रॉयल मिलिटरी अकॅडेमी, सँडहर्स्ट : सैनिकी अधिकार्यांजना प्रशिक्षण देणारी ग्रेट ब्रिटनमधील प्रसिद्ध संस्था. यूरोपात सतराव्या शतकाच्या अखेरीपासूनच अशा प्रकारच्या शाही सैनिकी प्रशिक्षण संस्था काही देशांत स्थापन करण्यात आल्या. बर्कशर परगण्यातील सँडहर्स्ट या खेड्याच्या परिसरात ही संस्था आहे. मुळात ही संस्था १८०२ च्या शाही अधिपत्रानुसार ग्रेट मार्लो येथे सुरू झाली आणि १८१२ मध्ये ती सँडहर्स्ट येथे हलविण्यात आली. पहिल्या महायुद्धापर्यंत लष्करातील तोफखाना, अभियांत्रिकी व संदेशवहन इ. विभागांतील अधिकाऱ्यांना वुलिज येथील सैनिकी अकादमीत प्रशिक्षण देण्यात येत असे. वुलिज येथील संस्थांचे एकीकरण करण्याचे ठरविण्यात आले तथापि दुसऱ्या महायुद्धामुळे प्रत्यक्षात हे एकीकरण १९४७ मध्ये घडून आले.

सँडहर्स्ट अकादमीमध्ये सर्वसाधारणपणे १८ १/२ ते १९ १/२ वर्षे पूर्ण केलेल्या उमेदवारांची (कॅडेट्स) एक वर्ष अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येते. तसेच यासाठी प्रवेश परीक्षा आणि अल्पकालीन सैनिकी सेवाही आवश्यक असते. १९६० च्या सुमारास राष्ट्रकुल देशांतील दहा टक्के उमेदरावांना प्रवेश देण्यात आला.

या अकादमीच्या प्रमुखपदी मेजर जनरलच्या हुद्याचा एक समादेशक (कमांडंट) असतो. तसेच सत्तरांहून अधिक सैनिकी क्षेत्राबाहेरील तज्ञ अध्यापक म्हणून काम करतात. गणित, विज्ञाने, आधुनिक विद्याशाखा व भाषा असे मुख्य विभाग असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र संचालक असतो. काही कॅडेट्स केंब्रिज विद्यापीठातील यांत्रिक अभियांत्रिकी विषयातील पदवी बसू शकतात. त्याचप्रमाणे बर्कशर व श्राइव्हनम येथील संलग्न महाविद्यालयांच्या विज्ञान विषयातील पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम निवडू शकतात. प्रशिक्षणात राष्ट्रकुल देशांतील शासन−यंत्रणांचा अभ्यास अंतर्भूत असतो. अभ्यासक्रमात इतिहास, सैनिकी संघटना आणि प्रशासन, सैनिकी कायदा, व्यूहतंत्र, शारीरिक शिक्षण, संदेशवहन, गिर्यारोहण इ. विषयांचा समावेश असतो. अभ्यासक्रमाच्या शेवटी उमेदवारांना गुणवत्तेप्रमाणे विविध सैनिकी दलांत रिक्त पदावर नियुक्त करण्यात येते. या अकादमीतील उमेदवारांना त्यांच्या पूर्वीच्या सैनिकी सेवेतील पदांवरील वेतन देण्याची तरतूद आहे. प्रथम येणाऱ्या कॅडेटला राजपदक आणि समादेशकाचा ‘सोअर्ड ऑफ ऑनर’ हा सन्मान्य पुरस्कार देण्यात येतो. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थानातील अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी या अकादमीत प्रशिक्षण घेतले. उदा., जनरल करिअप्पा, जनरल चौधरी, जनरल कुमारमंगलम् इत्यादी. भारताच्या आधुनिक सैनिकी जडण-घडणीत सँडहर्स्टच्या या संस्थेचा वाटा महत्त्वाचा आहे.

संकपाळ, ज. बा.