कुटूझॉव्ह, मिक्यिल इलऱ्यिऑनव्ह्यिच: (१६ सप्टेंबर १७४५–२८ एप्रिल १८१३).प्रसिद्ध रशियन सेनानी. सेंट पीटर्सबर्ग येथे जन्म. वयाच्या पंधराव्या वर्षी सैन्यात प्रवेश. १७६८ ते १७७४ मधील तुर्कस्तानबरोबरच्या युद्धात क्रिमियाच्या लढाईत त्याचा एक डोळा गेला. १७८४ मध्ये तो मेजर जनरल झाला. १७८८–९१ च्या तुर्कस्तानबरोबरच्या युद्धात त्याने महत्त्वाची कामगिरी केल्याने त्याला लेफ्टनंट जनरलचा हुद्दा देण्यात आला. १७९२ मध्ये तुर्कस्तानातील व १७९८ मध्ये प्रशियातील रशियाचा वकील म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. सेंट पीटर्सबर्गचा गव्हर्नर जनरल म्हणून काम करीत असताना १८०२ मध्ये त्याला सेवानिवृत्त करण्यात आले. १८०५ मध्ये त्याला परत बोलावण्यात येऊन ऑस्ट्रियातील रशियन सैन्याचे नेतृत्व देण्यात आले. त्यावेळी ⇨ ऑस्टर्लीट्‌झच्या लढाईत फ्रान्सच्या नेपोलियनकडून त्याचा पराभव झाल्याने त्याची कीव्हचा गव्हर्नर जनरल म्हणून बदली करण्यात आली. १८११-१२ च्या रशिया-तुर्क युद्धात त्याने तुर्कस्तानचा पराभव करून त्यास नामुष्कीचा तह करण्यास भाग पाडले. नेपोलियनने रशियावर केलेल्या स्वारीत त्याने बोरोडीनोचे लढाईत पराक्रम केल्याने त्याला फील्ड मार्शल करण्यात आले. मॉस्को शहर पडल्यानंतर देश सोडून लांबवर आलेल्या फ्रेंच सैन्याशी त्याने गनिमी युद्ध करून त्यांची रसदतोड सुरू केली. या त्याच्या युद्धतंत्राने हिवाळ्याच्या मोसमात गुजारा होऊ न शकल्याने नेपोलियनला माघारी जावे लागले. फ्रेंच सैन्याचा जर्मनीत पाठलाग करीत असता आजारी पडून तो बुन्त्सेल्व्हिट्‌स येथे मरण पावला. झार राजवटीतील महान सेनापतींमध्ये त्याची गणना रशियन इतिहासकार करतात. त्याच्या नावाने ठेवलेले ‘कुटूझॉव्ह मेडल’ हे रशियातील अत्युच्च लष्करी सन्मानचिन्ह समजले जाते.

चाफेकर, शं, गं.