गॅस्केल, एलिझाबेथ क्लेग् हॉर्न : (२९ सप्‍टेंबर१८१०–१२ नोव्हेंबर १८६५). इंग्रज कादंबरीकर्त्री. जन्म टेम्स नदीच्या उत्तर तीरावरील चेल्सी येथे. औद्योगिक क्षेत्रातील संघर्षाचे चित्रण असलेली मेरी बार्टन – अ टेल ऑफ मँचेस्टर लाइफ (१८४८) ही तिची पहिली कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली. क्रॅनफर्ड (१८५३), रूथ-अ नॉव्हेल (१८५३), नॉर्थ अँड साउथ (१८५५), लॉइस द विच (१८५९), सिल्व्हिआज लव्हर्स (१८६३) आणि अपूर्ण राहिलेली वाइव्ह्‌ज अँड डॉटर्स : ॲन एव्हरी-डे स्टोरी (ऑगस्ट १८६४ ते जानेवारी १८६६ पर्यंत कॉर्नहिल मॅगझिनमधून क्रमशः प्रसिद्ध झालेली) ह्या तिच्या अन्य काही कादंबऱ्या होत. क्रॅनफर्ड व वाइव्ह्‌ज अँड डॉटर्स… ह्यांची गणना तिच्या उत्कृष्ट कादंबऱ्यांत केली जाते. रूथ… मध्ये तिने निर्भीडपणे मांडलेल्या कुमारी मातेच्या समस्येने व्हिक्टोरिअन कालखंडातील इंग्रज वाचकांना धक्का दिला होता. विविध प्रसंगांतील नाट्यात्मकतेची जाणीव, खेळकर विनोद आणि प्रसन्न, अकृत्रिम शैली ही तिच्या कादंबरीलेखनाची काही वैशिष्ट्ये. तिच्या सूक्ष्म आणि सफाईदार व्यक्तिरेखनाचा प्रत्यय तिच्या वाइव्ह्‌‌ज अँड डॉटर्स… मधून विशेषत्वाने येतो.

यांशिवाय तिने लिहिलेले द लाइफ ऑफ शार्लट ब्राँटी  (२ खंड, १८५७) हे चरित्र म्हणजे इंग्रजी चरित्रसाहित्यातील एक मोलाची कृती होय. तिने काही कथाही लिहिल्या आहेत. हँपशरमधील ऑल्टन येथे ती निधन पावली.

संदर्भ : Hopkins, Annette, Elizabeth Gaskell : Her Life and Work, London, 1952.

देशपांडे, मु. गो.