चिनी हातरूमाल वृक्ष : (इं. हँकरचीफ प्लँट, डोव्ह ट्री, चायनीज हँकरचीफ, लॅ.डेव्हिडिया इन्व्होल्युक्रॅटा कुल-निस्सेसी). पश्चिम चीनमधील ह्या शोभिवंत वृक्षाचे नाव आर्मां दाव्हीद (डेव्हिड) या फ्रेंच धर्मोपदेशकांच्या नावावरून दिले आहे, कारण १८६२-७३ या काळात त्यांनी प.चीनमध्ये वनश्रीची पाहणी केली होती. निस्सा, कॅम्टोथेका  व डेव्हिडिया  या तीन शास्त्रीय नावांनी ओळखले जाणारे वंश पूर्वी निस्सेसी या कुलात घातले होते. हल्ली फक्त डेव्हिडिया  वंश व त्यातील एकमेव जातीचे डेव्हिडिएसी हे नवीन कुल बनविलेले आहे. पूर्वी एंग्लर व प्रांट्‌ल यांनी निस्सेसी कुल जंबुल गणात (मिर्टीफ्लोरीमध्ये) समाविष्ट केले होते. त्यातील सर्व जाती बेंथॅम व हूकर यांनी कॉर्नेसी कुलात अंतर्भूत केल्या होत्या हचिन्सन व तसेच तख्तजान (रशिया) यांनी हे कुल तापमारी गणात [ॲरॅलिएलीझ, → ॲरॅलिएसी] घातले आहे. कॉर्नेसी कुलाशी निस्सेसीचे निकट संबंध आहेत, ही गोष्ट सर्वसामान्य आहे. निस्सा  वंशातील जाती फक्त अमेरिका व आशिया येथे आणि कॅम्टोथेका  व डेव्हिडिया  फक्त चीनमध्ये आढळतात कॅम्टोथेका  तिबेटातही (प.चीन) आढळते.

डेव्हिडिया  हा चिनी वृक्ष पानझडी, सुरूसारखा, आकाराने त्रिकोनी व सु. १८·५ मी उंच असून त्याचा पर्णसंभार गर्द हिरवा व आकर्षक असतो त्याला फुले आल्यानंतर त्यांची फिकट पिवळट व मोठी छदे (फुलोऱ्याच्या तळाजवळची उपांगे) हातरूमालासारखी वाऱ्याने फडफडतात त्यावेळी वृक्षाची शोभा अधिकच वाढते व त्याची इंग्रजी व मराठी नावे सार्थ वाटतात. कोवळेपणी हा वृक्ष नाजूक वाटतो, परंतु मोठा झाल्यावर त्याचा काटकपणा प्रत्ययास येतो. त्याच्या फांद्या उभ्या व काहीशा तिरप्या वाढतात त्यांवर साधी, एकाआड एक, उपपर्णे नसलेली, दातेरी, हृदयाकृती-अंडाकृती, लांबट टोकांची, जाडजूड शिरांची पाने येतात. ती खालच्या बाजूस दाट लवदार व वरच्या बाजूस गुळगुळीत आणि ६-१२ सेंमी लांब असतात. ह्या वृक्षाला मे-जून मध्ये स्तबकासारख्या (गोंड्यासारख्या) गोलसर फुलोऱ्यावर [→ पुष्पबंध] पण फांद्यांच्या टोकावर लहान फुले येतात ती एक लिंगी व द्विलिंगी असून एका स्तबकात असंख्य पुं-पुष्पे व एक स्त्री-पुष्प असते या स्तबकाच्या तळाशी वर उल्लेख केलेली दोन किंवा तीन भिन्न आकारमानांची, अंडाकृती, दातेरी किंवा अखंड व समोरासमोर १८ X १२ सेंमी. छदे येतात. फुलात परिदलांचा अभाव असून पाच ते सहा केसरदले व स्त्रीलिंगी फुलात केसरदले (पुं-केसर) वंध्य, लहान, अनेक आणि सहा ते नऊ जुळलेली किंजदले (स्त्री-केसर) असतात. केसरदलांपेक्षा किंजले लांब व तितकीच किंजल्के असतात अधःस्थ किंजपुटात तितकेच कप्पे व प्रत्येक कप्प्यात एक लोंबते बीजक (पूर्वावस्थेतील बीज) मधल्या अक्षावर असते. [→ फूल]. आठळी फळे (अश्मगर्भी फळे) लांबट गोलसर, तपकिरी, सु. ३·५ सेंमी. लांब असून ती ऑक्टोबरात येतात. आठळीवर उभ्या खोबणी असून तीत तीन ते पाच कप्पे असतात. बियांतील पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) मांसल असतो. या वृक्षाची लागवड बिया लावून करतात. अर्धवट जून कलमे लावूनही रोपे बनविता येतात. चांगल्या सकस जमिनीत वाढ चांगली होते. भारतात हा वृक्ष असल्याचा उल्लेख नाही.

पहा : मिर्टेलीझ.

संदर्भ :1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

          2. Takhtajan A. A System of Phylogeny of  the Flowering Plants, Edinburgh, 1969.

परांडेकर, शं. आ.