एकिनॉयडिया : एकायनोडर्माटा संघातील एल्युथेरोझोआ उपसंघाचा एक वर्ग. या वर्गात समुद्री अर्चिन, हार्ट अर्चिन आणि केक अर्चिन या प्राण्यांचा समावेश होतो. समुद्री अर्चिनाचे शरीर जवळ जवळ वाटोळे, हार्ट अर्चिनाचे हृदयाकृती आणि केक अर्चिनाचे बिंबाकार असते. ते कवचाने पूर्णपणे झाकलेले असते. एकमेकांना लागून असलेल्या आणि पक्क्या जोडलेल्या कॅल्शियममय तकटांचे हे कवच बनलेले असते. हे प्राणी मुक्तजीवी (स्वतंत्रपणे जगणारे) असून त्यांना तारामीनाप्रमाणे बाहू नसतात. चरणार-प्रसीताही (नळीसारखे पाय जिच्यात असतात ती अरीय खोबण) नसतात. कवचावर एकाआड एक चरणार-क्षेत्रे (ज्यावर नालपाद असतात अशी क्षेत्रे) आणि अंतराचरणार-क्षेत्रे (दोन चरणार-क्षेत्रांच्या मध्ये असणारी क्षेत्रे) असतात. ही प्रत्येकी पाच असून प्राय: एका ध्रुवापासून दुसर्‍या ध्रुवापर्यंत पसरलेली असतात. चरणार-क्षेत्रे तारामीनाच्या बाहूंची निदर्शक असून त्यांवर छिद्रे असतात यांच्यातून चलनाच्या कामी उपयोगी पडणारे नालपाद बाहेर काढता येतात. काहींत त्वचाक्लोमांनी (त्वचेच्या बनलेल्या क्लोमांनी म्हणजे कल्ल्यांनी) तर काहींत रूपांतरित नालपादांनी श्वसन होते. कवचाच्या तकटांवर चल (सगळ्या बाजूंना फिरवता येणारे) कंटक असतात काही जातींत ते फार मोठे असतात तर काहींत ते बरेच लहान असतात. कंटकांचा चलनाच्या आणि स्वसंरक्षणाच्या कामी उपयोग होतो. कंटकांच्या मधून मधून लांब, चल वृंत (देठ) आणि तीन जंभ (तोंडाशी संबंध असलेले उपांग) असलेल्या संदंशिका (चिमट्यासारख्या सूक्ष्म संरचना) असतात. लहान भक्ष्यजीव पकडण्याकरिता व शरीर निर्मळ ठेवण्याकरिता त्यांचा उपयोग होतो.

काही बाह्य आणि आंतर संरचना दाखविणारे समुद्री अर्चिनाचे (अर्‌बॉसिया) अर्ध-रेखाचित्र : (१) परिगुद, (२) जलच्छिद्र, (३) अश्मनाल, (४) अक्षग्रंथी, (५) देहगुहा, (६) वलयनाल, (७) संदंशिका, (८) कंटक, (९) तंत्रिका-वलय, (१०) ॲरिस्टॉटलचा कंदील, (११) दात, (१२) परिमुखकला आणि मुख, (१३) अरीय नाल, (१४) नालपाद, (१५) निनाल, (१६) जठर, (१७) ग्रसिका, (१८) आंत्र, (१९) जनन-ग्रंथी, (२०) जनन-रंध्र, (२१) गुदद्वार.

मुख बहुधा एका ध्रुवाजवळ (अधर पृष्ठावर) आणि गुदद्वार प्राय: विरुद्ध ध्रुवावर (अपमुख) असते.  मॅड्रेपोराइट (खोबणी व भोके असलेले कॅल्शियममय तकट) गुदद्वाराजवळ असतो. मुखाभोवती चिवट, लवचिक त्वचा (परिमुख म्हणजे मुखाभोवती असणारी) असते. काहींच्या मुखांमध्ये अन्नाच्या चर्वणाकरिता एक गुंतागुंतीचे उपकरण असते त्याला  ‘ॲरिस्टॉटलचा कंदील’  म्हणतात. समुद्रतृणे, लहान जीव आणि निर्जीव प्राणिद्रव्य हे यांचे भक्ष्य होय पण काही जाती चिखलात मिसळलेल्या अन्नकणांचा उपयोग करण्याकरिता चिखल खातात. आहारनाल नळीसारखा व वेटोळी पडलेला असतो. पक्ष्माभिकांचे (केसासारख्या बारीक तंतूंचे) अस्तर असलेला एक निनाल (नळी) ग्रसिकेपासून (घशापासून जठरापर्यंतचा अन्न मार्गाचा भाग) निघून आंत्रात (आतड्यात) उघडतो. जनन-ग्रंथी अंतरा-अरीय असून त्यांच्यापासून युग्मकवाहिन्या (शुक्राणू किंवा अंडी नेणार्‍या नळ्या) निघून त्या गुदद्वाराभोवती असणार्‍या जननांग पट्टांवर जननरंध्रांनी उघडतात. अंड्याचे निषेचन (अंड्याचा शुक्राणूशी संयोग होणे) समुद्राच्या पाण्यात होते. अंड्यातून प्लूटियस डिंभ [अळीसारखी एक अवस्था, → डिंभ] बाहेर पडतो व त्याच्या रूपांतरणाने अर्चिन तयार होतो.

समुद्री अर्चिन किनार्‍यावरील अथवा समुद्राच्या तळावरील चिखलात किंवा खडकांत राहतात काही ५,००० मीटर खोलीवरही आढळतात. हार्ट अर्चिन व केक अर्चिन उथळ पाण्यातील वाळूत पुरलेले असतात. हे प्राणी संघचारी (समूहात राहणारे) आहेत. काही जातींचे हजारो प्राणी एके ठिकाणी राहत असलेले आढळतात.

एकिनॉयडिया वर्गात तीन गण आहेत : (१) रेग्युलॅरिया : या गणातील प्राण्यांत उघड पंचतयी (पाच भागांची बनलेली) अरीय सममिती [त्रिज्यीय सममिती, → प्राणि-सममिती] आढळते मुख आणि गुदद्वार विरुद्ध ध्रुवांवर असतात ॲरिस्टॉटलचा कंदील असतो उदा., समुद्री अर्चिन. (२) क्लायपीॲस्ट्रीडिया : या गणातील प्राणी अगदी चपटे असून ते बाह्यत: द्विपार्श्व-सममित (दोन सारखे भाग पडणारे) असतात गुदद्वार बहि:केंद्रक (एका बाजूला) असते ॲरिस्टॉटलचा कंदील असतो उदा., केक अर्चिन. (३) स्पॅटँगॉयडिया : या गणातील प्राणी ह्रदयाकृती असून, मुख आणि गुदद्वार बहि:केंद्रक असतात बाह्यत: द्विपार्श्व-सममिती आढळते ॲरिस्टॉटलचा कंदील नसतो उदा., हार्ट अर्चिन.

पहा: केक अर्चिन समुद्री अर्चिन हार्ट अर्चिन.

जोशी, मीनाक्षी.


जीवाश्म :  एकिनॉयडियांचे रेग्युलॅरिया व इर्रेग्युलॅरिया असे दोन उपवर्ग आहेत. रेग्युलॅरियांच्या कवचाची रूपरेखा वर्तुळाकार व सममिती जवळजवळ पूर्ण अरीय असते. मुख कवचाच्या तळाच्या मध्याशी व गुदद्वार माथ्याच्या तबकडीत असते. चरणार-क्षेत्रे साधी म्हणजे परिमुख भागापासून तो माथ्याच्या तबकडीपर्यंत सलग गेलेली असतात. सर्व रेग्युलॅरियात ॲरिस्टॉटलचा कंदील असतो. इर्रेग्युलॅरियांचे मुख कवचाच्या तळाच्या मध्याजवळ किंवा त्याच्या पुढे किंवा बरेच पुढे असते. गुदद्वार माथ्याच्या तबकडीच्या बाहेर व पश्व अतंरार (दोन अरांच्यामध्ये) चरणार-क्षेत्राच्या मध्यरेषेवर असते. कवचाचा आकार वर्तुळाकार असतोच असे नाही. तो बदामी एक्क्यासारखा किंवा दीर्घवर्तुळाकार असणे शक्य असते. कवचाची सममिती द्विपार्श्वीय असते. चरणार-क्षेत्रे साधी किंवा दलाभ (फुलाच्या पाकळीसारखी) असतात. काही गोत्रांत ॲरिस्टॉटलचा कंदील असतो तर काहींत तो नसतो.

ऑर्डोव्हिसियन कल्पाइतक्या (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वी इतक्या) प्राचीन कालापासून हा वर्ग अस्तित्वात आहे. पण पुराजीव महाकल्पात, विशेषत: कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) आधीच्या काळात या वर्गातील प्राण्यांची संख्या अत्यल्प असे. या वर्गाच्या दोन उपवर्गांपैकी रेग्युलॅरिया हा अधिक जुना असून पुराजीवी महाकल्पातील सर्वच गोत्रे त्या उपवर्गातील होती.

एक ट्रायासिक (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या ) व एक पूर्वक्रिटेशस (सु. १४ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालीन अशी दोन गोत्रे वगळली तर मध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) व त्या महाकल्पानंतरच्या कालातील सर्व एकिनॉयडियांचे मुकुट (वरचा भाग) पत्र्यांच्या वीस स्तंभांचे बनलेले असतात व स्तंभांची संख्या विसापेक्षा कमी किंवा अधिक असत नाही. पण पुराजीव महाकल्पातील एकिनॉयडियांच्या मुकुटातील स्तंभांच्या संख्येच्या बाबतीत बरीच विविधता आढळते.

एकिनॉयडियांच्या जिवंत राहण्यासाठी व वाढीसाठी काही विशिष्ट परिस्थिती आवश्यक असते. त्यामुळे त्यांचा प्रसार मर्यादित क्षेत्रात होत असतो. त्यांचे जीवाश्म असलेल्या खडकांचे क्षेत्र मर्यादित असते. म्हणून दूरदूरच्या क्षेत्रांतील गाळाच्या खडकांचे सहसंबंध ठरविण्यास त्यांचा फारसा उपयोग होत नाही. पण त्यांचे जीवाश्म तुरळक क्षेत्रात आढळत असले, तरी आढळतात तेथे बरेच जीवाश्म बहुधा आढळतात व पुरापरिस्थितिविज्ञानविषयक अध्ययनात त्यांचा चांगला उपयोग होतो.

केळकर, क. वा.