संधिशोथ : सांध्याच्या कोणत्याही भागात जंतुसंक्रामण, अपघातजन्य दुखापत, प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया, ऱ्हसन प्रक्रिया किंवा स्फटिकांसारख्या पदार्थाची अस्वाभाविक निर्मिती यांसारख्या कारणांनी प्रतिक्रिया उद्‌भवल्यास ‘संधिशोथ’ झाला असे म्हटले जाते. शोथाची (दाहयुक्त सूजेची) प्रक्रिया बहुधा सांध्यातील संधिकलेच्या पटलात सुरू होऊन नंतर ती कूर्चा, स्नायुबंधांची आवरणे, अस्थी, संधिसंपुट, संधिबंध (स्नायुरज्जू , कंडरा) यांत पसरत जाते. इतरत्र घडणाऱ्या शोथप्रक्रियांप्रमाणेच सांध्यामध्येही रक्तप्रवाह वाढणे, श्वेतकोशिकायुक्त द्रव साचणे, वेदना, स्पर्श-असह्यता, तापमानातील वाढ आणि कार्यक्षमतेतील घट यांसारखी लक्षणे निर्माण होतात. तीव्र शोथाचे रूपांतर दीर्घकालिक शोथात होऊ शकते. दीर्घकालिक शोथात वेदना, तापमान, सूज यांसारख्या लक्षणांची तीव्रता कमी असली तरी सांध्यात संरचनात्मक बदल घडून येत असल्याने सांधे कायमचे आखडण्यासारखे परिणाम अंशत: अपंगत्व निर्माण करू शकतात.

संक्रामणजन्य संधिशोथाला कारणीभूत असणारे सूक्ष्मजंतू हे खोलवर झालेल्या जखमा, सांध्यात थेट अंत:क्षेपणाने (इंजेक्शनने) दिलेली औषधे, शस्त्रक्रिया आणि प्रतिकारशक्तीचा अभाव यांमुळे सांध्यात प्रवेश करू शकतात किंवा शरीरात इतरत्र असलेल्या संक्रामणातील जंतू रक्तप्रवाहावाटे सांध्याच्या अंतर्भागात येऊन पोहोचतात. या जंतूंमध्ये स्टॅफिलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, न्यूमोकॉकस, गोनोकॉकस, स्युडोमॉनस, हीमोफायलस किंवा साल्मोनेला या प्रकारांचे जंतू प्रामुख्याने आढळतात. यांशिवाय मायक्रोबॅक्टिरिया (क्षयरोगाचे जंतू), काविळीचे, गोवराचे, गालगुंडाचे किंवा एड्सचे विषाणू , बोरेलियाचे सर्पिल सूक्ष्मजीव हेही संधिशोथास कारणीभूत होऊ शकतात. प्रत्यक्ष जंतुसंक्रामण न होता इतरत्र उद्‌भवलेल्या अल्पकालिक संक्रामणामुळे निर्माण झालेले प्रतिरक्षा यंत्रणेचे सकियण सांध्यांमध्ये तीव्र (उदा., संधिज्वर) किंवा दीर्घकालिक (उदा., संधिवाताभ संधिशोथ) शोथप्रक्रियेस चालना देऊ शकते.

संधिशोथाच्या बहुतेक सर्व प्रकारांची माहिती मराठी विश्वकोशात ‘संधिवात’ या नोंदीत आलेली आहे. संधिवातामध्ये समाविष्ट न होणाऱ्या दोन महत्त्वाच्या शोथप्रधान विकारांचाच विचार येथे केला आहे.

संधिज्वर : कधीकधी ‘तीव्र संधिवात’ या नावाने ओळखला जाणारा हा विकार लहान मुलांमध्ये-पाच ते पंधरा वर्षे या वयोगटात-आढळतो. कुपोषण, दाटीवाटीने राहण्यास भाग पाडणारी घरे, गारठा, हवेतील ओलावा यांसारख्या पार्श्र्वभूमीवर आणि काही प्रमाणात आनुवंशिक प्रवृत्ती असलेल्या मुलांमध्ये त्याची शक्यता अधिक असते. घशामधील स्ट्रेप्टोकॉकस संक्रामणाने त्याची सुरूवात होते आणि घसादुखी बरी झाल्यावर काही आठवडयानंतर एकाएकी ताप येण्यास सुरूवात होते. संक्रामणातून निर्माण होणारी शोथप्रतिक्रिया सांधे, त्वचा आणि हृदयाचे स्नायू व झडपा यांच्या ऊतकांत (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांत म्हणजे पेशीसमूहांत) तीव्र प्रमाणात प्रकट होते. प्रत्यक्ष सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व यांपैकी कोणत्याही ठिकाणी नसते.

सुमारे दोन आठवडे चढ-उतार करणारा हा ताप टिकतो. घोटे, गुडघे, कोपरे, मनगटे या सांध्यांमध्ये तीव्र वेदना, स्पर्श-असह्यता, सूज ही लक्षणे आढळतात. एका वेळी एका किंवा अधिक सांध्यांमध्ये जाणवणारे हे बदल अनेकदा एका सांध्याकडून दुसऱ्याकडे असे फिरताना दिसतात. त्वचेवर वेदनाहीन पुरळ आणि त्वचेखाली लहानलहान वेदनाहीन गाठी यांचे अस्तित्व जाणवते. सर्वांत गंभीर बदल हृदयात आणि त्याच्या आवरणामध्ये होत असल्याने छातीत दुखणे, धडधडणे, धाप लागणे, थकून जाणे, खोकला यांसारखी लक्षणे मुलाला याच वेळी अस्वस्थ करतात. अशा वेळी संपूर्ण विश्रांतीसाठी त्याला झोपवून ठेवणे आवश्यक असते. स्टेथॉस्कोपने तपास ल्यास हृदयाच्या अलिंद-निलय द्वाराची (वरच्या कप्प्यातून खालच्या कप्प्याकडे रक्त सोडणाऱ्या व्दाराची) झडप विशेषत: डाव्या बाजूची मायट्रल झडप (व्दिदल झडप) समाधानकारक कार्य करीत नाही, असे दर्शविणारे अस्वाभाविक ध्वनी ऐकू येतात.

या विकारासाठी संपूर्ण विश्रांती, ॲस्पिरीन किंवा तत्सम वेदनाशामक आणि शोथहारक औषधे आणि हृदयातील संभाव्य संक्रामण टाळण्यासाठी पेनिसिलिनासारखी प्रतिजैविक (अँटिबायॉटिक्स) औषधे यांचा अवलंब केला जातो. हृदयात गाठींची निर्मिती आणि अंत:हृदीय स्तरात जंतुसंक्रामण होऊ नये म्हणून प्रौढावस्थेपर्यंत वरचेवर प्रतिजैविकांचा वापर केला जातो. अन्यत्र असणाऱ्या संक्रामण केंद्रामधून हृदयाकडे सूक्ष्मजंतूंचा प्रसार टाळण्यासाठी प्रौढावस्थेतही कोणत्याही किरकोळ शस्त्रक्रियेपूर्वी (उदा., दात काढणे) प्रतिजैविकांचे संरक्षण अत्यावश्यक असते. या व्यक्तींमध्ये मध्यमवयात हृदयाची कार्यक्षमता कमी होण्याची आणि त्याच्या स्पंदनाच्या अनियमिततेचे विकार उद्‌भवण्याची शक्यता नेहमी लक्षात घ्यावी लागते. या संधिशोथाचे सांध्यांवर दूरगामी परिणाम फारसे होत नाहीत.

क्षयरोगजन्य संधिशोथ : तरूणांत, प्रौढांमध्ये अथवा मुलांमध्ये आढळणारा हा विकार दीर्घकालिक आणि अनेक महिने लक्षणे न दाखविता प्रगती करणारा रोग आहे. इतर संकामणांपेक्षा त्याची तीव्रता कमी असल्या-मुळे सुरूवातीस काही काळ केवळ सौम्य ताप, अस्वस्थता, रात्री घाम येणे यांसारखी सामान्य स्वरूपाची लक्षणे निर्माण होत राहतात. त्यानंतर गुडघे, श्रोणीचे मांडीला जोडणारे सांधे, पाठीचा कणा यांसारख्या अधिक भार पडणाऱ्या सांध्यांमध्ये सौम्य वेदना जाणवतात. जोराचा दाब दिल्यास काही सांध्यांत, विशेषत: मणक्यांच्या टोकांमध्ये दुखू लागते. कालांतराने सांधे सुजतात आणि नजीकच्या हाडांमध्येही शोथ प्रक्रिया पसरते. दीर्घकाळ उपचारा- शिवाय घालविल्यास मणक्यांचा मुख्य भाग ठिसूळ होऊन कोलमडतो आणि तंत्रिकांवर (मज्जापेशींवर) दाब पडून अन्य लक्षणे निर्माण होतात.

या विकाराचे निदान क्ष-किरण चित्रणाने होते. सांध्यानजिकच्या हाडात कधीकधी क्षयरोगाचा प्रारंभ आढळतो. हाडे विरळ होऊन सांध्यातील मोकळी जागा शोथजन्य द्रवाने व्यापलेली दिसते. सूक्ष्मजैविक परीक्षणात या द्रवात क्षयाचे जंतू आढळतात. कूर्चा नष्ट झालेली आढळते.

या विकाराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे सांध्याजवळ निर्माण झालेला पूयुक्त द्रव स्नायूंची आवरणे किंवा आसपासचे सैल संयोजी ऊतक यांतून पसरत बरेच अंतर पार करू शकतो. मुख्य जागेपासून काही अंतरावर तो त्वचेखाली येऊन पोहोचू शकतो. त्याला शीत विद्रधी म्हणतात क्ष-किरण चित्रात त्याची छाया ओळखता येते. ट्युबरक्युलिन चाचणी किंवा माँटू चाचणी होकारात्मक निष्कर्ष देत असल्याने या क्षयाच्या निदानास मदत होते. या चाचणीचा किंवा क्षयरोग जंतूंसंबंधी अहवाल संदेहजनक असल्यास संधि-कलेची ऊतकपरीक्षा निदानासाठी आवश्यक ठरते. तसेच क्षयरोगावरील औषधांच्या वापरामुळे संधिशोथात सुधारणा होत असल्यास तेही एक निदानाचे साधन म्हणून विचारात घेता येते.

फुप्फुसांच्या क्षयरोगाप्रमाणेच संधिशोथासाठी दीर्घ काळ औषधोपचार करावे लागतात. तसेच साचलेला द्रव काढण्यासाठी, विद्रधी पूर्णपणे मोकळा करण्यासाठी किंवा नष्ट झालेल्या कूर्चांवर हाडांच्या जागी आधार देण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक ठरू शकते. अशा शस्त्रक्रियांमध्ये काढलेल्या द्रवातील क्षयाच्या सूक्ष्मजंतूंची चाचणी करून योग्य अशा प्रतिजैविक औषधांची निवड करता येते. कारण क्षयरोगाच्या जंतूंमध्ये औषधांना प्रतिरोध करण्याची क्षमता विकसित होणे हा सर्व प्रकारच्या क्षयरोगांच्या उपचारातील एक मोठा अडसर असतो.

पहा : गाऊट बालरोगविज्ञान संधिवात.

संदर्भ : 1. Lahita, R. G., Ed., Systemic Lupus Erythematosus, 1992.

2. McCarty, D. J. Arthritis and Allied Conditions: A Textbook of Rheumatology, 1993.

3. Soren, A. Arthritis and Related Affectations: Clinic, Pathology and Treatment, 1993.

4. Stollerman, G. H. Rheumatic Fever and Streptococal Infection, 1975.

श्रोत्री, दि. शं.