कोकोस (कीलिंग) बेटे : ऑस्ट्रेलियाची हिंदीमहासागरातील बेटे. १२ द व ९६ ५३’ पू. क्षेत्रफळ १३ चौ. किमी. लोकसंख्या ६२५ (१९७१). ही डार्विनच्या पश्चिमेस ३,६८० किमी., पर्थच्या वायव्येस २,७५२ किमी., कोलंबोच्या आग्नेयीस २,२४० किमी. आणि जाकार्ताच्या नैर्ऋत्येस ९२८ किमी. आहेत. प्रवाळांनी बनलेली ही दोन कंकणद्वीपे आहेत. दक्षिणेकडील कंकणद्वीपामध्ये २४ बेटे असून त्यांतील होम, डिरेक्शन व वेस्ट कीलिंग ही वस्ती असलेली बेटे आहेत. २५ किमी. उत्तरेकडील कंकणद्वीपामधील नॉर्थ कीलिंग एवढेच मोठे परंतु तेही वस्ती नसलेले बेट आहे. कोणतेही बेट समुद्रसपाटीपासून ७ मी. पेक्षा जास्त उंच नाही, कोकोसमधील सर्वांत मोठे बेट जास्तीतजास्त १६ किमी. रुंद असून बेटांवर अधून-मधून भूकंपाचे धक्के बसतात. येथील हवा आग्नेय व्यापारी वाऱ्यांमुळे प्रसन्न असते. परंतु जानेवीरी-फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या चक्री वादळांनी बरेच नुकसान होते. नारळीच्या बागा व नारळीची उत्पादने हाच येथील महत्त्वाचा व्यवसाय असून काही तेलगिरण्या निघाल्या आहेत.

ब्रिटिश खलाशी कॅ. कीलिंग यांनी १६०९ मध्ये या बेटांचा शोध लावला असला, तरी येथील पहिली वसाहत जॉन रॉस याने १८२७ मध्ये केली. कित्येक वर्षे रॉस कुटुंबाकडेच ब्रिटिश सरकारने ह्या बेटांबाबतचे अधिकार दिले होते. दुसऱ्या महायुद्धात येथे विमानतळ बांधला गेला आणि संदेशवहनामधील हा महत्त्वाचा टप्पा बनला. १९५५ साली ब्रिटिशांनी ही बेटे ऑस्ट्रेलियाकडे दिली.

डिसूझा, आ. रे.