ॲस्केलमिंथिस : काही प्राणिशास्त्रज्ञांनी मानलेला निरनिराळ्या प्रकारच्या प्राण्यांचा एक संघ. यात लहान व सूक्ष्म कृमिसदृश प्राण्यांचा समावेश केलेला आहे. या संघातील प्राण्यांची समान लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : यांच्या शरीरात खरी देहगुहा (मध्यस्तरापासून उत्पन्न झालेली शरीरातील पोकळी) नसते शरीरराचे सामान्यतः खंड पडलेले नसून ते उपत्वचेने (त्वचेच्या बाह्य संरक्षक भागाने) आच्छादिलेले असतो आहारनाल (अन्नमार्ग) पूर्ण, साधा व सरळ असते आंत्राच्या (आतड्याच्या) भित्ती स्‍नायुमय नसतात आणि गुदद्वार शरीराच्या पश्च (मागच्या) टोकाशी अथवा त्याच्या जवळ असते.

रोटिफेरा, गॅस्ट्रोट्रायका, किनोर्‍हिंका, नेमॅटोडा आणि नेमॅटोमाॅर्फा या पाच प्राणिसमूहांचा या संघात समावेश केलेला असून प्रत्येकाला वर्गाचा दर्जा दिलेला आहे. अमेरिकेतील बऱ्याच प्राणिशास्त्रज्ञांचा या वर्गीकरणाला

जरी पाठिंबा असला, तरी इतर देशांतील पुष्कळांना ते मान्य नाही. अनेक कारणांमुळे वरील पाच आणि इतर काही समूहांचे प्राणिसृष्टीतील स्थान अद्याप निश्चित करता आलेले नाही. ते निश्चित होईलपर्यंत प्रत्येक समूह स्वतंत्र समजावा, असे पुष्कळ प्राणिशास्त्रज्ञांचे मत आहे. पण या बाबतीतही मतैक्य नाही. काहींनी प्रत्येक समूह स्वतंत्र संघ मानला आहे, तर काहींनी दोनतीन समूह एके ठिकाणी घेऊन त्यांचा एक स्वतंत्र संघ निर्माण करून समूहांना वर्गाचा दर्जा दिला आहे. वर्गीकरणाच्या या मतभिन्नतेत प्रत्येक समूह स्वतंत्र मानणेच उपयुक्त ठरेल.

पहा : कीटोग्नॅथा गॅस्ट्रोट्रायका नेमॅटोडा नेमॅटोमॉर्फा रोटिफेरा.

कर्वे, ज. नी.