ओकापी : हा जिराफ-कुलातील एक अती आद्य दुर्मिळ, रवंथ करणारा सस्तन प्राणी आहे. १९०० साली ब्रिटिश शोधक जॉन्स्टन यांना तो प्रथम आढळला म्हणून या प्राण्याला ओकापिया जॉन्स्टनाय असे प्राणिशास्त्रीय नाव दिले आहे. आफ्रिकेतील काँगोच्या निबिड अरण्यांत हा राहतो.

ओकापी

जिराफापेक्षा लहान असलेला हा प्राणी सु. १·५ मी. उंच असतो. पाय, मान आणि शेपूट आखूड असतात. मादी नरापेक्षा मोठी असते. शरीराचा रंग बेदाण्यासारखा झगझगीत बदामी असतो पण ढुंगण आणि पायांच्या वरच्या भागावर आडवे काळे व पांढरे पट्टे असतात. डोके आणि पायांचा खालचा भाग पांढरा असतो. नराला लहान शिंगे असतात पण मादीला नसतात.

हा प्राणी एकलकोंडा असून रात्री बाहेर पडतो. समागमाच्या कालात मात्र यांची जोडपी आढळतात. मादीला एका खेपेस एकच पिल्‍लू होते. झाडपाल्यावर तो उपजीविका करतो. तो बुजरा पण सावध असतो.

ओकापी हा मायोसीन आणि प्लायोसीन (सु. २ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील आखूड मानेच्या आद्य जिराफांपैकी सापेक्षतया न बदललेला एकमेव जिवंत प्राणी असल्यामुळे त्याचे प्राणिशास्त्रज्ञांना विशेष महत्त्व वाटते.

कर्वे, ज. नी.