विनोग्रॅडस्की, स्यिर्गेई निकलायेव्हिच: (१ सप्टेंबर १८५६-२५ फेब्रुवारी १९५३). रशियन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ त्यांनी मृदेतील सूक्ष्मजंतूंद्वारे होणारे नायट्रीकरण व नायट्रोजनाचे स्थिरीकरण या प्रक्रियांच्या क्रियाविज्ञानाविषयीचे शोध लावले. त्यांनी लावलेल्या या शोधांमुळे सूक्ष्मजंतुविज्ञान ही जीवविज्ञानविषयक एक प्रमुख पुढे आली.

विनोग्रॅडस्की यांचा जन्म कीव्ह (रशिया) येथे झाला. सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात निसर्गविज्ञानविषयक अध्ययन केल्यानंतर १८८५ साली ते स्ट्रॅसबर्ग (जर्मनी) येथे गेले. गंधकी सूक्ष्मजंतूंचे रंगहीन प्रकार प्रकाश नसताना हायड्रोजन सल्फाइडाचे प्रथम गंधकामध्ये व नंतर सल्फ्यूरिक अम्लामध्ये ऑक्सिडीकरण [⟶ऑक्सिडीभवन] करतात आणि ऊर्जा मिळवू शकतात, असे त्यांनी १८८७ साली प्रयोगांद्वारे दाखविले. यामुळे या सूक्ष्मजंतूंचे विशिष्ट क्रियाविज्ञान प्रस्थापित जाले. १८८८साली ते झुरिक विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी नायट्रीकरणास (अमोनियम लवणाचे नायट्राइटांमध्ये व नायट्राइटांचे नायट्रेटांमध्ये होणाऱ्या ऑक्सिडीकरणास) कारणीभूत असणारे सूक्ष्मजीव शोधून काढले (१८८९-९०). विनोग्रॅडस्की यांनी या प्रक्रियेशी निगडीत असलेल्या सूक्ष्मजंतूंच्या नायट्रोसोमोनॅस (नायट्राइट तयार करणारे) आणि नायट्रोसोकॉकस [(नायट्रोबॅक्टर) नायट्रेट तयार करणारे] या दोन नवीन प्रजाती प्रस्थापित केल्या. सेंट पीटर्झबर्ग येथे परत आल्यानंतर त्यांनी इंपीरिअल इन्टिट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसिन या संस्थेत सूक्ष्मजीवविज्ञानाचे संचालक (१८९१-१९०२) व सर्वसाधारण संचालक (१९०२-०५) म्हणून काम केले. १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीत त्यांना रशिया सोडून जावे लागले. १९२२ मध्ये त्यांनी पॅरिस येथील पास्चर इन्टिटट्यूटमध्ये आपल्या कार्याला पुन्हा सुरूवात केली. तेथे निवृत्त होईपर्यंत ते कृषी-सूक्ष्मजीवविज्ञानाचे संचालक होते (१९२२-४०).

इंपिरिअल इन्टिट्यूटमध्ये असताना त्यांनी मृदेतील सूक्ष्मजीवांच्या अध्ययनाच्या नवीन पद्धती सुटविल्या. विशेषतः शेंगा येणाऱ्यावनस्पतींबरोबर सहजीवन जगताना नायट्रोजनाचे स्थिरीकरण करणारे व मृदेत इतस्ततः पसरलेले सूक्ष्मजीव यांच्या अध्ययनाच्या या पद्धती होत्या. १८९३-९५ मध्ये त्यांनी क्लॉस्ट्रिडियम पाश्वरिॲनम या अवायुजीवी (ऑक्सिजन नसतानाही वाढू शकणाऱ्या) जीवाचाही शोध लावला. वातावरणातील मुक्त नायट्रोजन आपल्या चयापचय प्रक्रियेत (शरीरात सतत चालणाऱ्याभौतिक व रासायनिक घडामोडींत) वापरण्याची क्षमता या जीवांमध्ये असते. विनोग्रॅडस्की पाश्चर इन्स्टिट्यूट (पॅरिस) चे सदस्य होते (१८९०-९१). ब्री-कॉत-रॉबर्ट (फ्रान्स) येथे त्यांचे निधन झाले. 

सूर्यवंशी, वि. ल.