नाइटिंगेल, फ्लॉरेन्स: (१२ मे १८२०–१३ ऑगस्ट १९१०). इंग्रज परिचारिका व आधुनिक रुग्णपरिचर्या (शुश्रूषा) शास्त्राच्या संस्थापिका. त्यांना सार्वजनिक आरोग्यविज्ञानात मोलाची भर घातली. त्यांचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स येथे झाला. त्यांचे शिक्षण घरीच झाले. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन व इटालियन या भाषांखेरीज त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास, तत्त्वज्ञान व गणित हेही विषय शिकविले. अनेक भाषांचा अभ्यास त्यांनी पुढे जन्मभर चालूच ठेवला.

रुग्णालयात जाऊन रुग्णपरिचर्या शिकावी अशी इच्छा त्यांनी प्रकट करताच तिला तीव्र विरोध करण्यात आला व त्यांना पार्लमेंटच्या कामकाजाचे वृत्तांत अभ्यासण्याचे सुचविण्यात आले. त्थापि तीन वर्षांच्या काळातच त्या सार्वजनिक आरोग्य व रुग्णालये या विषयांतील तज्ञ म्हणून गणल्या जाऊ लागल्या. १८५० साली कैसर्सव्हर्ट (जर्मनी) येथील एका संस्थेत दाखल होऊन त्यांनी रुग्णपरिचर्याविषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार पाडला. १८५३ मध्ये लंडनच्या प्रसिद्ध हार्ले रस्त्यावरील एका छोट्या रुग्णालयात (इन्स्टिट्यूशन फॉर द केअर ऑफ सिक जंटलवुइमेन इन डीस्ट्रेस्ड सरकमस्टन्सेस) त्यांची अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. या संस्थेतील त्यांची कारकीर्द फार यशस्वी ठरली.

त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखून ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी १८५४ मध्ये रशियाविरुद्ध क्रिमियन युद्ध सुरू झाल्यावर नाइटिंगेल यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचविले. त्याप्रमाणे २१ ऑक्टोबर १८५४ रोजी ३८ परिचारिकांसह त्यांनी क्रिमियाला प्रयाण केले. हर्बर्ट यांनी तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयांतील रुग्णपरिचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी नाइटिंगेल यांच्याकडे सोपविली.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल

नोव्हेंबर १८५४ मध्ये त्या तुर्कस्तानातील स्कूटारी (आजचे ऊस्कूदार) येथील सैनिकी रुग्णालयात पोहोचल्या. हे रुग्णालय अतिशय गलिच्छ व आरोग्य दृष्ट्या दुर्लक्षिलेले होते. साधनांचाही मोठा अभाव होता व रोग्यांची संख्याही मोठी होती. तथापि नाइटिंगेल यांनी तेथे कामास ताबडतोब प्रारंभ केला. नंतर त्यांनी इंग्लंडमधून जादा परिचारिका बोलावून घेतल्या व जरूर ती साधनसामग्रीही मागवून घेतली. लष्करी अधिकारी व डॉक्टरांचा विरोध न जुमानता त्यांनी आपल्या पथकाकडून रुग्णसेवी करवून घेतली. तेथील जखमी व आजारी सैनिकांच्या व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून मृत्यूचे प्रमाण पुष्कळ कमी केले. १८५५ मध्ये या रुग्णालयात पटकी व प्रलापक सन्निपात ज्वराची (टायफस ज्वराची) भयंकर साथ उद्‌भवली. इंग्लंडकडे याबाबतीत योग्य त्या सुचना पाठवून स्कूटारीतील स्वास्थ्यरक्षा व्यवस्थापकांना नाइटिंगेल यांनी योग्य ती कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे या साथी चटकन नियंत्रणाखाली येऊन मोठी हानी टळली.

इंग्लंडमध्ये परतल्यानंतर त्यांनी कोणत्याही स्वागतसमारंभात भाग घेतला नाही. त्यांनी ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य, त्यांची राहण्याची व्यवस्था व त्यांना मिळणारे अन्न यांत सुधारणा घडवून आणण्याकरिता अविरत परिश्रम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच १८५७ मध्ये लष्कराच्या आरोग्यव्यवस्थेची चौकशी करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमण्यात आले. त्यामुळे सैनिकांचे अन्न, निवारा व आरोग्य यांसंबंधी इतिहासात प्रथम शांततेच्या काळात शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करण्यात आली. त्या रुग्णालय सुधारणांविषयक व स्वास्थ्यरक्षाविषयक सल्ला देत. परदेशी राज्ययंत्रणाही याबाबतींत त्यांचा सल्ला घेत असत. १८५९ मध्ये भारतातील लष्कराच्या आरोग्यव्यवस्थेची चौकशी करण्याकरिता एक समिती नेमण्यात आली होती व तिचा अहवाल १८६३ मध्ये नाइटिंगेल यांना सादर करण्यात आला. ब्रिटिश जनतेने उभारलेल्या नाइटिंगेल निधीतून सेंट टॉमस रुग्णालयात ‘नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस’ ही स्त्रियांना रुग्णपरिचर्याविषयक शिक्षण देणारी जगातील पहिली संस्था स्थापण्यात आली. १९०१ च्या सुमारास त्यांना अंधत्व आले. १९०७ मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला व तो मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.

त्यांनी बरेच ग्रंथलेखन केले असून त्यांपैकी नोट्स ऑन नर्सिंग (१८६०) हा ग्रंथ नावाजलेला आहे. नोट्स ऑन मॅटर्स ॲफेक्टिंग द हेल्थ, एफिशियन्सी अँड हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी हा त्यांचा प्रचंड ग्रंथ १८५८ साली प्रसिद्ध झाला. त्या लंडन येथे मृत्यू पावल्या.

कानिटकर, बा. मो. भालेराव, य. त्र्यं.