जीन :गुणसूत्रांमध्ये (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमध्ये) असणाऱ्या आनुवंशिक घटकांच्या एककाला जीन किंवा जनुक म्हणतात. सर्व जीवांचे शरीर ज्या एककांचे बनलेले असते त्यांना कोशिका (पेशी) म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक कोशिकेत एक केंद्रक (कोशिकेतील क्रियांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज) असतो आणि त्यात धाग्यांसारख्या काही महत्त्वाच्या संरचना असतात, त्यांना गुणसूत्रे म्हणतात. प्रत्येक गुणसूत्रावर माळेतील मण्यांप्रमाणे ओळीने मांडणी असलेल्या अनेक अतिसूक्ष्म कणांतील प्रत्येकाला जीन म्हणतात. एका जातीतील प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक कोशिकेतील गुणसूत्रे व त्यांवरील जीन सारखे असतात, परंतु भिन्न जातींत गुणसूत्रांची संख्या भिन्न असून त्यांवरील जीनही भिन्नत्व दर्शवितात. जीनांची संख्या प्रचंड असते. काही सूक्ष्मजंतुभक्षींमध्ये निरनिराळे १०० जीन असतात, तर सूक्ष्मजंतूंमध्ये ते १,०००–३,००० असतात. ड्रॉसोफिला  या फळमाशीत प्रत्येक कोशिकेत सु. पाच हजार (काहींच्या मताने दहा हजार) जीन, तर मनुष्यात त्यांची संख्या दहा हजार (काहींच्या मताने नव्वद हजार) असावी असे मानतात. प्रत्येक जीन अतिजटिल रेणूसारखा असून तो स्वयंनिर्मिती करू शकतो इतकेच नव्हे, तर कोशिकेतील सर्व जीवनकार्ये सगळे जीन मिळून नियंत्रित करतात आणि त्या व्यक्तीतील विशेष लक्षणांचे संततीत वहन [→ आनुवंशिकता] करतात. अशा लक्षणांची संख्या इतकी मोठी असते की, त्यांचे अनुहरण (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत नेली जाण्याची क्रिया) गुणसूत्रांपेक्षा त्यांतील जीनांच्या प्रचंड संख्येच्या द्वारेच होते असे मानतात. थोडक्यात सांगावयाचे तर जीन आनुवंशिकतेची एकके होत. प्रयोगांनी असे सिद्ध झाले आहे की, सर्व सजीवांत, मग ते अविकसित असोत किंवा विकसित असोत, जननिक (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत नेणारी) यंत्रणा सामान्यतः सारखीच असते. कोशिकेच्या विभाजनानंतर उत्पन्न झालेल्या प्रत्येक नवीन कोशिकेत मूळच्या जीनांचा संपूर्ण संच उतरतो. प्रत्येक भिन्न गुणसूत्रावर प्रत्येक भिन्न जीनाचे स्थान (बिंदुपथ) निश्चित असते. काही खालच्या दर्जाच्या फार साध्या जीवांत जीनांचे कार्य करणारे सूक्ष्मकण गुणसूत्रावर नसून ⇨जीवद्रव्यात विखुरलेले व मुक्तपणे तरंगत असतात. जीनांशिवाय जीवद्रव्यात आढळणाऱ्या व स्वयंनिर्मिती करणाऱ्या इतर आनुवंशिक एककांच्या साहाय्याने संततीत काही जननिक बदल घडून येतात, असे आढळून आले आहे यांना प्लाझ्माजीन म्हणतात. योहान्सेन या सुप्रसिद्ध डॅनिश जीववैज्ञानिकांनी जीन ही संज्ञा प्रथम उपयोगात आणली (१९०९) तसेच एखाद्या व्यक्तीच्या दृश्य लक्षणांबद्दल ‘फेनोटाइप’ (सरूपविधा) व त्या लक्षणांच्या संदर्भात व्यक्तीतील जीनांबद्दल ‘जेनोटाइप’ (जीनविधा किंवा जनुकविधा) या संज्ञाही प्रचारात आणल्या [→ आनुवंशिकी]. त्यापूर्वी मेंडेल यांनी केलेल्या संकर-प्रयोगांमुळे (१८६६ १९००) जनकांच्या प्रजोत्पादक कोशिकांतून निश्चित स्वरूपाच्या  काही घटकांद्वारे (एककांद्वारे) संततीस त्यांची लक्षणे नियमितपणे प्राप्त होतात, हे सिद्ध झाले होते. मेंडेल यांनी गुणसूत्रे किंवा जीन पाहिले नव्हते, परंतु लक्षणांचे काही कारक वा घटक असावेत हे त्यांनी गृहीत धरले होते. हे कारक म्हणजेच जीन होत हे योहान्सेन यांनी सिद्ध केले. जीन व लक्षणे ही भिन्न असून जीनांमुळे व्यक्तीत लक्षणांचा आविष्कार होतो. यानंतर मॉर्गन व त्यांचा शिष्यवर्ग यांनी केलेल्या संशोधनाने विसाव्या शतकातील जीन सिद्धांत मांडला गेला व त्या अन्वये जीन हा आनुवंशिकतेचे एकक मानला जाऊ लागला आहे. मेंडेल व त्यानंतर कित्येक इतर शास्त्रज्ञांनी केलेल्या आनुवंशिकतेसंबंधीच्या प्रयोगांत आलेल्या अनुभवामध्ये असलेली सुसंगती जीन सिद्धांतामुळे अजमाविता येऊन कित्येक अनपेक्षित अनुभवांचा उलगडा झाला. जीनांचे प्रत्यक्ष दर्शन अद्याप झालेले नाही, पण त्यांबद्दल साधार कल्पनाचित्र काढले गेले आहे  [→  आनुवंशिकी].

जीनांची रासायनिक संरचना आणि लक्षणांच्या अनुहरणातील त्यांची कार्यपद्धती यांबद्दल बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. जीनांत डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्‍ल) हे न्यूक्लिइक अम्‍ल [→ न्यूक्लिइक अम्‍ले] असल्यामुळे त्यांना स्वयंनिर्मिती करता येते पृथ्वीवरील जीवांचा आरंभ डीएनएसारख्या पदार्थामुळेच झाला असावा, असे म्हणूनच मानतात. जीन सापेक्षतः स्थिर असतात, तथापि त्यांमध्ये उत्परिवर्तनाने (एकाएकी होणाऱ्या बदलांनी) विकल्प निर्माण होऊन बदल घडून येतात व ते पिढ्यान्‌पिढ्या चालू राहतात. जीनाचा प्रभाव लागलीच दुसऱ्या पिढीत दिसून आल्यास त्याला प्रभावी व तो एकदोन पिढ्या न दिसल्यास अप्रभावी म्हणतात त्यांचे उत्परिवर्तनी, मारक, पूरक आणि वैकल्पिक इ. प्रकारही आढळले आहेत. त्यांचे उत्परिवर्तनी जीनांचे क्रमविकासातील कार्य महत्त्वाचे असते [→ ऱ्व्हीस, ह्यूगो द]. 

जीन या संज्ञेऐवजी अलीकडे तीन भिन्न संज्ञा वापरण्याची प्रवृत्ती वाढू लागली आहे, कारण त्यांची कार्यक्षमता भिन्न प्रकारची असते. उत्परिवर्तनशीलत्व असल्यास ते जीन ‘म्यूटॉन’, जीवरासायनिक क्रियाशीलत्व असल्यास ‘सिस्ट्रॉन’ व जननिक पुनःसंयोजनाचे (आनुवंशिक लक्षणांच्या होणाऱ्या नवीन संयोगांचे) एकक असल्यास ‘रेकॉन’ म्हणून संबोधले जातात. एस्. बेंझर यांच्या मते म्यूटॉन हा जीनाचा सर्वांत लहान खंड असून उत्परिवर्तनाने तो व्यक्तीच्या लक्षणांत फरक घडवितो एका जीनातील अनेक खंडांचे पुनःसंयोजन होऊन नवीन जीन बनू शकतो. जीनातील ज्या सर्वांत लहान खंडाची अदलाबदल होऊ शकते, परंतु जननिक पुनःसंयोजनाने जो विभागला जात नाही, तो रेकॉन होय. अनेक जीनांचे पुनःसंयोजन होते, तसेच प्रत्यक्ष जीनातही होते. सिस्ट्रॉन हे जीनातील अधिक मोठे उपएकक असून त्यातील म्यूटॉन किंवा रेकॉन यांची सर्वांत लहान संख्या एका गुणसूत्रावर एकत्र राहणे आवश्यक असते त्यांचे कार्य जीवरासायनिक किंवा जननिक प्रकारचे असते. रेकॉन आणि म्यूटॉन यांचे नियंत्रण प्रत्येक ⇨ॲमिनो अम्‍लाच्या संश्लेषणावर (घटक पदार्थ एकत्रित आणून आवश्यक तो नवीन पदार्थ तयार करण्यावर) असून पॉलिपेप्टाइडांच्या निर्मितीवर सिस्ट्रॉनाचे नियंत्रण असते. आधी सांगितल्याप्रमाणे डीएनए हा पदार्थ जीनात असून संदेशवाहक आरएनएच्या (रिबोन्यूक्लिइक अम्‍लाच्या) द्वारे त्यातील माहिती केंद्रकाबाहेरच्या कोशिकाद्रव्यात येते आणि तेथे प्रथिनसंश्लेषण होते. ⇨हरगोविंद खोराना  यांना १९६९ मध्ये निर्जीव रसायनांपासून जीनाचे संश्लेषण करण्यात यश मिळाले.

पहा : आनुवंशिकी कोशिका गुणसूत्र.

संदर्भ : Hickman, C. P. Integrated Principles of Zoology, Tokyo, 1966.

परांडेकर, शं. आ.