ओएन, सर रिचर्ड : (२० जुलै १८०४ — १८ डिसेंबर १८९२). ब्रिटिश प्राणिशास्त्रज्ञ. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या जीवाश्मविज्ञानाचे (अवशेषांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाचे) आद्य प्रणेते. त्यांचा जन्म लँकॅस्टर (इंग्‍लंड) येथे झाला. १८२० मध्ये एका स्थानिक शस्त्रवैद्य आणि औषधविक्रेत्याकडे ते उमेदवार म्हणून काम करू लागले. १८२४ मध्ये एडिंबरो विद्यापीठात ते वैद्यकाचा अभ्यास करण्याकरिता दाखल झाले. लंडन येथील सेंट बार्टोलोम्यू रुग्णालयात वैद्यकाचा अभ्यासक्रम पुरा करून त्यांनी शस्त्रक्रियेच्या व्यवसायाला सुरुवात केली पण विख्यात शस्त्रवैद्य जॉन ॲबर्नेटी यांच्या आग्रहावरून १८२७ मध्ये ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’च्या हंटेरियन संग्रहालयाचे संरक्षक विल्यम क्लिफ्ट यांचे साहाय्यक म्हणून ते काम करू लागले. या ठिकाणी आपल्या आवडीचे काम करण्याची त्यांना संधी मिळाल्यामुळे वैज्ञानिक संशोधनात ते गढून गेले. हंटेरियन संग्रहालयामधील संग्रहाच्या कित्येक वर्णनात्मक याद्या त्यांनी तयार केल्या. हे काम करीत असताना तुलनात्मक शारीराचे (शरीररचनाशास्त्राचे) जे ज्ञान त्यांनी संपादन केले त्याचा उपयोग लुप्त प्राण्यांच्या अवशेषांच्या संशोधनात त्यांना झाला. १८३६ मध्ये पहिले हंटेरियन प्राध्यापक म्हणून रॉयल कॉलेजात त्यांची नेमणूक झाली. क्लिफ्ट यांच्या नंतर १८४९ मध्ये संग्रहालयाचे ते संरक्षक झाले आणि १८५६ मध्ये ब्रिटिश संग्रहालयाच्या प्रकृतिविज्ञान (प्राणी, वनस्पती इ. नैसर्गिक विकासाचे विज्ञान) विभागाचे अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

ओएन यांनी तुलनात्मक शारीर आणि जीवाश्मविज्ञान यांत आपल्या संशोधनाने मोलाची भर घातली. १८३२ साली प्रसिद्ध झालेले मेम्वार ऑन द पर्ली नॉटिलस  हे त्यांचे संशोधनात्मक पुस्तक उत्कृष्ट ठरले. सर्व पृष्ठवंशी प्राण्यांच्या कंकालातील (सांगाड्यातील) हाडांना समान पारिभाषिक संज्ञा वापरण्याचा प्रयत्‍न प्रथम त्यांनी केला. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी काही महत्त्वाची पुस्तके ए हिस्टरी ऑफ ब्रिटिश फॉसिल मॅमल्स अँड बर्ड्‍‍स (१८४६) हिस्टरी ऑफ ब्रिटिश फॉसिल रेप्‍टाइल्स  ४ खंड (१८४९ – ८४) आणि कंपॅरेटिव्ह ॲनॅटमी अँड फिजियॉलॉजी ऑफ व्हर्टेब्रेट्स  ३ खंड (१८६६ – ६८) ही होत.

प्रकृतिविज्ञानाचे एक राष्ट्रीय संग्रहालय स्थापन करण्याची योजना त्यांनी आखली आणि त्यानुसार लंडनमधील दक्षिण केन्सिंग्टन विभागात नवी इमारत बांधून ब्रिटिश संग्रहालयामधील प्रकृतिविज्ञानाचा सगळा संग्रह त्या इमारतीत नेण्यात आला. १८८४ मध्ये हे कार्य पूर्ण होईपर्यंत ते अधिकारावर होते. याच वर्षी त्यांना सर हा किताब मिळाला. यानंतर ते निवृत्त झाले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.