डिंभजनन : काही प्राणिजातींमध्ये अपूर्ण वाढ झालेले लहान वयाचे प्राणी प्रजोत्पादन करतात. अपक्व प्राण्याने केलेल्या अशा प्रजोत्पादनाला डिंभजनन असे नाव दिलेले आहे. अशा तऱ्हेचे प्रजोत्पादन दोन प्रकारचे असू शकते. एका प्रकारात अंड्याचा शुक्राणूशी संयोग न होताच त्याचा विकास होऊन नवीन प्राणी तयार होतो  अशा प्रजोत्पादनाला अनिषेक-डिंभजनन म्हणतात. दुसरा प्रकार प्रजोत्पत्तीच्या सामान्य रीतीचा असल्यामुळे त्याला द्विलिंगी डिंभजनन म्हणतात. सीसिडोमाइडी कुलातील मक्षिका हे अनिषेक-डिंभजननाचे एक चांगले उदाहरण आहे. उदा., मिॲस्टर या मक्षिकेच्या डिंभात अंडी उत्पन्न होऊन डिंभाच्या (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेच्या) शरीरातच त्यांचा अनिषिक्त विकास होतो. जनक डिंभाची देहभित्ती फोडून आत तयार झालेले दुसऱ्या पिढीचे लहान डिंभ बाहेर पडतात आणि प्रजोत्पादनाच्या या पद्धतीची पुनरावृत्ती करतात. अशा प्रकारे कित्येक पिढ्या उत्पन्न झाल्यावर अखेरीस एका पिढीतील डिंभ कोशित होतात व या कोशांतून मिॲस्टराचे नर आणि माद्या बाहेर पडतात. यांचा नेहमीच्या लैंगिक पद्धतीने समागम होतो. टॅनिटार्सस या कीटकामध्ये डिंभजनन कोशावस्थेमध्ये घडून येते. याच्या उलट कॅल्सिड गांधील माश्यांमध्ये डिंभजनन जीवनचक्रातील अगदी पूर्व अवस्थांत घडून येते.

पर्णाभकृमी या परजीवी (दुसऱ्या प्राण्यावर जगणाऱ्या) कृमींमध्ये डिंभांच्या पिढ्यांची एक साखळीच तयार होते. निषेचित (फलित) अंड्यापासून मिरॅसीडियम डिंभ उत्पन्न होतो. हा लिम्निया वंशाच्या गोगलगायीच्या शरीरात शिरतो. तेथे त्याचे बंद पिशवीसारख्या बीजाणुपुटीत (ज्यात अतिसूक्ष्म प्रजोत्पादक घटक आहेत अशा बंदिस्त आवरणात) रूपांतर होते. या पुटीत आदिम (आद्य) अंडाणूंच्या स्वरूपाच्या जनन-कोशिका (पेशी) असतात. त्यांच्यापासून अनिषेकजननाने ‘रेडिया’ नावाचे डिंभ उत्पन्न होतात. या रेडियांपासून अनिषेकजनानेच रेडियांची दुसरी पिढी उत्पन्न होते पण काही काळाने या दुसऱ्या पिढीचे उत्पादन बंद पडून त्यांच्याऐवजी ‘सरकॅरिया’ नावाचे डिंभ उत्पन्न होऊ लागतात. सरकॅरिये गोगलगायीच्या शरीरातून बाहेर पडून गवताच्या पात्यांना चिकटतात आणि तेथे त्यांचे पुटीभवन (स्वतःभोवती सरंक्षक कवच तयार करणे) होते. हे गवत मेंढ्या वा गुरांच्या खाण्यात आले म्हणजे पुटीभूत सरकॅरिये त्यांच्या आहारनालात (अन्नमार्गात) जातात आणि तेथे त्यांचे पर्णाभकृमींत रूपांतर होते.

ॲक्झोलोटल हा एका जातीच्या सॅलॅमँडराचा मेक्सिकोत आढळणारा चिरस्थायी डिंभ आहे. हा लैंगिक रीतीने प्रजोत्पादन करीत असल्यामुळे द्विलिंगी डिंभजननाचे उत्तम उदाहरण होय.

पहा : चिरडिंभता डिंभ.

कर्वे, ज. नी.