अमोनिया: रासायनिक संयुग. सूत्र NH3 रंगहीन, तिखट वास असणारा वायू. याच्या संयुगांची माहिती मानवाला प्राचीन कालापासून आहे. ख्रि.पू. ४ थ्या शतकात ईजिप्तमधील लोक उंटाची लीद जाळल्यावर जी काजळी जमते तिच्यापासून अमोनियम क्लोराइड (नवसागर) बनवीत. ते बनविण्याची जागा ज्यूपिटर अमोनच्या देवळाजवळ असे. म्हणून त्या लवणाला ‘साल अमोनियाक’ म्हणजे ‘सॉल्ट ऑफ अमोन’ असे म्हणत. इ.स.पू. काळात अमोनियम क्लोराइड बाजारात विक्रीला येत असे. ते उंटाच्या लिदीसारखे पदार्थ किंवा मूत्र व मीठ एकत्र तापवून तयार केलेले असे. प्राचीन भारतातही शेणखत भाजून किंवा विटांच्या भट्ट्यांच्या जागेतून ते मिळवीत असत. मध्ययुगात शिंगे, खूर इत्यादींचे ऊर्ध्वपातन करून अमोनियाचा जलीय विद्राव (पाण्यात अमोनिया विरघळवून तयार होणारा द्रव) मिळविण्यात आला होता. त्या विद्रावाला त्या कालातील किमयागार लोक ‘स्पिरिट्स ऑफ हार्टशॉर्न’ असे म्हणत. १७७४ साली प्रीस्टली यांनी नवसागर व चुनकळी यांचे ऊर्ध्वपातन करून वायुरूप अमोनिया मिळवीपर्यंत, अमोनिया हे स्वतंत्र संयुग आहे हे कोणाला माहीत नव्हते. प्रीस्टली यांनी त्याला ‘अल्कलाइन एअर’ असे नाव दिले होते. १७८५ साली अमोनियाचे विजेच्या ठिणगीने अपघटन (लहान घटकांत रूपांतर) करून त्याचे रासायनिक संघटन NH3 आहे असे बर्थेलॉट यांनी सिद्ध केले. निसर्गातील जवळजवळ सर्व जागी लेशमात्र तरी अमोनिया किंवा त्याची संयुगे आढळतात. वातावरणात व पावसाच्या पाण्यात त्याचे कार्बोनेट असते. प्राण्यांचे व वनस्पतींचे नायट्रोजनयुक्त घटक कुजत असताना अमोनिया तयार होतो. बरेच ह्यूमस (मातीतील अपघटित जैव पदार्थ) असलेल्या शेतमातीत, समुद्राच्या पाण्यात, वनस्पतिज रसात, प्राण्यांच्या मूत्रांत व ज्वालामुखीपासून बाहेर पडणाऱ्‍या वायूतही तो आढळतो.

गुणधर्म: हवेपेक्षा हलका, गोठणबिंदू -७८ से., क्कथनबिंदू (उकळबिंदू) -३३से., क्रांतिक तापमान (जास्तीत जास्त दाब असता वायूचे द्रवात रूपांतर होण्याचे तापमान) १३३ से. सामान्य तापमानात दाब देऊन त्याला सहज द्रवरूप करता येते. पाण्यात अतिशय विद्राव्य. सामान्य दाब व २० से. तापमान असताना पाण्याच्या भाराच्या ३३.१% इतक्या प्रमाणात तो विरघळतो. तो पाण्यात विरघळताना बरीच उष्णता निर्माण होते. हवेत तो सहज जळत नाही पण ऑक्सिजनात वेगाने जळतो. त्याची ज्योत पिवळसर असते. हवेची व त्याची काही प्रमाणातील मिश्रणे स्फोटक असतात. सामान्य तापमानात हा स्थिर असतो पण उच्च तापमानात त्याचे अपघटन होऊ लागते व घटक-मूलद्रव्ये मुक्त होऊ लागतात. ज्या पृष्ठाशी वायूचा संपर्क येतो त्या पृष्ठाच्या स्वरूपावर अपघटनाचा वेग अवलंबून असतो. यावर काचेचा काही परिणाम होत नाही परंतु चिनी माती किंवा ⇨पमीस दगड यांच्या संपर्काने अपघटन वाढते. लोह, निकेल, जस्त इत्यादींशी संपर्क होण्याने अपघटनाचा वेग खूपच वाढतो.

विक्रिया: (१) अमोनिया व ऑक्सिजन यांच्या विक्रिया होऊन मुख्यतः नायट्रोजन व पाणी ही तयार होतात.

(२) कॉपर ऑक्साइडासारखी कित्येक ऑक्साइडे तापवून त्यांच्यावरून वायुरूप अमोनिया जाऊ दिला असता विक्रिया होऊन अमोनियापासून नायट्रोजन व पाणी ही तयार होतात. ही विक्रिया उच्च तापमानात होते. पोटॅशियम परमँगॅनेटासारख्या प्रबल ऑक्सिडीकारक (ऑक्सिडीकरण होण्यास मदत करणाऱ्‍या) संयुगांची तशीच विक्रिया सामान्य तापमानात होते.

(३) अमोनियाची व क्लोरिनाची विक्रिया दोन प्रकारे होते : (अ) अमोनिया अतिरिक्त (वाजवीपेक्षा जास्त) असेल तर नायट्रोजन विभक्त होतो. (आ) क्लोरीन अतिरिक्त असेल तर नायट्रोजन ट्रायक्लोराइड (NCl3)तयार होते. ते पिवळ्या रंगाचे तेल असून अतिशय स्फोटक असते.

(४) अमोनिया क्षारकीय असून अम्‍लाशी विक्रिया होऊन त्याची लवणे तयार होतात. उदा., सल्फ्यूरिक अम्‍लाशी विक्रिया होऊन अमोनियम सल्फेट (NH4)2 SO4 व हायड्रोक्लोरिक अम्‍लाशी विक्रिया होऊन अमोनियम क्लोराइड (NH4Cl) तयार होते.

(५) तापलेल्या धन विद्युत् भारित धातूशी अमोनियाची विक्रिया होऊन सोडामाइड (NaNH2) मॅग्‍नेशियम नायट्राइड (Mg3N2) यांसारखी संयुगे तयार होतात :

(६) काही धातूंची लवणे अमोनिया शोषून घेतात व त्यांची धन अमाइने होतात. उदा., CaC12·8NH3 ही तापविल्यावर त्यांच्यातील अमोनिया निघून जातो.

(७) अमोनियम हायड्रॉक्साइड NH4OH हे अमेनियाचा पाण्यातील विद्राव असते व तो विद्राव क्षारीय असतो. त्याचे कारण असे की, अमोनिया पाण्यात नुसता विरघळतो असे नसून त्याची पाण्याशी विक्रिया होऊन जे अमोनियम हायड्रॉक्साइड तयार होते त्याचे विगमन (उदासीन संयुग पाण्यात विरघळले असता दोन अणू होणे,  विद्युत् रसायनशास्त्र) होऊन त्या विद्रावात तयार झालेल्या H+ आयनापेक्षा OH ची संख्या बरीच अधिक असते. अमोनियम हायड्रॉक्साइड दुर्बल क्षार (अल्कली) असते व अम्‍लांचे उदासिनी करण करून त्याची NH+4 आयन असलेली लवणे तयार होतात. उदा.,

(८) दहा टक्के अमोनिया असलेले हवा व अमोनिया यांचे मिश्रण तापविलेल्या प्लॅटिनमासारख्या

संश्लेषणाने अमोनिया तयार करण्याच्या कृतीचे प्रक्रम-चित्र. (१) हायड्रोजन, (२) कार्बन डाय-क्साइडविरहित हवा, (३) ज्वालक, (४) संघनक, (५) नायट्रोजन व हायड्रोजन या वायूंचे १ : ३ प्रमाणातील मिश्रण, (६) प्राथमिक संपीडक, (७, ८ व ९) विविध विशोधक, (१०) प्रशीतकी अमोनिया-संघनक, (११)प्रशीतकी संपीडक, (१२) अमोनिया-संघनक, (१३) अमोनिया-संग्राहक, (१४ व १९) द्रव अमोनिया संग्राहक, (१५ व २०) द्रव अमोनिया बाहेर काढण्याचे स्थान, (१६) उत्प्रेरक, (१७) उष्णता-विनिमयक, (१८) शीतक, (२१)अभिसारी संपीडक.

उत्प्रेरकावरून (विक्रियेत भाग न घेता तिची गती वाढविणाऱ्या पदार्थावरून) पाठविल्यास नायट्रिक ऑक्साइड (NO) मिळते व त्याच्यापासून नायट्रिक अम्‍ल बनविण्यात येते [⟶नायट्रिक अम्‍ल].

(९) कार्बनी रसायनशास्त्रातील ॲमोनोविच्छेदनासाठी (अमोनियाचा उपयोग करून विच्छेदन करण्यासाठी) अमोनियाचा पुष्कळ उपयोग करतात. ॲमोनोविच्छेदनाचे स्वरूप पुढील समीकरणात दाखविलेल्या विक्रेयेवरून कळून येईल :

R.COCl + HNH2R.CONH2 + HClसूत्रातील R हा एखादा कार्बनी मूलक (विक्रियांमध्ये तसाच राहणारा पण सामान्यतः वेगळे अस्तित्व नसणारा अणूंचा गट) असतो. ॲमोनोविच्छेदनामुळे अमोनियातील NH2 हा गट –Cl, –OH, –SO3H इ. गटांची जागा घेतो. उदा.,

C6H5Cl+ 2NH3 g C6H5NH2 + NH4Cl. संश्लेषणाने (घटक  अणू एकत्र आणून कृत्रिम रीतीने संयुग बनविण्याने) कार्बनी संयुगे बनविण्यासाठी अमोनियाचा पुष्कळ उपयोग होतो. उदा., त्याच्या विक्रियेने अल्किल हॅलाइडांपासून अल्किल अमाइने तयार करता येतात.

पाणी व अमोनिया यांच्या गुणधर्मांत पुष्कळसे साम्य आहे. पाण्याप्रमाणेच द्रव्यरूप अमोनियाचा उपयोग विद्रावक (विरघळविणारा पदार्थ) म्हणून होतो. त्याच्यात पुष्कळ कार्बनी व अकार्बनी संयुगे विरघळतात. कित्येक ऑक्सिजनयुक्त संयुगे पाण्याची अनुजात (एका संयुगापासून तयार केलेली दुसरी संयुगे) आहेत, असे मानून त्यांच्या रासायनिक विक्रियांचे स्पष्टीकरण होते. त्याचप्रमाणे कित्येक नायट्रोजनयुक्त अकार्बनी व कार्बनी संयुगे ही अमोनियाची अनुजात आहेत असे मानून विक्रियांचा खुलासा होतो. पाण्याचे व अमोनियाचे सादृश्य खाली दिलेल्या संयुगांवरून कळून येईल :

कृती: (१) प्रयोगशाळेत किंवा अल्प प्रमाणात अमोनिया तयार करण्यासाठी (अ) अमोनियाचे कोणतेही लवण व एखादा क्षार एकत्र तापवून. उदा.,

निघणारा वायू चुनकळीतून जाऊ देऊन कोरडा केला जातो. (आ) सापेक्षतः अधिक घनविद्युत् धातूंच्या नायट्राइडांचे पाण्याने अपघटन करून. उदा.,

(२) औद्योगिक उत्पादन: दगडी कोळशापासून कोक तयार करण्याच्या पद्धतीत अमोनिया हा उपपदार्थ म्हणून मिळतो. उद्योगधंद्यात वापरल्या जाणाऱ्‍या अमोनियापैकी अशा अमोनियाच्या उत्पादनाचे प्रमाण अल्प भरते.

म्हणून संश्लेषणाने अमोनिया तयार करण्याच्या पद्धती वापरल्या जातात. अनुकूल असे तापमान व दाब असताना व उत्प्रेरकाच्या सान्निध्यात हायड्रोजन व नायट्रोजन यांचा संयोग होऊन अमोनिया तयार होतो, असा शोध हाबर यांनी लावला. म्हणून या पद्धतीला ‘हाबर-पद्धती’ म्हणतात. तिच्यात बॉश यांनी केलेल्या सुधारणांमुळे अमोनियाचे किफायतशीर व्यापारी उत्पादन शक्य झाले. नायट्रोजन व हायड्रोजन या वायूंचे एकास तीन या प्रमाणात मिश्रण करणे, ते मिश्रण शुद्ध करणे व उचित अशा उत्प्रेरकाच्या सान्निध्यात व तापमानात त्या मिश्रणावर दाब देणे, हे संश्लेषणाने अमोनिया तयार करण्याच्या पद्धतीचे सार आहे. मूळच्या हाबर यांच्या पद्धतीच्या तपशिलात, उदा., वायू मिळविण्याच्या पद्धती, त्याचे मिश्रण शुद्ध करणाऱ्या पद्धती, उत्प्रेरकाच्या प्रकारात तसेच किती तापमान व दाब वापरावयाचा या बाबतींत, अनेक सुधारणा घडून आलेल्या आहेत व या बाबतीत निरनिराळे प्रकार आढळतात. बऱ्याच वेळा ५०० ते ६०० से. तापमानात व २०० ते १,००० वातावरण दाबाखाली(१ वातावरण = ७६० मिमी. पाऱ्‍याच्या स्तंभाचा दाब) संश्लेषण केले जाते. लोह व लोहाची किंवा इतर धातूंची ऑक्साइडे ही उत्प्रेरक म्हणून वापरली जातात.

संश्लेषणाने अमोनिया तयार करण्यासाठी लागणारे हायड्रोजन व नायट्रोजन हे वायू पुढे दिल्याप्रमाणे मिळविले जातात :

(अ) जळताना तापून पांढऱ्‍या झालेल्या कोकच्या निखाऱ्‍याच्या थरातून वाफ जाईल असे केल्यावर C+H2O⟶CO+H2 अशी विक्रिया होते व ⇨पाणवायू (वॉटर गॅस) तयार होतो.

(आ) तशाच कोकच्या थरातून हवा जाऊ दिल्यावर कोकातील कार्बनाची व हवेची 2C+O2+4N2⟶2CO+4N2 अशी विक्रिया होऊन ⇨ ‘प्रोड्यूसर वायू  तयार होतो.

वरील दोन्ही विक्रिया एकत्र घडवून आणल्यास अर्ध-पाणवायू (सेमीवॉटर गॅस) मिळतो. त्याच्यात सु. ५०% नायट्रोजन, २०% हायड्रोजन व ३०% कार्बन मोनॉक्साइड असतो.

(इ) तप्त उत्प्रेरकावरून वाफ, कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजन यांचे मिश्रण जाऊ दिल्यावर

CO+H2+H2O⟶CO2+2H2 अशी विक्रिया होऊन कार्बन डाय-ऑक्साइड व हायड्रोजन यांचे मिश्रण मिळते. या विक्रियेला ‘बॉश-विक्रिया’ म्हणतात.

वरील विक्रियांनी तयार झालेल्या वायूंच्या मिश्रणातील हायड्रोजन व नायट्रोजन हे वायू आवश्यक तर अलग करून त्यांचा उपयोग केला जातो.

अधिक आधुनिक पद्धतीत द्रवीभूत केलेल्या हवेचे अंशात्मक ऊर्ध्वपातन [⟶ ऊर्ध्वपातन] करून नायट्रोजन मिळविला जातो. तसेच खनिज तेलातील वायूंचा किंवा नैसर्गिक वायूचा (निसर्गात आढळणारा इंधन वायू,⟶ नैसर्गिक वायु) उपयोग हायड्रोजन मिळविण्यासाठी केला जातो. सामान्यतः त्या वायूचा मुख्य घटक मिथेन (CH4) हा असतो. मिथेन, वाफ व थोडा शुद्ध ऑक्सिजन यांचे मिश्रण ६०० से. तापमानात निकेल उत्प्रेरकाजवळ जाऊ दिल्यावर हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साइड CO ही मिळतात. ते मिश्रण ४५० से. तापमानात उत्प्रेरकावरून जाऊ दिल्यावर (वर दिलेल्या बॉश-पद्धतीस अनुसरून) आणखी हायड्रोजन तयार होतो.

अमोनिया साठवणे व हाताळणे: मोठ्या उद्योगधंद्यांत जलहीन अमोनिया वापरणे सोयीस्कर व काटकसरीचे असते व तो खास तयार केलेल्या पोलादाच्या किंवा निष्कलंक पोलादाच्या सिलिंडरांत, टाक्यांत किंवा ‘हॉर्टोनोस्फीअर’ नावाच्या गोलाकार टाक्यांत साठविला जातो. अशा पात्रांतील जलहीन अमोनिया सामान्यतः २·८ कि.ग्रॅ./सेंमी. इतक्या दाबाखाली असतो. अशा दाबाखाली त्याचा क्वथनबिंदू ३·९ सें. असतो त्यामुळे पात्र तापून त्याचे बाष्पीभवन होणे शक्य असते. ते टाळण्यासाठी अमोनिया साठविण्याच्या पात्रांत विशेष रचना केलेली असते किंवा ते थंड करण्याची व्यवस्था केलेली असते. अशा पात्रांतून अमोनिया जरूरीप्रमाणे काढून घेण्याचीही व्यवस्था केलेली असते. उत्पादनाच्या स्थानापासून उपयोगाच्या जागी वाहतूक होत असताना साठवण्याची पात्रे सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी लागते.

अमोनियाच्या वाफेच्या संपर्काने डोळ्यांना इजा होते व तो श्वासाबरोबर बऱ्‍याच प्रमाणात शिरल्यास गुदमरायला होते. म्हणून अमोनिया किंवा त्याचा विद्राव साठविलेली पात्रे काळजीपूर्वक व अंगावर त्याचा फवारा येणार नाही अशा रीतीने भरावी लागतात. मोठ्या प्रमाणात अमोनिया वापरला जात असेल अशा कारखान्यात अमोनियाची पात्रे हाताळणाऱ्‍यांना संरक्षक मुखवटे, हातमोजे व पोशाख वापरावे लागतात.

अमोनिया साठविण्याच्या किंवा वापरण्याच्या जागी त्याची पात्राबाहेर गळती होणार नाही, अशी काळजी घ्यावी लागते. अमोनिया पेट घेत नाही पण तो काही प्रमाणात हवेत शिरल्यावर त्याचे व हवेचे मिश्रण स्फोटक होते. असे मिश्रण होण्याचा संभव असलेल्या टाक्या व हौद काळजीपूर्वक वापरावे लागतात. कोणत्याही आकस्मिक कारणाने ठिणगी पडली तर मिश्रणाचा स्फोट होण्याचा संभव असतो. असे मिश्रण होण्याचा संभव असलेल्या दालनातील विजेचे स्विच, पंखे किंवा विजेच्या उपकरणांचे ठिणगी पडण्याचा संभव असलेले भाग संरक्षक आवरणाने झाकावे लागतात.

उपयोग: एकूण उत्पादनाच्या सु. ६५% अमोनिया खते तयार करण्यासाठी वापरला जातो व सु. ३०% औद्योगिक उत्पादनासाठी खर्च होतो. औद्योगिक संयुगांपैकी मुख्य म्हणजे स्फोटक पदार्थ बनविण्यासाठी. त्यांच्यापैकी बहुतेकांत नायट्रोजन असतो व तो अमोनियापासून मिळविला जातो. उदा., नायट्रोसेल्युलोज, डायनामाइट, दगडाच्या खाणकामात वापरावयाचे सुरुंग, तसेच सोडियम कार्बोनेट बनविण्यासाठी, क्युप्रा-अमोनियम, रेशीम, रंजक द्रव्ये (विविध प्रकारचे धागे रंगविण्यासाठी वापरण्यात येणारी द्रव्ये), औषधे, प्लॅस्टिक, नायलॉन, संश्लेषित रेझिने इ. बनविण्याच्या प्रक्रियांसाठी, यांशिवाय कापडावर संस्कार करण्यासाठी, रबर तयार करण्याच्या प्रक्रियांत लागणारी द्रव्ये करण्यासाठीही अमोनिया वापरला जातो. तो सहज विघटन पावत असल्यामुळे तप्त उत्प्रेरक वापरून हायड्रोजन मिळविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. धातूंचे वितळजोडकाम (वेल्डिंग) करण्यासाठी अशा हायड्रोजनांचा वापर केला जातो. औषधे तयार करण्यासाठीही त्याचा उपयोग करतात. शहरातील व औद्योगिक पाणीपुरवठा शुद्ध करण्यासाठी क्लोरिनाच्या बरोबर अमोनिया वापरला जातो. प्रकाशाचा उपयोग करून आरेखांच्या (आकृती, चित्रे इत्यादींच्या) प्रती काढण्यासाठी व छायाचित्रणाच्या प्रक्रियांत अमोनिया व त्याच्या अनुजातांचा उपयोग करतात.

सर्वसामान्य प्रयोगशाळांत व कित्येक लहानसहान उद्योगधंद्यांत अमोनिया हा त्याच्या जलीय विद्रावाच्या स्वरूपात वापरला जातो. त्याच्या तीव्र विद्रावाची घनता ०·८८० ग्रॅ./मिलि. इतकी असते म्हणून त्याला ८८० अमोनिया म्हणतात. त्याच्यात भाराने ३५·२% अमोनिया असतो व विद्राव उकळून तो सर्व घालविता येतो. म्हणून सामान्य प्रयोगशाळांत अमोनिया मिळविण्यासाठी अशा विद्रावाचा उपयोग केला जातो. अमोनियाचा विद्राव काचेच्या लहान किंवा मोठ्या बाटल्यांत किंवा कार्‌बॉयांमध्ये (विशिष्ट काचपात्रांमध्ये) साठविला जातो.

अमोनियाची लवणे : अम्‍लांची अमोनियाशी किंवा त्याच्या पाण्याची विद्रावाशी विक्रिया होण्याने अमोनियाची लवणे तयार होतात. त्याच्यात NH4+ हा रंगहीन आयन (विद्युत् भारित मूलक) असतो. त्यामुळे अमोनियाची लवणे सामान्यतः रंगहीन असतात. त्यांच्यातील धनायन (ऋण विद्युत् भारित आयन) रंगीत असला तर मात्र ती रंगीत असतात. उदा., नारिंगी रंगाचे अमोनियम डायक्रोमेट [(NH4)2Cr2O7] अमोनियाची बहुतेक सर्व लवणे पाण्यात विरघळतात व ती तीव्र जलीयविच्छेद्य (पाण्याची भर घातली असता दोन विभाग होणारी) असतात. तीव्र अम्‍लांपासून तयार झालेल्या लवणांचे पाण्यातील विद्रावात जलीयविच्छेदन होत असल्यामुळे ते विद्राव अम्‍लीय असतात. अमोनियाच्या लवणांची विद्राव्यता एकंदरीत क्षारांच्या (अल्कलींच्या) लवणांसारखी, विशेषतः सोडियमाच्या लवणासारखी, असते व क्षारांच्या लवणांच्या मानाने ती पुष्कळच बाष्पनशील असतात व बाष्पीभवनात त्यांचे कमी-अधिक अपघटन होते. उदा., NH4Cl⇌NH3+HCl क्षारांबरोबर तापविल्यावर त्या लवणांतील अमोनिया मुक्त होतो.

(१)अमोनियम ॲसिटेट: NH4.C2H3O2. पांढरे स्फटिकमय आर्द्रशोषकता (पाणी शोषून घेणारे) पाण्यात सहज विरघळते कापड रंगविण्यासाठी तसेच औषधांत कफ सुटण्यासाठी, घाम येण्यासाठी व लघवी होण्यासाठी सौम्य द्रव्य म्हणून याचा उपयोग होतो.

(२)अमोनियम कार्बोनेट : (NH4)2CO3. अमोनियम सल्फेट व कॅल्शियम कार्बोनेट यांचे मिश्रण तापवून किंवा एखाद्या शिशाच्या भांड्यातून अमोनिया, कार्बन डाय-ऑक्साइड व वाफ यांचे मिश्रण जाईल असे करून हे लवण तयार केले जाते. त्याचे स्फटिक रंगहीन व पारभासी (अंशतः प्रकाश जाऊ देणारे) असतात. पाण्यात विद्राव्य, चव अमोनियासारखी, तिखट वास अमोनियासारखा येतो. उघड्या जागेत राहिल्यावर त्याचे अपघटन होऊन अमोनियम बायकार्बोनेट NH4HCO3 तयार होते. बाजारी अमोनियम कार्बोनेटात बायकार्बोनेट कमी-अधिक प्रमाणात असते. हुंगण्याचे औषध म्हणूनही किंवा कफ सुटण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बेकिंग पूड (भिजविलेल्या पिठात कार्बन डाय-ऑक्साइड वायू निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारी पूड) म्हणूनही त्याचा उपयोग करतात.

(३)अमोनियम क्लोराइड : NH4Cl. सामान्य नाव साल अमोनियाक मराठी ‘नवसागर’ स्फटिक सामान्यतः तंतूसारखे [⟶नवसागर].

(४)अमोनियम नायट्राइट : NH4NO2. पांढरे, स्फटिकमय पाण्यात सहज विरघळते तापविल्यावर त्याचे अपघटन होऊन नायट्रोजन व पाणी ही तयार होतात. सामान्य तापमानातही तसेच पण सावकाश अपघटन होते. शुद्ध नायट्रोजन तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

(५)अमोनियम नायट्रेट : NH4NO3. पांढरे, स्फटिकमय, आर्द्रताशोषक असल्यामुळे त्याचे कण चिकटून टणक गोळे किंवा ढेकळे (विशेषतः ओलसर हवेत) तयार होतात आणि काही परिस्थितींत ते स्फोटक असते. याचा उपयोग मुख्यतः खत म्हणून तसेच स्फोटक द्रव्ये, नायट्रस ऑक्साइड तयार करण्यासाठी व किण्वन (जैव पदार्थाचे अपघटन होण्याची प्रक्रिया, ⟶ किण्वन) करून सायट्रिक अम्‍ल तयार करण्यामध्ये होतो.

(६)अमोनियम फॉस्फेटे : यांचे मोनो अमोनियम फॉस्फेट, NH4H2PO4 डाय अमोनियम फॉस्फेट (NH4)2HPO4 व ट्राय अमोनियम फॉस्फेट (NH4)3PO4 असे तीन प्रकार असतात. त्यांपैकी ट्राय अमोनियम फॉस्फेट अस्थिर असून हवेत राहिल्यावर त्याच्यातील काही अमोनिया निघून जाऊन त्याचे डाय अमोनियम फॉस्फेट तयार होते. मोनो व डाय अमोनियम फॉस्फेटांचे स्फटिक किंवा त्यांची पूड पांढरी असते. ही दोन्ही फॉस्फेटे पाण्यात सहज विरघळतात. मोनो अमोनियम फॉस्फेटाचा विद्राव किंचित अम्‍लीय व डाय अमोनियम फॉस्फेटाचा विद्राव किंचित अम्‍लीय व डाय अमोनियम फॉस्फेटाचा किंचित क्षारीय असतो.

फॉस्फोरिक अम्‍ल ७५% असणाऱ्‍या विद्रावात अमोनियाची भर घालून मोनो अमोनियम फॉस्फेट व ३५% फॉस्फोरिक अम्‍ल असणाऱ्‍या विद्रावातून अमोनिया नेऊन डाय अमोनियम फॉस्फेट तयार केले जाते. खत म्हणून या फॉस्फेटांचा उपयोग केला जातो.

(७)अमोनियम सल्फेट : (NH4)2SO4. शुद्ध लवणाचे स्फटिक पांढरे, परंतु बाजारी प्रतीच्या मालाला त्याच्यातील मळामुळे किंचित तपकिरी रंग आलेला असतो वासहीन, पाण्यात विरघळते. विद्रावाची चव बरीच खारट. हे स्थिर राहत असून त्याचा द्रवांक (वितळबिंदू) १४०से. आहे. अमोनियम सल्फेटाचे व्यापारी उत्पादन करण्याच्या दोन पद्धती आहेत : (अ) सल्फ्यूरिक अम्‍लाने अमोनियाचे ðउदासिनीकरण करून (आ) जिप्सम पद्धती. या पद्धतीत अमोनियाचे प्रथम अमोनियम कार्बोनेट केले जाते व ४०% अमोनियम कार्बोनेट असलेल्या जलीय विद्रावाची जिप्समाच्या, CaSO4.2H2O किंवा ॲनहायड्राइटाच्या, CaSO4, सूक्ष्मकणी-चूर्णाशी विक्रिया घडवून आणतात. या विक्रियेत CaCO3 अवक्षेपित (अविद्राव्य म्हणून तळाला जाते) होते व विद्राव गाळण्याने गाळून घेतल्यावर अमोनियम सल्फेटाचा विद्राव मिळतो. वाफेने तापविलेल्या व अंशतः निर्वात असलेल्या पात्रांमधून पाणी बाष्पीभवनाने काढून टाकून स्फटिकमय अमोनियम सल्फेट मिळवितात. अमोनियम सल्फेटाचा उपयोग मुख्यतः खत म्हणून होतो व नायट्रोजनयुक्त खतांपैकी याचा वापर सर्वांत जास्त प्रमाणात होतो [⟶खते].

(८) हायड्रॅझिने : NH2·NH2हायड्रॅझीन हायड्रेट NH2·NH2·H2O व हायड्रॅझीन सल्फेट NH2·NH2·H2SO4. अमोनियाच्या ऑक्सिडीकरणाने बनणारी ही संयुगे आजच्या रसायनशास्त्रात फार महत्त्वाची आहेत. अमोनियाच्या तीव्र विद्रावात सोडियम हायपोक्लोराइट व उत्प्रेरक म्हणून थोडे जिलेटीन (सरसासारखा पदार्थ) घालून उकळल्याने हायड्रॅझीन बनते. प्रथम त्याचे सल्फ्यूरिक अम्‍लाने सल्फेट बनवितात व मग पोटॅशियम हायड्रॉक्साइडाच्या क्रियेने व नंतर ऊर्ध्वपातन करून हायड्रॅझिने बनवितात.

रंगहीन, बाष्पनशील द्रव, द्रवांक १०४ से., क्वथनांक ११३.५ से., पाण्यात पूर्णपणे विद्राव्य. द्वि-अम्‍लिक (दोन OH गट असलेले) क्षारक. त्यामुळे दोन तऱ्हेची लवणे बनतात. कोरडा ऑक्सिजन, हॅलोजने, गंधकांचे ऑक्साइड, क्षारीय धातू वगैरेंशी ते फारच तीव्रतेने संयोग पावते. ऑक्सिजनमध्ये पेट घेते. याचा आजचा महत्त्वाचा उपयोग अग्निबाण (रॉकेट) व क्षेपण-अस्त्रे (फेकावयाची शस्त्रे) यांत इंधन म्हणून होतो. रासायनिक उद्योगात याचा वापर वाढत आहे. औषधोद्योगात ते बरेच वापरले जाते. हे तीव्र क्षपणकारक आहे व त्यामुळे त्या त्या लवणातून सोने, चांदी, प्लॅटिनम इ. अवक्षेपित करते.

संदर्भ : Thorpe, J. F. Whiteley, M. A. Thorpe’s Dictionary of Applied Chemistry, Vol. I, London, 1966.

कारेकर, अ. न.