दीपमाळ : फुलांच्या झुबक्यांसह (पुंजवल्लरी) फांदीचा भाग.

दीपमाळ-२ : (हिं. हेजुरचेरी गु. मातीसूळ, मातीजेर लॅ. लेओनोटिस नेपेटीफोलिया कुल–लॅबिएटी). सुमारे १·२–१·८ मी. उंच, शोभिवंत, ओषधीय [→ औषधि] व वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती. ही श्रीलंकेत आणि भारतात उष्ण ठिकाणी सर्वत्र, जंगली अवस्थेत किंवा लागवडीत आढळते शिवाय आशिया, आफ्रिका व अमेरिका येथील उष्ण प्रदेशांत आढळते खोड बारीक, चौधारी व सूक्ष्म लवदार पाने साधी, मोठी, लांब देठाची, समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व पातळ. मुख्य खोडावर व फांद्यांवर विशेषतः वरच्या पेऱ्यांवर पानांच्या वा छदांच्या बगलेत पुंजासारख्या वल्लरीत [→ पुष्पबंध] शेंदरी नारिंगी रंगाचे अनेक फुलांचे झुबके सप्टेंबर–ऑक्टोबरात येतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ लॅबिएटी कुलात (तुलसी कुलात) वर्णिल्याप्रमाणे. छदे व संदले काटेरी टोकांची असतात. फळ विभागून त्याचे चार, त्रिकोणी व रेषांकित भाग होतात प्रत्येकाला कपालिका म्हणतात. बिया लहान व अनेक असतात.

पाने, संदले व फुले यांमध्ये कडू द्रव्य, मेदी अम्ल [→ वसाम्ले], रेझीन व खनिज द्रव्ये असतात. भाजणे, पोळणे यांवर फुलांची राख लावतात दह्यातून ती गजकर्ण, नायटे, चाई आणि खाज कंडूवरही लावतात. मॅलॅगॅसीत ही वनस्पती शुद्धिकारक, आर्तवजनक (विटाळ साफ करणारी), ज्वरनाशक, सारक आणि मादक मानली असून ती कातडीचे विकार, अनार्तव (विटाळ बंद होणे) व ज्वरावर वापरतात. प्वेर्त रीकोमध्ये पानांचा काढा बलवर्धक आणि ज्वरनाशी म्हणून देतात. ब्राझीलमध्ये संधिवातावर पानांचा उपयोग करतात. छोटा नागपूर प्रदेशातील मुंडा आदिवासी स्त्रिया स्तन सुजून दूध देत नसल्यास मुळे वाटून त्यावर घासतात.

परांडेकर, शं. आ.