हस्तलिखिते : हाताने लिहिलेल्या कोणत्याही मजकुराला ही संज्ञा देतात. पपायरस, चर्मपत्र, भूर्जपत्र, ताडपत्र, कागद वा तत्सम माध्यम-साधनांवर हाताने लिहिलेल्या मजकुराला हस्तलिखित असे संबोधितात. सांप्रत प्रकाशनपूर्व टंकलेखन होण्यापूर्वीच्या मूळ लेखनसाहित्यालाही ही संज्ञा अद्यापि वापरतात. मुद्रणकलेचा शोध लागण्यापूर्वी ज्ञान व माहितीच्या संप्रेषणाचे सर्व व्यवहार हस्तलिखितांद्वारेच होत असत. हाताने लेखनकरणे ही एक अनिवार्यता होती. प्राचीन व मध्ययुगीन काळातील चीन, भारतासह भूमध्यसागरी प्रदेशातील हस्तलिखितांतून तत्कालीन संस्कृतींची, विशेषतः व्यापार, चालीरीती, कौटुंबिक जीवन, साहित्य, शासनव्यवस्था, धार्मिक रूढी इत्यादींची इत्थंभूत माहिती मिळते. त्या काळी पपायरस, कातडे, मृदुचर्मपत्रे, मेणाच्या मुद्रा, भूर्जपत्रे, ताडपत्रे इ. माध्यमसाधनांचा हस्तलेखनासाठी वापर केला जाई. साधारणतः चौथ्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत चर्मपत्रावर व मृदुचर्मपत्रावर लेखन होऊ लागले. चौदाव्या शतकात कागदाने प्राचीन माध्यमसाधनांची जागा घेतली आणि त्याच सुमारास मुद्रणकलेचा शोध लागला. तरीसुद्धा हाताने लेखन करण्याच्या प्रवृत्तीत अद्यापि खंड पडलेला नाही. हस्तलेखनाच्या ऐतिहासिक विकास- क्रमाचा आढावा हा प्रामुख्याने पुराभिलेखविद्येचा म्हणजे इतिहासकालीन लिहिल्या गेलेल्या मजकुराचा पद्धतशीर व शास्त्रशुद्ध अभ्यास होय. वाचनीयता हा अक्षरसौंदर्याचा प्राथमिक घटक असल्यामुळे प्राचीन हस्तलेखन करणाऱ्या लेखकांनी त्याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

 

ऐतिहासिक पार्श्वभूमी : हस्तलेखनाची सुरुवात निश्चितपणे केव्हा झाली, हे ज्ञात नाही. मेसोपोटेमियातील लोक इ. स. पू. ३३०० मध्ये मातीच्या ओल्या विटांवर लेखन करीत व नंतर त्या विटा भाजत असत तथापि भूमध्यसागरी प्रदेशाच्या परिसरातील ईजिप्शियन, ग्रीक आणि रोमन लोकांचे पपायरस हे लेखनाचे माध्यमसाधन होते. पपायरसावरील हस्तलिखित लेखन इ. स. पू. २७०० पासून ते इ. स. तिसऱ्या शतकापर्यंत (चर्मपत्रांचा वापर सुरू झाला तरीसुद्धा) प्रचारात असल्याचे दाखले मिळतात. ईजिप्तमध्ये अठराव्या वंशातील फेअरोंनी (इ. स. पू. १५३९–१२९२) बुक ऑफ द डेड या ग्रंथाच्या अनेक प्रती नकलून ठेवल्याचे आढळले. त्यात तत्कालीन देवदेवता, प्रार्थना, थडगी, ममी यांबद्दल नोंदी आहेत. पपायरसाची भेंडोळी ०.३ मीटरपासून ६ मीटरपर्यंत विविध आकारांची उपलब्ध झाली आहेत. पपायरस कोरड्या हवेतच टिकून राहतो व त्याच्या एकाच बाजूला लिहिता येते त्यामुळे दमट व आर्द्र हवामान असणाऱ्या यूरोप खंडात तो पूर्णतः निरुपयोगी ठरला.

 

ग्रीक व रोमन संस्कृतींत पपायरसाबरोबरच लेखनासाठी मेणाच्या मुद्रांचा वापर करीत. ते अधिक टिकाऊ होते. मेणाच्या मुद्रांवर अणकुचीदारदाभणासारख्या लेखणीने (स्टायलस) कोरून अक्षरे काढीत. या मुद्रा कलाबतूने (लेस) एकत्र बांधून त्याचा ग्रंथ (कोडॅक्स) तयार करीत.आद्य ग्रीक हस्ताक्षर लेखनाचे दोन प्रमुख प्रकार इ. स. पू. आठव्या शतकापर्यंत प्रचलित होते. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे ग्रंथाच्या हस्तलिखित नकला करणारे लेखन हा असून दुसरा प्रकार युन्सिअल म्हणजे वाटोळ्या मोठ्या अक्षरांत केले जाणारे हस्ताक्षर लेखन होय. हे लेखन अलंकरणप्रधान, सुशोभित स्वरूपाचे असून त्यातील अक्षरे शैलीदार, सुस्पष्ट व मोठ्या अक्षरांच्या लिपीत लिहिली जात. या दोन लेखन माध्यमसाधनांव्यतिरिक्त गाईचे वासरू, बोकड वा मेंढी यांच्या कमावलेल्या कातड्यांपासून बनविलेली चर्मपत्रे लिहिण्यासाठी वापरीत. पुढे ही चर्मपत्रे अधिक सफाईदार करून या मृदु चर्मपत्रांवर पर्शियन व हिब्रू लोकांनीलेखन केले. त्यांच्या लेखनाचा नमुना ‘द डेड सी स्क्रोल्स’ चा शोध (१९४७) लागल्यानंतर निदर्शनास आला. बायबलमधील ‘जुना करार’ (ओल्ड टेस्टामेंट) याचाही काही भाग आढळला. ग्रीक लिपीतून लॅटिन व रोमन लिपीची उत्पत्ती झाल्याचे मानण्यात येते त्यातून रोमन हस्तलिखितांत नेमकेपणा व प्रमाणबद्धता आली. लाकूड, तांब्याचे पत्रे यांचाही हस्तलिखितांसाठी उपयोग होत असे. चीनमध्ये कागदाचा शोध इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत लागला. त्यांचे हस्तलिखित ग्रंथ कागदाच्या भेंडोळ्याच्या आकारात उपलब्ध झाले आहेत. तत्पूर्वी चिनी लोक हाडावर व रेशमी कापडावर लेखन करीत. शिवाय ०.६ सेंमी. रुंदीच्या सु. १५–२३ सेंमी. लांब बांबूच्या सोटावर ते लेखन करीत. चिनी लोकांनी शोध लावलेला कागद यूरोप खंडात इ. स. अकराव्या शतकात प्रसृत झाला. तेथील हस्तलेखन करणाऱ्या व्यावसायिक लेखकांना स्क्राइब ही संज्ञा होती. त्यांचे चार वर्ग होते. त्यांपैकी पहिला वर्ग तलम मृदु चर्मपत्रेपुरवीत असे, तर दुसरा वर्ग लेखन करी, तिसरा वर्ग चर्मपत्रांना भौमितिक आकृतिबंध व चित्रांनी अलंकृत करी आणि चौथा वर्ग ती सर्व चर्मपत्रेएकत्र करून त्यांची बांधणी ग्रंथरूपात करी. मध्ययुगातील काही शोभित हस्तलिखिते उपलब्ध झाली असून त्यांचा विषय मुख्यत्वे बायबल व त्यातील ‘जुना करार’ यांच्याशी संबंधित आहे. यांची लेखनशैली बायझंटियन, इंग्लिश, फ्रेंच, आयरिश व इटालियन या नावांनी ओळखली जाते. इस्लाम धर्मियांत कुराणा च्या नकला करणे, हे पवित्र कार्य मानले जाई. कुराणा च्या अरबी लिपी व भाषेतील श्रद्धापूर्वक हस्तलेखनातून इस्लामी सुलेखनकलेचा विकास झाला. कुराणा तील वचने मशिदी, दरवाजे (बुलंद दरवाजा), दर्गे वा अन्य धार्मिक वास्तू यांवर कोरलेली आढळतात. यांशिवाय कुराणा चे काही हस्तलिखित अलंकृत असे ग्रंथही उपलब्ध झाले आहेत. भारतातील बहुतेक प्राचीन व मध्ययुगीन हस्तलिखिते भूर्जपत्र व ताडपत्र यांवर लिहिलेली आहेत. काही लेखन ताम्रपट, कापड व कागदावरही लिहिलेले आढळते. भारतातील हस्तलिखितांचा प्रारंभ निश्चितपणे केव्हा झाला, हे ज्ञात नसले, तरी तमिळ संघम् साहित्याची हस्तलिखिते इ. स. पू. ४०० – इ. स. २०० या काळात लिहिली गेली असावीत मात्र त्यांच्या बहुतेक साहित्यकृती नष्ट झाल्या असून काही सुदैवाने उपलब्ध आहेत. तथापि मौर्य काळातील (इ. स. पू. ३२१–१८५) सम्राट अशोकाच्या धर्माज्ञा, कौटिलीय अर्थशास्त्र, रामायण-महाभारता दी महाकाव्ये यांच्या हस्तलिखित प्रती व पाठभेद उपलब्ध झाले आहेत. यांशिवाय सांप्रत उपलब्ध असलेल्या हस्तलिखित ग्रंथांत धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, तत्त्वज्ञान, काव्य, नाटक इ. विषयांवरच्या ग्रंथांच्या अनेक प्रती आहेत. एवढेच नव्हे तर ज्योतिष, वास्तुशास्त्र, शिल्पकला, तंत्रशास्त्र इ. विषयांवर विद्वानांनी लिहिलेली हस्तलिखिते उपलब्ध आहेत. त्यांत काही सचित्र पोथ्या आहेत. बहुतेक हस्तलिखित ग्रंथांवर त्या ग्रंथकाराचे नाव, रचनाकार किंवा नकलाकार यांचा निर्देश नसतो. भारतातील हस्तलिखिते मोठ्या प्रमाणावर तिबेट, चीन, नेपाळ, जपान, इंग्लंड या देशांत नेली गेली. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी तिबेट, चीन व जपान या देशांत इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून इ. स. सातव्या-आठव्या शतकापर्यंत बौद्ध विद्वान व प्रचारक यांच्याद्वारे या हस्तलिखितांची निर्यात झाली असावी. फाहियान, ह्यूएनत्संग व इत्सिंग या चिनी प्रवाशांनी भारतभेटीत हजारो हस्तलिखित ग्रंथ चीनमध्ये नेले. बौद्ध काळात हस्तलिखित निर्मितीमागे ज्ञानसंवर्धन व धर्मप्रसाराचा उद्देश होता. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आदी विद्यापीठांतून भूर्जपत्रांवरील व ताडपत्रांवरील हस्तलिखित ग्रंथ संग्रहित करण्यात आले होते तथापि भारतात अद्यापि अनेक हस्तलिखिते ग्रंथरूपात, पत्ररूपात, सनदा, वाके, कैफियती इ. स्वरूपांत अवशिष्ट असून त्यांच्या सूच्याही तयार करण्यात आल्या आहेत. हस्तलिखित पोथ्यांचे व्यावसायिक लेखक नक्कलकरतात तेव्हा कालानुवर्ती त्यात पाठभेद होत असतात. याचा प्रत्यय ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा यांतून आढळतो. मध्ययुगात तवारिखा, बखरी, सनदा, कैफियती, तह इत्यादींची हस्तलिखित कागदपत्रे ही ऐतिहासिक साधने म्हणून उपयुक्त ठरली. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजा जयसिंह यांमधील पुरंदरच्या तहाचा ताडपत्रावरील हस्तलिखित तहनामा सात मी. लांबीचा असून तो बिकानेरच्या पुरातत्त्व संग्रहालयात आहे. मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतरही शेकडो वर्षे हस्तलिखिते नकलून घेण्याची पद्धत अव्याहत चालू होती. हस्तलिखितांचे धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय मूल्य वादातीत आहे. त्यामुळे हस्तलिखिते विविध संस्थांतून जतन करण्यात आली आहेत. जीर्णशीर्ण हस्तलिखितांचे सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म्स) तयार करण्यात आले आहेत. भारतात अनेक राज्यांच्या पुराभिलेखागारात तसेच काही विद्यापीठांत (वाराणसी हिंदू विश्वविद्यालय) हस्तलिखितांचा संग्रह आहे. महाराष्ट्रात डेक्कन कॉलेज, भारत इतिहाससंशोधक मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, आनंदाश्रम (पुणे), प्राज्ञ पाठशाळा मंडळ (वाई), छत्रपती शाहू संशोधन केंद्र (कोल्हापूर), विपश्यना केंद्र (इगतपुरी) आदी संस्थांतून लाखो हस्तलिखित कागदपत्रे आहेत. महानुभाव पंथाशी संबंधित हजारो हस्तलिखिते रिद्धपूर (जिल्हा अमरावती) येथील विविध मठांत जतन केली आहेत. यांशिवाय दक्षिण भारतातील सरस्वती महाल (तंजावर), अड्यार, चेन्नई, म्हैसूर व त्रिवेंद्रम येथील ग्रंथालयांतून हजारो हस्तलिखिते सुस्थितीत जतन केलेली आहेत. (चित्रपत्र).

देशपांडे, सु. र.