प्लॅटिपस : या प्राण्याला डकबिल, डकबिल प्लॅटिपस, डकमोल, वॉटरमोल अशीही नावे आहेत. ⇨

काटेरी मुंगीखाऊ (एकिड्‌ना) व प्लॅटिपस यांचा समावेश ⇨ मोनोट्रिमॅटा गणात होतो. प्लॅटिपस हा सर्वांत आद्य असा एक सस्तन प्राणी असून त्याचा अंतर्भाव ऑर्निथोऱ्हिंकिडी कुलात करतात व त्या कुलात प्लॅटिपसाची ऑर्निथोऱ्हिंकस ॲनॅटिमस ही एकच जाती आहे. त्याच्या अंगावर केस असतात व त्याची मादी आपल्या पिलाला दूध पाजते ही सस्तन प्राण्याची लक्षणे आहेत परंतु अंडी घालणे व खरी स्तनाग्रे नसणे हे त्याच्यातील व इतर सस्तन प्राण्यांतील फरक आहेत. तो ऑस्ट्रेलियाचा पूर्व भाग व टास्मानिया येथे आढळतो. तो अर्धजलवासी असून उष्ण कटिबंधातील समुद्रसपाटीचे जलप्रवाह ते समुद्रसपाटीपासून २,००० मी. उंचीवरील शीत सरोवरांत आढळतो.

प्लॅटिपस

त्याची चोच बदकासारखी लांबट, रुंदट, पसरट व चामड्यासारखी असते म्हणून त्याला डकबिल हे नाव पडले आहे. चोचीवर पातळ, मऊ संवेदनाक्षम अनावृत (आच्छादन नसलेली) त्वचा असून त्या त्वचेत स्पर्शग्राही स्वरूपाची पुष्कळ संवेदना इंद्रिये असतात.

प्लॅटिपसाच्या ठिकाणी सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांची काही लक्षणे आढळतात. मादीला शिशुधानी (जिच्यात पिलाची वाढ पूर्ण होते अशी उदरावरील पिशवी) नसते, तथापि अपिजघनास्थीचा (दुंगणाच्या हाडाचा जो भाग श्रोणीचा-म्हणजे धडाच्या तळाशी असलेल्या हाडांनी वेष्टिलेल्या पोकळीचा-अग्रभाग बनलेला असतो त्याच्या पुढे असणाऱ्या हाडाचा) विकास चांगला झालेला असतो. नराच्या मागच्या पायावर विषारी आयुध (आर) असते परंतु त्याच्या कार्याविषयी माहिती नाही, मात्र ते इतर मोनोट्रिम प्राण्यांतही आढळते. त्याला बरगड्यांच्या सतरा जोड्या व कमरेचे फक्त दोनच मणके असतात. कवटी पुढच्या बाजूला पसरट (विस्तार पावलेली) असते व सुरूवातीला बाहेर जाणाऱ्या व नंतर आत वळणाऱ्या अग्रहनूचा चोचीला आधार मिळतो. यांच्यामधे डंबेलच्या आकाराचे हाड असते. हे हाड सरीसृप प्राण्यांची प्रातिनिघिक पूर्वहलास्थी (नाकाच्या पोकळीच्या तळाशी असणारे कवटीचे हाड) असल्याचे मानतात. प्लॅटिपसाच्या मेंदूवर सुरकुत्या नसतात. याशिवाय हा प्राणी अंडी घालणारा असल्यामुळे त्याच्यात अवस्कर (ज्यात गुदद्वार, जननमार्ग व मूत्रमार्ग उघडतात असा शरीराच्या मागील भागातील कोष्ठ), दोन गर्भाशय व आद्य प्रजोत्पादक इंद्रिये आढळतात आणि ही सरीसृप प्राण्यांत आढळणारी लक्षणे होत.

त्याच्या अंगावर दाट, आखूड फर असते. बाह्य कर्ण नसतो. शेपटी रूंद, पसरट असून बीव्हरसारखी दिसते. दुधाचे दात पडून जातात व त्यांच्या जागी शृंगी पट्ट येतात. त्यांनी तो अन्नाचे तुकडे करतो. कवचधारी व मृदुकाय प्राणी, कृमी, कीटक हे त्याचे अन्न होय. मागच्या व पुढच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात. त्याच्या विषारी आरीने लहान प्राण्यांना झालेली जखम प्राणघातक असते पण मानव व इतर मोठ्या प्राण्यांना झालेल्या जखमा फक्त वेदनाकारक असतात.

प्रौढ प्लॅटिपस सु. ६० सेंमी. लांब असून त्याचे वजन अदमासे २ किग्रॅ. भरते. तो नदीच्या तीरांवर बिळे करून त्यात राहतो. बिळाचे एक तोंड पाण्याखाली असते व दुसरे तीरावर असते. बिळाची लांबी ६-१५ मी. असते. बिळाला गवताचे अस्तर असते व त्यात घरट्याची कोठी असते. मादी त्यात दोन गोलसर, पांढरी, चामड्यासारख्या कवचाची अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम मादी करते आणि त्याला सु. दोन आठवड्यांचा काळ लागतो. जन्माच्या वेळी पिलांच्या अंगावर केस असतात व ती असहाय्य असतात. मादी त्यांना आपल्या स्तन ग्रंथींतून स्त्रवणारे दूध पाजते.

जमदाडे, ज. वि.