ला साल, रेने-रॉबेर काव्हल्ये, स्यूर द : (२१ नोहेंबर १६४३-१९ मार्च १६८७). प्रसिद्ध फ्रेंच समन्वेषक व फरचा व्यापारी. मिसिसिपी नदीमार्गे मेक्सिकोच्या आखातात उतरणारा पहिला यूरोपियन. ला साल म्हणजे एक धाडसी व महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व होते. फ्रान्समधील रूआन येथे एका सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. आपल्या मुलाने जेझुइट पाद्री बनावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. रूआन येथील जेझुइट शाळेत शिक्षण घेऊन तेथेच शिकविण्याचे काम ला सालने सुरू केले मात्र त्यात त्याचे मन रमले नाही. साहस व समन्वेषण यांबद्दल त्याला विलक्षण आकर्षण वाटू लागले, तेव्हा वयाच्या २३ व्या वर्षी कॅनडातील (न्यू फ्रान्स) माँट्रिऑल येथे मिशनरी म्हणून काम पहात असलेल्या ॲबे जीन काव्हल्ये या आपल्या मोठ्या भावाकडे तो दाखल झाला. ला साल कॅनडात आला, तेव्हा केवळ अटलांटिक किनाऱ्याजवळ व सेंट लॉरेन्स नदीजवळ लहानलहान वसाहती स्थापन झाल्या होत्या आणि काही मिशनरी व फरचे व्यापारी यांनी पंचमहासरोवर प्रदेशातून प्रवास केलेला होता. फरचा व्यापार करणे हा ला सालच्या कॅनडात येण्याचा प्रमुख हेतू होता. येथे आल्यावर सेंट लॉरेन्स नदीतीरावरील माँट्रिऑलजवळ त्याला काही भूभाग देण्यात आला. तेथे त्याने आपले व्यापारी ठाणे स्थापन केले.

इंडियनांशी व्यापार करीत असताना पश्चिम व दक्षिणेकडील नद्यांविषयीच्या इंडियनांच्या कथांनी ला सालला विशेष आकर्षित केले. तेव्हा त्याने आपली जमीन विकली (१६६९) आणि या नद्यांच्या समन्वेषणाची योजना तयार करून तिला गव्हर्नर कूर्सेल याची मान्यताही घेतली. सुकाणूविरहित काही लहान होड्या (डोंगी) व काही माणसे बरोबर घेऊन गव्हर्नरच्या सूचनेनुसार पश्चिमेकडे जाणाऱ्या दॉल्ये द कासाँ व गॅलिनी यांच्या मिशनरी गटात तो सामील झाला. यावेळी त्याने ऑटॅरिओचे व ईअरी सरोवराजवळच्या प्रदेशाचे समन्वेषण केले. मिशनरी गटापासून अलग होऊन त्याने ओहायओकडे जाण्याची आपली स्वतंत्र योजना आखली. याच वेळी त्याने ओहायओ नदीमार्गांचा शोध लावल्याचा दावा केला जातो.

काउंट द फ्रोंतनॅक हा १६७२ मध्ये कॅनडाचा (न्यू फ्रान्सचा- म्हणजे फ्रान्सच्या कबजातील कॅनडामधील प्रदेशाचा) नवीन गव्हर्नर झाला. फ्रोंतनॅक व ला साल या दोघांची मैत्री जमली. आँटॅरिओ सरोवर सेंट लॉरेन्स नदीला जेथे मिळते, तेथे त्यांनी फोर्ट फ्रोंतनॅक हा किल्ला बांधला. उत्तर अमेरिकेतील फर व्यापारक्षेत्रात फ्रेंच साम्राज्याला अग्रहक्क मिळवून देण्याचे या दोघांचे स्वप्न होते. ला साल १६७४ मध्ये फ्रान्सला परतला त्यावेळी फरचा व्यापार व फोर्ट फ्रोंतनॅकचा ताबा ला सालकडे देण्यात आला. या किल्ल्यातूनच फ्रेंच फर व्यापारी पंचमहासरोवरांमध्ये होड्यांमधून व्यापार करू लागले. फरच्या बदल्यात इंडियनांना ते ब्रँडी व इतर वस्तू देऊ लागले. ही फर यूरोपीय बाजारपेठेत भारी किंमतीला विकली जाऊ लागली.

ला सालने १६७७ मध्ये फोर्ट फ्रोंतनॅक येथून फ्रान्सला आल्यावर न्यू फ्रान्समधील पश्चिमेकडील प्रदेशाचे समन्वेषण करण्याची व तेथे किल्ले बांधण्याची परवानगी, तसेच मिसिसिपी नदीतून फरच्या व्यापाराचा एकाधिकार चौदाव्या लूईकडून मिळविला. १६७८ मध्ये कॅनडाला परतताना त्याच्याबरोबर हेन्री द तोंती हा इटालियन सैनिक होता. कॅनडात आल्यावर ला सालने आपल्या अनेक व्यापाऱ्यांना पश्चिमेकडे फर गोळा करण्यात धाडले. ला साल व तोंती यांनी मिळून न्यूयॉर्कमधील बफालोजवळ नायगारा नदीवर ‘ ग्रिफॉन ’ ह्या बोटीची बांधणी केली. तिच्यातून सरोवरे व ग्रीन उपसागर पार करून ला साल मिशिगन सरोवराजवळील विस्कॉन्सिनमध्ये आला. महासरोवरांतून प्रवास करणारी ही पहिलीच बोट असावी. तेथे त्याच्या व्यापाऱ्यांनी खूप फर गोळा केल्याचे त्याला आढळले. तो फर ग्रिफॉन बोटीमध्ये भरून फोर्ट फ्रोंतनॅक येथे पाठविण्यात आली.

ला सालने १६८० मध्ये इलिनॉय नदीकाठावर सध्याच्या पिओरिया येथे क्रेव्हेकूर हा किल्ला बांधला तसेच तेथे वसाहतही स्थापन केली. हीच सध्याच्या इलिनॉय राज्यातील गौरवर्णियांची पहिली वसाहत होय. या किल्ल्याची नासधूस झाल्याने त्याने इलिनॉय नदीच्या वरच्या टप्प्यात सेंट लूई हा दुसरा किल्ला बांधला. त्यानंतर हा किल्ला त्या प्रदेशातील फर व्यापाराचे मुख्य ठिकाण बनला. १६८२ मध्ये ला साल व तोंती यांनी इलिनॉय नदीवरील हे ठाणे सोडून मिसिसिपी नदीतून दक्षिणेस मेक्सिकोच्या आखाताकडे प्रवासास सुरुवात केली. ९ एप्रिल १६८२ रोजी ला साल मिसिसिपीच्या मुखाशी येऊन पोहोचला. असा प्रवास करणारे हे बहुधा पहिलेच यूरोपीय असावेत. नदीच्या मुखाजवळच्या संपूर्ण खोऱ्यावर ला सालने फ्रान्सचा राजा चौदावा लूई याचा हक्क सांगितला व त्याच्या सन्मानार्थ या प्रदेशाला ‘लुइझिॲना’ असे नाव दिले.

ला साल पुन्हा कॅनडाला येईपर्यंत फ्रोंतनॅक याच्या जागी नवीन गव्हर्नरची नियुक्ती करण्यात आली होती. नव्या गव्हर्नरने इलिनॉयमधील किल्ल्यांवरील ला सालचा अधिकार काढून घेतला. तेव्हा ला सालने फ्रान्सला परत येऊन ही बाब राजाच्या निदर्शनास आणून दिली. राजाने मिशिगन सरोवरापासून मेक्सिको आखातापर्यंत पसरलेल्या मिसिसिपी नदीखोरे प्रदेशाच्या व्हॉइसरॉयपदी ला सालची नेमणूक केली तसेच त्या प्रदेशात वसाहती स्थापन करून त्या प्रदेशाचा कारभार पाहण्याचा अधिकारही त्याला बहाल केली. ही भूमी अवाढव्य अशा फ्रेंच साम्राज्याचा एक भाग बनावा, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती.

चार जहाजे आणि काही सैनिक, कारागीर व वसाहतकरी यांसह १६८४ मध्ये ला साल मिसिसिपीच्या मुखाजवळ वसाहत स्थापण्यासाठी निघाला. परंतु सुरुवातीपासूनच त्याची ही सफर असफल होत गेली व ती त्याला खूपच पीडादायक ठरली. फ्रान्स सोडल्यानंतर लगेचच सफरीतील जहाजांचा कप्तान व ला साल यांच्यात भांडण सुरू झाले तसेच त्याचे साथीदारांबरोबरचे संबंधही बिघडले. त्यातच मिसिसिपीच्या मुखाशी पोहोचण्याऐवजी ला साल चुकीने सांप्रतच्या टेक्सस राज्यातील मॅटॅगॉर्ड उपसागर किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. तेथे त्याने सेंट लूई नावाचा किल्ला बांधला.  चाचेगिरी, जहाजांची मोडतोड, साथीदारांचा आजार यांमुळे सफरीतील लोकांची संख्या कमी झाली. जमिनीवरून मिसिसिपी प्रदेशात जाण्याचा त्याचा प्रयत्नही फसला. मिसिसिफी खोरे शोधण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, परंतु त्यापासून तो वंचितच राहिला. या अपयशामुळे शेवटी जानेवारी १६८७ मध्ये अत्यंत दुःखी अंतःकरणाने त्याने कॅनडाकडे परत जाण्याचा निश्चय केला. मार्गात ला साल व त्याचे खलाशी यांच्यात तंटा निर्माण झाला. त्या वादातच ला सालच्याच एका माणसाने त्याचा खून केला त्यामुळे मिसिसिपी खोऱ्यातील वसाहतीचे त्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. त्याने लुइझिॲनावर फ्रान्सचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी केलेले प्रयत्न हे जरी त्या काळी व्यर्थ वाटले, तरी नंतरच्या फ्रेंच समन्वेषकांना व वसाहतकऱ्यांना त्याच्या अथक प्रयत्नांचा खूपच उपयोग झाला.

चौधरी, वसंत