पेटके : स्नायूच्या किंवा स्नायुगटाच्या आपोआप व अनैच्छिकपणे उद्भfवणाऱ्या वेदनायुक्त संकोचाला ‘पेटका’ म्हणतात. पृष्ठभागाजवळील ऐच्छिक स्नायूमध्ये असे संकोच एकामागून एक येतात व प्रत्येक संकोचाच्या वेळी तो स्नायू किंवा स्नायुगट हाताला कठीण व ताठ बनलेला लागतो. यालाच ‘गोळा येणे’ किंवा ‘वांब’ असेही म्हणतात. अशा प्रकारचे संकोच आतडे, जठर किंवा रोहिण्या यांमधील अनैच्छिक स्नायूंतही उद्भचवतात परंतु त्यांचा समावेश या संज्ञेत केला जात नाही. पाय व हात या शरीर भागांतील स्नायूंमध्ये, विशेषेकरून पोटरीच्या स्नायूमध्ये पेटके येतात. बहुतेकांना शरीर प्रकृती चांगली असूनही पेटक्यांचा अनुभव केव्हांना केव्हा आलेला असतो.

कधीकधी पेटक्यांचे निश्चित कारण सांगता येत नाही. अशा पेटक्यांना ‘अज्ञातहेतुक पेटके’ म्हणतात. पुष्कळ वेळा पेटके येणे हे काही विकृतींचे लक्षण असते. प्रेरक तंत्राच्या विकृती [→ प्रेरक तंत्र ],⇨आकडी, परावटू ग्रंथिजन्य विकृती [→ परावटु ग्रंथि ], अतिघामामुळे किंवा पटकीसारख्या विकृतीमुळे [→ पटकी ] शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे होणाऱ्या निर्जलीकरणामुळे, तसेच मूत्रविषरक्तता [→ मूत्रोत्सर्जक तंत्र ], कॅल्शियमन्यूनता व मॅग्नेशियमन्यूनता विकृतींमध्येही पेटके येतात. कंपवात (कंप, स्नायुताठरता वगैरे लक्षणे असलेली वृद्धावस्थेतील एक विकृती),⇨धनुर्वात,  ⇨अलर्क रोग, काही विषबाधा (उदा., कुचल्याची विषबाधा) यांमध्येही पेटके येतात. परंतु त्यात थोडाफार फरक असतो, उदा., धनुर्वातातील स्नायुसंकोच जवळजवळ सतत टिकणारे असतात.

टंकलेखन, हाताने शिंपीकाम करणारे व सतत लेखन करणारे यांच्या हाताच्या व बोटांच्या स्नायूंमध्ये पेटके येऊन काम करणे अशक्य होते. अशा पेटक्यांना ‘व्यवसायजन्य’ पेटके म्हणतात. पेटक्यांचे कारण निश्चित सांगता येत नसले, तरी काही गोष्टी कारणीभूत असाव्यात. स्नायूंचा अती वापर आणि अपुरा रक्तपुरवठा ही कारणे असावीत. काम करते वेळी त्या विशिष्ट स्नायूंना अधिक रक्तपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित होते. स्नायूंच्या रक्तवाहिन्यांचा (रोहिण्यांचा) व्यास मोठा होऊन अधिक रक्त पुरवले जाते. कोणत्याही कारणाने या यंत्रणेत बिघाड झाल्यास पुरवठा कमी पडून पेटके येतात. गार पाण्यात पोहणाऱ्य़ा व्यक्तीमध्ये हातापायात पेटके येण्याचा संभव असतो. पोहताना स्नायूंना जोरदार श्रम करावे लागतात व त्यांना जादा रक्ताची आवश्यकता असते. परंतु शारीरिक उष्णता कायम ठेवण्याकरिता अंतस्त्याकडे (छातीत व उदरात असलेल्या हृदय, यकृत, आतडी इ. अवयवांकडे) नेहमीपेक्षा जादा रक्त नेले जाते व त्यामुळे स्नायूंना पुरेसा पुरवठा होत नाही. कधीकधी झोपेतून उठल्याबरोबर पेटके उद्भदवतात. झोपेत सर्वच स्नायूंचा रक्तपुरवठा जरूरी पुरताच असतो, त्यातून हात किंवा पाय वेडावाकडा ठेऊन झोपल्यामुळे रक्तपुरवठ्यात अधिक व्यत्यय येऊन पेटके येतात.


पुष्कळ वेळा केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या विकृतीमध्ये [→तंत्रिका तंत्र ] पेटके येतात. अलीकडे काही रोग्यांमध्ये अशी कोणतीही विकृती नसताना शरीराच्या धडाचे व हातापायांचे स्नायू कमीजास्त प्रमाणात अधूनमधून ताठ बनल्याचे आढळले आहे. हा प्रकार अज्ञातहेतुक पेटक्यासारखाच असून त्याला ‘ताठमानव लक्षणसमूह’ म्हणतात. काही परिस्थितीत पेटक्यांची वारंवारता वाढल्याचे आढळते. निर्जलीकरण व अतिघाम ती वाढवण्यास मदत करतात. गर्भारपणातही पेटके वारंवार येतात परंतु त्याचे कारण अजून समजलेले नाही. क्रीडापटू शर्यतीच्या अगोदर पेटके येऊ नयेत म्हणून सोडियम क्लोराइडाचे (मिठाचे) सेवन करतात. पेटक्यावरील उपायांमध्ये स्नायूंना विश्रांती देणे, दाबणे, चोळणे, शेकणे वगैरे उपायांचा समावेश होतो. पोटऱ्यांतील पेटक्यांवर कधीकधी थंड पदार्थ सबंध तळपायास लावण्याने आराम पडतो. प्रेरक तंत्र विकृतीतील पेटके सकाळच्या हालचाली बरोबर सुरू होतात. त्यावर झोपतेवेळी डायफेनहायड्रामीन हायड्रोक्लोराइडाची (बेनाड्रिलाची) ५० मिग्रॅ. मात्रा उपयुक्त असते. ताठमानव लक्षणसमूहावर डायझेपामाची ३० ते ६० मिग्रॅ. मात्रा गुणकारी आहे. जेथे शक्य असेल तेथे पेटक्यांचे कारण शोधून त्यावर इलाज करतात.     

                                

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं. आयुर्वेदीय वर्णन व चिकित्सा : हा विकार स्नायुधमनींचा आहे. स्नायूंचे जोराने आकुंचन होते आणि त्यांत वेदना अती प्रमाणात होतात. पेटके येणाऱ्या अवयवाला नारायण तेलासारख्या वातनाशक तेलाने मर्दन करून नंतर शेकावे किंवा अगोदर शेकून नंतर नारायण तेल चोळावे. नंतर लोकरीच्या कापडाच्या पट्ट्याने तो अवयव बांधावा. वातनाशक तेलांचे नाकामध्ये नेहमी नस्य करावे. एखाद्या अवयवात जर पेटके येत असतील तर व जुना रोग नसेल, तर एवढ्याने बरे वाटेल पण अनेक अवयवांत विकार असेल आणि जीर्ण असेल, तर वरील उपचारांबरोबर त्या त्या अवयवातून रक्तस्त्रावही थोड्या थोड्या प्रमाणात करावा. दररोज मात्राबस्ती द्यावा. अनुवासन आणि रेचक बस्तीही द्यावेत. वेदनांच्या वेळी महावात विध्वंस, महायोगराज गुग्गुलू, राजवल्लभ, वातगजाकुश ही औषधे द्यावीत. ज्या औषधाने बरे वाटले ते औषध चालू ठेवावे.

पटवर्धन, शुभदा अ.

संदर्भ : Thorn, G. W. and others, Ed. Harrison’s Principle of Internal Medicine, Tokyo, 1977.