संस्तंभ : सूर्याची क्रांती जास्तीत जास्त (सु. २३.५°) होण्याच्या खगोलावरील जागेस किंवा सूर्याच्या त्या अवस्थेस संस्तंभ असे म्हणतात. या सुमारास सूर्य उत्तरेकडे अगर दक्षिणेकडे सरकत नाही असे भासते, म्हणून संस्तंभ हे नाव पडले. पृथ्वीचा आस तिच्या कक्षेच्या पातळीशी ६६.५ अंशानी कललेला असतो. ही दिशा बहुतांशी कायम असते. कक्षीय परिभमणामुळे भगोलावर ताऱ्यांच्या पार्श्र्वभूमीवर सूर्य पश्र्चिमेकडून पूर्वेकडे सरकतो असे दिसते. त्याचवेळी कधी तो खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेकडे व कधी दक्षिणेकडे सरकत आहे, असेही दिसते. २१ मार्च व २२ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्याने कांती शून्य असते. कांती उत्तर किंवा दक्षिण (धन किंवा ऋण) असेल त्याप्रमाणे संस्तंभाचे दोन प्रकार पडतात उत्तर संस्तंभ किंवा विष्टंभ आणि दक्षिण संस्तंभ किंवा अवष्टंभ. २१ जूनला जास्तीत जास्त + २३.५° कांती असते म्हणून ही परिस्थिती विष्टंभ आणि २२ डिसेंबरला जास्तीत जास्त २३.५° क्रांती असते म्हणून ही परिस्थिती अवष्टंभ होय. विष्टंभाच्या वेळी पृथ्वीवर उत्तर गोलार्धात मोठयात मोठा दिवस आणि लहानात लहान रात्र असते उलट या दिवशी दक्षिण गोलार्धात लहानात लहान दिवस व मोठयात मोठी रात्र असते. अवष्टंभाच्या वेळी दक्षिण गोलार्धात मोठयात मोठा दिवस व लहानात लहान रात्र असते उलट त्यावेळी उत्तर गोलार्धात लहानात लहान दिवस व मोठयात मोठी रात्र असते. उत्तर संस्तंभापासून दक्षिण संस्तंभापर्यंत दक्षिणायन आणि दक्षिण संस्तंभापासून उत्तर संस्तंभापर्यंत उत्तरायण असते. हे विष्टंभ आणि अवष्टंभ संपातांशी त्रिभांतर योग (९०° अंतर) करतात.

पहा : अयने उत्तरायण क्रांति-१ क्रांतिवृत्त दक्षिणायन.

गोखले, मो. ना.