क्लोपश्टोक, फ्रीड्रिख गोट्लीप : (२ जुलै १७२४–१४ मार्च १८०३). जर्मन कवी. जन्म क्व्हेडलीनबुर्क, सॅक्सनी येथे. नाऊम्बुर्कजवळील ‘शूल्पफोर्टा’  ह्या विख्यात शाळेत ग्रीक-लॅटिन काव्यांचा अभ्यास. पुढील शिक्षण येना आणि लाइपसिक येथे. मुख्यतः Der Messias (इं. शी. द. मेसिया, १७४८-७३) ह्या महाकाव्याचा कर्ता म्हणून प्रसिद्धी. विद्यार्थिदशेतच क्लोपश्टोकने ह्या महाकाव्याचा संपूर्ण आराखडा तयार केला आणि त्याचे आरंभीचे काही सर्ग लिहिले. ईश्वराने आपणास ख्रिस्ती होमर होण्याचा आदेश दिला आहे, अशी त्याची भावना होती. ख्रिस्तिजीवनावर लिहिलेल्या ह्या महाकाव्याचे पहिले तीन सर्ग प्रसिद्ध होताच क्लोपश्टोकला फार मोठी कीर्ती लाभली (१७४८). हेक्झॅमीटरसारख्या अभिजात छंदाचा ह्या महाकाव्यासाठी त्याने यशस्वी उपयोग करून घेतला. ह्या महाकाव्यात उत्कट भावनात्मक लय आणि धर्मस्फुरणाचा ध्वनी प्रकर्षाने जाणवतो. An meine Freunde (१७४७, नंतरचे नाव Wingolf ) आणि Oden (१७७१) ह्या त्याच्या काव्यसंग्रहांतून त्याच्या उत्कृष्ट भावकविता संगृहीत केलेल्या आहेत. भावकवितांसाठी त्याने तोपर्यंत जर्मन काव्यात न वापरलेले अनेक अभिजात छंद उपयोगात आणले. त्याच्या उद्देशिका अभिजात ग्रीक उद्देशिकांच्या नमुन्याबरहुकूम असल्या, तरी त्यांतही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा स्पर्श प्रत्ययास येतोच. त्याने बायबलमधील कथांवर आधारलेली काही नाटकेही लिहिली. सर्वसाधारणतः त्याचे लेखन भूतकाळलक्षी आहे. कवी द्रष्टा असतो, अशीही त्याची धारणा आहे. त्याच्या गतिशील शैलीचा प्रभाव हल्डरलीन आणि रिल्के ह्या आधुनिकांत जमा होणाऱ्या कवींवरही पडलेला आहे. काव्याखेरीज Die deutsche Gelehrtenrepublik (१७७४, इं. शी. द जर्मन रिपब्लिकन ऑफ स्कॉलर्स ) यासारखे महत्त्वपूर्ण गद्यग्रंथही त्याने लिहिले. जर्मन भाषेतील शब्दांचे वर्णक्रम आणि त्या भाषेचे व्याकरण ह्यांच्या संदर्भात त्याने काही उपकारक सुधारणा सुचविल्या होत्या. १७५१ ते १७७० ह्या काळात तो कोपनहेगन येथे होता. डॅनिश सरकारकडून त्यास मानधनही दिले जात होते. १७७० मध्ये तो हँबुर्ग येथे परतला. तेथेच त्याचे निधन झाले.

मेहता, कुमुद