श्लीमान, हाइन्रिख : (६ जानेवारी १८२२ – २६ डिसेंबर १८९०). प्रसिद्ध जर्मन पुरातत्त्वज्ञ. प्रागैतिहासिक ग्रीसचा आधुनिक संशोधक म्हणूनही त्याचा वारंवार उल्लेख केला जातो. त्याचा जन्म जर्मनीतील न्यू बकॉव या गावी एका गरीब धर्मोपदेशकाच्या कुटुंबात झाला. लहानपणीच ग्रीक पुराणकथांचा, विशेषतः

होमरच्या काव्याचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला आणि प्राचीन ग्रीक नगरांबद्दल त्याच्यात तीव्र जिज्ञासा निर्माण झाली. ॲमस्टरडॅम येथे एका व्यापारी कंपनीत काम करीत असताना त्याने इंग्रजी, फ्रेंच, डच, स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज इ. यूरोपीय भाषांचा फावल्या वेळात अभ्यास केला. पुढे रशियातील सेंट पीटर्झबर्ग येथे त्याने निळीचा स्वतंत्र व्यवसाय केला. या सुमारास त्याने एकटेरिना लिश्चिन या युवतीबरोबर लग्न केले (१८५२). क्रिमियन युद्धात (१८५४-५६) लष्कराचा कंत्राटदार म्हणून त्याने खूप पैसा कमविला. पुढे अमेरिकेत त्याने कायमचे वास्तव्य केले आणि नागरिकत्वही घेतले.१८५८ नंतर त्याने पुरातत्त्वीय संशोधनास वाहून घेतले आणि व्यवसायात मिळविलेला पैसा या व्यासंगात व्यतीत केला. यासाठी तत्पूर्वी पॅरिसमध्ये पुरातत्त्वीय संशोधन व उत्खनन यासंबंधीचे प्रशिक्षणही त्याने घेतले होते.

हाइन्रिख श्लीमानश्लीमानने ग्रीस आणि आशिया मायनरमधील होमरच्या काव्यात उल्लेखिलेल्या स्थळांचा शोध घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला. याच सुमारास श्लीमानने ग्रीस आणि आशिया मायनरमधील होमरच्या काव्यात उल्लेखिलेल्या स्थळांचा शोध घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला. याच सुमारास त्याने एकटेरिनाला घटस्फोट दिला आणि सोफिया इंगॅस्ट्रोमिनॉस नावाच्या एका ग्रीक शाळकरी मुलीबरोबर दुसरा विवाह केला (१८६९). तिची मदत त्याच्या उत्खननांमध्ये झाली.१८७१ ते१८८२ दरम्यान त्याने प्राचीन ⇨ट्रॉय नगरीच्या परिसरात उत्खनन केले आणि तेथील सात वसाहतींची माहिती उजेडात आणली. ट्रॉयचा इतिहास ख्रिस्तपूर्व तिसऱ्या सहस्रकापर्यंत मागे जातो, तसेच प्रसिद्ध ट्रोजन युद्ध व सुप्रसिद्ध हेलनची घटना ख्रिस्तपूर्व १२०० मध्ये घडली, असे त्याने निदर्शनास आणून दिले. दरम्यान त्याने प्राचीन मायसीनी नगरीचेही उत्खनन केले आणि तेथील पाच थडग्यांचे अवशेष शोधून काढले (१८७६-७८). ⇨टायरिन्झ येथील मायसीनी संस्कृतीचा एक भव्य प्रासादही त्याने शोधून काढला(१८८४-८५)[⟶ मायसीनी संस्कृति] श्लीमान याच्या महत्त्वाच्या गंथांमध्ये इथका, द पेलोपनीज अँड ट्रॉय (१८६९, इं. भा.), ट्रोजन अँटिक्विटी (१८७४, इं. भा.), ट्रॉय अँड इट्स रूइन्स (१८७५, इं. भा.), मायसीनी (१८७८, इं. भा.) इत्यादींचा अंतर्भाव होतो.

स्तरीय उत्खननपद्धतीचा वापर करणारा तो पहिला पुरातत्त्वज्ञ होय. ग्रीक पुरातत्त्वविद्येचा जनक म्हणूनही त्याचा गौरव करण्यात येतो. अखेरच्या दिवसांत त्याला कानदुखीचा अतीव त्रास झाला. त्या असह्य दु:खातच नेपल्स येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले.

संदर्भ : Deuel, Leo, Memoirs of Heinrich Schliemann, New York,१९७७.

देगलूरकर, गो. बं.