सौंदाला (लॅक्टॅरियस लॅक्टॅरियस)सौंदाला : या माशाचा समावेश लॅक्टॅरिडी कुलात होतो. याचे शास्त्रीय नाव लॅक्टॅरियस लॅक्टॅरियस (लॅ. डेलिकॅट्युलस) असे आहे. याचा प्रसार अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, मलाया द्वीपसमूह व चीन येथे आहे. याची लांबी २५ सेंमी.पर्यंत असते. शरीराचा रंग पाठीवर पार्श्वरेषेपर्यंत शिशासारखा असतो. प्रच्छदाच्या वरच्या व मागच्या भागावर एक काळा ठिपका असतो. पाठीवरील पराचा पहिला काटा कमकुवत असतो, तिसरा काटा सर्वांत लांब असून पटलाला खोलवर खाचा असतात. पाठीवरील दुसऱ्या पराची (हालचाल व तोल सांभाळण्यास उपयुक्त अशा स्नायुमय घडीची) पुढची बाजू सर्वाधिक उंच असते. पार्श्वभागावरील परही दुसऱ्या परासारखा असतो. तोंड मोठे व तिरपे असते. वरच्या जबड्यात दोन्ही बाजूंना सुळ्यांची जोडी असते.

सौंदाल्याचे थवे किनाऱ्यालगतच्या पाण्यात येतात. त्याला थोडेसे खारे व संथ पाणी चालते. तो कोळंबी, सार्डिन व इतर लहान मासे यांवर आपली उपजीविका करतो. विक्रीयोग्य माशाची लांबी १३-२५ सेंमी. असते व तो वर्षभर नेहमी उपलब्ध असतो. मात्र जून-डिसेंबर या काळात तो मोठ्या प्रमाणात सापडतो. फेब्रुवारी-मार्च या दरम्यान त्याचे समूह मलबार किनाऱ्यावर येतात. पूर्व किनाऱ्यावरील मच्छिमारी केंद्रावर पकडलेल्या एकूण मासळीत याचा तीन चतुर्थांश हिस्सा असतो असे १९५१ मध्ये केलेल्या पहाणीत आढळून आले होते. १९८० मध्ये ७,४०८ टन सौंदाला मासे पकडले, तर १९८०-८१ मध्ये महाराष्ट्रात ते १,६५३ टन पकडले होते. एकूण उपलब्ध आकडेवारीवरून सौंदाला माशाचे मत्स्य-व्यवसायातील आर्थिक महत्त्व लक्षात येते. ताजा मासा लोक खातात व तो आजारी माणसासाठी पचनास हलका समजला जातो. मुबलक उत्पादनामुळे तो मोठ्या प्रमाणावर खारविला जातो.

जमदाडे, ज. वि.

सौंदाला (लॅक्टॅरियस लॅक्टॅरियस)