पृष्ठवंशी : पाठीचा कणा (पृष्ठवंश) असणाऱ्या कोणत्याही प्राण्याला ‘पृष्ठवंशी’ (व्हर्टिब्रेट) म्हणतात.  ⇨कॉर्डेटा  या प्राणिसंघाचा हा एक प्रमुख उपसंघ आहे (बहुकोशिक म्हणजे ज्यांचे शरीर अनेक पेशींचे बनलेले आहे अशा प्राण्यांच्या अनेक संघांपैकी कॉर्डेटा हा एक संघ आहे; यात कायम स्वरूपाचा किंवा अल्पस्थायी पृष्ठरज्जू असणाऱ्या सर्व प्राण्यांचा समावेश केलेला आहे सर्व पृष्ठवंशी कॉर्डेट आहेत परंतु सर्व कॉर्डेट मात्र पृष्ठवंशी नाहीत). या उपसंघात माशांपासून [→ मत्स्यवर्ग] मानवासह स्तनी प्राण्यांपर्यंत सर्व प्राण्यांचा समावेश होतो.

पहिले पृष्ठवंशी प्राणी ऑर्डोव्हिसियन (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील जंभहीन (जबडा नसलेले तसेच त्यांना कवटीही नसे-कर्परहीन किंवा कवटीहीन) असून जंभयुक्त माशांचा उदय सिल्युरियन (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात झाला. उभयचर (पाण्यात व जमिनीवरही) वास्तव्य करणारे प्राणी (अँफिबिया) डेव्होनियनमध्ये (सु. ४०-३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात), सरीसृप (सरपटणारे प्राणी; रेप्टिलिया) पेनसिल्व्हेनियनमध्ये (सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात), पक्षी (एव्हीज) व स्तनी (मॅमॅलिया) प्राणी जुरासिकमध्ये (सु. १८.५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) व शेवटी प्लाइस्टोसिनमध्ये (सु. ६ लक्ष वर्षांपूर्वी) मानव उदयास आला. पृष्ठवंशी उपसंघातील प्राण्यांची शरीरचना कॉर्डेटा या संघातील त्यांच्या आप्तप्राण्यांपेक्षा अधिक प्रगत असते. पृष्ठवंशी उपसंघातील प्राण्यांचे प्राथमिक वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

मत्स्य अधिवर्गामध्ये पादहीनता असते (म्हणजे पुढील व मागील पायांचा पूर्ण अभाव असतो). त्यांचा दुसरा विशेष म्हणजे ते पूर्णतया जलचर असतात, म्हणजे त्यांच्या उदयापासून आजतागायत ते पाण्यातच आहेत. चतुष्पाद अधिवर्गामध्ये पुढील दोन व मागील दोन पाय (चतुष्पाद अवस्था) पंचांगुलीयुक्त (पाच बोटे असलेले) असतात. याचा निरनिराळ्या परिसरांत चलनवलनासाठी (उदा.,पाण्यात पोहणे, जमिनीवर सरपटणे, रांगणे, घसरणे, झाडावर चढणे, बसणे, हवेत उडणे इत्यादींसाठी) उपयोग केला जातो. सापांची एक पादहीनता हा एक अपवाद आहे. त्यांचे चलनवलन उदरभागावरील शल्क व मणक्यांतील विशिष्ट रचना यांमुळे होणाऱ्या नागमोडी हालचालीद्वारे घडते. या दोन अधिवर्गांच्या क्रमविकासातील आप्तसंबंध पुढील आकृतीत दाखविल्याप्रमाणे आहेत.

जंभहीन प्राण्यांचा उदय ऑर्डोव्हिसियन ते डेव्होनियन काळात ऑस्ट्रॅकोडर्म प्राण्यांपासून (कठीण कवचधारी प्राण्यांपासून) झाला, असे निश्चितपणे जीवाश्मांच्या (शिळारूप झालेल्या अवशेषांच्या) साहाय्याने कळते. जंभहीन (सायक्लोस्टोमॅटा-गोलमुखी) प्लॅकोडर्म प्राण्यांच्या अंगावर चिलखती कवच होते व ते प्राणी डेव्होनियनाच्या शेवटी निर्वंश झाले. सिल्युरियन कल्पात एका मार्गाने उपास्थिमय (कूर्चेचा सांगाडा असलेल्या) माशांचा उदय झाला व दुसऱ्या मार्गाने अस्थिमय माशांचा विकास झाला. पुढे याच गटापासून काही हवेत (पाण्याबाहेर जाऊन) श्वसन करू शकणारे मासे (फुप्फुसमीन-डिप्नोई-क्रॉसोप्टेरिजाय) हे पाण्यामध्ये ऑक्सिजनाचे प्रमाण कमी झाल्याने व स्वजातीय प्राण्यांची संख्यावाढ, अस्तित्व टिकवण्यासाठी स्पर्धा, अन्नाचा अभाव, जलाशयातील पाण्यात अस्तित्व टिकवून धरण्यात अडचणी निर्माण होणे इत्यादींमुळे पाण्याबाहेर येऊन भूचर झाले असावेत आणि या प्राण्यांपासून उभयचर संक्रमित झाले असावेत. उभयचर प्राणी डेव्होनियन कल्पात उदय पावले. उभयचर वर्ग हा पृष्ठवंशी उपसंघाचा एक पराभूत वर्ग आहे. त्याचा विस्तार व विकास फार मर्यादित आढळतो, कारण प्रजननासाठी पाण्याची आवश्यकता, सदोष रुधिराभिसरण तंत्र (संस्था) व हृदय (त्रिकोष्ठ हृदय-दोन अलिंद, एक निलय) असणे इत्यादींमुळे जलाशयाजवळच्या भूमीच्या पट्ट्यावरच या प्राण्यांचे अस्तित्व आढळते. खाऱ्या पाण्यात उभयचर आढळत नाहीत (उदा., बेडूक). सरीसृप वर्गाप्रमाणे जमिनीवरील सर्व भागांत (वाळवंटे, पर्वतराजी, शुष्क भूप्रदेश इ.) ते सापडत नाहीत, तर फक्त जलसंचयाजवळच आढळतात म्हणजेच ह्या उभयचर वृत्तीनेच त्यांचे अस्तित्वमूल्य वाढवले आहे. उभयचरांपासून सरीसृपांचा उदय कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या शेवटी झाला. या वर्गातील महत्त्वपूर्ण प्राप्ती म्हणजे पाण्याअभावी जमिनीवर टिकणारे व वाढणारे कवचधारी अंडे. सरीसृपांचा भूमीवर अनुकूली (परिसराशी जुळवून घेऊन होणारा) प्रसार प्रथमच झालेला आढळतो. जमिनीखालील बिळांत, गुहांत, झाडांवर, दलदली चिखलांत, वालुकामय शुष्क प्रदेशांत, घनदाट जंगलांत व पर्वतराजींमध्ये सरीसृपांचे अनेक गण सुस्थित झाले. आता कासवे, मगरी, सुसरी, पाणसाप इ. पाण्यात राहू शकतात. सरडे व साप हे अलीकडे उदयास आले आहेत. सरीसृपांपासून पक्षी व स्तनी प्राणी उदयास आले, हे क्रमविकासाचे (उत्क्रांतीचे) एक चांगले उदाहरण आहे.

पृष्ठवंशी प्राण्यांचा क्रमविकासी वंशवृक्ष

अपृष्ठवंशी प्राण्यांपेक्षा पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीरचनेमध्ये संरचनात्मक क्रमविकास झालेला आढळतो. उभयचर व सरीसृप या प्राण्यांपेक्षा पक्षी व स्तनी प्राणी नियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिसराच्या तापमानापेक्षा सामान्यत: अधिक असून स्थिर असते असे) असतात. त्यांच्या हृदयामध्ये शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त संपूर्णतया वेगळे राहते. त्यात चार कप्पे असतात (दोन अलिंद, दोन निलय). स्तनी प्राण्यांमध्ये श्वसन तंत्र चांगले विकसित झालेले आढळते. त्यांनी इतर प्राण्यांपेक्षा परिसरातील घटकांपासून शरीरक्रियांच्या बाबत अधिक स्वातंत्र्य मिळविले आहे. त्यांच्या पृष्ठरज्जूभोवती खंडयुक्त मांडणी असलेले पृष्ठवंशाचे कशेरुक (मणके) असतात आणि मणक्यांनी तयार झालेल्या पोकळीत पृष्ठरज्जू सुरक्षित असतो. लिंगभेद आढळतो. मूत्रपिंडाच्या (वृक्क ग्रंथी) विकासाबाबत फक्त पृष्ठवंशी प्राण्यांत (पक्षी व स्तनी) अधिक प्रगती आढळते. जठर ग्रंथी ही स्तनी प्राण्यांत अधिक कार्यक्षम असते. शुक्राणू (पुं-जनन कोशिका) व अंडाणू (स्त्री-जनन कोशिका) यांचे बाहेर वहन करण्यासाठी वेगळ्या वाहिन्या असतात. तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) व मेंदू यांची वाढ आरंभीच्या पृष्ठवंशी प्राण्यांतसुद्धा तुलनेने उच्च प्रतीस पोहोचलेली दिसते. स्तनी प्राण्यांत मेंदू व ज्ञानेंद्रियांची वाढ यांचा उत्कर्ष साधलेला असून कपिवानर (बिनशेपटीचे वानर) व मानवामध्ये ज्ञानेंद्रियांचे सर्वात्मक विशिष्टीकरण झालेले आढळते. प्रमस्तिष्क (मोठ्या मेंदूच्या) गोलार्धाची सर्वाधिक परिपूर्णता झाली असल्याने बुद्धी, अनुभवातून शिकणे तसेच वाचा, चलन, भाषा, श्रवण केंद्रे मेंदूच्या या भागातच असतात. कार्यकारणभाव, क्रियाशीलता, हाताचा गुंतागुंतीची कामे करण्यास उपयोग, अवयवांच्या चलनातील सुसूत्रता (सहसंयोजन) इ. गुणसमुच्चयामुळे मानवाने आपल्या बौद्धिक वर्चस्वाने सर्व प्राणिसमूहांमध्ये वेगळेपण प्रस्थापित केले आहे.

पहा : अपृष्ठवंशी; उभयचर वर्ग; कॉर्डेटा; क्रमविकास; पक्षि वर्ग; मत्स्य वर्ग; स्तनी वर्ग.

संदर्भ :     1. Berril, N. J. The Origin of Vertebrates, New York, 1955.

2. Romer, A. S. The Vertebrate Body, Philadelphia, 1965.

3. Romer, A. S. The Vertebrate Story, Chicago, 1959.

कुलकर्णी, र. ग.