बॅर्ना :चेकोस्लोव्हाकियाच्या द. मोरेव्हियन विभागातील एक प्रमुख शहर. लोकसंख्या ३,६५,८३७ (१९७७). हे प्रागच्या आग्नेयीस १८५ किमी. स्व्हराट्‌का व स्विताव्हा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. शहराच्या दक्षिणेस ३० किमी. वरील पव्हलाव्ह टेकडीवरील दॉलन्यीव्झेस्टॉन्यित्से येथे प्राचीन निअँडरथल मानवासंबंधी व क्रोमॅग्नन लोकांसंबंधी पुरातत्त्वीय अवशेष आढळून आले.

प्राचीन काळी येथे केल्टिक लोकांची वस्ती होती. ‘बरनॉ’ हे नाव केल्टिक भाषेतील ‘टेकडीवरील शहर’ या अर्थाचा शब्दांवरून पडले आहे. प्रथम ते बोहीमिया राज्यात होते. त्यास १२४३ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. येथील स्पिलबेर्क या टेकडीवर किल्ला असून तो दहाव्या शतकातील असावा. चौदाव्या शतकात हे शहर मोरेव्हियाच्या सरदाराने जिंकले आणि अल्पावधीतच त्याचे हे प्रमुख ठाणे बनले. या शहरावर प्रॉटेस्टंटांनी १४२८, बोहीमियनांनी १४६४, स्वीडिशांनी १६४५, प्रशियनांनी १७४२ व १८६६, तर फ्रेंचांनी १८०५ व १८०९ मध्ये हल्ले केले होते. तीस वर्षांच्या युद्धानंतर (१६१८-४८) स्पिलबेर्क किल्ला ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग घराण्याच्या अंमलाखाली आला. या घराण्याच्या कारकीर्दीत राजकीय कैद्यांना या किल्ल्यात डांबून ठेवण्यात येई. सील्व्ह्यो पेल्लीको या इटालियन देशभक्त साहित्यिकास १८२२-३० दरम्यान येथे ठेवले होते. त्याने आपले अनुभव Le mie Prijioit (इं. शी. माय प्रिझन्स) या पुस्तकातून प्रसिद्ध केले. ग्रेगोर मेंडेल (१८२२-८४) या ऑस्ट्रियन धर्मोपदेशकाने आनुवंशिकतेसंबंधीचे वैज्ञानिक प्रयोग येथे केले. १९१८ मध्ये हे शहर चेकोस्लोव्हाकियात समाविष्ट झाले.

येथे लोकर उद्योग प्रमुख असून सुती कापड, लोखंड-पोलाद, रसायने इ. उद्योगांचाही विकास झाला आहे. ‘झेड्रबी’ ही प्रसिद्ध बंदूक प्रथम याच शहरात तयार करण्यात आली. पुढे ‘ब्रेन गन’ म्हणून तिची इंग्लंडमध्ये एन्‌फील्ड येथे निर्मिती होऊ लागली. तंत्रविद्या विद्यापीठ (१८९९), मासारिक विद्यापीठ (१९१९),संगीत अकादमी, पशुवैद्यक विज्ञान अकादमी इ. उच्च शैक्षणिक संस्था शहरात आहेत. दरवर्षी येथे आंतरराष्ट्रीय व्यापार जत्रा  भरते. येथील सेंट टॉमस व सेंट जेम्स या चर्चवास्तू, सेंट पीटर व सेंट पॉल ही कॅथीड्रल तसेच नगरभवन उल्लेखनीय असून याच्याजवळच कार्स्ट भूमिस्वरूपासाठी प्रसिद्ध असलेला मोरेव्हियन हा विभाग आहे. पर्यचकांची या शहरी सतत वर्दळ असते.

गाडे, ना. स.