स्वातंत्र्यदिन : ( इन्डिपेन्डेन्स डे ). राष्ट्राचा जन्मदिन. हा ‘ वर्धापन दिन ’ म्हणूनही संबोधला जातो. जागतिक इतिहासात अनेक राष्ट्रांना परकीय सत्तेशी संघर्ष करून स्वातंत्र्य संपादन करावे लागले आहे. अशा बहुतेक राष्ट्रांतून प्रतिवर्षी ज्या दिवशी स्वातंत्र्याची घोषणा झाली, तो दिवस ‘ स्वातंत्र्य दिन’ म्हणून पाळण्याचा प्रघात आहे. त्या निमित्ताने स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या थोर देशभक्तांच्या स्मृतीला मानवंदना दिली जाते व त्याचबरोबर स्वातंत्र्य रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे, ह्याची जाणीवही प्रतिवर्षी प्रत्येकास होते.

सर्वप्रथम स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा १७७६ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपासून सुरू झाली. दुसर्‍या कॉन्टिनेन्टल काँग्रेसने अमेरिकन वसाहतींच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यासंबंधीचा जाहीरनामा ४ जुलै १७७६ रोजी मान्य करण्यात आला व तेव्हापासून ‘ ४ जुलै ’ हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत पाळण्यात येऊ लागला. प्रत्येक राष्ट्रात स्वातंत्र्य दिवस हा राष्ट्रीय सण समजण्यात येतो व त्या दिवशी गावोगावी सन्मानार्थ तोफांची सलामी, शोभेचे दारूकाम, लष्करी संचलने, प्रकट सभा व देशभक्तिपूर्ण गाणी-व्याख्याने असे कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात. त्या निमित्ताने क्रीडा स्पर्धा, संगीत जलसे, सहली इ. कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रे आपल्या लष्करी सामर्थ्याचेही प्रदर्शन करतात.

ब्रिटिशांनी हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिले. त्या दरम्यान भारत, पाकिस्तान, म्यानमार ( ब्रह्मदेश ), श्रीलंका ( सीलोन ) ही स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली. पाकिस्तानला १४ ऑगस्ट १९४७ रोजी व भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, तर ब्रह्मदेशाला ४ जानेवारी १९४८ आणि श्रीलंकेला ४ फेब्रुवारी १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. पुढे २६ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान हा भाग बाहेर पडून बांगला देश हे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात भारतीय जनतेने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला आणि अंतिमतः महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अहिंसक सत्याग्रहाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून प्रतिवर्षी ‘ १५ ऑगस्ट ’ हा दिवस संपूर्ण देशभर स्वातंत्र्यदिन म्हणून थाटाने साजरा करण्यात येतो. भारतात हा एक अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय सण समजला जातो. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात येतो व राष्ट्रगीत होते. त्यानंतर पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. ही प्रथा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केली व ती अव्याहत चालू आहे. या दिवशी राजधानीत व राज्यांच्या प्रमुख शहरी झेंडावंदन, लष्करी अगर पोलीस संचलने, प्रकट सभा अगर संमेलने वगैरे कार्यक्रम योजण्यात येतात. तसेच विविध गावांतून, सार्वजनिक संस्थांतून, शासकीय कार्यालयांतून झेंडावंदन होते. सरकारी व खाजगी इमारतींवर रोषणाई करण्यात येते. सामान्य नागरिक आपल्या घरांवर राष्ट्रीय ध्वज उभारून हा सण साजरा करतात. भारताबाहेरही भारतीय वकिलातीत व सामान्य नागरिक हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

जगातील अठरा देशांनी साम्राज्यवादी पाश्चात्त्य देशांची सत्ता झुगारून १९६० मध्ये स्वातंत्र्य मिळविले. ब्रिटिश सोमालीलँड आणि इटालियन सोमालीलँड यांच्या विलीनीकरणातून सोमालिया या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली (१ जुलै ). तसेच सायप्रस (१६ ऑगस्ट ) व नायजेरिया (१ ऑटोबर) यांनी स्वातंत्र्य प्राप्त केले, तर अन्य पंधरा आफ्रिकन देशांनी फ्रान्स व बेल्जियम यांचे वासाहतिक वर्चस्व झुगारून स्वातंत्र्य मिळविले. ते देश व त्यांचे स्वातंत्र्य दिन असे : बुर्किना फासो (५ ऑगस्ट ), मध्य आफ्रिका प्रजासत्ताक (१३ ऑगस्ट ), काँगो प्रजा-सत्ताक (१५ ऑगस्ट ), चॅड (११ ऑगस्ट ), मॉरिटेनिया (२८ नोव्हेंबर ), कॅमेरून (१ जानेवारी ), मादागास्कर (२६ जून ), सेनेगल (२० जून ), माली (२२ सप्टेंबर ), झाईरे (३० जून), नायजर (३ ऑगस्ट), टोगो (२७ एप्रिल ), गाबाँ (१७ ऑगस्ट ), बेनिन प्रजासत्ताक (१ ऑगस्ट ) व कोत दे आयव्हरी (७ ऑगस्ट ). फिलिपीन्सने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची सत्ता झुगारून ४ जुलै १९४६ रोजी स्वातंत्र्य मिळविले तथापि ते १२ जून हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात कारण फिलिपीन्स प्रथम स्पेनच्या वासाहतिक वर्चस्वातून १२ जून १८९८ रोजी मुक्त झाले. यांव्यतिरिक्त अन्य देशांची नावे व त्यांचे स्वातंत्र्य दिन खालीलप्रमाणे :

आशिया खंड : अफगाणिस्तान (२७ मे ), कंबोडिया (९ नोव्हेंबर ), इंडोनेशिया (१७ ऑगस्ट ), इझ्राएल (१४  मेड्ढज्यू पंचांगाप्रमाणे ), जॉर्डन (२५ मे ), उत्तर कोरिया (९ सप्टेंबर ), दक्षिण कोरिया (१५ ऑगस्ट ), लाओस (१९ जुलै ), लेबानन (२२ नोव्हेंबर ), मलेशिया (३१ ऑगस्ट).

आफ्रिका खंड : घाना (६ मार्च ), गिनी (२ ऑटोबर ), लायबीरिया (२६ जुलै ), लिबिया (२४ डिसेंबर ), सूदान (१ जानेवारी), ट्युनिशिया (२० मार्च ), साउथ सूदान (९ जुलै ).

यूरोप खंड : अल्बेनिया (२९ नोव्हेंबर ), बेल्जियम (२१ जुलै ), फिनलंड (६ डिसेंबर ), ग्रीस (२५ मार्च ), हंगेरी (४ एप्रिल ), पोर्तुगाल (१ डिसेंबर).

अमेरिका खंड : अर्जेंटिना (९ जुलै ), बोलिव्हिया (६ ऑगस्ट ), ब्राझील (७ सप्टेंबर ), चिली (१८, १९ सप्टेंबर ), कोलंबिया (२० जुलै ), कोस्टा रीका (१५ सप्टेंबर), यूबा (२० मे ), एवादोर (१० ऑगस्ट ), एल् साल्वादोर (१४, १५ सप्टेंबर ), हैती (१ जानेवारी), हाँडुरस (१५ सप्टेंबर ), मेसिको (१६ सप्टेंबर ), निकाराग्वा (१५ सप्टेंबर ), पॅराग्वाय (१४ मे ), पेरू (२८ जुलै ), यूरग्वाय (२५ ऑगस्ट), व्हेनेझुएला (५ जुलै ).

देशपांडे, सु. र. नरवणे, द. ना.