वास्तववाद, तत्वज्ञानातील : वास्तववाद हे ज्ञानमीमांसेतील एक मत आहे. ज्ञानाचा विषय असलेल्या वस्तूंना ज्ञानप्रक्रियेबाहेर स्वतंत्र, स्वायत्त अस्तित्व असते, हे ते मत. आपण खुर्ची, झाड, दगड इ. भौतिक वस्तू पाहतो, त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होते परंतु भौतिक वस्तू प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय जरी होत असली, तरी प्रत्यक्ष ज्ञानाचा असा विषय होण्यावर तिचे अस्तित्व अवलंबून नसते. अधूनमधून प्रत्यक्ष ज्ञानाचा असा विषय ती होते खरी पण तिचे अस्तित्व स्वतंत्र असते. जेव्हा मी एखादा दगड पाहत असतो, तेव्हा तो दगड माझ्या प्रत्यक्ष ज्ञानाचा, ज्ञानक्रियेचा विषय असतो. आता समजा, तो दगड पाहण्याचे सोडून मी दुसरीकडे पाहू लागलो (किंवा डोळे मिटून घेतले) आणि म्हणून तो दगड पाहण्याचा माझा अनुभव संपुष्टात आला, तरी तो दगड जसाच्या तसाच राहतो, त्याचे स्वरूप आणि अस्तित्व अबाधित राहते, असे वास्तववादाचे म्हणणे आहे. ह्या दृष्टीने पाहता प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय असलेले भौतिक पदार्थ मनोबाह्य (एक्स‌टर्नल) आहेत असे म्हटले पाहिजे. उलट, समजा मला काही जखम झाली आहे आणि तिची वेदना मला होते आहे. ही वेदना म्हणजे वेदनेच्या अनुभवाचा विषय होय. आता, हा वेदनेचा अनुभव काही कारणाने संपुष्टात आला, समजा मला गुंगी आली, तरी ह्या वेदनेचे अस्तित्व जसेच्या तसेच राहते असे आपण म्हणणार नाही. अननुभूत वेदना असत नाहीत. वेदना असणे म्हणजे वेदनेच्या अनुभवाचा विषय असणे. त्यापलीकडे स्वतंत्र अस्तित्व तिला नसते, भौतिक वस्तूंचे असे नसते, प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय असण्यापलीकडचे असे स्वतंत्र अस्तित्व त्यांना असते, हे मत म्हणजे वास्तववाद. वास्तववादाला विरोधी असलेले ज्ञानशास्त्रातील मत म्हणजे ⇨चिद्‌वाद. वस्तूंचे अस्तित्व आणि स्वरूप ज्ञात्याच्या ज्ञानाचे विषय असण्यावर अवलंबून असते, ह्या ज्ञानसंबंधापलीकडे वस्तूंना स्वतंत्र स्वरूप आणि अस्तित्व नसते हे मत म्हणजे चिद्‌वाद. प्रत्यक्ष ज्ञानाचा  विषय असलेल्या वस्तूचे स्वरूप आणि अस्तित्व स्वतंत्र असते त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यावर ते अवलंबून नसते, हे तर झालेच पण शिवाय व्यवहारात आपण असेही मानतो, की वस्तूचे मुळात, स्वतंत्रपणे जे स्वरूप असते, तेच स्वरूप त्या वस्तूच्या प्रत्यक्ष ज्ञानात आपल्याला प्रतीत होते आणि प्रत्यक्ष ज्ञानात वस्तूचे जे स्वरूप आपल्याला प्रतीत होत असते, नेमके तेच स्वरूप ती वस्तू प्रत्यक्ष ज्ञानाच्या विषय नसताना सुद्धा तिच्या अंगी असते. साध्या भाषेत सांगायचे, म्हणजे भ्रम, आभास, ज्ञानेंद्रियातील दोषांमुळे किंवा काही कारणाने वस्तूचे होणारे विपरीत दर्शन इ. अपवादात्मक अनुभव सोडले, तर वस्तू जशी असते तशीच ती आपल्याला दिसते आणि जशी ती आपल्याला दिसते तशीच ती एरव्हीही तिच्याकडे कोणी पाहत नसतानासुद्धा असते. मी पाहत असलेला हा दगड चपटा, करड्या रंगाचा, खडबडीत आणि कठीण आहे. हे त्याचे मुळातले स्वरूप आहे. प्रत्यक्ष ज्ञानात हेच स्वरूप जसेच्या तसे अनुभवाला येते आणि हा दगड कुणाच्याही प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय झालेला नसतो तेव्हाही त्याचे हेच स्वरूप असते. व्यवहारात आपण नैसर्गिकपणे स्वीकारत असलेल्या ह्या मताला सरल वास्तववाद (नाइव्ह रिॲलिझम) असे प्रौढ अभिधान तत्त्वज्ञानात देण्यात येते.

सरल वास्तववादात पुढील तीन विधाने स्वीकारलेली असतात. (१) प्रत्यक्ष ज्ञानात भौतिक वस्तूंचे-टेबल, खुर्ची, दगड इ. वस्तूंचे साक्षात ज्ञान होत असते. जेव्हा मी एखादा दगड पाहतो, तेव्हा खुद्द तो दगड माझ्या प्रत्यक्ष ज्ञानाचा लगतचा विषय असतो. (२) प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय असलेल्या भौतिक वस्तू सार्वजनिक असतात. मी जो दगड पाहतो नेमका तोच दगड इतर लोकही पाहू शकतात. भौतिक वस्तू अनेक ज्ञात्यांना त्यांच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा लगतचा विषय म्हणून उपलब्ध होऊ शकते. ह्याच्या उलट, मी सहन करीत असलेली एखादी वेदना, अनुभवत असलेला भावनेचा उद्रेक ह्यांचा दुसऱ्या कुणालाही साक्षात अनुभव घेता येत नाही. मी सहन करीत असलेल्या वेदनेसारखी वेदना दुसरा एखादा अनुभवू शकेल पण खुद्द माझी वेदना तो अनुभवू शकणार नाही. मी जो दगड पाहत आहे तोच दगड दुसरेही पाहू शकतात. म्हणून भौतिक वस्तू सार्वजनिक असतात आपले अनुभव खाजगी असतात. (३) आणि म्हणून भौतिक वस्तू मनोबाह्य असतात अनुभवांप्रमाणे आंतरिक नसतात. प्रत्यक्ष ज्ञानात भौतिक वस्तू विषय म्हणून आपल्याला उपलब्ध होते आणि त्या वेळी तिच्यात आणि ज्ञात्यांत ज्ञानसंबंध जुळून आलेला असतो. परंतु मनाशी तिचा असा संबंध जुळून येणे ही अधूनमधून घडून येणारी घटना आहे. एरव्ही ती आपल्या स्वरूपासह स्वतंत्रपणे विद्यमान असते.


व्यवहारात आपण स्वीकारीत असलेला हा सरल वास्तववाद अनेक तत्त्ववेत्ते अमान्य करतात. ह्याची कारणे थोडक्यात अशी :   (१) समजा, वि१ आणि वि२ ह्या दोन व्यक्ती रुपयाच्या एकाच नाण्याकडे पाहत आहेत. वि१ रुपयाकडे बरोबर वरून पाहत आहे आणि म्हणून त्याची नजर रुपयाच्या पृष्ठभागाशी काटकोन करीत आहे वि२ दुसऱ्या कोनातून रुपयाकडे पाहत आहे. त्याची नजर रुपयाच्या पृष्ठभागाला काटकोनात छेदत नाही. रुपयाचा आकार वाटोळा असतो ही सर्वमान्य गोष्ट आहे. आता पहा. ‘वि२ ला नेमक्या कोणत्या आकाराची वस्तू दिसत आहे?’ ह्या प्रश्नाचे बिनचूक उत्तर ‘वि२ ला लंबवर्तुळाच्या आकाराची वस्तू दिसत आहे’ असे राहील [भूमितीच्या यथादर्शनाच्या (पर्‌स्पेक्टिव्ह) नियमांप्रमाणे ही गोष्ट सिद्ध होते]. उलट, वि१ ला वाटोळी वस्तू दिसत असणार. आता, वि२ ला जिचे साक्षात प्रत्यक्ष ज्ञान होते आहे ती वस्तू लंबवर्तुळ आकाराची असल्यामुळे आणि रुपयाचा आकार वाटोळा असल्यामुळे वि२ च्या ज्ञानाचा साक्षात विषय असलेली वस्तू म्हणजे रुपया नव्हे, हे उघड आहे आणि वि२ च्या ज्ञानाचा साक्षात विषय असलेली वस्तू वाटोळी असल्यामुळे आणि उलट वि२ च्या ज्ञानाचा साक्षात विषय असलेली वस्तू लंबवर्तुळ आकाराची असल्यामुळे ह्या दोहोंच्याही ज्ञानाचा साक्षात विषय असलेली वस्तू एकच आहे असे म्हणता येणार नाही आता वि१ आणि वि२ हे दोघे एक रूपया, एक भौतिक वस्तू, पाहत आहेत ह्यात शंका नाही आणि ह्या भौतिक वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांना होते आहे असेही म्हणता येईल. परंतु भौतिक वस्तूचे असे प्रत्यक्ष ज्ञान होताना, ती भौतिक वस्तूच त्यांच्या अनुभवाचा लगतचा, साक्षात विषय असते असे म्हणता येणार नाही. (कारण, वि२ च्या अनुभवाचा साक्षात विषय असलेली वस्तू लंबवर्तुळ आकाराची आहे आणि तो पहात असलेली भौतिक वस्तू-रुपया-वाटोळी आहे.) तेव्हा एखाद्या भौतिक वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होत असताना, आपल्या अनुभवाचा साक्षात विषय असलेली वस्तू-आपल्या उदाहरणात वि२ च्या अनुभवाचा साक्षात विषय असलेली लंबवर्तुळ आकाराची वस्तू-आणि ह्या वस्तूच्या साक्षात अनुभवावर आधारलेले असे ज्या भौतिक वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होत असते ती भौतिक वस्तू ह्यांच्यात भेद केला पाहिजे. आपल्या अनुभवाचा साक्षात विषय असलेल्या वस्तूला अक्षगृहीत (सेन्स डेटम) किंवा अक्षग्राह्य म्हणूया. आता अक्षग्राह्यांचा आणि भौतिक वस्तूंचा संबंध काय असतो हा प्रश्न पुढे येईल पण वर दिलेल्या युक्तिवादात जर काही तथ्य असेल, तर भौतिक वस्तूच्या प्रत्यक्ष ज्ञानात ती वस्तू आपल्या अनुभवाचा साक्षात विषय असते हे यथार्थ वास्तववादाचे मत अग्राह्य ठरते. भौतिक वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होत असते, पण आपल्या अनुभवाचा साक्षात विषय भौतिक वस्तू नसतात, तर अक्षग्राह्ये असतात. अक्षग्राह्यांच्या  आपल्या परिचयावर भौतिक वस्तूचे आपल्याला होणारे प्रत्यक्ष ज्ञान आधारलेले असते. (२) भौतिक वस्तूंच्या प्रत्यक्ष ज्ञानात आपल्या अनुभवाचा साक्षात विषय अक्षग्राह्ये असतात भौतिक वस्तू नसतात, ह्या मताला बळकटी आणणारा दुसरा युक्तिवाद आभासाच्या विश्लेषणावर आधारलेला आहे. समजा, मला कोपऱ्यात साप दिसतो, पण तेथे साप नसून एक दोरी आहे असे उघडकीला येते. तेव्हा साप दिसण्याचा हा अनुभव एक आभास आहे असे आपण म्हणू. आता ह्या अनुभवावरून दोन गोष्टी निष्पन्न होतात (अ) साप दिसण्याचा अनुभवापासून तेथे साप आहे हे निश्चितपणे सिद्ध होत नाही. कारण साप दिसण्याचा अनुभव प्राप्त झाला, तरी तेथे कधी साप असतो, कधी नसतो. तेव्हा, ‘मी पाहत असलेली वस्तू एक साप आहे’, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला लाभत असलेल्या साप दिसण्याच्या अनुभवाच्या आशयापलीकडे आपण जात असतो ह्या अनुभवाच्या आशयापासून आपण निष्कर्ष काढीत असतो. जेव्हा हा निष्कर्ष योग्य असतो, तेव्हा ह्या अनुभवावर आधारलेले सापाच्या स्वरूपाचे आणि अस्तित्वाचे प्रत्यक्ष ज्ञान प्रमाण आहे (व्हेरिडिकल पर्सेप्शन) असे आपण म्हणतो नाही तर तो एक भास असतो. म्हणजे खराखुरा साप आपण पाहत असताना आपल्याला येणाऱ्या अनुभवाचा साक्षात आशय तो साप नसतो. असा साप तेथे आहे हा या अनुभवाच्या आशयापासून काढलेला निष्कर्ष असतो. (ब) खऱ्याखुऱ्या सापाचे आपल्याला होणारे प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञान किंवा सापाचा होणारा भास ह्या दोन्ही अनुभवांत ‘साप दिसण्याचा’ अनुभव हा एक समान घटक असतो आणि ह्या अनुभवाचा साक्षात विषय, त्याचा आशय साप नसतो-कारण तसे असते, तर सापाचा भास होऊ शकला नसता. ह्या अनुभवाचा साक्षात विषय एक अक्षग्राह्य असते. ‘मला एक साप दिसतो आहे पण येथे खरोखरच एक साप आहे का ?’ असा संशय आपण घेऊ शकतो पण साप दिसण्याचा अनुभव मला येत आहे ह्याविषयी मी संशय घेऊ शकत नाही. साप दिसण्याच्या अनुभवाचा विषय एक अक्षग्राह्य असते आणि त्याच्याशी माझा साक्षात परिचय असल्यामुळे मी त्याच्या अस्तित्वाविषयी संशय घेऊ शकत नाही. ‘मला अशा अशा स्वरूपाचे अक्षग्राह्य आता प्राप्त आहे’, हे विधान नेहमी संशयातीत असते. ‘उलट, येथे एक (खराखुरा) साप आहे’ असे हे भौतिक वस्तूचे अस्तित्व प्रतिपादन करणारे विधान नेहमी संशयास्पद असते. (३) वैज्ञानिक उपपत्तीप्रमाणे-म्हणजे पदार्थविज्ञान वा भौतिकीप्रमाणे (फिजिक्स) आणि शारीरक्रियाविज्ञानाप्रमाणे (फिजिऑलॉजी)-बाह्य, भौतिक वस्तूंच्या अंगी रंग, वास, रुची इ. गुण नसतात. तांबड्या रंगाची एक बाह्य, भौतिक वस्तू मला दिसते, ह्याचा अर्थ मला दिसणाऱ्या वस्तूच्या स्वतःच्या अंगी तांबडेपणा हा गुण असतो वा ती वस्तु स्वतः तांबडी असते असा नाही, तर त्या वस्तूपासून एका विवक्षित लांबीच्या प्रकाशलहरी निघत असतात त्यांचा माझ्या डोळ्यांवर आणि डोळ्यांशी संबंधित असलेल्या मज्जातंतूवर आघात झाल्याने एक मज्जाप्रवाह सुरू होतो आणि तो मेंदूतील एका विशिष्ट विभागातील मज्जाकेंद्रे जेव्हा उत्तेजित करतो, तेव्हा तांबड्या रंगाची संवेदना मला प्राप्त होते. तेव्हा प्रत्यक्षानुभवात भौतिक वस्तू जशी असते, तसा आपला तिच्याशी परिचय होत नसतो. मला दिसणारी वस्तू तांबडी असते पण तेथे असणारी वस्तू स्वतः तांबडी नसते. आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनामार्फत बाह्य वस्तूंचे ज्ञान आपल्याला होते.

वरील तीन युक्तिवादांचा निष्कर्ष हा, की बाह्य, भौतिक वस्तू आपल्या प्रत्यक्षानुभवाचे साक्षात विषय असत नाहीत. सरल वास्तववाद आणि आपली व्यवहारबुद्धी असे मानतात पण ते चूक आहे. प्रत्यक्षानुभवात आपल्या संवेदनांचा आशय असलेल्या अक्षग्राह्यांशी आपला साक्षात परिचय असतो आणि त्यांच्या द्वारा बाह्य, भौतिक वस्तूंचे ज्ञान आपल्याला होते. आपल्या साक्षात परिचयाची असलेली अक्षग्राह्ये बाह्य, भौतिक पदार्थांचे प्रतिनिधित्व करतात. आता, दोन प्रश्न उपस्थित होतात. (१) भौतिक वस्तूंहून भिन्न असलेल्या पण त्यांच्याशी संबंधित असलेल्या ह्या अक्षग्राह्यांचे स्वरूप काय असते ? (२) अक्षग्राह्यांचा भौतिक वस्तूंशी नेमका संबंध काय असतो आणि असा त्यांचा संबंध आहे हे आपल्याला कसे कळते ?


(१) आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या उगमस्थानी असलेल्या ⇨ देकार्त व ⇨लॉक ह्या दोन्ही तत्त्ववेत्त्यांनी वर उल्लेखिलेली प्रत्यक्ष ज्ञानाविषयीची ‘प्रतिनिधी उपपत्ती’ (रेप्रेझेंटेटिव्ह थिअरी ऑफ पर्सेप्शन) स्वीकारली होती. शिवाय, भौतिक वस्तू आणि मन ह्या दोन सर्वस्वी भिन्न स्वरूपाच्या वस्तू आहेत, असे ते मानीत असत. प्रत्यक्ष ज्ञानात आपला त्यांच्याशी साक्षात परिचय होत असतो ती अक्षग्राह्ये भौतिक वस्तूंहून ज्या अर्थी भिन्न आहेत त्या अर्थी ती मानसिक असली पाहिजेत, असे त्यांनी मानले. अक्षग्राह्ये म्हणजे आपल्या संवेदनांचे आशय आहेत, त्यांच्याशी आपला साक्षात परिचय असतो आणि त्यांचे अस्तित्व ज्ञात्याच्या मनात असते, भौतिक वस्तूंचे अस्तित्व मनाबाहेर असते अशी ही भूमिका. अक्षग्राह्यांचे अस्तित्व मनात असल्यामुळे संवेदनांचे आशय म्हणून आपल्याला जोपर्यंत त्यांची जाणीव होत असते, तोपर्यंतच त्यांचे अस्तित्व असते. अननुभूत वेदना जशी असू शकत नाही, त्याप्रमाणे जे अक्षग्राह्य जाणिवेचा विषय नसते, ते अस्तित्वात असू शकत नाही, उलट भौतिक पदार्थांचे अस्तित्व मनोबाह्य असल्यामुळे ते अनुभवनिरपेक्ष असते. अक्षग्राह्यांच्या स्वरूपाविषयीचे हे मत लॉकने स्पष्टपणे आणि विस्तृतपणे मांडले आहे. (२) बाह्य, भौतिक वस्तूंचा आणि त्यांचे ज्ञात्याच्या मनात प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षग्राह्यांचा संबंध कसा असतो? एखादी भौतिक वस्तू आपण पहातो, तेव्हा आपल्या मनात अक्षग्राह्यांचा एक समूह किंवा पुंजका उपस्थित असतो-रंग, आकार, वास, चव इ.-आणि त्याच्या मार्फत बाह्य, भौतिक वस्तूचे ज्ञान आपल्याला होत असते. अक्षग्राह्यांचा पुंजका आणि भौतिक वस्तू ह्यांचा परस्परसंबंध दुहेरी असते. भौतिक वस्तू हे हा पुंजका आपल्या मनात निर्माण होण्याचे कारण असते म्हणून अक्षग्राह्यांचा एखादा पुंजका जेव्हा आपल्या मनात उपस्थित असतो, तेव्हा त्याचे कारण असलेली बाह्य वस्तूही तेथे असली पाहिजे असे अनुमान आपण करतो आणि अक्षग्राह्यांचा समूह आणि त्यांचे कारण असलेली बाह्य वस्तू ह्यांच्यात काही बाबतींत तरी साम्य असते म्हणून अक्षग्राह्यांचा एखादा विवक्षित समूह मनात उपस्थित असला, की त्याचे कारण असलेल्या बाह्य वस्तूंचे स्वरूप कसे आहे ह्याचे अनुमान आपण करू शकतो.

पण अशा प्रकारचे अनुमान टिकू शकणार नाही हे ⇨बर्क्लीने दाखवून दिले. ‘अ हे ब चे कारण आहे’ हे विधान प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या प्रकारचा पुरावा आवश्यक असतो ? कमीत कमी एकदा तरी अ ह्या प्रकारची गोष्ट उपस्थित असल्यानंतर (किंवा घडल्यानंतर) ब ह्या प्रकारची गोष्ट उपस्थित होते (किंवा घडते) असा अनुभव आपल्याला आलेला असणे आवश्यक आहे. पण आपल्या वरील अनुमानातील अनुमित वस्तू म्हणजे बाह्य, भौतिक वस्तू नेहमीच आपल्या अनुभवक्षेत्राच्या बाहेर असते. तिच्याशी आपला कधीच साक्षात परिचय नसतो. तेव्हा तिच्यामुळे एखादी गोष्ट घडून येते किंवा तिचे एखाद्या वस्तूशी साम्य आहे हा अनुभव आपल्याला येऊच शकत नाही. आपल्या मनात उपस्थित असलेल्या अक्षग्राह्यांपासून त्यांचे कारण असलेल्या किंवा त्यांच्याशी कित्येक बाबतींत साम्य असलेल्या बाह्य वस्तूंचे अनुमान आपण कधीच करू शकणार नाही. अशा बाह्य वस्तू आहेत हे प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असलेला पुरावा कधीच उपलब्ध होऊ शकणार नाही. बर्क्लीचा हा युक्तिवाद मान्य केला, तर काय निष्पन्न होते ? विवध ज्ञाते आणि त्यांच्या मनात उपस्थित असलेल्या, त्यांचा ज्यांच्याशी साक्षात परिचय आहे अशा अक्षग्राह्यांच्या समूहांची परंपरा एवढाच अस्तित्वाचा पसारा आहे. ह्यांच्या पलीकडे असलेल्या भौतिक वस्तूंचे अस्तित्व मान्य करण्याचे कारण नाही.

बर्क्लीची भूमिका म्हणजे व्यक्तिनिष्ठ चिद्‌वादाची भूमिका. अलीकडच्या काळात ⇨जी. ई. सुर ह्यांनी ह्या भूमिकेवर हल्ला केला आणि वास्तववादाची परत स्थापना केली. ‘अक्षग्राह्ये मानसिक असतात’ ह्या मताचे खंडन करण्याचा मुर ह्यांनी प्रयत्न केला. ‘संवेदना मानसिक घटना आहेत आणि अक्षग्राह्ये संवेदनांचे आशय असतात, तेव्हा अक्षग्राह्ये मानसिक असली पाहिजेत’, ह्या युक्तिवादावर हे मत आधारलेले आहे पण संवेदनांच्या दोन अंगांमध्ये आपण भेद केला पाहिजे. एक, संवेदनेमध्ये कशाचे तरी संवेदन केलेले असते ही संवेदन करण्याची, अक्षणाची कृती (द ॲक्ट ऑफ सेन्सिंग). ही मानसिक असते. दोन, संवेदनेचा आशय, ज्याचे संवेदन झालेले असते, तो संवेदनेचा विषय हा मानसिक समजण्याचे बिलकुल कारण नाही. ज्ञात्याला संवेदना प्राप्त होतात, त्यांच्या मार्फतच फार तर बाह्य वस्तूंचे ज्ञान आपल्याला होऊ शकते आणि संवेदना मानसिक असल्यामुळे ज्ञानाचे साक्षात विषय मानसिक असतात असे म्हणण्यात गोंधळ आहे. ज्ञात्याला संवेदनांमार्फत सर्व ज्ञान होते, ह्याचा अर्थ असा, की ज्ञानाची सुरुवात कित्येक विषयांच्या साक्षात दर्शनाने किंवा अक्षणाने होते आणि अक्षणाच्या ह्या साक्षात विषयांमार्फतच इतर वस्तूंचे ज्ञान (झाले तर) ज्ञात्याला होते. अक्षणाची कृती मानसिक असते म्हणून ज्याचे अक्षण होते तो विषय मानसिक असला पाहिजे हे निष्पन्न होत नाही. अक्षणाच्या कृतीने ज्यांचे साक्षात दर्शन होते ते ज्ञानाचे विषय आणि ज्ञानाचे इतर विषय ह्यांतील भेद म्हणजे मानसिक वस्तू आणि अमानसिक वस्तू ह्यांतील भेद नव्हे.

हे म्हणजे ज्यांनी मान्य केले त्यांनी व्यक्तिनिष्ठ चिद्‌वादाचा त्याग केला. अक्षणाचे विषय मानसिक नसल्यामुळे त्यांचे अस्तित्व अक्षणावर अवलंबून नसते. ज्ञानाच्या सर्व विषयांचे अस्तित्व अनुभवनिरपेक्ष व स्वतंत्र असते. मग ते अक्षणाचे साक्षात विषय असोत किंवा अपरोक्ष ज्ञानाचे विषय असोत, ही वास्तववादी भूमिका त्यांनी स्वीकारली. परंतु अक्षणाचे साक्षात विषय असलेली अक्षग्राह्ये आणि भौतिक वस्तू यांतील परस्परसंबंध काय? हा प्रश्न उरतोच. बर्क्लीच्या युक्तिवादानंतर भौतिक वस्तू अक्षग्राह्यांचे कारण असते किंवा त्या दोघांत काही बाबतींत तरी साम्य असते, हे मत टिकण्यासारखे नव्हते. ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ पहाणाऱ्या दोन वास्तववादी उपपत्ती पुढे आल्या : (१) नववास्तववाद (न्यू रिॲलिझम) आणि (२) चिकित्सक वास्तववाद (क्रिटिकंल रिॲलिझम).

(१) नववास्तववाद : बर्ट्रंड रसेल, होल्ट, माँटेग्यू, पेरी, मार्व्हिन, स्पॉल्डिंग इ. तत्त्ववेत्त्यांनी हे मत स्वीकारले आणि त्याचे समर्थन केले. गणितात सत् संख्या (रिअल नंबर) इ. संकल्पनांचा उलगडा करण्यासाठी प्रिन्सिपल ऑफ एक्स्‌टेन्सिव्ह ॲब्‌स्ट्रॅक्शन (विस्तारीत निष्कर्षणाचे तत्त्व) हे जे तार्किक तत्त्व रसेलने पुढे मांडले, त्याचा उपयोग हे मत घडविताना करण्यात आला आहे. ⇨विल्यम जेम्सच्या‘मूलगामी अनुभववादा’मध्ये (रॅडिकल एंपिरिसिझम) ह्या मताची काही बीजे आढळतात. एखादी भौतिक वस्तू पाहत असताना एका किंवा अनेक ज्ञात्यांना की अक्षग्राह्ये प्राप्त होतात त्यांच्यापासून त्यांच्याहून भिन्न असलेल्या पण त्यांच्याशी संबंधित असलेल्या अशा, भौतिक वस्तूच्या अस्तित्वाचे आणि स्वरूपाचे अनुमान आपण करतो, असे अनेकदा मानण्यात येते. नववास्तववादाप्रमाणे असे समजणे योग्य नाही. एखाद्या किंवा अनेक ज्ञात्यांना एखाद्या भौतिक वस्तूकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहत असताना जी अक्षग्राह्ये उपलब्ध होतात, त्यांची अवकाशातील व्यवस्था म्हणजेच ती भौतिक वस्तू. अक्षग्राह्यांची अशी व्यवस्था असलेल्या भौतिक वस्तूची  सभासद असलेली अक्षग्राह्ये परस्परांशी अवकाशात्मक संबंधांनी निगडित असतात.


एखाद्या भौतिक वस्तूचे मला होणारे प्रत्यक्ष ज्ञान प्रमाण आहे ह्या म्हणण्याचा अर्थ काय, तर मला एका अक्षग्राह्याचे साक्षात दर्शन होत आहे, हे अक्षग्राह्य म्हणजे अक्षग्राह्यांच्या एका व्यवस्थेचे (म्हणजे एका भौतिक वस्तूचे) सभासद असे मी मानतो आणि हे माझे मत योग्य आहे. उलट, मला उपलब्ध असलेले एखादे अक्षग्राह्य अक्षग्राह्यांच्या एका व्यवस्थेचे सभासद आहे हा माझा विश्वास जर चूक असेल, तर माझा अनुभव म्हणजे एक भास आहे असे ठरेल. ह्या उपपत्तीचा एक परिणाम असा, की भौतिक वस्तू म्हणजे कित्येक गुणधर्मांनी नटलेले एक द्रव्य (सब्‌स्टन्स) नसून परस्परसंबंधित अक्षग्राह्यांची एक व्यवस्था, असे तिचे स्वरूप ठरते. दुसरा परिणाम हा की कोणत्याही भौतिक वस्तूकडे अनंत दृष्टिकोनांतून पाहता येणे शक्य असल्यामुळे भौतिक वस्तू ही अनंत अक्षग्राह्यांची व्यवस्था ठरते. भौतिक वस्तूंच्या स्वरूपाविषयीची ही उपपत्ती नववास्तववादाचे पुरस्कर्ते मनालाही लावतात. एका क्षणी मला अनेक अक्षग्राह्ये उपलब्ध असतात आणि ती वेगवेगळ्या भौतिक वस्तूंची सभासद असतात. नेहमीच्या भाषेत बोलायचे, तर ह्या क्षणी मला टेबल, खुर्ची, भिंत, खिडकीबाहेरचे झाड इ. वस्तू दिसत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या भौतिक वस्तूंशी संबंधित असलेली अक्षग्राह्ये मला उपलब्ध आहेत. आता, ही अक्षग्राह्ये माझ्या मनात आहेत असे म्हणण्याऐवजी एका दृष्टिकोनातून उपलब्ध होणारी, मी लक्ष दिल्यामुळे एकत्रित व म्हणून परस्परसंबद्ध झालेली ही अक्षग्राह्ये, अक्षग्राह्यांची ही व्यवस्था म्हणजेच माझे ह्या क्षणीचे मन, माझ्या मनाची ह्या क्षणीची स्थिती असे म्हणता येईल आणि माझे सबंध मन म्हणजे अशा एका, एका दृष्टिकोनातून प्राप्त अशा परस्परसंबंधित अक्षग्राह्यांच्या क्षणिक व्यवस्थांची मालिका किंवा प्रवाह. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गुणधर्मांनी नटलेले बाह्य, भौतिक द्रव्य नसते त्याप्रमाणे आंतरिक, अनुभवांनी नटलेले असे मनोद्रव्यही नसते. द्रव्य ही संकल्पनाच निरुपयोगी म्हणून त्याज्य आहे. भौतिक वस्तू आणि मने ह्यांचे अंतिम घटक म्हणजे अक्षग्राह्ये होत. अक्षग्राह्यांचे आंतरिक स्वरूप भौतिकही नसते किंवा मानसिकही नसते. ते अपक्ष (न्यूट्रल) असते. एका विवक्षित प्रकारच्या म्हणजे अवकाशात्मक, संबंधांनी संबंधित अक्षग्राह्यांची एक व्यवस्था म्हणजे भौतिक वस्तू. दुसऱ्या प्रकारच्या संबंधाने म्हणजे एका दृष्टिकोनातून प्राप्य व म्हणून परस्परसंबंधित अशा अक्षग्राह्यांची व्यवस्था म्हणजे मन. अस्तित्व हे भौतिक आणि मानसिक असे दोन संपूर्णपणे भिन्न प्रकारचे असत नाही अस्तित्वाचे, भौतिक वस्तूंचे आणि मनांचे अंतिम घटक एकाच स्वरूपाचे असतात. ह्या नववास्तवादाने स्वीकारलेल्या मताला अपक्ष एकतावाद (न्यूट्रल मोनिझम) असे म्हणतात.

(२) चिकित्सक वास्तववाद : हे मत जी. डॉज हिक्स ह्या ब्रिटिश आणि ड्रेक, लव्हजॉय, जे. बी. प्रॅट, रॉजर्झ, सेलर्झ आणि विशेषतः ⇨ सांतायाना ह्या अमेरिकन तत्त्ववेत्त्यांनी प्रस्थापित आणि विकसित केले. आपला साक्षात परिचय अक्षग्राह्यांशी असतो आणि ही अक्षग्राह्ये भौतिक वस्तूंचे आणि मनांचे घटक असतात ही नववास्तववादी भूमिका चिकित्सक वास्तववादी अमान्य करतात. प्रत्यक्ष ज्ञान हे बाह्य, भौतिक वस्तूंचे असते, जेव्हा एखाद्या वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होते तेव्हा तिचे रूप आपल्याला प्रतीत होत असते आणि ह्या प्रतीत होणाऱ्या रूपामार्फत आपल्याला बाह्य वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होते, अशी त्यांची मध्यवर्ती भूमिका आहे. तेव्हा चिकित्सक वास्तववादी लॉकच्या प्रत्यक्ष ज्ञानाच्या प्रातिनिधिक उपपत्तीचा पुनरुद्धार करतात असे म्हणता येईल. मग दोन प्रश्न उपस्थित होतात. (अ) प्रत्यक्ष ज्ञानात आपल्याला वस्तूची जी विविध रूपे प्रतीत होतात त्याचे स्वरूप काय ? ह्याविषयी चिकित्सक वास्तववादी एकमताने बोलत नाहीत. कित्येकांच्या मते ह्या रुपांशी आपला साक्षात परिचय असल्यामुळे ही रूपे म्हणजे आपल्या तत्कालीन मनःस्थितीचा आशय आहे असे मानले पाहिजे म्हणजे ह्या रूपांचे अस्तित्व आपल्या मनात असते. उलट, आपल्याला प्रतीत होणारी ही रूपे (ज्यांच्यात आपल्याला वस्तूंचे गुणधर्म प्रतीत होत असतात) म्हणजे सामान्ये (युनिव्हर्सल्स), सत्त्वे (एसेन्सिस) असतात असे सांतायानाचे म्हणणे आहे. सामान्ये अनेक ठिकाणी प्रकट होतात, त्यांची अनेक उदाहरणे असतात. परंतु ‘सामान्ये कुठे असतात ?’ हा प्रश्न निरर्थक आहे. तेव्हा ‘आपल्याला प्रतीत होणारी रूपे कुठे असतात ?’ हा प्रश्न आणि ती ‘आपल्या मनात असतात’ हे उत्तर दोन्ही चूक आहेत असे सांतायानाचे म्हणणे आहे. (ब) आपल्याला प्रतीत होणाऱ्या ह्या रूपांचा, सामान्यांचा किंवा सत्त्वांचा संबंध आपण का, कोणत्या आधारवर जोडतो? कित्येक चिकित्सक वास्तववाद्यांचे म्हणणे असे, की ही रूपे बाह्य वस्तूंची रूपे आहेत, ही अंधुक जाणीव पहिल्यापासूनच आपल्या मनात असते आणि आपला अनुभव जसजसा विकसित, गुंतागुंतीचा होत जातो तसतसे आपल्याला प्रतीत होणाऱ्या रूपांपासून बाह्य, भौतिक वस्तूंच्या सामान्य स्वरूपाचे, त्यांच्या तत्कालीन स्थितीचे जे ज्ञान आपण प्राप्त करून घेतो ते अधिकाधिक सूक्ष्म, निश्चित होत जाते. आपली ही प्रगती कशी होते हे मानसशास्त्राकडून आपल्याला कळते. उलट, सांतायाना असे म्हणतात, की आपल्याला प्रतीत होणाऱ्या रूपांचा संबंध आपण बाह्य वस्तूंशी नैसर्गिकपणे, अपरिहार्यपणे जोडतो. ही रूपे बाह्य वस्तूंची रूपे आहेत. त्यांच्या मार्फत बाह्य वस्तूंच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला प्रतीत होत असतात हे सिद्ध करता येत नाही पण आपल्याला वाटत असलेला हा विश्वास इतका सरळ आणि नैसर्गिक आहे, की तो कोणाला पटवून देण्याचे कारणच नाही. जगात वावरणारे प्राणी म्हणून आपण बाळगीत असलेली ही श्रद्धा (ॲनिमल फेथ) आहे. ह्या श्रद्धेचे प्रामाण्य सिद्ध करणे शक्य नाही पण तसे करणे आवश्यकही नाही. जी. ई. मुर ह्यांच्या ‘रेफ्यूटेशन ऑफ आयडिॲलिझम’ (म. अर्थ चिद्वादाचे खंडन) ह्या १९०३ साली प्रसिद्ध झालेल्या लेखानंतर तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात वास्तववादी विचारसरणी बळावली. वास्तववादी भूमिका स्वीकारून, तिला अनुसरून विश्वाच्या सर्व अंगांची व्यवस्था लावण्याचा आणि मनाचे ह्या विश्वातील स्थान आणि भवितव्य निश्चित करण्याचा पद्धतशीर प्रयत्न ⇨सॅम्युएल अलेक्झांडर ह्यांनी केला. सर्वंकष अशा चिद्‌वादी सत्ताशास्त्राच्या धर्तीवर सर्वंकष असे वास्तववादी सत्ताशास्त्र उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विसाव्या शतकातील दुसरे प्रमुख वास्तववादी दर्शन म्हणजे ⇨ॲल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड ह्यांचे. पण वास्तववादी भूमिकेतून एक सर्वंकष असे सत्ताशास्त्र उभारणे हे ज्याप्रमाणे अलेक्झांडर ह्यांचे प्रमुख तात्त्विक उद्दिष्ट होते, त्याप्रमाणे व्हाइटहेड ह्यांचे नव्हते. ‘चिद्‌वाद की वास्तववाद ?’ हा त्यांच्यापुढील प्रश्न नव्हता, त्यांचे प्रश्न वेगळे होते.


अलीकडच्या काही वर्षांत वास्तववादाची मांडणी वेगळ्या अंगाने करण्यात येऊ लागली आहे. वस्तूंचे अस्तित्व आणि स्वरूप ही त्यांचे ज्ञान होण्यावर अवलंबून नसतात, त्यांचे अस्तित्व आणि स्वरूप हे स्वतंत्र, ज्ञाननिरपेक्ष असते. हा वास्तववादाचा मूलभूत सिद्धांत आहे. वस्तूविषयीचे आपले ज्ञान विधानांत ग्रथित करण्यात येते. जे आहे ते जसे आहे, त्याच्याशी विधान जर जुळत असेल म्हणजे जे आहे ते आहे आणि ते जसे आहे तसे ते आहे, असे जर विधान सांगत असेल, तर आणि तरच ते सत्य असते, अशी सत्यतेविषयीची जी उपपत्ती आहे (कॉरस्पाँडन्स थिअरी ऑफ ट्रूथ) ती वास्तववादी भूमिकेशी संबंधित आहे. आकारिक तर्कशास्त्रात वर्जित-मध्य नियम (लॉ ऑफ एक्‌ स्क्ल्यूडेड मिड्‌ल) हा एक नियम आहे. ह्याचा आशय असा, की कोणतेही विधान सत्य तरी असते किंवा असत्य तरी असते जे सत्यही नाही आणि असत्यही नाही असे एक्‌स्क्ल्यूडेड विधान असू शकत नाही. आता ‘हिमालय हा पर्वत आहे’ हे विधान घ्या. हिमालय ह्या वस्तूच्या अंगी पर्वत असण्याचा धर्म आहे असे ते सांगते. हे विधान जर सत्य असायचे असेल, तर हिमालय अशी एक विशिष्ट, निश्चित, असंदिग्ध वस्तू असली पाहिजे आणि तिचे स्वरूप पूर्णपणे निश्चित, असंदिग्ध असले पाहिजे. असे जर असेल, तर हिमालय ह्या वस्तूच्या अंगी पर्वत असण्याचा धर्म आहे, असे तरी निश्चित करता येईल (आणि ‘हिमालय हा पर्वत आहे’ हे विधान सत्य ठरेल) किंवा त्याच्या ठिकाणी तो धर्म नाही असे तरी निश्चित करता येईल (आणि हे विधान असत्य ठरेल). पण समजा, हिमालय ही वस्तू कोणती हे संदिग्ध असेल, तिचे स्वरूप अनिश्चित असेल, पर्वत असण्याचा धर्म अस्पष्ट असेल, तर हिमालय ह्या वस्तूच्या अंगी पर्वत असण्याचा धर्म आहे किंवा नाही हे निश्चित असणार नाही. ‘हिमालय हा पर्वत आहे’ हे विधान सत्यही असणार नाही किंवा असत्यही असणार नाही. हे विधान वर्जित-मध्य-नियमाला अपवाद आहे असे होईल. पण तार्किक नियमाला अपवाद असू शकत नाही. तेव्हा वर्जित-मध्य- नियमाचे जे गृहीत आहे ते सत्य असले पाहिजे. म्हणजे कोणत्या वस्तू आहेत (किंवा नाहीत) हे सुनिश्चित आहे, त्यांच्या स्वरूपात नेमके काय अंतर्भूत आहे (आणि काय नाही) हे सुनिश्चित आहे आणि वस्तूंना उद्देशून ज्या धर्मांचे विधेयन आपण करतो ते सुनिश्चित आहेत असे असले पाहिजे. ह्याचा अर्थ असा होतो, की वास्तववादी भूमिका ही आकारिक तर्कशास्त्राचे पूर्वगृहीत आहे आणि म्हणून ती सत्य आहे असे मानणे भाग पडते.

पण आकारिक तर्कशास्त्रात अलीकडे जे संशोधन झाले आहे त्याचे एक फलित म्हणून पर्यायी आकारिक तर्कशास्त्रे आहेत ही भूमिका पुढे आली आहे. ती वादग्रस्त असली, तरी अनेक तत्त्ववेत्त्यांनी ती स्वीकारली आहे. आकारिक तर्कशास्त्राच्या एका व्यवस्थेत वर्जित-मध्य-नियम प्रमाण म्हणून स्वीकारण्यात येत नाही. परिणामी वास्तववादी सिद्धांत हा आकारिक तर्कशास्त्राचे गृहीत म्हणून सत्य मानला पाहिजे ही भूमिका टिकत नाही. तेव्हा वास्तववाद आणि पर्यायी आकारिक तर्कशास्त्रांची शक्यता हे प्रश्न एकमेकांत गुंतलेले आहेत. ह्या मुद्याचे अधिक स्पष्टीकरण ⇨सिद्धि-उपपत्ति ह्या नोंदीत आढळेल.

संदर्भ : 1. Drake, Durant and others, Essays in Critical Realism, New York, 1920.

          2. Holt, F. B. and others, The New Realism, New York, 1912.

          3. Perry, R. B. Present Philosophical Tendencies, 1912.

रेगे, मे. पुं.