ड्रॉसोफिला : डिप्टेरा गणाच्या ड्रॉसोफिलिडी कुलातील हा एक वंश असून त्यात ८०० जातींचा समावेश होतो. त्या मुख्यतः उष्ण कटिबंधी प्रदेशात 

ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर : अर्धनारी अर्धनर रूप : डाव्या बाजूचा गर्द रंगाचा डोळा, खाचयुक्त पंख आणि उदराचा आकार नारीचा आहे. उजव्या बाजूचे रूंद पंख, डोळ्याचा रंग व लक्षण, पिळवटलेले रोम (राठ केस) व इतर लक्षणे नराची आहेत.

आढळतात, पण काही मूळच्या समशीतोष्ण कटिबंधातील आहेत. त्या सामान्यतः नासक्याकुजक्या फळांवर व भाजीपाल्यावर घोंगावताना आढळतात. त्या नासक्या पदार्थातील ॲसिटिक अम्लामुळे आकर्षिल्या जातात. त्यांच्या अळ्या नासक्याकुजक्या फळांत आढळतात आणि त्या त्यांभोवती घोंगावतात. त्यामुळे त्यांना चुकून फळमाशी समजले जाते [⟶ फळमाशी].

ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर  ही जाती महत्त्वाची व सर्वसामान्य आहे. ती पिवळसर, तीन मिमी. लांब असून तिला रुंद पंखांची एक जोडी व पिसासारख्या स्पर्शिका (सांधे असलेली लांब स्पर्शेंद्रिये) असतात. तिचे डोळे साधारणतः चमकदार लाल असतात.

⇨ टॉमस हंट मॉर्गन  यांच्या आद्य कार्यानंतर मुख्यत: या जातीचा व इतर सु. १२ जातींचा उपयोग प्रयोगशाळेत ⇨ आनुवंशिकी व क्रमविकास (उत्क्रांती) यांच्या अध्ययनासाठी केला जात आहे. त्यांची वाढ करणे सोपे व कमी खर्चाचे असते. नासकी केळी किंवा ओटचे पीठ मद्यनिर्मितीत लागणाऱ्या यीस्टमध्ये भिजवून लहान काचपात्रात त्यांची वाढ करतात. २५°से. तापमानास त्यांचे जीवनचक्र दोन आठवड्यांपेक्षा कमी एवढ्या अल्प काळाचे असते. नरमादीची एक जोडी हजारो अळ्यांची पैदास करते. त्यांच्या पूर्ण वाढलेल्या अळीच्या लाला ग्रंथीतील कोशिकांमधील (पेशींमधील) बृहत् गुणसूत्रे (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक) अगदी सुस्पष्ट असून अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडतात.

टोपणी, गो. त.