ग्रुंटव्हीग, निकोलाय फ्रीद्रिक सेव्हेरीन : (८ सप्टेंबर १७८३–२ सप्टेंबर १८७२). डॅनिश धर्मशास्त्रवेत्ता, शिक्षणतज्ञ आणि कवी. जन्म साउथ झीलंडमधील उडबी येथे. वडील तेथील चर्चमधील ‘मिनिस्टर’ होते. कोपनहेगन विद्यापीठातून त्याने धर्मशास्त्र या विषयाची पदवी घेतली (१८o३). तत्कालीन बुद्धिवादाचा त्याच्यावर प्रथम परिणाम झाला असला, तरी पुढे काही काळ स्वच्छंदतावादाचा त्याच्यावर प्रभाव होता. आइसलँडिक एड्डांचा आणि स्नॉरी स्टर्लसनच्या आइसलँडिक सागांचा अभ्यास त्याने केला. Nordens Mytologi (१८o८, इं. शी. माय्‌थॉलॉजी ऑफ द नॉर्थ) आणि Optrin of Kaempelivets Undergang i Nord (२ खंड, १८o९, १८११, इं. शी. एपिसोड्स फ्रॉम द डाउनफॉल ऑफ द नॉर्दन हिरोइक लाइफ) हे ग्रंथ त्याने लिहिले. पुढे एका आध्यात्मिक संघर्षातून त्याला जावे लागले व परिणामतः १८११ मध्ये आपल्या वडिलांच्या हाताखाली तो ‘क्यूरेट’ झाला. १८१२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या Kort Begreb af Verdens Kronike (१८१२, इं. शी. ब्रिफ व्ह्यू ऑफ द हिस्टरी ऑफ द वर्ल्ड) या ग्रंथात जगाच्या इतिहासातील येशू ख्रिस्ताचे केंद्रस्थान सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. १८१८–२२ मध्ये ग्रुंटव्हीगचे अँग्लो-सॅक्सन साहित्याचे संशोधन चालू होते. सॅक्सो ग्रमॅटिकसच्या Gesta Danorum (डेन्मार्कचा ११८६ पर्यंतचा इतिहास) या ग्रंथाचे व स्नॉरी स्टर्लसनच्या नॉर्वेच्या इतिहासावरील ग्रंथाचे त्याने डॅनिश भाषेत भाषांतरही केले.

डॅनिश चर्चच्या सेवेत आल्यानंतर तेथील बुद्धिवादी प्रवृत्तींना त्याने विरोध करावयास सुरुवात केली. त्यामुळे चर्चमधील पदाधिकाऱ्यांशी त्याचे मतभेद होऊ लागले. त्याला व्याख्याने देण्यास मनाई करण्यासारखे उपाय चर्चकडून योजण्यात आले. ख्रिस्तोपदेशाच्या प्रामाण्यासाठी पुरावा शोधण्याचा त्याचा प्रयत्न होता. १८२५ च्या सुमारास त्याला हा प्रयत्न सफल झाल्यासारखे वाटले. येशू ख्रिस्ताने आपला उपदेश (गॉस्पेल) आपल्या प्रिय बारा शिष्यांना (अपॉसल्स) केला अपॉसल्सनी तो ख्रिस्ताच्या आद्य अनुयायांत प्रसृत केला व तेव्हापासून आजतागायत तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत आला, ही मौखिक परंपरा त्याला गॉस्पेलच्या प्रामाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वाटली. पिढीपिढीतून संक्रमित होत राहणारा चैतन्यपूर्ण मुक्त असा ‘जिवंत शब्द’ हेच ज्ञानसंक्रमणातील निसर्गाचे पहिले मूलभूत तत्त्व असून मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याची अधिक गरज आहे, अशी त्याची श्रद्धा होती. यासाठी मौखिक परंपरेचे संवर्धन केले पाहिजे व मानवाच्या आध्यात्मिक विकासात तिला अग्रस्थान दिले पाहिजे, असे त्याने आग्रहाने प्रतिपादन केले. पुस्तकी पांडित्य, पुस्तकांवरील अंधश्रद्धा आणि रूक्ष पढिकता यांना त्याने सतत विरोध केला. अखेरीस Kirkens Genmaele (१८२५, इं. शी. द रिप्लाय ऑफ द चर्च ) या ग्रंथातील त्याच्या विचारांमुळे – विशेषतः त्यात एच्. एन्. क्लाउसन या धर्मशास्त्रवेत्त्यावर त्याने केलेल्या प्रखर टीकेमुळे – त्याच्यावर चर्चतर्फे कडक उपाययोजना करण्यात आली. त्याला दंड तर झालाच परंतु त्याच्या लेखनावर कडक बंधने घालण्यात आली. परिणामत: ग्रुंटव्हीगने चर्चमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला (१८२६).

त्यानंतर ग्रुंटव्हीगने अँग्लो-सॅक्सन साहित्याच्या संशोधनाकडे पुन्हा लक्ष वळविले. अँग्लो-सॅक्सन हस्तलिखितांच्या अभ्यासासाठी त्याने इंग्लंडला तीन वेळा भेट दिली (१८२९–३१). इंग्लंडमधील वास्तव्यात तेथे असलेल्या वैचारिक व नागरी स्वातंत्र्याचा त्याच्यावर सखोल ठसा उमटला. त्यामुळे आपल्या देशातही पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याच्या आवश्यकतेवर त्याने भर दिला. डेन्मार्कमध्ये संसदीय सरकार स्थापन करण्यासाठी जी चळवळ चालू होती, तीमध्येही त्याने सक्रिय भाग घेतला.

पुढे १८३९ मध्ये त्याच्या लेखनावरील बंदी उठविण्यात आली. कोपनहेगनमधील व्हर्‌टॉव्ह येथे तो ‘पास्टर’ झाला. ख्रिस्ती चर्चच्या सेवेबद्दल १८६१ मध्ये त्याला झीलंडचा बिशप करण्यात आले. अखेरपर्यंत तो व्हर्‌टॉव्ह येथेच होता. त्याला पुढे अनेक अनुयायीही भेटले. त्याची विचारसरणी ‘ग्रुंटव्हीगवाद’ म्हणून

ओळखली जाते. ही डॅनिश चर्चमधील एक महत्त्वाची विचारसरणी मानली जाते. आपले विचार आणि तत्त्वज्ञान त्याने मुख्यतः पुढील ग्रंथांतून मांडले आहेत : Christelige Praedikener (३ खंड, १८२७–३o), Nordens Mytologie (१८३२) व Haandbog in Verdenshistorien ( ३ खंड, १८३३–४३).

डेन्मार्कच्या शैक्षणिक क्षेत्रातही ग्रुंटव्हीगचे स्थान मानाचे आहे. आपले शिक्षणविषयक विचार त्याने Skolen for Livet og Acadamiet i Soer (१८३८) या ग्रंथात मांडले आहेत. त्याच्या मते व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची खरी सुरुवात अठराव्या वर्षापासून होते म्हणून या विकासास उपयुक्त ठरणाऱ्या विषयांना – उदा., साहित्य, संस्कृती, धर्म, इतिहास, मातृभाषा इ.– अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान द्यावयास हवे. या दृष्टिकोनातूनच त्याने ⇨लोकशाळांची (फोक स्कूल्स) स्थापना केली. या शाळांत तरुण स्त्री-पुरुषांना प्रवेश असे व या शाळा उन्हाळ्यात अथवा हिवाळ्यात भरत. रूक्ष पुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा एकमेकांशी मनमोकळा संवाद, परस्परांच्या मतांची देवघेव त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध यांवर तेथे अधिक भर असे. अभ्यासक्रमही त्यानुसारच असे. जीवन समृद्ध करण्यास योग्य असे शिक्षण व वैचारिक वादसंवादांतून व्यक्तिमत्त्वाचा विकास या दोन्ही तत्त्वांना ग्रुंटव्हीगने शिक्षणपद्धतीत अग्रस्थान दिले. प्रौढ शिक्षणाच्या आवश्यकतेचाही त्याने आग्रह धरला. प्रौढ शिक्षणाच्या किंवा कामगारांच्या शिक्षणाच्या बाबतीत ग्रुंटव्हीगने केलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या विचारांचा प्रभाव जगभर आढळतो. त्याला लोकशाळांचा जनक मानले जाते.

डॅनिश साहित्यात ग्रुंटव्हीग त्याच्या स्तोत्रांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. त्याने एक हजाराच्या वर स्तोत्रे रचलेली असून जवळजवळ तितकीच गीते इतर भाषांतून डॅनिशमध्ये भाषांतरित केली आहेत. देशप्रेम, उत्कट भक्ती, धार्मिकता आणि डेन्मार्कच्या इतिहासासंबंधीचे व संस्कृतीबद्दलचे प्रेम इत्यादींचा आविष्कार त्याच्या गीतांतून होतो. कल्पनासौंदर्य व गूढरम्य शैली यांमुळे ती अधिक परिणामकारक वाटतात. Roskildle-Riim (१८१४) हा त्याचा उल्लेखनीय काव्यसंग्रंह. त्याने स्वतः रचलेली, भाषांतरित केलेली सर्व सूक्ते व गीते Sang-Vaerk til den Dansk- Kirke og Skole (५ खंड, १८३७–७o) या संग्रहात आढळतात. त्याच्या साहित्यावर व कार्यावर डॅनिशमध्ये बरेच लेखन केलेले आढळते. व्हर्‌टॉव्ह येथे तो निधन पावला.

संदर्भः 1. Davies, Noelle, Education for Life, A Danish Pioneer, London, 1931.

  2. Davies, Noelle, Grundtvig of Denmark, London, 1944.

 3. Lindhardt, P. G. Grundtvig, An Introduction, London, 1951.

यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इ. ) पोरे, प्रतिभा (म.)