संमोहक द्रव्ये : (शायके). निद्रानाशाची तकार असणाऱ्या व्यक्तींमध्ये झोपतेवेळी दिल्यास जी द्रव्ये नैसर्गिक झोपेच्या आगमनास मदत करतात त्यांना संमोहक द्रव्ये किंवा शायके म्हणतात. त्यांच्या प्रभावामुळे येणाऱ्या झोपेतून व्यक्तीला सहज जागे करता येते. तसेच इतर वेळी (उदा., दिवसाच्या प्रारंभी) घेतल्यास ही औषधे डोळ्यांवर झापड आणून दैनंदिन व्यवहारात अडथळा आणतात परंतु नैसर्गिक झोपेची निर्मिती करण्यासाठी नेहमीची मात्रा (झोपतेवेळची) अपुरी पडते [→ झोप].

एकोणिसाव्या शतकातील ब्रोमाइड क्षार, पॅराआल्डिहाइड, युरेथेन, क्लोरल हायड्रेट आणि त्याच्याशी साम्य असणारी इतर द्रव्ये इत्यादींची जागा विसाव्या शतकात बार्बिच्युरिक अम्लाच्या संयुगांनी घेतली [→ बार्बिच्युरेटे]. या औषधांच्या सु. ५० प्रकारांमध्ये बरीच विविधता असल्यामुळे निद्रानाशाच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांचा मोठया प्रमाणात उपयोग झाला. सवय लागणे, अधिक मात्रेमुळे तंत्रिका तंत्रामधील (मज्जा- संस्थेतील) महत्त्वाच्या नियंत्रक केंद्रांचे (उदा., श्वसनकेंद्र) अवसादन होणे, आत्महत्येसाठी वापर यांसारखे बरेच तोटे असूनही ही औषधे १९६० पर्यंत लोकप्रिय होती. त्यानंतर आलेल्या बेंझोडायॲझेपीन वर्गातील औषधांनी हळूहळू बार्बिच्युरिक अम्लाच्या संयुगांची जागा घेतली. ही औषधे त्यांच्या नेमक्या (विवेचक) कार्यपद्धतीमुळे अधिक परिणामकारक व सुरक्षित ठरली आहेत.

सध्या उपलब्ध असलेल्या झोपेच्या औषधांमध्ये पुढील द्रव्यांचा समावेश होतो : (१) बेंझोडायॲझेपीन वर्ग : डायझेपाम, नायट्नोझेपाम, ट्रायझोलॅम इत्यादी. (२) रासायनिक रचनेत भिन्न, परंतु बेंझोडायॲझेपिनाच्याच ग्राहीशी बद्ध होऊन परिणाम घडविणारी झोपिक्लोनांसारखी औषधे आणि (३) शामके व शांतके यांच्या वर्गातील काही जुनी औषधे. उदा., बार्बिच्युरिक अम्लापासून तयार केलेली संयुगे, कनिष्ठ शांतके, क्लोरल हायड्रेट, ट्रायक्लोफॉस इत्यादी.

बहुसंख्य औषधांचा परिणाम मेंदूतील गॅमा अमायनोब्युटिरिक अम्ल या अवसादक (दमनकारी) रसायनाच्या कियेस अधिक प्रभावी करून तंत्रिका तंत्रातील विशिष्ट क्षेत्रांचे अंशत: निष्क्रियण घडवून साधला जातो. हा निद्राजनक परिणाम घडत असताना लहान मेंदूवरील त्यांच्या कियांमुळे स्नायूंच्या हालचालींतील सुसूत्रता कमी होणे, तोल जाणे यांसारखे दुष्परिणाम आढळू शकतात. प्रमस्तिष्काच्या (मोठया मेंदूच्या) काही भागात अवसादन घडल्यामुळे विचारशक्ती, अचूक निर्णय घेण्याची क्षमता आणि विशेष कौशल्यपूर्ण सूक्ष्म हालचाली (उदा., यांत्रिक साधनांची कुशल हाताळणी) यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. झोपताना घेतलेल्या औषधांचा अवशिष्ट दुष्परिणाम दुसऱ्या दिवशी जागेपणी टिकून राहिल्यास व्यक्तीच्या व्यावसायिक कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

संमोहक द्रव्यांच्या उपयोगाच्या दृष्टीने निद्रानाशाच्या रूग्णांचे मुख्यत: पुढील तीन वर्ग करता येतात : (१) तात्पुरता, अत्यल्पकालिक निद्रानाश: झोपेची जागा बदलणे, जेट विमानाने प्रवास, आसपास गोंगाट होणे, कामाच्या वेळातील बदल, रूग्णालयात तपासणीसाठी दाखल होणे यांसारख्या कारणांनी झोपेत अडथळा येतो. या व्यक्तींना शरीरात अल्पकाळ राहणाऱ्या औषधांच्या मात्रा एक किंवा दोन दिवस देऊन इष्ट परिणाम साधता येतो.

(२) काही आठवडयांचा, अल्पमुदतीचा निद्रानाश : प्रिय व्यक्तीचे निधन, कौटुंबिक समस्या, व्यावसायिक चिंता, गंभीर स्वरूपाचा आजार यांमुळे काही आठवडे किंवा महिने टिकणाऱ्या निद्रानाशासाठी औषधांची आवश्यकता भासते. अशा रूग्णांना अल्पकाळ परिणाम टिकणाऱ्या औषधांच्या मात्रा सुरूवातीस एक आठवडा व आवश्यकतेनुसार तीन आठवडयांपर्यंत देणे परिणामकारक ठरते. नंतर काही दिवस थांबून पुन्हा जरूर पडल्यास एक-दोन आठवडे उपाययोजना करता येते.

(३) दीर्घ मुदतीचा निद्रानाश : मानसिक विकार, व्यसनाधीनता (मदयपान किंवा हेरॉइन वा तत्सम द्रव्यांचे सेवन) यांमुळे निर्माण होणारा निद्रानाश बरा करण्यासाठी संमोहक द्रव्यांचा उपयोग फारसा परिणाम-कारक ठरत नाही. इतर उपचारांना साहाय्यक म्हणूनच ही औषधे वापरता येतात. कित्येक आठवडे हे उपचार चालू ठेवावे लागतात. काही आठवडयांनी झोपेची औषधे थांबविल्यावर रूग्णाला शांत झोप न लागणे, मधूनमधून काही तास जाग येणे, अस्वस्थ करणारी स्वप्ने पडणे यांसारखा त्रास होऊ शकतो. याची स्पष्ट कल्पना रूग्णाला आधीच देणे आवश्यक ठरते.

संमोहक औषधांचा उपयोग लहान मुलांमध्ये सहसा केला जात नाही. रात्री घाबरून उठणे किंवा झोपेत चालणे यांसारख्या काही लक्षणांमध्ये ती वापरावी लागतात. वृद्धांमध्ये औषधांचा चयापचय होण्याची गती कमी होत असते तसेच हालचालींमधील सफाईदारपणा कमी होण्याची शक्यता असते. औषधांमुळे अडखळत चालणे किंवा पडणे यांसारख्या शक्यता लक्षात घेऊन झोपेची औषधे शक्यतो टाळावी लागतात. कमीतकमी मात्रेपासून सुरूवात करून ती आवश्यकतेनुसार वाढविणे अधिक सुरक्षित ठरते. वयोमानानुसार दैनंदिन झोपेचे प्रमाण कमी होत असल्यामुळे औषध घेऊन झोप वाढविणे आवश्यक नसते, ही गोष्टही वृद्धांना समजावून सांगावी लागते. गरोदर स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता आणि यकृत वा वृक्काचे विकार असलेले रूग्ण यांना झोपेची औषधे देताना अधिक काळजी घ्यावी लागते. इतर व्यक्तींमध्येही तंत्रिका तंत्राचे अवसादन करणारी इतर द्रव्ये घेत असल्यास झोपेच्या औषधांची मात्रा कमी करावी लागते. उदा., हिस्टामीनरोधी औषधे, अल्कोहॉल, शांतके, शामके वगैरे घेणाऱ्या व्यक्ती.

श्रोत्री, दि. शं.

आयुर्वेद : शायके म्हणजे झोप आणणारी औषधे. शरीरात किंवा शिर ह्या स्थानामध्ये वात किंवा पित्त ह्या दोषांचे आधिक्य झाले आणि त्या दोषांनी विषयापासून इंद्रियांना परावृत्त होऊ दिले नाही तर झोप नाहीशी होते. तसेच मन:स्ताप, धातुक्षय आणि आघात ह्यांनीही निद्रानाश होतो. वात दोष अधिक असेल तर वातनाशक तेलांचा अभ्यंग विशेषत: कान, नाक आणि डोके व तळपाय ह्यांच्यावर तेल घालणे. वातनाशक द्रव्ये अंगाला लावून मर्दन किंवा मृदू मर्दन करावे. पिंपळमूळाचे चूर्ण झोपताना गरम पाण्याबरोबर दयावे. आस्कंद चूर्ण दुधाबरोबर झोपताना दयावे. तकधारा व तैलधारा म्हणजे विधिपूर्वक डोक्यावर तेल किंवा ताक ह्यांची धार सोडणे हा उपचार आहे. पित्तज निद्रानाशाकरिता शीतवीर्य द्रव्यांचा आहार, पान, औषध यांचा उपयोग मोरावळ्यासारख्या किंवा डाळींब पाकासारख्या अनुपानाबरोबर करावा. तसेच प्रवाळ, मौक्तिक, मौक्तिकयुक्त कामदुधा, सुवर्णमाक्षिक भस्म, गोदंती भस्म ही मोरावळा, दूध व साखर ह्या अनुपानाबरोबर दयावीत. मज्जागत वात कमी करण्याकरिता आवळकाठी, गुळवेल व नागरमोथा ह्यांचे मधतुपाबरोबर सेवन करावे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री

पहा : औषधिक्रियाविज्ञान झोप.

संदर्भ : 1. Gilman, A. G. and others, Eds., Goodman and Gilman’s Pharmacological Basis of Therapeutics, New York, 1990.

2. Leonard, B. E. Fundamentals of Psychopharmacology, Chinchester, 1990.