बर्नेट, सर (फ्रँक) मॅकफार्लेन :(३ सप्टेंबर १८९९-  ) ऑस्ट्रेलियान वैद्य व्हायरस-वैज्ञानिक. उपार्जित प्रतिरक्षाविषयक (रोगप्रतिकारक्षमतेविषयक) सहिष्णूतेच्या शोधाबद्दल ⇨सर पिटर ब्रायन मेडाषर यांच्या समवेत १९६० चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक त्यांना विभागून मिळाले.

बर्नेट यांचा जन्म ट्राराल गॉन (व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया) येथे झाला. मेलबर्न विद्यापीठाच्या एम्.बी.बी.एस्. (१९२२) व एम्.डी. (१९२३) या पदव्या त्यांनी मिळविल्या. १९२३ मध्ये त्यांनी वॉल्टर अँड इलिझा हॉल इन्स्टिट्यूतटमध्ये आंत्रज्वरावरील संशोधनास सुरूवात केली. १९२३-२४ मध्ये ते मेलबर्न रूग्णालयात निवासी विकृतिवैज्ञानिक होते. १९२६ मध्ये त्यांना बीट शिष्यवृत्ती मिळाली व ते लंडन येथील लिस्टर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाकरिता दाखल झाले. १९३२ मध्ये लंडनमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत त्यांनी कार्य केले. अधूनमधून ते व्याख्याने देण्याकरिता परदेशात जात असले, तरी त्यांनी आपले प्रमुख संशोधन कार्य मेलबर्न येथील हॉल इन्स्टिट्यूटमध्येच केले. १९४४ मध्ये ते या संस्थेचे प्रमुख झाले व त्याच वेळी तेथे प्रायोगिक वैद्यकाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांची नेमणूक झाली.

आंत्रज्वरातील समूहजनकावरील [प्रतिपिंडे ज्यामुळे सूक्ष्मजंतूंचे समूहन करू शकतात त्या पदार्थंवरील ⟶ प्रतिपिंड] संशोधनानंतर त्यांनी व्हायरसांवरील संशोधनास प्रारंभ केला व त्यांच्या या संशोधनाबद्दल ते विशेष प्रसिद्ध आहेत. १९३५ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियात ⇨इन्ल्फ्यूएंझा या रोगास कारणीभूत असणाऱ्या व्हायरसावर व इतर काही व्हायरस प्रकारांवर संशोधन केले. व्हायरसामुळे होणाऱ्या रोगांच्या प्रतिबंधांत्मक इलाजसंबंधी आणि व्हायरसांची कोशिकांतर्गत (पेशींच्या अंतर्गत) वाढ हेही त्यांच्या संशोधनाचे विषय होते. भ्रूणावस्थेत असलेल्या कोंबडीच्या सजीव अंड्यामध्ये व्हायरसांचे संवर्धन करता येते, हे त्यांनी सप्रयोग दाखवून दिले. त्यांच्या संशोधनामुळे मिक्झोमॅटोसिस (सशातील त्वचा व श्लेष्मकला-आतड्यासारख्या अवयवांचे पातळ अस्तर यांमध्ये अर्बुदे-नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी-उत्पन्न करणारी व्हायरसजन्य मारक विकृती), क्यू-ज्वर [शेळ्यामेंढ्या, गुरेढोरे, पक्षी व जंगली जनावरांत विशिष्ट सूक्ष्मजंतूमुळे उद्‌भवणारा व अशा संसर्गित प्राण्यापासून मानवात होणारा रोग ⟶प्राणिजन्य मानवी रोग] यांसारख्या रोगांवर नियंत्रणाच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली. क्यू-ज्वराचे सूक्ष्मजंतू कॉक्सिला बर्नेटी याच नावाने ओळखतात.

बर्नेट यांनी १९४७ मध्ये जे.डी. स्टोन यांच्या सहकार्याने व्हिब्रिओ कॉलेली या ⇨ पटकीच्या रोगास कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूमध्ये विशिष्ट एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिन) असल्याचा शोध लावला. या शोधामुळे पुढील संशोधनास प्रोत्साहन मिळून हे एंझाइम इन्फ्ल्यूएंझाच्या संसर्गास पुष्कळसा प्रतिबंध करू शकते हे समजले.

काही व्हायरस प्रकार (उदा.,इन्फ्ल्युएंझा, गालगुंड इ.रोगांस कारणीभूत असणारे आणि ज्यांना तंतुरूप व्हायरस म्हणतात ते) संसर्गोत्पादक व असंसर्गोत्पादक अशा दोन भागांचे बनलेले असतात, हा शोध त्यांनी लावला. व्हायरसांच्या जननिक जटिलतेसंबंधी (आनुवंशिक लक्षणे संक्रमित होण्याच्या प्रक्रियेतील गुंतागुंतीसंबंधी) तसेच एकाच कोशिकेमधील त्यांच्या जननिक प्रतिक्रियेविषयी त्यांनी मौलिक संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे निरनिराळे पदार्थ वापरून व्हायरसांची वाढ रोखणे, व्हायरस प्रतिरक्षाविज्ञान व व्हायरसविज्ञान यांच्या ज्ञानात फार मोठी भर पडली आहे.

त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. शास्त्रीय माहिती व जटिल कल्पना अत्यंत सोप्या भाषेत विशद करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी आहे. व्हायरस-विज्ञान, प्रतिरक्षाविज्ञान हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय असून त्यांच्या आत्मचरित्रासह १९७९ पर्यंत सु. वीस ग्रंथ प्रसिद्ध झाले.

नोबेल पारितोषिकाखेरिज त्यांना अनेक सन्मान मिळालेले असून त्यांत लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व (१९४२) व या सोसायटीची रॉयल (१९४७) व कॉल्पी (१९५९) ही पदके, केंब्रिज विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट पदवी, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे फेलो (१९५३), सोसायटी ऑफ थेरॅप्यूटिक्सचे गेलेन पदक (१९५८), नाईट (१९५१) व ऑर्डर ऑफ मेरिट (१९५८ हे किताब विशेष उल्लेखनीय आहेत. १९६५-६९ या काळात ते ऑस्ट्रेलियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे अध्यक्ष होते.

भालेराव, य. त्र्यं.