म्यूलर, पॉल हेरमान : (१२ जानेवारी १८९९–१२ ऑक्टोबर १९६५). स्विस रसायनशास्त्रज्ञ. डीडीटी (डायक्लोरोडायफिनिलट्रायक्लोरोएथेन) या रासायनिक पदार्थाच्या अनेक कीटकांवरील संपर्कजन्य विषारी परिणामांच्या शोधाबद्दल शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे १९४८ चे नोबेल पारितोषिक म्यूलर यांना मिळाले.

म्यूलर यांचा जन्म ओल्टन (स्वित्झर्लंड) येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बाझेल येथे झाले. १९१६ मध्ये ते ड्रायफस अँड कंपनीमध्ये प्रयोगशालेय साहाय्यक होते. १९१७ मध्ये लोंझो एजी कंपनीच्या शास्त्रीय-औद्योगिक प्रयोगशाळेत साहाय्यक रसायनशास्त्रज्ञ म्हणून ते काम करू लागले. येथे त्यांना औद्योगिक रसायनशास्त्राचा भरपूर प्रत्यक्ष अनुभव मिळाला. १९१८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर १९१९ मध्ये पदविका मिळवून त्यांनी बाझेल विद्यापीठात शिक्षण घेतले व १९२५ मध्ये त्या विद्यापीठाची रसायनशास्त्राची डॉक्टरेट पदवी मिळविली. याच वर्षी बाझेलमधील जे. आर्‌. गायगी एजी या कंपनीत नोकरीस लागून १९४६ मध्ये ते तेथील वनस्पति-संरक्षक पदार्थांवरील वैज्ञानिक संशोधनाचे उपसंचालक झाले. १९६१ मध्ये ते या कंपनीतून सेवानिवृत्त झाले. सुरुवातीस त्यांनी वनस्पतीजन्य रंजके आणि कातडी कमावण्याकरिता वापरण्यात येणारे नैसर्गिक पदार्थ यांवर संशोधन केले. १९३० च्या सुमारास कातडी कमावण्यासाठी उपयुक्त असे इर्गाटॅन एफएल आणि इर्गाटॅन एफएलटी हे दोन संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेले) पदार्थ शोधून काढले.

इ. स. १९३५ मध्ये ⇨ कीटकनाशकावर संशोधन करीत असताना त्यांचे लक्ष, संश्लेषित संपर्कजन्य कीटकनाशक (कीटकाच्या शरीर, पाय वगैरे भागांशी संपर्क होऊन कीटकाला मारणारा पदार्थ) शोधण्याकडे वळले. चार वर्षांच्या परिश्रमपूर्वक संशोधनानंतर संश्लेषित डीडीटी मिळाले व त्याचे स्विस एकस्व (पेटंट) म्यूलर यांनी १९४० मध्ये घेतले. हे संयुग १८७३ मध्ये एका ऑस्ट्रियन विद्यार्थाने तयार केले होते परंतु ते दुर्लक्षित राहिले होते. या वेळी केलेल्या क्षेत्रीय चाचण्यांत डीडीटी घरगुती माश्यांशिवाय उवा, डास आणि कोलोरॅडो बीटल या बटाटानाशक कीटकावर परिणामाकारक ठरले. १९४२ मध्ये ‘गेसारॉल’ आणि ‘निकोसाइड’ नावांची डीडीटीवर आधारित दोन कीटकनाशके बाजारात विक्रीस आली. दुसऱ्या महायुद्धात ⇨ प्रलापक सन्निपात ज्वर आणि हिवताप (मलेरिया) या रोगांवरील प्रतिबंधात्मक उपायांकरिता ही औषधे अतिशय प्रभावी ठरली. ही संयुगे कृषी कीटकविज्ञानातही मोलाची ठरली. म्यूलर यांच्या शोधामुळे इतर कीटकनाशकांच्या शोधास जोरदार चालना मिळाली.

डीडीटी हे तयार करण्यास सोपे व स्वस्त असे कीटकनाशक आहे. ते फक्त कीटकांना विषारी आहे असे म्यूलर यांना वाटले होते आणि त्याच्या साहाय्याने संधिपाद (सांधेयुक्त पाय असणाऱ्या) प्राण्यांद्वारे फैलावणाऱ्या रोगांचे उच्चाटन करण्यासंबंधीचे अतिरंजित दावे काही जणांनी केले. तथापि लवकरच शास्त्रज्ञांना वाटले होते त्यापेक्षा कीटक अधिक प्रतिरोधक असल्याचे आणि डीडीटी एकूण जीवसृष्टीला व परिसराला विघातक असल्याचे दिसून आले. त्यामुळे कित्येक प्रगत देशांनी त्याच्या वापरावर बंदी घातली.

म्यूलर यांचे अनेक शास्त्रीय संशोधनपर निबंध Helvetica Chimica Acta या नियतकालीकात प्रसिद्ध झाले. ते बाझेल येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.