क्रेटिनिझम : (अवटुजन्य जडवामनता). अवटू ग्रंथीचा [गळ्याच्या पुढे दोन्ही बाजूंस असलेल्या अंतःस्रावी ग्रंथीचा, → अवटु ग्रंथि] अंतःस्राव कमी पडल्यामुळे लहानपणी जडबुद्धी आणि वामनता येते. या विकाराला ‘क्रेटिनिझम’ अथवा ‘अवटुजन्य जडवामनता’ असे म्हणतात.

शरीराच्या योग्य वाढीसाठी अवटू ग्रंथीच्या अंतःस्रावाची फार जरूरी असते. गर्भावस्थेत मातेच्या किंवा जीवनाच्या पहिल्या काही महिन्यांत बालकाच्या अन्नात आयोडीन कमी पडले, तर अवटू ग्रंथीचा अंतःस्राव कमी पडतो, त्यामुळे बालकाच्या शरीराची आणि बुद्धीची वाढ खुंटते. शरीराची व बुद्धीची वाढ पुरी झाल्यानंतर जर हा अंतःस्राव कमी पडला तर स्थूलपणा, मनोदौर्बल्य, त्वचा जाड आणि खरखरीत होणे वगैरे विकार होतात. त्याला ‘मिक्सीडीमा’ (सर्वांगीण घनशोफ) असे म्हणतात.

जडवामनता : ज्या प्रदेशात गलगंड रोग [अवटू  ग्रंथीच्या वाढीमुळे त्या जागी सूज दिसणारा रोग, → गलगंड] स्थानिक स्वरूपात दिसतो, तेथे जडवामनता हा विकार जास्त प्रमाणात दिसून येतो. क्वचित आनुवंशिक प्रवृत्तीही असते.

वयाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या महिन्यातच लक्षणे दिसू लागतात. बालकाचा आवाज बसल्यासारखा वाटतो. चेहरा विद्रपू दिसू लागतो. गाल लोंबल्यासारखे दिसतात. जीभ जाड आणि मोठी झाल्यामुळे तोंडाबाहेरच राहते. त्यामुळे चेहरा बाळवट दिसतो. डोळे मोठे व गोल असून पोट मोठे होऊन बेंबीपाशी अंतर्गळ (अस्वाभाविक मार्गातून इंद्रियाचा अगर ऊतकाचा म्हणजे समान रचना व कार्य असणार्‍या पेशींच्या समूहाचा भाग बाहेर येणे, हार्निया) होतो. मान धरणे, उठून बसणे, रांगणे, बोलणे वगैरे बालक्रिया फार उशिरा होतात किंवा मुळीच होत नाहीत. त्वचा कोरडी, रखरखीत आणि जाड असून केस राठ व रुक्ष असतात.

मनाची आणि बुद्धीची वाढ खुंटल्यामुळे मुले क्षीणबुद्धी व समजूत कमी असलेली अशी असतात. अशा मुलांचे शिक्षण जवळजवळ अशक्य होते.

श्वासोच्छ्‌वास व नाडी मंद असते. शरीराचे तापमानही २ ते ३ अंशांनी कमी असते. भूक फार लागते आणि अन्न जास्त घेतल्यामुळे मेदोवृद्धी होते. खांदे, पाठ व नितंब या भागांत मेदोवृद्धी दिसते.

अवटू ग्रंथीच्या अंतःस्रावाबरोबरच इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या स्राव– विशेषतः पोष ग्रंथीचा [मेंदूच्या बुंध्याशी असलेल्या अंतःस्रावी ग्रंथीचा, → पोष ग्रंथि]– कमी पडल्यास जननेंद्रियांचीही वाढ खुंटते.

ज्या प्रदेशात गलगंड रोग स्थानिक स्वरूपात दिसतो, तेथे गर्भिणीला रोज थोड्या प्रमाणात आयोडीन दिल्यास या रोगाला प्रतिबंध होऊ शकतो. लक्षणे दिसू लागल्याबरोबर अवटू ग्रंथीचा अर्क योग्य प्रमाणात सतत दिल्यास शरीराची व मानसिक वाढ होऊ शकते. हा उपाय करण्यास जितका उशीर होईल तितक्या प्रमाणात शरीराची वामनता आणि बुद्धीचे जडत्व कायम राहते.

सर्वांगीण घनशोफ : शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर जर अवटू ग्रंथीचा अंतःस्राव कमी पडला, तर हा विकार होतो. अवटू ग्रंथीचा शोथ (दाहयुक्त सूज) अथवा अपपुष्टी (पोषणाच्या अभावी अगर अन्य कारणांनी रोडावणे) झाल्यास किंवा शस्त्रक्रियेच्या वेळी अवटू ग्रंथी जास्त प्रमाणात काढून टाकली गेली, तरीही हा विकार दिसतो.

या विकारात मूळ चयापचयी (शरीरात सतत होणार्‍या रासायनिकभौतिक घडामोडींचे) परिमाण २० ते ४० टक्के कमी होते. सर्व त्वचा जाड, फुगलेली असून केस रुक्ष, भंगुर आणि तुरळक दिसतात. रोगी उदासीन आणि सुस्त असतो. शरीरात सर्वत्र वसा साठून राहते रक्तातील ⇨कोलेस्टेरॉलाचे प्रमाण वाढते. सर्दी लवकर होते आणि हृदय अभिस्तीर्ण होते (आकारमानात वाढ होते).

त्वचेखाली साठून राहणारा पदार्थ ‘म्यूसीन’ (उष्णतेमुळे गुठळी न होणारे एक प्रकारचे प्रथिन) हा असावा अशी पूर्वी कल्पना होती, परंतु अलीकडे तो प्रथिनयुक्त अंशप्रवाही (पातळसर) पदार्थ आहे, असे सिद्ध झालेले आहे.

अवटू ग्रंथीचा अर्क देऊ लागल्याबरोबर थोड्याच दिवसांत लक्षणे कमी होतात मात्र हा अर्क योग्य प्रमाणात नेहमीच द्यावा लागतो.

संदर्भ : 1. Boyd, W. A Textbook of Pathology : Structure and Function of Disease, Philadelphia, 1961.

           2. Trotter, W. R. Diseases of the Thyroid, Philadelphia, 1962.

ढमढेरे, वा. रा.