द्यूमा, आलेक्सांद्र (फीस) : (२७ जुलै १८२४–२७ नोव्हेंबर १८९५). फ्रेंच कादंबरीकार व नाटककार. सुप्रसिद्ध कादंबरीकार आलेक्सांद्र द्यूमा (पेअर) ह्याचा हा अनौरस मुलगा. याचा जन्म पॅरिस येथे झाला. अनौरस असल्याची जाणीव त्याला त्याच्या बालपणापासूनच मिळत गेली होती. त्या जाणिवेने त्याचा एकूण जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोणावर वैशिष्ट्यपूर्ण असा परिणाम घडवून आणलेला होता. त्याच्या साहित्यातून ठळकपणे व्यक्त होणारी नीत्युदबोधनाची प्रेरणा ह्या संदर्भात लक्षणीय ठरते.

कर्ज फेडण्याकरिता त्याने प्रथम लेखनास सुरुवात केली. ला दाम ओ कामेलया (इं. शी. द लेडी ऑफ द कामेलया) या १८४८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीने द्यूमाला कीर्ती मिळवून दिली. पुढे १८५२ मध्ये ही कादंबरी नाटकरूपाने प्रसिद्ध झाली. तिसऱ्या नेपोलियनच्या राजवटीत यशस्वी नाटककार म्हणून त्याला मान्यता मिळाली. कौशल्यपूर्ण नाट्यरचना, नाट्यतंत्राची उत्तम समज व मनोवेधक संवाद असूनही बोधवादामुळे अशा नाटकांच्या परिणामकारकतेला मर्यादा पडलेल्या आहेत. सामाजिक सुधारणा, विशेषतः विवाहाच्या बाबतीत, घडवून आणण्याचा नाटककाराचा उद्देश स्पष्ट दिसतो व काही अंशी त्याची ही आकांक्षा पुरी झालेली दिसते. अकुलिन समाजाचे वास्तव व प्रभावी चित्रण ल दमीमाँद (१८५५, इं. शी. हाय सोसायटी) आणि ल फिस नात्युरॅल (१८५८, इं. शी. द नॅचरल सन) या नाटकांतून झालेले आहे. ल दमीमाँद ह्या द्यूमाने तयार केलेल्या शब्दाला पुढे फ्रेंच अकादमीने मान्यता दिली. यांशिवाय ला कॅस्तियाँ दाजाँ (१८५७, इं. शी. द क्केश्वन ऑफ मनी), लामी दे फाम (१८६४, इं. शी. द फ्रेंड ऑफ विमेन) इ. अनेक नाटके त्याने लिहिली. १८८६ मध्ये प्रसिद्ध झालेली क्लेमांसो केस ही काही अंशी आत्मचरित्रपर असलेली त्याची कादंबरी आजही वाचली जाते. पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भः Taylor, Frank A. The Theatre of Dumas Fils, New York, 1937.

टोणगावकर, विजया