रावस : चेलची या नावानेही हा मासा ओळखला जातो. याचा समावेश पॉलिनीमिफॉर्मिस गणाच्या पॉलिनीमिडी कुलात करतात. एल्युथेरोनीमा टेट्राडॅक्टिलस (पॉलिनीमस टेट्राडॅक्टिलस) हे याचे शास्त्रीय नाव आहे. भारतात याचा प्रसार पूर्व किनाऱ्यावर प. बंगाल, ओरिसा, गोपाळपूर, गंजम येथे आणि पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र व गुजरात येथे आहे. तसेच हा चीनपर्यंतच्या समुद्रात आढळतो. त्याची लांबी १·८ मी. पर्यंत असते. याच्या शरीराचा रंग रुपेरी हिरवट असून पोट व दोन्ही बाजू पिवळसर पांढऱ्या रंगाच्या असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर पर म्हणजे हालचालीस उपयुक्त त्वचेची स्नायुमय घडी) व पुच्छपक्ष (शेपटीचा पर) करडसर असून त्यावर अगदी बारीक काळे ठिपके असतात व त्यांच्या कडा जवळजवळ काळ्या असतात. अधरपक्षाचा (खालच्या पराचा) व गुदपक्षाचा (गुदद्वाराजवळील पराचा) बाहेरील अर्धा भाग नारिंगी रंगाचा असतो.

रावस मांसाहारी असून खेकडे, झिंगे व अस्थिमय सांगाडे असलेल्या माशांची पिले यांवर आपली उपजीविका करतो. हिवाळ्यात मोठे मासे नद्यांच्या प्रवाहात भरतीच्या खुणेपर्यंत जातात. तसेच हा हुगळी नदीच्या मुखात आढळतो. माद्या समुद्रात वर्षातून दोन वेळा म्हणजे जानेवारी-मार्च व जुलै-सप्टेंबर या काळात अंडी घालतात. पश्चिम किनाऱ्यावर रावस मासे पकडण्याचा हंगाम सप्टेंबर-नोव्हेंबर या काळात जोरात चालतो पूर्व किनाऱ्यांवर तो फेब्रुवारी-मे असा असतो. रावस पकडण्यासाठी नदीमुखात व उथळ समुद्रात मोठे जाळे व ओढ जाळे वापरतात. जास्तीत जास्त १४०·६ किग्रॅ. वजनाचा मासा सापडलेला आहे. हा मासा उत्तम खाद्यमत्स्य आहे. हा ताजा खातात. हा खारवितात किंवा उन्हात वाळवूनही साठवितात. काठेवाडच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवरील मासेमारीत हा व दाडा हे महत्त्वाचे मासे आहेत.

रावसशिवाय पॉलिनीमिडी कुलातील तीन जाती भारतात आढळतात. पॉलिडॅक्टिलस इंडिकस (पॉलिनीमस इंडिकस) या जातीची भात, भाट, भट ही मराठी नावे आहेत. तसेच मुंबईत हे दाडा या नावाने ओळखले जातात. दाड्याची लांबी १·२ मी. व वजन नऊ किग्रॅ. पर्यंत असते. तो नदीमुखात फारसा जात नाही. खाद्यमत्स्य म्हणून यालाही फार महत्त्व आहे. तसेच त्याच्या वायुकोशांनाही चांगली किंमत येते. मोठ्या माशाच्या वायुकोशापासून ५६·८ ग्रॅ. वजनाची कच्ची आयसिंग्लास (जिलेटीन) मिळते.

जोशी, लीना जमदाडे, ज. वि.