गुंडर्ट, हेरमान : (१८१४—१८१३). मल्याळम् भाषेत सर्वप्रथम शब्दकोश रचणारा जर्मन पंडित. डॉ. गुंडर्ट धर्मप्रसारासाठी बाझेल मिशनतर्फे १८३८ मध्ये केरळात आला. तेथे असताना त्याने मल्याळम्, तमिळ, कन्नड व तेलुगू ह्या द्राविडी भाषांचे सखोल अध्ययन केले. शाळानिरीक्षक म्हणून उत्तर केरळमध्ये नोकरी करत असता, नवीन अभ्यासक्रमानुसार शालेय पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम मद्रास सरकारने त्याच्यावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने काही पाठ्यपुस्तकेही तयार केली. मल्याळम् भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणाची उणीव दूर करण्यासाठी त्याने १८५१ मध्ये मल्याळ भाषा व्याकरणम्  हा मल्याळम् भाषेचा व्याकरणग्रंथ तयार केला व १८७२ मध्ये मल्याळम्-इंग्रजी-मल्याळम् असा शब्दकोशही तयार केला. त्यासाठी दहा वर्षे त्याने खूप परिश्रम केले. ह्या कोशात त्याचे मल्याळम्‌चे सखोल ज्ञान तसेच शब्दांच्या व्युत्पत्ती, उच्चारण, अर्थभेद इत्यादींबाबतचा सांगोपांग व्यासंग यांचा प्रत्यय येतो. आजही हा कोश मल्याळम्‌मध्ये प्रमाणभूत मानला जातो. त्याने तयार केलेला व्याकरणग्रंथही आज महत्त्वपूर्ण मानला जातो. यांशिवाय पळंचोल्माल (प्राचीन भाषा-माला, १८४५), नळचरितसार शोधन (पौराणिक ‘नल’ कथेच्या संबंधी) व केरळपळम (केरळचा इतिहास, १८६८) हे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मल्याळम्‌‌मधील राज्यसमाचारम् (१८४७) हे पहिले मासिक सुरू होण्यास डॉ. गुंडर्ट याचेच परिश्रम कारणीभूत होते. 

नायर. एस्. के. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)