सार्स, मिकाल : (३० ऑगस्ट १८०५–२२ ऑक्टोबर १८६९). नॉर्वेजियन जीवशास्त्रज्ञ. ते सागरी प्राणिविज्ञानाचे एक जनक मानले जातात. ते तज्ञ वर्गीकरणवैज्ञानिक व आकारवैज्ञानिक होते. तसेच जीवनचक्रे, डिंभांच्या अवस्था, प्रजोत्पादनाचे हंगाम, आवर्ती आविष्कार, सागरी जीवांचे स्थलांतर इत्यादींमध्येही त्यांना रुची होती. त्यांच्या संशोधनामुळे ॲनेलीड, ॲसिडियन, सीलेंटेरेट, कवचधारी (क्रस्टेशिया), एकायनोडर्म व मृदुकाय (मॉलस्क) प्राण्यांच्या माहितीत भर पडली. त्यांनी पुराजीवविज्ञानावरही संशोधन केले होते.

मिकाल यांचा जन्म नॉर्वेतील बर्गेन येथे झाला. त्यांनी क्रिस्तिॲनिया (आता ऑस्लो ) येथे धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले व १८२८ मध्ये पदवी मिळविली. नंतर त्यांनी १८५४ पर्यंत शिक्षक, व्हिकार (पॅरिसचे धर्मगुरू) व रेक्टर म्हणून काम केले. या काळात ते पुष्कळ वेळ प्राणिविज्ञानाचा अभ्यास करीत. त्यांचे बहुतेक महत्त्वपूर्ण संशोधन कार्य या काळात झाले. ७ ऑगस्ट १८५४ रोजी त्यांची क्रिस्तिॲनिया विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे असाधारण प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. मृत्यूपावेतो ते या पदावर होते.

तरुणपणी मिकाल यांनी अध्ययनासाठी खूप प्रवास केला. नॉर्वेचा उत्तर समुद्र तसेच हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, झेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क व स्वीडन या ठिकाणी सहा महिन्यांची मोहीम (१८३७) भूमध्य समुद्र, ॲड्रिॲटिक (१८५१), नेपल्स व मेसिनार (१८५२-५३) या मोहिमा त्यांनी काढल्या. १८३०–६० या काळात सागरी अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणाऱ्या) प्राण्यांची जीवनचक्रे स्पष्ट करण्याचे एक महत्त्वाचे संशोधन त्यांनी केले. बहुतेक सागरी प्राण्यांच्या डिंभांच्या अवस्था त्यांच्या प्रौढांपेक्षा अगदी वेगळ्या असतात. यामुळे मध्यस्थ अवस्थांची प्रणाली प्रस्थापित झाल्याशिवाय त्यांच्यातील संबंध शोधणे शक्य नव्हते. मिकाल यांनी अशा अनेक मध्यस्थ अवस्था शोधून काढल्या. त्यांनी ट्रोकोफोर डिंभ शोधून त्याचे वर्णन केले.

मिकाल यांनी गाळ उपसणाऱ्या साधनाच्या मदतीने खोल सागरी जीवांविषयीचे अनेक शोध लावले. जेथे प्रकाश पोहोचू शकत नाही, तेथे जीव नसतात हे व्यापक मत त्यांनी याद्वारे खोडून काढले. मिकाल यांनी नॉर्वेलगतच्या २००–४५० फॅदम खोलीवरच्या सागरी पाण्यात अपृष्ठवंशी प्राण्यांच्या मिळविलेल्या ४२७ जातींविषयीची संस्मरणिका १८६८ मध्ये प्रसिद्घ केली. यामुळे खोल सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले व यातून चॅलेंजर सागरी मोहिमेची संकल्पना व संघटन होऊ शकले.

मिकाल यांचे सु. ९५ शोधनिबंध प्रसिद्घ झाले. त्यांनी Bidrag til soedyrenes naturhistorie (१८२९) व Fauna Littoralis Norvegiae (१८४६ कोरेन व डॅनिएलसन यांच्या समवेत) हे ग्रंथ प्रकाशित केले. ते विसाहून अधिक परदेशी संस्था व ॲकॅडेमीचे सदस्य होते. त्यांना झुरिक (१८४६) व बर्लिन (१८६०) या विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या होत्या. त्यांच्या मूळ नॉर्वेजियन लेखनाचे सारांशरूपात फ्रेंच, इंग्लिश व जर्मन भाषांत अनुवाद प्रसिद्घ झाले आहेत. मिकाल यांचे क्रिस्तिॲनिया येथे निधन झाले.

मिकाल यांचे पुत्र गेऑर्ग ऑसिअन सार्स (१८३७–१९२७) यांनी १८६४ मध्ये गाळ उपसून प्राणी मिळविण्याच्या कामात मिकाल यांना मदत केली. तेव्हा गेऑर्ग यांना जीवंत सवृंत क्रिनॉइडे (समुद्रनलिनी) सु. ३०० फॅदम खोलीवर आढळली. फक्त जीवाश्मरूपात माहीत असलेला हा प्राण्यांचा गट मध्यजीव काळात निर्वंश झाल्याचे शास्त्रज्ञ मानीत असत. गेऑर्ग यांचे ॲन अकाउंट ऑफ क्रस्टेशिया ऑफ नॉर्वे (९ खंड, १८९०–१९२८) हा प्रमाण व्याप्तिलेख व त्यांनी चॅलेंजरवरील सफरीत जमविलेल्या कवचधारी प्राण्यासंबंधी केलेला अभ्यास हे मौलिक व उल्लेखनीय कार्य ठरले.

ठाकूर, अ. ना.