फायरस्टोन, हार्वी सॅम्युएल : (२० डिसेंबर १८६८-७ फेब्रुवारी १९३८). अमेरिकन उद्योगपती, रबर उत्पादक व विशिष्ट प्रकारच्या वायवीय टायरचे संशोधक. त्यांचा जन्म व पदवीपर्यंतचे शिक्षण कोलंबियाना (ओहायओ, अमेरिका) येथे झाले. तद्‍नंतर क्लीव्हलँड येथे त्यांनी व्यापारविषयक शिक्षण घेतले. काही काळ त्यांनी एका बग्गी कंपनीत विक्रेत्याची नोकरी केली. १८९५ साली त्यांनी हेन्‍री फोर्ड यांच्या घोडाविरहित गाडीकरिता वेगळ्या प्रकारचा भरीव रबरी टायर तयार केला. १८९६ साली फायरस्टोन यांनी शिकागो येथे टायर निर्मितीचा कारखाना सुरू केला परंतु तीन वर्षानी त्यांनी तो विकून टाकला. १९०० साली त्यांनी ओहायओमधील ॲक्रन येथे ‘फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ची स्थापना केली. १९०३-३२ या काळात ते या कंपनीचे अध्यक्ष आणि तद्‍नंतर मृत्यूपावतो तिच्या संचालक मंडळाचे चेअरमन होते.

हार्वी सॅम्युएल फायरस्टोनपूर्वीच्या टायरांना कंगोरे असल्याने ते चाकावर बसविणे अवघड होत असे. फायरस्टोन यांनी चाकावर सहज बसविता येईल असा कंगोरे नसलेला सरळ कडांचा टायर शोधून काढला. त्यांनी टायराच्या आतील बाजूने कापडाऐवजी दोऱ्यांचे अस्तर वापरण्यास सुरूवात केल्याने टायर जास्त दिवस टिकू लागला. टायरच्या जमिनीवरील घर्षणाने उष्णता निर्माण होऊन तिचा या दोऱ्यांवर अनिष्ट परिणाम होई. म्हणून त्यांनी दोरी डिंकात बुडवून तिचा उष्णतारोघ वाढविला. यांशिवाय मालवाहू मोटारगाडीच्या चाकाची अलग करता येईल अशी पाळ व टायर, न घसरणारी पायसर[→ टायर-२ ] वगैरे सुधारणाही त्यांनी केल्या. १९२२ मध्ये त्यांनी ‘बलून टायर’ तयार केला. हा टायर रूंद असून त्यातील हवेचा दाब कमी असतो. १९३२ साली त्यांनी हेच तत्त्व ट्रॅक्टरच्या व इतर शेती अवजारांच्या टायरांमध्ये वापरले.

टायरांच्या किंमती कमी राहाव्यात म्हणून चाकाची पाळ, टायरनिर्मितीची यंत्रे व रबर यांच्या उत्पादकांच्या मक्तेदारीविरूद्ध त्यांनी मोहिमा उभारून त्या यशस्वी केल्या. उदा., कच्च्या रबराचा पुरवठा निश्चितपणे व्हावा म्हणून त्यांनी १९२४ सालापासूनच प्रयत्न सुरू केले व १९२६ साली त्यांनी लायबीरियामध्ये (प. आफ्रिका) सु. ४ लाख हेक्टर जमीन दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने घेऊन तेथे रबराची लागवड केली. तसेच द. अमेरिका व फिलिपीन्स येथेही रबराची लागवड केली. फायरस्टोन कंपनीच्या शाखांमध्ये टायरांशिवाय रबराच्या इतर वस्तू, पोलादी वस्तू, कापड, स्पंजी रबर व यंत्रातील रबरी भाग यांची निर्मिती होते. तसेच प्लॅस्टिक व कृत्रिम रबर यांविषयी संशोधनही केले जाते. या कंपनीचे इतर सहा देशांत कारखाने आहेत. सॅम्यूएल क्राउदर व फायरस्टोन यांनी मिळून मेन अँड रबर (१९२६) हे पुस्तक लिहिले आहे. फायरस्टोन हे मिआमी बीच (फ्लॉरिडा) येथे मरण पावले.

भोईटे, प्र. वा.