानांच्या काळात जौनपूर, माळवा इ. ठिकाणी बंडे झाली. या घराण्यातील शेवटचा सुलतान अलाउद्दीन याचा पंजाबचा सुभेदार बहलूल लोदी याने पराभव केला. तो स्वतः दिल्लीचा सुलतान झाला. आणि पुढे लोदी घराण्यातील सुलतानांनी १४५१ ते १५२६ पर्यंत दिल्ली येथे राज्य केले. बहलूल लोदीने मुसलमान सुलतानांची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळविण्याची खटपट केली. शिकंदर शाह हा लोदी घराण्यातील कर्तबगार सुलतान. त्याच्या मृत्यूनंतर लोदी सुलतानांत कलह निर्माण झाले. त्यांना दिल्लीचे राज्य सांभाळता आले नाही. दौलतखान लोदीने काबुलचा सुलतान जलालुद्दीन ⇨ बाबर याला मदतीसाठी बोलाविले. बाबरने स्वारी करून पहिल्या पानिपतच्या युद्धात (१५२६) इब्राहीम लोदीचा पराभाव करून त्यास ठार केले. अशा तऱ्हेने दिल्ली येथे स्थापन झालेल्या सुलतानशाहीचा १५२६ मध्ये शेवट झाला.


हिंदूंच्या पराभवाची कारणमीमांसा : अरब व तुर्क यांनी हिंदुस्थानवर अनेक वर्षे सारख्या स्वाऱ्या केल्या. अनेक वर्षांच्या प्रतिकारानंतर हिंदूंना पराभव पतकरावा लागला परंतु हिंदूंच्या पराभवाची कारणमीमांसा स्टॅन्ली लेनपूल व्हिन्सेंट स्मिथ इ. इतिहासकारांनी चुकीच्या सिद्धांतावर केलेली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जात, वंश, हवापाणी, शौर्य आणि धैर्य या सर्व दृष्टींनी हिंदू हे अरब व तुर्क यांच्या तुलनेने दुर्बल असल्यामुळे त्यांचा पराभव झाला.

जगाच्या इतिहासाच्या संदर्भात पाहिले तर हिंदूंनी वर्षानुवर्षे दीर्घकाल केलेल्या प्रतिकाराइतका प्रतिकार इतर कोणत्याही देशांतील लोकांनी केलेला नाही अरबांना सिंधमध्ये ७५ वर्षे, हिंदु-अफगाणिस्तानात २२० वर्षे व पंजाबमध्ये १५० वर्षे लढल्यानंतरच मुसलमानांना ते प्रदेश जिंकता आले होते. प्रदेश जिंकला तरी त्यांना हिंदू संस्कृती व धर्म नष्ट करण्यात यश आले नाही. त्यांची पीछेहाट मात्र निश्चितच झाली.

हिंदूंच्या पराभवाची कारणे ही बाह्य स्वरूपाची नसून अंतर्गत होती. वायव्य सरहद्द प्रांत, हिंदु-अफगाणिस्तान व सिंध हे सरहद्दीवरील प्रांत हिंदुस्थानपासून अलग समजले जात होते. हे प्रांत मागासलेले प्रांत म्हणून सर्वसाधारण लोक समजत असत. या प्रांतांवर झालेल्या आक्रमणाकडे हिंदुस्थानातील इतर लोकांनी लक्ष दिले नाही. सरहद्दीवर आलेले आक्रमण हे आपणा सर्वांवर आलेले आक्रमण आहे, असे समजून सर्व हिंदू एकवटले नाहीत. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर हिंदूंनी सरहद्दीवरील संरक्षणाकडे लक्ष दिले नाही कारण त्यावेळी सबंध भारतात छोटी छोटी अनेक राज्ये होती. सबंध भारत देश एका सत्तेखाली नव्हता. जलद दळणवळणाच्या अभावी कितीही कर्तबगार, क्रूर व कडव्या सम्राटाला भारतासारख्या मोठ्या प्रदेशावर एकछत्री अंमल फार वर्षे टिकविता आला नाही, हा इतिहासाचा धडाच आहे.

त्या काळात देशातील बऱ्याच भागात उपाध्याय वर्गाचे वर्चस्व वाढले असल्यामुळे क्षत्रिय व शूद्र लोक त्यांचे दास बनले होते. उपाध्याय वर्गाकडे राजसत्तेचे नेतृत्व होते. हा प्रकार सिंध व काबूल येथे अस्तित्त्वात होता. कर्मकांडांचे स्तोम वाढल्याने राज्यकर्ते व प्रजा यांच्या अंतर पडले, अशी समजूत आहे पण तीत फारसे तथ्य नाही. पुरोहित वर्गाचे राज्य एखादेच झाले. पुराहित राज्य आपोआप क्षत्रिय बने.

हिंदूंच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदूंचे युद्धकलेतील ज्ञान परिपूर्ण नसून, त्यांनी नवीन युक्त्या किंवा नवीन पद्धती अंगीकारल्या नाहीत. शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्यात ते मागे पडले. अरब किंवा तुर्क हे उत्तम घोडेस्वार असून त्यांनी युद्धकौशल्यात बरीच प्रगती केलेली होती. प्रचंड संख्येने येऊन ते अचानकपणे हिंदूंवर तुटून पडत. त्यामुळे हिंदूंमध्ये एकप्रकारचे भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या शहरांवर हल्ले करून, मुसलमान तलवारीच्या जोरावर शहरे उद्ध्वस्त करीत. अशा तऱ्हेने वारंवार हल्ले झाल्यामुळे हिंदू समाज दुर्बळ झाला होता. मुसलमानांनी लढण्याच्या नवीन पद्धती शोधून काढल्या. हिंदूंना स्वतःच्या लढण्याच्या पद्धतीमधील गुणदोष अपवादादाखलच उमजले.

अरब व तुर्क लोक धर्मवेड्या भावनेने लढत असल्यामुळे बेभान होऊन लढाई करीत. इस्लामची उदात्त तत्त्वे जगभर पसरविण्याचे पवित्र कार्य आपण करीत आहोत, या भावनेने ते लढत. हिंदूंनी मात्र नेहमी बचावात्मक धोरण अंगीकारले. लष्करी शिक्षण, प्रभावी शस्त्रे, क्रूरता, भोगलालसा इत्यादी हिंदूंमध्ये मुलमानांएवढी मुळीच नव्हती.

शासन व्यवस्था : दिल्ली सल्तनतीत ईश्वरसत्ताक राज्यपद्धती होती. इस्लाम हाच राज्याचा धर्म होता. दुसरा कोणताही धर्म सुलतानाला मान्य नव्हता. सुलतानाची शासनव्यवस्था धर्मावर आधारलेली होती. सुलतान खाजगी जीवनात व राज्ययंत्रणेत कुराणातील नियमानुसार वागत. शासनकर्त्यांनाही आपले व्यवहार कुराणातील नियमांप्रमाणे करावे लागत. कुराणहदीसवर आधारलेला शरीयत कायदा शाश्वत व न बदलणारा होता. हिंदुस्थानातील इस्लामी सत्तेचे ध्येय हिंदूंना बाटवून हिंदू धर्म व संस्कृती नष्ट करणे हे होते.

इस्लामी धर्माप्रमाणे सर्व राज्यसत्ता एकाच मुसलमानाच्या म्हणजे खलीफाच्या हातात असून, इतर सर्व मुसलमान शासक त्याचे मांडलिक समजले जात. प्रत्यक्षात खलीफाची सत्ता नष्ट झाली, तरी इस्लामी सत्तेतील एकतेची कल्पना जिवंत ठेवण्यात आली होती. बहुतेक सुलतान खलीफाकडून नाममात्र मान्यता मिळवून त्यांपैकी काहींनी त्यांच्या नावाने नाणीही पाडली. त्याच्या नावाने खुत्बा वाचीत. प्रत्यक्षात सुलतान हे स्वतंत्र सत्ताधारी असत. सुलतान हाच राज्याचा प्रमुख शासक, सेनापती व सर्वोच्च न्यायाधीश असून, त्याचे अधिकारक्षेत्र फार व्यापक होते. मुसलमानांनी जेव्हा हिंदुस्थानात सत्ता स्थापन केली, तेव्हा सत्ताधीशांनी सुलतान हा किताब धारण केला. सुलतान हा किताब बाबरपर्यंत चालू होते. सर्व सुलतान मध्य आशियातील राजघराण्यातील नव्हते, त्यामुळे त्यांना एखाद्या थोर घराण्याची प्रतिष्ठा नव्हती. ही प्रतिष्ठा नसल्यामुळे सुलतानाचे स्थान त्याच्या लष्करी सामर्थ्यावर व कर्तृत्वावर अवलंबून असे. एखाद्या नालायक सुलतानाला काढून टाकण्याचा विधियुक्त मार्ग नव्हता. बंड करूनच त्याला काढण्याचा मार्ग अवलंबावा लागे. सुलतानशाहीच्या काळात वारसाहक्कासंबंधी कोणताही परंपरागत कायदा नव्हता. लष्करी बळ हेच सुलतानपद मिळविण्याचे प्रमुख साधन असे.

सुलतान आपल्या साह्यार्थ एक मंत्रिमंडळ नेमत असे. यात सर्वसाधारण चार मंत्री किंवा अधिकारी असत. वझीर हा मुख्य प्रधान व महसूल मंत्री असे. सुलतानाच्या खालोखाल वझीराचा मान असे. त्याच्या हाताखाली चार मंत्री असत. वझीर हा आर्थिक व लष्करी खात्यात देखरेख करीत असे. तुघलक सुलतानांच्या काळात वझीराला महत्त्व आले. वझीर हा दीवान-इ-विझारतचा प्रमुख असे. त्याच्या खात्यात टांकसाळ, वास्तुशिल्प, गुप्तहेर, शेतकी इत्यादींचा समावेश केलेला असे. वझीराच्या कर्तृत्वावर सुलतानाचे भवितव्य अवलंबून असे. दीवान-इ-विझारतच्या खालोखाल दीवान-इ-अर्झ, दीवान-इ-रिसालत, दीवान-इ-रियासत, दीवान-इ-इन्शा ही खाती होती. दीवान-इ-अर्झ खात्याकडे लष्कराची व्यवस्था असे. या खात्याचा मुख्य आरीझ-इ-मालिक हा असे. दीवान-इ-रिसालत खात्यात लोकांच्या गाऱ्हाण्यांचा विचार होत असे. ⇨ फिरोझशाह तुघलकाच्या काळात या खात्याला महत्त्व आले होते. अलाउद्दीन खल्जीच्या काळात दीवान-इ-रियासत हे खाते उघडण्यात आले. या खात्यात व्यापाऱ्यांची नोंद, जकात, बाजारात वापरण्यात येणारी वजनमापे याची नोंद केली जाई. अलाउद्दीन खल्जीनंतर हे खाते जवळजवळ बंद पडले. दीवान-इ-इन्शा या खात्याकडे स्थानिक कारभारावर देखरेख ठेवण्याचे काम असे. केंद्रीय व स्थानिक कामांचा या खात्यातून संबंध राखला जाई. फीरूज तुघलकाच्या काळात या खात्याचे महत्त्व कमी झाले. याशिवाय सद्र म्हणून एक मंत्री किंवा मुख्य काझी असे. हा मुख्य न्यायाधीश असून धार्मिक बाबतीत तोच मुख्य अधिकारी असे. मज्लिस-इ-खिल्वत म्हणून सुलतानाचे एक सल्लागार मंडळ असे. यात सुलतानाचे मित्र व विश्वासू अधिकारी असत. हे मंडळ वेळोवेळी सुलतानाला सल्ला देई. पण या मंडळाने दिलेला सल्ला सुलतानावर बंधनकारक नसे. राजप्रासादात ३६ कारखाने (खाती) असत. यात रातिबी व घैर हे दोन प्रकार असत : रातिबी प्रकारात फालखाना, पायगाह (पागा), शराबखाना, सागखाना, आबदारखाना इ. कारखान्यांचा समावेश होई. घैर प्रकारात जामदारखाना, आलमखाना, फरासखाना, रिकाबखाना, झरादखाना, सिलहखाना, ताशतादारखाना इ. कारखान्यांचा समावेश केलेला असे. या सर्व कारखान्यांवर बराच पैसा खर्च केला जाई. सर्व कारखान्यांवर देखरेख ठेवण्यासाठी एक वेगळा अधिकारी नेमलेला असे. प्रत्येक कारखान्याला आपला हिशाब ठेवावा लागे. बरीद-इ-ममालिक या गुप्तचर खात्यात बारिद हे बातमीदार व गुप्तहेर म्हणून काम करीत. बारिदांची संस्था महत्त्वाची असून सबंध राज्यात बारिद पसरलेले असत. या बारिदांची सुभेदार व इतर अधिकारी यांच्या हालचालींवर देखरेख असे. बारिदांनी पाठविलेली माहिती सुलतान ग्राह्य मानीत.


प्रांतीय प्रशासनव्यवस्था : राज्यव्यवस्थेच्या सोयीसाठी विभागलेले प्रांत सारखे नव्हते. सुलतानांच्या कारकीर्दीत तीन प्रकारचे प्रांत होते. प्रांतांना इक्ता म्हणत. पहिल्या प्रकारच्या प्रांतांत मुलतान, पूर्व पंजाब व आधुनिक उत्तर प्रदेश समाविष्ट केलेला असे. दुसऱ्या प्रकारात गुजरात, माळवा, बिहार व बंगाल हे प्रांत मोडत. तिसऱ्या प्रकारात सुलतानाची नावालाच सत्ता मानणारे परंतु खंडणी देणारे सत्ताधीश असत. पहिल्या प्रकारचे प्रांत लहान असून त्यांवर सुलतानांची देखरेख राहू शके. अशा प्रकारच्य प्रांताच्या सुभेदारांना काली किंवा मुक्ती म्हणत. त्याचे अधिकार मर्यादित असत. दूरवरच्या प्रांतांवर सुलतानांची देखरेख राहू शकत नसे. तेथील सुभेदारांनची नेमणूक सुलतानाकडून होत नसे. दूरवरचे सुभेदार इमारत-इ-काशा म्हणून ओळखले जात. बंगाल, गुजरात व दक्षिण हिंदुस्थान हे या प्रकारच्या प्रांतांत मोडत. दक्षिण भाग देवगिरी, मतबार, तेलंगण, द्वारसमुद्र या चार छोट्या प्रांतांत विभागलेला होता. प्रांतांची व्यवस्था केंद्राप्रमाणेच असे. प्रांतीय सुभेदारांना पुष्कळसे स्वांत्र्य असले, तरी त्यांच्यावर अशा तऱ्हेने दाब असे की, त्यामुळे त्याच्या महत्त्वाकांक्षा दबल्या जात. सुलतान सर्वसत्ताधारी असल्याने त्यास प्रांतीय सुभेदाराला काढून टाकण्याचा अधिकार असे. एखाद्या सुभेदाराविरुद्ध लोकांना सुलतानाकडे तक्रार करता येत असे. सुभेदाराची बदली करण्याचा अधिकार सुलतानाला असे. प्रांताधिकांऱ्यांना आपापल्या प्रांतात शांतता व सुव्यवस्था ठेवावी लागे. एखादा सुलतान दुर्बल निघाला तर प्रांतीय अधिकारी त्याच्यावर हुकमत गाजवीत असत. प्रत्येक प्रांतात महसूल मंत्री असून, तो सुलतानाने नेमलेला असे.

तेराव्या शतकात इक्ताच्या खालोखाल प्रांतांची विभागणी केलेली नव्हती. परंतु चौदाव्या शतकात प्रांत निरनिराळ्या जिल्ह्यांत विभागलेले होते. लहान प्रांतांना शिक्क म्हणत. जिल्ह्यातील प्रमुख सरकारी अधिकाऱ्याला शिक्कदार म्हणत. हा लष्करी अधिकारी असून जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याचे काम त्याच्याकडे असे. शिक्कचा लहान घटक परगणा असे. परगण्याच्या मुख्य गावास कसबा म्हणत. एका परगण्यात सुमारे शंभर खेडी असत. फौजदार हा परगण्याचा मुख्य अधिकारी असे. त्याला शांतता व सुव्यवस्था ठेवावी लागे. प्रांतातील सगळ्यात लहान घटक खेडे असे. सुलतानांनी खेड्यांतील व्यवस्था पूर्ववत चालू ठेवली होती. मुकादम, खोत, चौधरी यांच्यामार्फत खेड्याचा कारभार चाले. अलाउद्दीनच्या केंद्रीकरणाच्या धोरणामुळे खेड्यातील अधिकाऱ्यांचे महसूल गोळा करण्याचे काम कमी झाले. प्रत्येक खेड्यात पटवारी, पाटील व चौकीदार असत.

  लष्करी व्यवस्था : दिल्लीच्या सुलतानाचे राज्य हे त्यांच्या जवळ असलेल्या लष्करी सामर्थ्यावर आधारलेले होते. सर्व सत्ता लष्करी बळावर अवलंबून असल्यामुळे सुलतानांना स्वतःचे असे स्थायी सैन्य बाळगावे लागे. या स्थायी सैन्याव्यतिरिक्त सुलतान प्रांताधिकारी, जहागीरदार, सुभेदार यांच्याकडून सैन्याची भरती करी. लष्करात नोकरी करणे हे सक्तीचे असे. सुलतानाकडे असलेल्या सैनिकांना खासह खैल म्हणत. सुलतानांची लष्करी व्यवस्था तुर्की पद्धतीवर आधारलेली होती. खान व मलिक अमीर या उतरत्या क्रमाने अधिकाऱ्यांची वर्गवारी केलेली असे. राज्यातील सर्व सैन्य वली व इकतादार यांत विभागलेले असून ते महत्त्वाच्या ठिकाणी नेमलेले असत. अमीरउमराव व इतरत्र होत असलेली सैन्य भरतीची पद्धत सुलतानशाहीच्या अखेरीपर्यंत चालू होती. या पद्धतीतील दोष नाहीसे करण्यासाठी बल्बनने महत्त्वाच्या ठिकाणी आपले लोक नेमले. निरनिराळ्या अमीरउमरावांच्या तुकड्यांनी मोगलांच्या स्वाऱ्यांचा प्रतिकार केला होता. सुलतानांचे सैन्य देशभर पसरलेले असे. केंद्र सरकारात असलेल्या स्थायी सैन्याची संख्या घोडदळ व पायदळ मिळून जवळ-जवळ पाच-सहा लाख असे. बल्बनने लष्कराकडे विशेष लक्ष दिले. त्याने लष्करी खात्याचा मुख्य आरीझ याचे अधिकार वाढविले, त्याला मंत्र्यांचा दर्जा दिला.

अलाउद्दीनने लष्करी खात्यात सुधारणा करून सैन्यदलाचे केंद्रीकरण केले. तो सैनिकांना रोख पैशात पगार देऊ लागला. आरीझकडून सैनिकांची परीक्षा घेतल्यानंतर त्यांची नावे नोंद वहीत नोंदविली जात. अलाउद्दीनने घोड्यांना खूण असावी, म्हणून त्यांना डाग देण्याची पद्धत पाडली. आरीझच्या खात्यात स्थायी सैनिकांची व इतर ठिकाणच्या सैनिकांची नोंद ठेवून त्यांची पटावर नावे घालण्याची पद्धत सुरू झाली. ही पद्धत सुलतानशाहीच्या अखेरीपर्यंत चालू होती. आरीझचे काम वाढताच त्याला नायब आरीझ, कारकून इ. देण्यात आले. केंद्रात आरीझच्यामार्फत भरती केली जाई. प्रांतात सुभेदार व इकतादार भरती करत. सैन्यदलात कायमचा सरसेनापती नसे. सुलतान स्वतःच सैन्य दलात मुख्य व सरसेनापती असे. आरीझ-इ-मुमालिक व नायब आरीझ-इ-मुमालिक हे महत्त्वाचे अधिकारी असत. सैनिकांचा पगार निरनिराळ्या सुलतानांच्या काळात वेगवेगळा होता. सैनिकांना इनाम जमिनी दिल्या जात. लढाईतील लुटीत त्यांचा काही वाटा असे. अलाउद्दीनने ही पद्धत बंद केली.

फिरोझशाह तुघलकाने लष्करी व्यवस्था सरंजामशाही पद्धतीवर चालू केली होती. लोदी सुलतानांच्या काळात सैन्यात लोदी, करमाली, लोहानी, सूर व अफगाण इ. टोळ्यांतील लोकांची भरती असल्याने गैरशिस्त वाढली. लढाईच्या काळात प्रांतीय व जहागिरदारांचे सैन्य दिवाण-इ-आरीझच्या नेतृत्वाखाली काम करीत असे. सैन्यभरती व बढती करण्यात सर्वत्र एकसारखे नियम नसत. हिंदूविरुद्ध लढताना परदेशीय मुसलमानांना सुलतानाच्या सैन्यात सामील व्हावे लागे. मौलवी व उलेमा गावात फिरून मुसलमानांना हिंदू जनतेविरुद्ध लढण्यास भाग पाडीत. सैनिक दल हे राष्ट्रीय दल नसून त्यात तुर्क, ताजीक, इराणी, मोगल, अफगाण इ. परकीय मुसलमानांचा भरणा असे.

सुलतानांच्या सैन्यात घोडदळ, पायदळ व हत्तीदळ असे. हत्तीदळाला विशेष महत्त्व असे. हत्तींच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक खास अधिकारी नेमलेला असे. घोडदळाचा विभागही महत्त्वाचा समजला जाई. पायदळात हिंदू व मुसलमान असून ते तलवारी, भाले, धनुष्यबाण इ. शस्त्रे वापरीत. बहुतेक सुलतान कसलेले योद्धे असून तत्कालीन युद्धकलेत तरबेज होते. हेरपाठवून शत्रूंच्या हालचालींची बातमी आणणे, रात्रीचे छापे घालणे, हुलकावणी देऊन शत्रूस पेचात पकडणे इ. युद्धकौशल्याच्या बाबतीत मुसलमान पूर्णपणे तरबेज होते. युद्धक्षेत्राची पहाणी व मोजणी करून भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात येई.

किल्ले हे संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक समजले जात. बल्बनने किल्ल्यांकडे विशेष लक्ष दिले. त्याने सरहद्दीवर किल्ले बांधले. मोगलांच्या स्वाऱ्यांनंतर अलाउद्दीन खल्जीने जुने गड दुरुस्त केले. काही नवीन बांधले. किल्ल्याच्या व्यवस्थेसाठी कोतवाल, काझी, मिरदाद नेमलेले असत. किल्ल्यांच्या बंदोबस्तासाठी काही गावे लावून दिलेली असत.


आर्थिक स्थिती : सुन्नी विधिशास्त्रापैकी हनफी शाखेच्या तत्त्वानुसार सुलतानांनी आपले जमाबंदीविषयक धोरण आखले होते. मुसलमानी धर्माचार्यांनी स्वधार्मिक व परधार्मिक असे महसुलाचे दोन प्रकार केले होते. स्वधार्मिक वसुलात जकात व अशर कर असून ते फक्त मुसरमानांकडून घेतले जात. परधार्मिक महसुलात जझिया, खराज, खमस हे कर समाविष्ट असत. राज्याला या करांचे उत्पन्न होत असे. अशर हा जमिनीवरील कर असून तो मुसलमानांकडून उत्पन्नाच्या एक-दशांश घेतला जाई. खराज हा जमिनीवरील कर मुसलमानेतरांकडून उत्पन्नाच्या एक-पंचमांश घेतला जाई. खमस कर हिंदूविरुद्ध झालेल्या लढाईत मिळालेल्या लुटीतील एक-पंचमांश भाग घेतला जात असे. जकात हा धार्मिक कर असून तो मुसलमानांकडून वसूल केला जात असे. हा वसूल केलेला कर मुसलमानांच्या धार्मिक कारणासाठी वापरला जात असे. हा उत्पन्नाच्या एक-चाळीशांश असे. जझिया कर हा मुसलमानेतरांकडून त्यांच्या संरक्षणार्थ घेतला जाई. यासाठी हिंदू जनतेचे तीन वर्गात वर्गीकरण केले होते. याचे दर निरनिराळ्या वेळी निरनिराळे होते पण सामान्यतः पहिल्या वर्गातील लोकांकडून रू. ४८, दुसऱ्या वर्गातील लोकांकडून रू. २४ व तिसऱ्या वर्गातील लोकांकडून रू. १२ याप्रमाणे घेतला जात असे. मुले, आंधळे, पांगळे, भिकारी, रोगी यांना हा माफ असे.

वर दिलेल्या करांशिवाय खाणी, निपुत्रिकांची संपत्ती, पशू, घरे, कुरणे, व्यापारी मालावरील जकात इ. गोष्टींवरील कर ही उत्पन्नाची साधने असत. परदेशातून आलेल्या मालाच्या किंमतीवर व घोड्यांवर ५%कर घेतला जाई. हाच कर हिंदूंकडून दुप्पट प्रमाणात घेतला जाई. काही सुलतान घरे, कुरणे, कालव्याचे पाणी यांवर व काही किरकोळ कर घेत असत.

उद्योगधंदे : मध्ययुगात कृषिप्रधान भारताची आर्थिक सुस्थिती होती. आरंभीच्या काळात तुर्क लोकांच्या स्वाऱ्यांत त्यांनी सर्व संपत्ती लुटून नेली नव्हती किंवा उत्पादक-साधक संपत्तीच्या नायनाट केला नव्हता. तुर्क-अफगाण काळात आणि त्यापूर्वी सर्व देश सुसंपन्न होता. शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन होते. सुपीक जमीन, चांगला पाऊस, मेहनती शेतकरी व फिरोझाशाह तुघलकाने केलेल्या शेतीविषयक सुधारणा यांमुळे शेतीचे उत्पादन इतके वाढले की, देशाला धान्याचा पुरेसा पुरवठा होऊन धान्य निर्यात केले जाई. कापूस, ऊस, मसूर, गळिताची धान्ये, खसखस, तीळ इ. पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होई. मासेमारी, खनिजे, मीठ, अफू, दारू इ. कृषिव्यतिरिक्त उद्योगधंदे चालत. औद्योगिक दृष्ट्या येथील धंदे व्यवस्थित चालत. सोने, लोखंड, तांबे अनेक ठिकाणी उपलब्ध होई. खेड्यातील हस्तव्यवसायाचे उद्योग व व्यापारी संघ यांमुळे मोठ्या प्रमाणावर व्यापार होई. या सर्व उद्योगधंद्यांना सरकारी पाठबळ नव्हते तथापि परकीय आक्रमणे व अंतर्गत लढाया यांपासून ते कसेबसे सुरक्षित राहिले.

सुलतानांचे स्वतःचे असे अनेक कारखाने होते. यांत हजारो विणकर रेशमी व सुती कापड विणण्यात गुंतलेले असत. खाजगी उद्योगात कापड विणण्याचा उद्योग, कापड उत्पादन, रंगाई-छपाई, धातुकाम, सुतारकाम, जडावाचे व मुलाम्याचे दागिने इ. उद्योगधंदे चालू असत. तुर्क-अफगाण काळात केंद्रीय सरकारने लोकांच्या हिताच्या दृष्टीने जरी व्यापक धोरण अंगीकारले नव्हते, तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर अंतर्गत व बाहेरील व्यापार चाले. हिंदुस्थानचे इतर देशांशी व्यापारी संबंध असून धान्य, कापड, अफू, नीळ, जस्त वगैरे गोष्टी निर्यात केल्या जात. घोडे, खेचरे व चैनीच्या वस्तू आयात केल्या जात. जगातील सर्व व्यापारी हिंदुस्थानात सोने नेऊन त्या बदल्यात डिंक, वनस्पती व मसाल्याचे पदार्थ नेण्याची संधी कधी दवडीत नसत.

सुलतान, अमीरउमराव, उच्च पदाधिकारी व हिंदू राजे या ठराविक वर्गातच संपत्तीचा मोठा भाग होता. ही सर्व मंडळी खूप थाटात रहात. मध्यम वर्गातील काही अधिकारी व व्यापारी सुस्थितीतले होते. परंतु बहुजन समाजाच्या जीवनावश्यक गरजाही पुऱ्या होऊ शकत नव्हत्या. सरकारी कर व महसूल अधिकाऱ्यांची लोभी वृत्ती यांमुळे शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाचा एक-तृतियांश भाग पडत असे. एकंदर या लोकांवर करांचा बोजा फार असे. अवर्षणाने पडलेला दुष्काळ, परकीय आक्रमणे व नैसर्गिक आपत्ती यांमुळे हजारो लोक मृत्यूमुखी पडत, दळणवणांच्या गैरसोयीमुळे सर्वत्र सारखे भाव नसत.

न्यायव्यवस्था : न्यायव्यवस्था सुसंघटित नव्हती. सुलतान हाच राज्याचा सर्वोच्च न्यायाधीश होता. कुराणातील कायद्यानुसार तो न्यायाची अंमलबजावणी करी. आठवड्यातून दोनदा दरबार भरवून तो स्वतःच खटल्यांचे निर्णय देई. दिल्लीचे सुलतान न्यायाचे महत्त्व जाणत. कायदा मोडला जाणार नाही, याची दक्षता घेत. मुसलमानापुरता पक्षपातीपणाने न्यायनिवाडा केला जाई. कुराणोक्त कायदाच प्रचलित होता. साक्षीपुराव्याची लेखी नोंद घेतली जात नसे. गुन्ह्याची चौकशी तोंडी, जेथल्या तेथे करून तडकाफडकी निकाल दिले जात. भिन्न धर्मीय पक्षकार असलेल्या नित्याच्या व्यवहारातील खटल्यांचे निर्णय पारंपरिक कायद्यानुसार दिले जात. परंतु ते कायदे लिखित नसल्याने न्यायाधीशाच्या लहरीनुसार कायद्याचा अर्थ लावला जाई.

राज्यात कायद्याची अंमलबजावणी नीटपणे केली जाते की नाही याची काळजी कुत्बुद्दीन ऐबक घेई. निःपक्षपातीपणाने न्यायनिवाडा केला जाई. अल्तमशने ऐबकचे धोरण अंगीकारले होते. बल्बन न्यायादानाच्या बाबतीत निःपक्षपाती होता. नातेवाईक किंवा मुले यांच्या हातून गुन्हा घडला, तरी तो त्यांना कडक शिक्षा करण्यास मागेपुढे पाहत नसे. सर्वांना सारखा न्याय लागू करण्यात येई. जलालुद्दीन खल्जी क्वचितच कडक शिक्षा करीत असे. गुन्हेगारांना तो शक्यतो समज देऊन मुक्त करी, सोडून देई. त्यामुळे शिस्त नाहीशी झाली. अलाउद्दीन खल्जीने कडक धोरण अंगीकारून राज्यात वाढलेल्या बेशिस्तपणाला आळा घातला. कित्येकदा तो इस्लामी कायद्याविरुद्ध असलेल्या शिक्षा देई. बल्बनप्रमाणे अलाउद्दीन खल्जी राज्यात हेर नेमून त्यांच्याकडून माहिती काढी. त्यामुळे चोर व दरवडेखोर यांचा बंदोबस्त झाला. अलाउद्दीनने वैयक्तिक व सामाजिक कायद्याचे क्षेत्र अलग केले. मुसमानांच्या वैयक्तित कायद्याच्या बाबतीत त्याने काझी व मुफ्ती यांना धार्मिक हुकमाप्रमाणे वागण्यास सांगितले. राज्याच्या हिताच्या दृष्टीने सामाजिक कायदा अंमलात आणण्यात येई. घियासुद्दीन तुघलकाने शरीयतच्या आधारावर दिवाणी कायद्याची संहिता तयार करवून घेतली. मुहम्मद तुघलकाने दरबारात चार मुफती नेमले. गुन्हेगारांना फाशी देण्यापूर्वी तो त्यांचा सल्ला घेई. मुहम्मद तुघलक न्यायदानाच्या बाबतीत विशेष काळजी घेई. त्याने सर्वांना एकच कायदा लागू केला होता.


सुलतानशाहीच्या काळात धार्मिक गुन्हे, दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांपासून अलग करण्यात आले. दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांबाबत सुलतानाला सर्वश्रेष्ठ अधिकार होते. सुलतानाच्या खालोखाल मुख्य न्यायाधीशाचे काझी-उल्-कुझ्झातचे न्यायालय होते. १२४८ मध्ये सद्र-इ-जहान स्थापन झाल्यापासून काझी-उल्-कुझ्झातचे महत्त्व कमी झाले. धार्मिक बाबतीत देखरेख ठेवण्याचे काम काझी-उल्-कुझ्झात करीत असल्यामुळे न्यायदानाच्या बाबतीत गोंधळ निर्माण झाला. अलाउद्दीन खल्जीने सद्र-इ-जहान व काझी-उल्-कुझ्झातचे एकीकरण करून त्या जागी काझी सदुद्दीन आरिफची नेमणूक केली. फिरोझशाह तुघलकाच्या कारकीर्दीत ही खाती पुन्हा अलग करण्यात आली. सद्र-इ-जहानला शैक्षणिक संस्था, विद्वानांना दिलेली इनामे आणि अनुदाने व न्याय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे काम करावे लागे. ही जागा निर्माण केली असली, तरी न्यायदानाचे काम काझी-उल्-कुझ्झातच करी. तोच खरा मुख्य न्यायाधीश होता. त्याच्या मदतीसाठी दोन काझी नेमलेले असत. तो दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांबाबत निकाल देई. याशिवाय प्रांतीय सुभेदारांकडून आलेल्या गुन्ह्याबाबत त्याला निर्णय द्यावा लागे, काझी उल्-कुझ्झातची नेमणूक सुलतानाकडून होई. सुलतानाच्या राज्यारोहणप्रसंगी होणाऱ्या शपथविधीचा कार्यक्रम तोच करी. दिल्लीच्या राजधानीच्या ठिकाणी सुलतानाचे वैयक्तिक न्यायालय, सद्र-इ-जहान व काझी-उल्-कुझ्झातचे न्यायालय असे.

प्रांतीय न्यायदानाच्या बाबतीत सुभेदार, काझी-इ-सुबह, दिवान-इ-सुबह, सद्र-इ-सुबह अशी चार न्यायालये होती. सुभेदार हाच मुख्य न्यायाधीश असे. याशिवाय मुफ्ती, मुहतसिब, पंडित व दादबक हे अधिकारी असे. सुभेदार हा सुलतानाचा प्रतिनिधी असून न्यायादानाचे काम त्याला करावे लागे. अपिलाच्या खटल्यासंबंधी तो काझी-इ-सुबह व इतरांचे साह्य घेत असे. सुभेदाराच्या खालोखाल काझी-इ-सुबह याचा अधिकार असे. त्याची नेमणूक काझी-उल्-कुझ्झातच्या सांगण्यावरून सुलतानाकडून होई. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध फक्त सुभेदाराला निर्णय घेता येत असे. दिवाणी व फौजदारी खटल्यांचा निकाल देण्याचा अधिकार त्याच्याकडे असे. प्रांतीय उपसुभ्यातील न्यायदानाची पद्धत साधी होती. तेथील न्यायालयात काझी, फौजदार, आमिल, दादबक, कोतवाल व पंचायतचा समावेश असे.

सुलतानशाहीच्या काळात गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिल्या जात. बल्बनच्या कारकीर्दीत एखाद्याचा कोणी खून केला, तर खुनी इसमास देहान्ताची शिक्षा सुनावली जाई. अफरातफर, अप्रामाणिकपणा, सट्टेबाजी इ. गुन्ह्यांबाबत कैद, काठीने मारणे, चिमटे काढणे, हाल करणे इ. शिक्षा दिल्या जात. सरकारी अधिकाऱ्यांच्या हातून वरील गुन्हे घडले, तर त्यांचे अवयव तोडले जात. मुहम्मद तुघलकाच्या कारकीर्दीत धर्मभ्रष्टता, खून, व्यभिचार, सुलानाविरुद्ध कट, कारस्थाने, बंड, राजाच्या शत्रूशी मैत्री किंवा त्यांना माहिती पुरविणे इ. गुन्ह्यांबाबत देहान्ताची शिक्षा दिली जाई. याशिवाय हातपाय तोडणे, डोळ्यात तळपती सळई खुपसणे, घशात पातळ शिसे ओतणे, हातापायाची हाडे हातोड्यांनी तोडणे, शरीराची शकले करणे इ. कडक शिक्षा सुलतान देत. फिरोझशाहाने वरील कडक शिक्षा कमी केल्या.

प्रादेशिक राज्ये : फिरोझशाह तुघलकाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या सुलतानांची सत्ता झुगारून हिंदुस्थानात अनेक छोटी राज्ये अस्तित्वात आली. या सगळ्या राज्यांत जौनपूरचे राज्य प्रथम स्वतंत्र झाले.

जौनपूर : (१३९४–१४७७). तैमूरलंगच्या स्वारीच्या वेळी दिल्लीची सत्ता झुगारून जौनपूरचा सुभेदार मलिक सर्वर हा स्वतंत्र झाला. त्याने जौनपूर येथे शर्की घराण्याची सत्ता प्रस्थापन केली. त्याने अयोध्या आणि दुआबपर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याच्या मृत्यूनंतर मुबारकशाह-इब्राहिमशाह गादीवर बसले. या घराण्यातील इब्राहिमशाह हा सर्वांत कर्तबगार सुलतान. तो विद्येचा भोक्ता होता. त्याला नवीन इमारती बांधण्याचा शोक होता. त्याच्या कारकीर्दीत जौनपूर हे हिंदुस्थानचे शीराझ म्हणून ओळखले जाई. इब्राहिमची मुलगा महमूदशाह हा १४३६ मध्ये गादीवर आला. त्याने दिल्लीवर स्वारी केली असता बहलूल लोदीने त्याचा पराभव केला. त्यानंतर मुहम्मदशाह व हुसेनशाह गादीवर बसले. हुसेनशाह शर्की घराण्यातील शेवटचा सुलतान. बहलूल लोदीने त्याचा पराभव केला. तेव्हा तो बिहारमध्ये निघून गेला. शर्की सुलतानांनी सांस्कृतिक व शैक्षणिक उद्योगांना उत्तेजन दिल्यामुळे जौनपूर हे विद्या व संस्कृतीचे केंद्र बनले.

माळवा : (१३९८–१५३१). माळव्याच्या प्रदेशात पुष्कळ दिवस हिंदूंचे राज्य होते. अलाउद्दीनाने तो प्रांत ताब्यात आणून तेथे आपला सुभेदार नेमला (१३०५). तैमूरलंगच्या स्वारीच्या वेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन तेथील सुभेदार दिलावरखान घोरी १३९८ मध्ये स्वतंत्र झाला. तेव्हापासून तेथे स्वतंत्र मुसलमानी सुलतानांचा अंमल सुरू झाला. १४०६ मध्ये दिलावरखानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अल्पखान हूशंगशाह या नावाने गादीवर बसला. १४२२ मध्ये त्याने ओरिसावर स्वारी केली. त्याचे दिल्ली, गुजरात, जौनपूर व बहमनी सुलतानाशी भांडण झाले. १४३५ मध्ये त्याचा मुलगा घाझीखान मुहम्मदशाह या नावाने गादीवर बसला. एका वर्षात त्याच्या मंत्र्याने-महमूदशाहाने त्याला पदच्युत केले. महमूदशाह हा माळव्याच्या खल्जी घराण्याचा संस्थापक, त्याने गुजरातच्या अहमदशाह, दिल्लीच्या मुहम्मदशाह, तिसरा सय्यद बहमनी व मेवाडचा राणा कुंभ यांबरोबर लढाया केल्या. तो कर्तृत्ववान सुलतान असून त्याला ईजिप्तच्या खलीफाची मान्यता मिळाली होती. त्यानंतर घियासुद्दीन, नासीरूद्दीन, दुसरा महमूद हे गादीवर आले. मेवाडच्या राणा संगाच्या मदतीने मेदिनी रायने त्याचा पराभर केला. १५३१ मध्ये गुजरातच्या बहादुरशाहाने महमूदाचा पराभव करून, माळव्याचे राज्य गुजरात राज्यात समाविष्ट केले.

गुजरात : अलाउद्दीन खल्जीने गुजरात प्रांत १२९७ मध्ये दिल्लीच्या राज्याला जोडला होता. १४०१ मध्ये तेथील सुभेदार झफरखान हा स्वतंत्र झाला. झफरखान मुजफ्फरशाह या नावाने तो राज्य करू लागला. तो १४११ मध्ये मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पहिला अहमदशाह गादीवर आला. १४११ ते १४२२ पर्यंत त्याने राज्य केले. गुजरातच्या सुलतानांमध्ये हा कर्तृत्ववान होता. यानेच ⇨ अहमदाबाद हे नवीन शहर स्थापन केले. भव्य इमारती व मशिदी बांधल्या. मात्र त्याने हिंदूंचा छळ करून त्यांची अनेक देवळे पाडली व मूर्ती फोडल्या. त्याच्यानंतर दुसरा मुहम्मुद अहमद दाऊद व महमूद बेगडा हे सुलतान गुजरातच्या गादीवर बसले. महमूद बेगडाने १५११ पर्यंत राज्य केले. या घराण्यात हाच प्रख्यात होता. याने पोर्तुगीज लोकांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला, पण अखेरीस त्यांना दीव येथे वखार घालण्यास त्याने परवानगी दिली. त्याच्यानंतर दुसरा मुजफ्फर व बहादुरशाह गादीवर आले. बहादुरशाह व मोगल हुमायून यांच्या संघर्ष होऊन, हुमायूनने त्याचा पराभव केला. पुढे १५२७ मध्ये अकबराने हे राज्य खालसा केले.


बंगाल : (१३४०–१५७६). बाराव्या शतकाच्या अखेरीस मुहम्मद घोरीचा सरदार मुहम्मद-बिन-बख्‌तियार खल्जी याने बंगालचे राज्य जिंकले. त्याच्या मरणानंतर त्याचे वारसदार स्वतंत्र झाले. बल्बनने बंगालच्या सुभेदारांना आपली सत्ता मान्य करण्यास भाग पाडले. त्याने तेथे बुछाखान हा सुभेदार नेमला. बल्बनच्या मृत्यूनंतर बुछाखान स्वतंत्र झाला. बंगालमधील तंटे मिटविण्यासाठी घियासुद्दीन तुघलकाने बंगालचे लखनौती, सातगाव व सुनारगाव हे तीन विभाग केले. १३४५ मध्ये हाजी इलियास याने हे विभाग मोडले, पुढे संयुक्त बंगालचा तो सुलतान झाला. फीरूझ तुघलकाने त्याच्या विरुद्ध स्वारी केली होती पण त्याला बंगाल जिंकता आला नाही. १३५७ ते १४१० पर्यंत सिकंदर, घियासुद्दीन आझम आणि सैफुद्दीन हमझाशाह हे सुलतान होऊन गेले. सैफुद्दीन हमझाशाह दुर्बल सुलतान असल्याने दिनाजपूर प्रदेशातील मेतूरिया राजा गणेश यांनी आपल्या हातात सत्ता घेऊन, स्वतःला राजा म्हणून जाहीर केले. स्वतःच्या मुलासाठी त्याने पदत्याग केला. जदूने मुसलमान धर्म स्वीकारून जलालुद्दीन मुहम्मदशाह हे नाव धारण करून राज्याची सूत्रे घेतली. त्यानंतर १४६० पर्यंत शम्सुद्दीन अहमद, दोन दुर्बल सुलतान व नासीरूद्दीन हे सुलतान होऊन गेले. पुढे बंगालमध्ये गोंधळ उत्पन्न झाला. १४९३ मध्ये अलाउद्दीन हुसैनशाह हा सुलतान झाला. त्याच्या वारसदारांनी ५० वर्षे बंगालमध्ये राज्य केले १५१८ मध्ये गादीवर बसलेला नुस्त्रतशाह लायक सुलतान होता. कला व साहित्य यांचा तो भोक्ता होता. त्याच्या उदार आश्रयाखाली रामायणमहाभारताचे बंगालीत भाषांतर झाले. बंगालचा घियासुद्दीन महमूदशाह हा शेवटचा सुलतान. १५३८ मध्ये शेरशाह सुरने त्याला हुसकले.

काश्मीर : (१३३९–१५८६). शेवटच्या हिंदूराजाच्या पदरी असलेल्या शाह मिर्झा नावाच्या सरदाराने विश्वासघाताने काश्मीरची गादी १३३९ मध्ये बळकाविली. शमसुद्दीन शाह या नावाने तो राज्य करू लागला. १३४९ मध्ये तो मरण पावल्यावर त्याच्या चार मुलांनी -जमशीद, अलाउद्दीन, शिहाबुद्दीन आणि कुत्बुद्दीन-शेहचाळीस वर्षे राज्य केले. कुत्बुद्दीनचा मुलगा सिकंदर १३९४ मध्ये सुलतान झाला. त्याने हिंदूंवर जुलूम करून त्यांना बाटविले. काश्मीरमधील सर्व ब्राह्मणांना त्याने हाकलून दिले. तेथील प्रसिद्ध मार्तंडाचे देऊळ व इतर अनेक मंदिरे त्याने पाडली. झैनुल-आबिदीन परधर्मसहिष्णू होता. त्याने जझिया कर रद्द केला (१४२०), गोवधास बंदी केली. त्याला अनेक भाषा येत होत्या. तो विद्येचा व कलेचा भोक्ता होता. त्याने अनेक सुधारणा केल्या. त्याच्या मागून आलेले सुलतान दुर्बल होते. १५४० मध्ये बाबरचा एक नातेवाईक मिर्झा हैदर याने काश्मीर जिंकले. १५५१ मध्ये त्याला पदच्युत करण्यात आले. १५५५ मध्ये कश्मीरमध्ये चक वंशाचे राज्य होते. १५६० मध्ये कश्मीर अकबराने खालसा केले.

ओरिसा : ओरिसामध्ये हिंदू राज्य असून १०७६ ते ११४८ र्प्यंत तेथे गंग राजे राज्य करीत होते. चोडगंगाने पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर बांधले. १४३४ पासून कपिलेंद्र कुलातील राजे तेथे राज्य करीत होते. पुरूषोत्तम रूद्राच्या काळात (१४७०–९७) राज्यास उतरती कळा लागली. त्याच्या वारसदारांच्या काळात राज्याचा बराचसा भाग विजयानगराच्या राजांना द्यावा लागला. १५१६ मध्ये विजयानगराच्या कृष्णदेवरायने ओरिसावरील स्वारीचा शेवट केला. गोवळकोंड्याचा संस्थापक कुत्बुलमुल्क याने १५४० मध्ये ओरिसाचे राज्य हस्तगत केले.

  कामरूप व आसाम : तेराव्या शतकात ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात अनेक स्वतंत्र राज्ये होती. त्यांतील कामरूप हे महत्त्वाचे होते. बंगालच्या अलाउद्दीन हुसैनने ते राज्य १४९८ मध्ये जिंकले परंतु १५१५ मध्ये कुच टोळ्यांपैकी विशासइनहास हा कामारूपाचा सत्ताधीश झाला. नर नारायण हा या घराण्यातील श्रेष्ठ राज्यकर्ता परंतु तेथील टोळ्यांतील अंतर्गत कलहामुळे आहोम व मुसलमान यांत राज्याची विभागणी झाली. १६३९ मध्ये कामरूपाचा पश्चिम भाग मुसलमानांच्या ताब्यात गेला. पूर्व भाग आहोमांच्या ताब्यात राहिला. त्यांची सत्ता जवळजवळ सहाशे वर्षे होती. सुलतानशाहीच्या काळात आसाम स्वतंत्र राहिला होता.

राजस्थान : मेवाड, मारवाड आणि आंबेर ही तीन स्वतंत्र राज्ये राजस्थानात होती.

मेवाड : राजपुतान्यात मेवाडचे राज्य प्रसिद्ध होते. गुहिलोत राजपूत घराणे सातव्या शतकापासून मेवाडमध्ये राज्य करील होते. अलाउद्दीन खल्‌जीने चितोड जिंकल्यानंतर मेवाडच्या काही भागावरच गुहिलोतांची सत्ता राहिली होती. राणा हमीराने राजधानी जिंकल्यानंतर तेथे १३६४ पर्यंत राज्य केले. या घराण्यात कुंभकरन अथवा कुंभ बराच प्रसिद्ध होता. त्याने कुंभळगड व इतर अनेक गड बांधले. त्याने माळवा व गुजरातच्या सुलतानांचा अनेक वेळा पराभव करून मेवाडचा दरारा व कीर्ती वाढविली. माळव्याविरुद्ध आलेल्या यशाची कीर्ती रहावी म्हणून त्याने चितोडगड येथे कीर्तिस्तंभ बांधला. बाबर भारतात आला त्यावेळी मेवाडमध्ये महाराणा संग (१५०९–२८) राज्य करीत होता. दिल्ली, माळवा व गुजरातविरुद्ध याने यशस्वीरीत्या लढत दिली. १५२७ मध्ये बाबरने खानवा येथे त्याचा पराभव केला. परंतु त्याला मेवाड जिंकता आले नाही. अकबर व महाराणा प्रताप आणि औरंगझेब व अजितसिंह या जोड्या त्यांच्या विरोधांमुळे प्रसिद्ध आहेत.

मारवाड : राष्ट्रकूट किंवा राठोड मारवाड येथे राज्य करीत होते. या घराण्यातील पहिला शासक चुंडा (१३९७–१४२१) होता. त्याच्यानंतर जोधाने राज्य केले. त्यानेच जोधपूरचा व मंडोरचा किल्ला बांधला. त्याच्या एका मुलाने १४६४ मध्ये बिकानेर स्थापन केले. मारवाडचा प्रसिद्ध राजा मालदेव (१५३२–६२) याचे व शेरशाहाचे भांडण झाले होते. आबेरचे राज्य हल्ली जयपूरचे राज्य म्हणून ओळखले जाते. दहाव्या शतकात स्थापन झालेले कच्छवाह घराणे तेथे राज्य करीत होते. चौदाव्या शतकात या राज्याला महत्त्व प्राप्त झाले. सोळाव्या शतकात आंबेरचे राज्य पहिल्या प्रतीचे समजले जात असे.

दक्षिण हिंदुस्थानातील राज्ये : खानदेश : तापी व तिच्या उपनद्या याची खोरी म्हणजे खानदेश. फिराझशाह तुघलकाच्या कारकीर्दीपर्यंत खानदेश हा दिल्ली सुलतानांच्या राज्यातील एक प्रांत होता. फिरोझशाहाच्या मृत्यूनंतर तेथील सुभेदार मलिक फारूकी १३८८ मध्ये स्वतंत्र झाला. यानंतर गादीवर बसलेला मलिक नासिर याने असीरगड हिंदू सुभेदाराकडून जिंकून घेतला. खानदेशचे गुजरात व बहमनी सुलतानांशी कायम झगडे चालत. पुढील शासक गुजरातच्या सुलतानांच्या वर्चस्वाखाली होते. १६०१ मध्ये अकबराने खानदेश आपल्या राज्याला जोडला.


बहमनी राज्य : मुहम्मद बिन तुघलकाच्या जुलमी वागणुकीमुळे दक्षिणेतील अनेक सरदारांनी बंडे पुकारली. त्यातील इस्माइल मख्र या नासिरूद्दीन शाहा या नावाने गादीवर बसला. त्याने राजीनामा दिल्यानंतर हसन याने अलाउद्दीन बहमन शाह या नावाने १३४७ मध्ये राज्य करण्यास सुरुवात केली. हाच बहमनी राज्याचा संस्थापक. थोड्याच दिवसांत त्याने आपल्या छोट्या राज्याचा विस्तार केला. गुलबर्गा (कलबर्गे) ही त्याची राजधानी. त्यानंतर त्याचा मुलगा पहिला मुहंमद (कर. १३५८–७५) हा गादीवर बसला. विजयानगर व वरंगळ राजांशी त्यांचे वैर होते. मुहमदनंतर मुजाहिदशाह, दाऊद शाह, दुसरा मुहंमदशाह गादीवर बसले. १३९७ मध्ये हसनचा नातू फिरोझ गादीवर बसला. १४२२ पर्यंत त्याने राज्य कले. यानंतर अहमदशाह (याने बीदरला राजधानी हलविली), दुसरा अलाउद्दीन, दुसरा मुहम्मद हे सुलतान होऊन गेले. दुसऱ्या मुहम्मदचा दिवाण महमूद गावानचा १४८१ मध्ये खून झाल्यानंतर बहमनी राज्य विस्कळीत झाले. यानंतर राज्यावर बसलेले सुलतान दुर्बळ होते. शेवटचा सुलतान कलिमुल्ला १५२७ मध्ये मरण पावल्यानंतर बहमनी राज्य संपुष्टात आले. बहमनी राज्यातूनच पुढे विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, बीदरची बरीदशाही व गोवळकोंड्याची कुत्बशाही ही पाच राज्ये निर्माण झाली. [⟶ आदिलशाही इमादशाही कुत्बशाही निजामशाही बरीदशाही बहमनी सत्ता].

मुहमद बिन तुघलुकाच्या काळात हरिहर व बुक्क यांनी १३३६ मध्ये विजयानगर राज्याची स्थापना केली. संगम (१३४०–१४४६), साळुव (१४८६–१५०५), तुळुव (१५०५–७०) आणि आरविडू (१५७०–१६१४) या चार वंशांतील राजांनी सु. तीनशे वर्षे राज्य केले. तुळुव वंशातील राजे कर्तबगार होते. ⇨ कृष्णदेवराय (कार. १५०९–२९) हा हिंदुस्थानच्या इतिहासातील कर्तृत्ववान राजा असून त्याच्या कारकीर्दीत विजयानगरचे राज्य उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचले होते. दक्षिणेतील पाच शाह्यांच्या सुलतानांनी विजयानगरच्या राजाचा तालिकोटच्या लढाईत पराभव केला (१५६५). उत्तरेत मुसलमान सुलतान आपला अंमल बसवीत असता, दक्षिणेत विजयानगरचे राज्य भरभराटीस आले. या राज्यामुळे दक्षिणेत मुसलमानांच्या राज्यविस्ताराला आळा बसला. विजयानगरच्या पराक्रमी राजांनी दोनशे वर्षांच्या वर आपले वर्चस्व कायम ठेविले. या राजांनी कृष्णेपासून कन्याकुमारीपर्यंत राज्याचा विस्तार करून बहमनी सुलतानांची परचक्रे परतविली [⟶ विजयानगर साम्राज्य].

धार्मिक स्थिती : अरब व तुर्क यांनी हिंदुस्थानात इस्लाम धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी स्वाऱ्या केल्या. देवळे पाडणे, मूर्ती फोडणे व त्या जागी मशिदी बांधणे याचा प्रारंभ मुहम्मद बिन कासिमने केला. हेच धोरण पुढील सुलतानांनी अंगीकारून राज्यविस्तार केला. महमूद गझनीने कांगडा, मथुरा, सोमनाथ ही हिंदूंची पवित्र स्थाने उद्‌ध्वस्त केली. कुत्बुद्दीन ऐबकने हजारो देवळे पाडली, मूर्ती फोडल्या व अनेक ब्राह्मणांची कत्तल केली. सुलतानांनी बिहारमधील बुद्धमूर्ती, मठ, स्तूप स्तंभ इ. फोडून त्या जागी मशिदी उभारल्या. याशिवाय हिंदूंना बाटविणे, लुटणे, त्यांच्या बायका पळविणे, मुलांना गुलाम करणे इ. प्रकार या काळात चालू होतेच. गुलाम घराण्यातील सुलतान धर्मवेडे होते. अलाउद्दीन खल्जीने हिंदूंचा छळ केला. आपल्या जुलमी कृत्यांनी सुलतानांनी एक प्रकारची दहशत निर्माण केली होती. या दहशतीच्या वातावरणामुळे अनेक हिंदूंना मुसलमानी धर्माची दीक्षा घ्यावी लागली. मुसलमानी धर्म स्वीकारलेल्या हिंदूंची स्थिती शोचनीय होती.

हिंदुस्थानात मुसलमानांची सत्ता स्थापन झाल्यानंतर त्या धर्माचा प्रसार करण्यासाठी सुलतानांनी प्रयत्न केले. धार्मिक बाबतीत मतभेद असल्यामुळे मुसलमान येथील संस्कृतीत एकरूप होऊ शकले नाहीत. परंतु दीर्घ कालाच्या सानिध्यामुळे हिंदू आणि मुसलमान यांचे एकमेकांच्या राहणीमानावर परिणाम झाले. कालांतराने दोहोंतील कटुता कमी झाली. दोहोंकडे अनेक धार्मिक पंथ निर्माण झाले. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात सूफी संप्रदायाचा प्रवेश हिंदुस्थानात झाला. सूफी पंथाच्या शिकवणीचा परिणाम हिंदू व मुसलमान यांवर झाला. सूफी संत धार्मिक रूढींवर टीका करीत असत. अजमेर येथील ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती हा या पंथाचा श्रेष्ठ संत. त्याचे अनेक शिष्य हिंदुस्थानात होऊन गेले. या पंथाचा प्रसार पंजाब, बिहार, गुजरात येथे प्रामुख्याने झाला. या पंथाच्या शिकवणीमुळे हिंदु-मुसलमानात सलोखा उत्पन्न झाला. हिंदू धर्मपंथांचा प्रसार होताच, पंधराव्या शतकात या पंथाचे महत्त्व कमी झाले.

उत्तरेत सूफी पंथाचा प्रसार होत असता दक्षिणेत भक्तिमार्ग फोफावत होता. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाची परंपरा घालून दिली. त्यांनी रचलेली ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेतील श्रीमद्‌भगवद्‌गीतेवरील पहिली टीका होय. होयसळ राजा बल्लाळ याच्या आश्रयास असलेल्या मुकुंदराजाने (११२८–९६) अनेक मराठी ग्रंथ लिहिले. त्यांनी रचलेल्या विवेकसिंधु या ग्रंथात अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार आहे. नामदेव व एकनाथ यांनी ज्ञानदेवांची परंपराच पुढे नेली. हिंदू धर्मात असलेल्या एकेश्वरत्वाला मुसलमानांच्या आगमनामुळे उत्तेजन मिळाले. रामानंदांनी हिंदू धर्माच्या रक्षणाचे काम केले. त्यांनी वैष्णव पंथाचा प्रसार केला. धार्मिक पुनरुज्जीवनाचा प्रारंभ रामानंद संप्रदायाने केला. रामानंदांच्या शिष्यगणात कबीर, रौनदास, पीपा, घन्ना, सेना असे कोष्टी, चांभार, राजपूत, जाट, न्हावी इ. सर्व जातीय लोक होते. कबीर रामभक्त असून त्याने भक्तिमार्गाचा प्रसार केला. कबीराला जातिभेद मान्य नव्हता. त्याने हिंदू व इस्लाम यांत फरक केला नाही.

रामानंद व कबीर यांच्या मताशी थोडाफार फरक असलेला कृष्ण चैतन्य हा मध्ययुगीन भारतातील बंगालमधील श्रेष्ठ संत. हा कृष्णभक्त असून त्याने भक्तिमार्गाचा प्रसार केला. बंगालमध्ये हा गौरांगप्रभू म्हणून ओळखला जातो. या संप्रदायाचे लोक चैतन्याला श्रीकृष्णाचा पूर्णावतार मानतात. बंगालमध्ये या संप्रदायाच्या अनेक शाखा आहेत.

पंजाबात गुरू नानक उदयास आले. त्यांनी हिंदू व मुसलमान यांत एकी करण्याचा प्रयत्न केला. हे शीख पंथाचे संस्थापक. ते काही काळ कबीराचे शिष्य होते. त्यांनी हिंदू व मुसलमान धर्मांतील ग्राह्य भाग एकत्र केला. हिंदू व मुसलमान असे दोन्ही त्यांचे शिष्य होते. त्यांच्या कवितांचा व वचनांचा संग्रह शिखांच्या आदिग्रंथ या धार्मिक ग्रंथात केला आहे.

सामाजिक स्थिती : सुलतानशाहीच्या काळात हिंदू व मुसलमान यांच्या सामाजिक स्थितीत बराच फरक होता. या दोन्ही वर्गांचे संबंध जेते आणि जित या नात्याचे असल्याने त्यांच्यात कायम झगडे चालू असत. सुलतानांनी दरबाराच्या कामात हिंदूंची मदत घेऊनही त्यांना मानाच्या व उच्च अधिकाराच्या जागा दिल्या नाहीत. त्यामुळे हिंदू व मुसलमान हे एकमेकांपासून अलिप्त राहिले होते. हिंदूंच्या बाह्य शक्तींवर मुसलमानांचा ताबा बसला पण सामाजिक व धार्मिक बाबतीत त्यांचा कायमचा पगडा बसू शकला नाही. मुसलमानांनी हिंदुस्थानातील प्रदेश जिंकला असला, तरी त्यांना हिंदू संस्कृती नष्ट करता आली नाही.  


सलतनतशाहीत विरोधी पुरुषांची व स्त्रियांची अत्यंत क्रूरतेने दुर्दशा करणे, त्यांना जन्मांध करून बंदिवासात लोटणे, शिरच्छेद करणे इ. निंद्य प्रकार नेहमी चालत. अशा कृत्यांचा परिणाम सूड घेण्यात होत असे. हिंदूंचा छळ करण्यात, त्यांची क्रूरपणे कत्तल करण्यात. मंदिरमूर्तीची मोडतोड करण्यात, त्यांच्या बायकांना आपल्या जनानखान्यात धाडण्यात व मुलांना गुलाम करण्यात आणि त्यांचा धर्म व संस्कृती नष्ट करण्यात सुलतानांना पुरुषार्थ वाटे.

मुसलमान शासक वर्गाचे प्रतिनिधी असल्याने त्यांना राज्याच्या सर्व सुखसोयी, सवलती आणि उच्च पदे प्राप्त होत. मुसलमानी समाजात तुर्क, उलेमा, मोगल, अरब व भारतीय मुसलमान असे वर्ग होते. त्या काळातील बहुतेक सुलतान तुर्क व पठाण जमातीचे होते. विशेषतः तुर्क सुलतानांना आपल्या रक्ताचा अभिमान असे. त्यामुळे राज्यातील समस्त सवलती तुर्कांना प्राप्त होत. बाहेरून आलेल्या इराणी, अरब, हबशी आणि अन्य जातीच्या मुसलमानांनाही शासनव्यवस्थेत व सैन्यात महत्त्वाची पदे उपलब्ध होत असत.

सुलतान व सरदारांमध्ये गुलाम बाळगण्याची पद्धत होती. दरबारात गुलामांची संख्या मोठी होती. अलाउद्दीनच्या कारकीर्दीत ५०,००० गुलाम होते. ही संख्या फिराझशाह तुघलकाच्या काळात दोन लाखांपर्यंत वाढली होती. बहुतेक सुलतान गुलामांची चांगली काळजी घेत असत. आर्थिक दृष्ट्याही सुलतानांना त्यांच्यापासून फायदा होत असे. काही काळानंतर सुलतान गुलामांना दास्यमुक्त करीत. काही गुलामांनी स्वतःच्या कर्तृत्वावर राजकीय व सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठा मिळविली होती. आसाममधील सुदृढ गुलाम सुलतानांच्या दरबारात मोठ्या प्रमाणात असत. चीन, तुर्कस्तान व इराणमधून गुलाम मुद्दाम मागविले जात. दुष्काळ आणि लढाया यांमुळे गुलामांच्या भावात चढ-उतार होत असे. सुलतानांना गुलामांचा उपयोग होत असला. तरी त्यामुळे समाजावर अनिष्ट परिणाम होत.

हिंदू व मुसलमान समाजात स्त्रियांना आपल्या नवऱ्यावर किंवा नातेवाईकांवर अवलंबून रहावे लागे. काही स्त्रियांना घरात मानाचे स्थान होते. वैवाहिक जीवनात त्यांना पातिव्रता धर्म कडकपणे पाळावा लागे. घरात एकांतवास सहन करावा लागे. बहुपत्नीकत्व, बालविवाह, कन्यावध, सती इ. चाली हिंदू समाजात रूढ होत्या. हिंदू व मुसलमानी स्त्रियांत पडदा पाळण्याची पद्धत होती. ही पद्धत गुजरातमध्ये व खालच्या वर्गात नव्हती. स्त्रियांचे रहाणीमान त्या ज्या वर्गात नांदत त्यावर अवलंबून असे. गरीब स्त्रियांना पोट भरण्यासाठी मुसलमानांच्या घरी हलकी कामे करावी लागत. श्रीमंत स्त्रिया कलाकुसरीची कामे करीत.

मध्यम वर्ग त्या काळात अस्तित्वात नव्हता. श्रीमंत आणि गरीब हे दोनच वर्ग होते. इराणी, तुर्क, अफगाण, अरब हे हिंदू प्रजेपासून अलिप्त रहात. अमीरउमरावांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला होता. या वर्गातील अमीरउमराव त्यांच्या खालच्या लोकांशी वैवाहिक संबंध जोडीत नसत. सुलतान, अमीरउमराव यांच्यापासून खालच्या वर्गातील मुसलमानांनी हिंदूंच्या चालीरीतींचे अनुकरण केले होते. जरीचे कपडे, मुलामा दिलेल्या व रत्नजडित तलवारी, छत्र्या, झूल घातलेले हत्ती, पान खाणे इ. दरबारी पद्धती मुसलमानांनी उचलल्या होत्या. हिंदूंमध्ये रूढ असलेल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीही त्यांनी घेतल्या. मुसलमानात रूढ असलेल्या काही पद्धती हिंदूनी उचलल्या.

कला, वाङ्‌मय, संगीत इत्यादी : वास्तू बांधण्यात सुलतानांच्या स्वतंत्र कल्पना होत्या. आयताकार इमारती, मशिदी, घुमट, मिनार इ. कल्पना त्यांनी अरबस्तान, सिरिया, ईजिप्त व इराणमधून हिंदूस्थानातरूढ केल्या. सुलतानांनी अनेक मशिदी, मद्रसा, मिनार व राजप्रसाद बांधले. गुलाम वंशी सुलतानांच्या काळात निर्माण झालेल्या इमारतीवर हिंदू स्थापत्य कलेचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. मुसलमानांनी भारतात सुरू केलेल्या स्थापत्यशैलीला भारतीय-इस्लामी शैली म्हणतात. इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा कुत्बुद्दीन ऐबक हा पहिला शासक. दिल्ली येथे बांधलेली कुब्वतुलइस्लाम व कुतुबमिनार या वास्तू त्याने जैन व हिंदू मंदिरांच्या भग्नावशेषांच्या सामग्रीवर बांधल्या आहेत. अल्तमशने वरील इमारतीत भर घातली. अलाउद्दीन खल्जीने वास्तुकलेत सुबकता आणली. अलाई दरवाजा व जमाअतखान मशीद या रचना खल्‌जी शैलीची उत्कृष्ट प्रतीके म्हणून समजल्या जातात. फिरोजशाह तुघलकाला इमारती बांधण्याची आवड होती. दिल्ली शहरात त्याने फतहाबाद आणि हिसार-इ-फीरूझ नावाच्या इमारती बांधल्या. याशिवाय त्याने किल्ले, पूल, धर्मशाळा बांधल्या. त्याने सतलज व यमुना नद्यांना कालवे काढले. तुघलक सुलतानांनी बांधलेल्या इमारती भव्य पण साध्या होत्या. लोदी व सैय्यद सुलतानांच्या काळात वास्तुशैलीचा हळूहळू ऱ्हास झाला.

प्रांतीय सुलतानांनी वास्तुकलेत बरीच प्रगती केली होती. जौनपुरच्या शर्की सुलतानांनी बांधलेल्या अताला मस्‌जिद, जामा मस्‌जिद या इमारती प्राचीन वास्तूंच्या अवशेषांनी बांधल्या होत्या. काचेचे किंवा संगमरवरी तुकडे त्यात बसविल्यामुळे त्या वास्तू शोभिवंत झाल्या होत्या. नागोर येथील अतकान-का-दरवाजा ही इमारतही हिंदूंच्या जुन्या अवशेषांनी बांधलेली होती. मांडूचा किल्ला मोठा असून आजही तेथे पडके राजवाडे, मशिदी, थडगी, तलाव आढळतात. येथील जामी मशीद, हिंदोला महाल, जहाज महाल, होशंगचे थडगे या वास्तू कलापूर्ण आहेत. बंगालमध्ये नुस्त्रतशाह सुलतानने मुसलमानी शिल्पाचा प्रसार केला.जुन्या अवशेषांत आढळणारी सोनेरी मोठी मशीद. कदग रसूल, आदीना मशिदी या इमारती प्रेक्षणीय आहेत. आदीना मशिदीला अनेक घुमट आहेत. गुजरातमध्ये पूर्वीपासून इमारतीत दगडी जाळ्यांचे (जाळीकाम) आणि लाकडी कोरीव काम केले जाई. येथील सुलतानांनी प्राचीन जैन व हिंदू शिल्पांना उत्तेजन दिले. अहमदाबाद व खंबायत येथे सुंदर इमारती बांधल्या. अहमदाबाद हे शहर सुलतान अहमदशाहाने अशावाड या शहरावर बसविले. अहमदाबाद येथे अहमदशाह, कुत्बुशह, अच्युत बिबी, दस्तूरखान यांच्या कबरी, तीन दरवाजा, तलाव व आझमखानाचा राजवाडा ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. फीरोझ बहमनीला इमारती बांधण्याचा शोक होता. स्पेनमधील कार्डोव्हा पद्धतीची मशीद त्याने गुलबर्गा येथे बांधली. विजयानगरमधील वास्तुशिल्प कलात्मक होते. विजयानगरच्या राजवाड्याजवळ नरसिंहाची पाषाणाची खोदलेली मूर्ती सहा मी. उंच असून हंपी येथे विजयानगरच्या राजधानीचे अवशेष नजरेस पडतात. येथील राजवाडे, गजशाळा, मंदिरे, तोरणे, तलाव प्रेक्षणीय आहेत.

दिल्लीचे सुलतान साहित्याचे भोक्ते होते. सुलतानांनी साहित्य व कला यांस उत्तेजन दिले. मात्र संस्कृत व देशी भाषांना त्यांनी राजाश्रय दिला नाही. अरबांच्या काळात आणि सुलतानांच्या कारकीर्दीत अनेक व्यवहारोपयोगी संस्कृत ग्रथांचे फार्सीत अनुवाद झाले. हे अनुवाद संस्कृत साहित्यात असलेल्या ज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी करण्यात आले होते. महमूद गझनीच्या काळात भारतात आलेल्या अल् बीरूनीने संस्कृत भाषेचा अभ्यास करून अनेक ग्रंथांचे अरबीत भाषांतर केले. फिरोजशाह तुघलकाने कोट कांगडा येथील ग्रंथालयातील अनेक ग्रंथांचे भाषांतर करून त्याचे नाव दलाइल-इ शाही ठेवले. सिकंदर लोदीने आयुर्वेदातील एका पुस्तकाचे फार्सीत भाषांतर करविले.

साहित्याच्या बाबतीत सुलतानांनी बरीच प्रगती केली होती. १२५८ मध्ये झालेल्या बगदादच्या लुटीनंतर दिल्लीला इस्लामी विद्येचे प्रमुख केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्ली व इतर शहरांतील मुसलमान विद्वानांनी स्वतंत्र पुस्तके लिहीली होती. बहुतेक सुलतानांच्या दरबारात साहित्यिक, कवी यांना उदार आश्रय मिळत होता, सिरिया, अरबस्तान, इराण इ. देशातून अनेक विद्वान भारतात येत. त्यांनाही सुलतानांच्या दरबारात आश्रय मिळे. अशा तऱ्हेचा आश्रय हिंदू पंडितांना मिळत नसे. त्या काळातील प्रसिद्ध कवी अमीर खुस्त्रौ (१२५३–१३२५) हा बल्बन, खल्जी आणि तुघलक सुलतानांच्या दरबारात होता. मीर हसन देहलवी (१२५२–१३३७) हा तुघलकांच्या काळातील प्रसिद्ध कवी. त्याच्या कवितांचे इराणी कवी जामीने बरेच कौतुक केले. कोशशास्त्राचे भाषांतर करणारा तूती नावाचा कोशकार हा प्रसिद्ध लेखक होता. सुलतानशाहीच्या काळात अनेक इतिहासकार होऊन गेले. हसन निझामी, सिन्हाजुस्सिराज, बरनी, अफीफ व याह्या हे नाव घेण्यासारखे प्रसिद्ध होते. १५ व्या शतकात जौनपूर हे विद्या-कलांचे केंद्र होते. काझी शिहाबुद्दीन दौलताबादी व मौलाना शेख इलाहाबादी हे विद्वान लेखक होते. मुसलमानी धर्मप्रचारक व संत यांना हिंदूंच्या तत्त्वज्ञान, वेदान्त, योग यांविषयी विशेष आकर्षण वाटत असे. फार्सी, अरबी व तुर्की या भाषांच्या एकत्रीकरणातून उर्दू ही नवीन भाषा उदयास आली. काही मुसलमान लेखकांनी त्या काळी रूढ असलेल्या प्रादेशिक भाषेतून हिंदू जीवन व रूढी यांवर लेखन केले होते.


सुलतानांनी मक्तब (प्राथमिक शाळा) व काही मद्रसा (महाविद्यालये) दिल्ली, लाहोर, आग्रा, जौनपूर येथे सुरू केल्या होत्या. या संस्थांमध्ये अरबी, फार्सी, मुसलमानी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र यांचे शिक्षण दिले जाई. मुसलमान अध्यापक व धर्मवेत्त्यांना सरकारकडून मानधन मिळे. लहान खेड्यातील व शहरातील मुसलमानी वस्त्यात मक्तबा असत.

हिंदूच्याही स्वतंत्र पाठशाळा असून तेथे संस्कृत व प्रादेशिक भाषा शिकविल्या जात. मुसलमानी आक्रमणानंतर मध्ययुगापर्यंत तग धरून राहिलेल्या तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला व वाराणसी येथील विद्यापीठे नष्ट झाली, तरी वैयक्तिक विद्वान पंडित वाराणसी आणि अन्य ठिकाणी मुलांना शिकवीत असत. हिंदू राज्यकर्ते व त्यांचे मांडलिक यांच्या दरबारात संस्कृत ग्रंथ तयार केले जात होते. बंगालमधील काही सुलतानांनी बंगाली भाषेचा पुरस्कार केला. हुसेनशाहच्या (१४९३–१५१८) कारकीर्दीत रामायण, महाभारत, भागवत पुराण यांची बंगालीत भाषांतरे झाली. काही मुसलमान लेखकांनी प्रथमच चंदायनमधुमालती यांसारखे हिंदी साहित्य निर्माण केले.

सुलतानशाहीच्या काळात संगिताच्या कलेकडेही थोडेफार लक्ष दिले गेले. अमीर खुस्त्रौ हा कवी व इतिहासकार असूनही तो संगीताचा भोक्ता होता. त्याने हिंदू संगीतातील रागदारी व इस्लामी संगीताचा संयोग घडवून आणला. चिश्ती सूफी संतांनी संगीताकडे विशेष लक्ष दिले. ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती समुदाय रोज संध्याकाळी कवाली गाण्यांचा कार्यक्रम करीत. अल्तमशने संगीतावर बंदी घातली होती. परंतू चिश्ती संतांच्या आग्रहावरून ही बंदी उठविण्यात आली. तेव्हापासून दरबारात संध्याकाळी गाण्याचे कार्यक्रम होऊ लागले. सार्वजनिक लोकही या कार्यक्रमात सहभागी होत. रूक्नुद्दीन फीरूझ (गुलाम घराणे) याच्या दरबारात गायक व नर्तक असत. बल्बन संगीताचा भोक्ता होता. त्याला भारतीय संगीताबद्दल विशेष आदर होता. तो भारतीय संगीत श्रेष्ट मानीत असे. त्याने इराणी व भारतीय संगीताच्या संयोगातून काही मधूर गीते रचली. कैकुबाद, जलालुद्दीन आणि अलाउद्दीन खल्जी, फीरूझ तुघलक हे संगीताचे पुरस्कर्ते होते. तुघलकाच्या सांगण्यावरून नगरकोट जवळच्या ज्वालामुखी मंदीरातील संगीत व नृत्य यांवरील ग्रंथांचे फार्सीत भाषांतर केले. कव्वाली हा संगीतातील प्रकार त्यावेळी बराच लोकप्रिय होता. जौनपूरचा सुलतान हुसैन शर्की याने संगीताकडे बरेच लक्ष पुरविले. तो ‘ख्याल’ या गाण्यातील प्रकाराचा प्रवर्तक मानला जातो. ग्वाल्हेरचा राजा मानसिंग (१४८६–१५१६) याने संगीताचे विद्यालय स्थापन केले होते. त्याने रचलेल्या मान कुतुहल या प्रसिद्ध संगीतावरील ग्रंथावरून त्यावेळच्या संगीताच्या प्रगतीची कल्पना येते.

संदर्भ : 1. Day, U. N. Administrative System of Delhi Sultanate, Allahabad, 1965.

             2. Haig, Wolseley, Ed. The Cambridge, History of India, Vol.III, Jullundur, 1958.

             3. Lane-Poole, Stanley, Medieval India under Mohammadan Rule, Delhi 1963.

             4. Majumdar, R. C. Ed., The Delhi Sultanate, Bombay, 1960.

             5. Pandey, A. B. Early Medieval India, Allahabad, 1960.

श्रीवास्तव, ए. एल्‌. (इं.) गोखले, कमल (म.)