डिंक : काही झाडांना असलेल्या किंवा पाडलेल्या खाचांतून एक प्रकारचा नि:स्राव होतो (द्रव पदार्थ बाहेर पडतो) व काही काळाने तो वाळून घट्ट बनतो. अशा पदार्थाला सामान्यतः आपण डिंक म्हणतो उदा., बाभळीचा डिंक. परंतु सर्व प्रकारच्या डिंकांचा यात अंतर्भाव होत नाही. कारण सर्व डिंक निःस्राव रूपाने मिळत नाहीत. कित्येक डिंक वनस्पतींच्या बिया, फळे, पाने यांपासून आणि काही डिंक प्राणिज पदार्थांपासून मिळतात. शिवाय काही इतर पदार्थांपासून रासायनिक विक्रियांनी बनविले जातात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन डिंकाची व्याख्या आधुनिक काळात पुढीलप्रमाणे केली जाते. जो पदार्थ कार्बनी विद्रावकात विरघळत नाही पण पाण्यात मिसळला असता विरघळतो अथवा फुगतो आणि त्यामुळे कलिलवृत्तीचा (सूक्ष्म परंतु रेणूंपेक्षा मोठे कण असलेल्या पदार्थांचे विशेष गुण असलेला) श्यान (दाट) विद्राव बनतो. त्याला डिंक असे म्हणावे. काही वनस्पतींच्या बिया. फळे इत्यादींपासून मिळाणाऱ्या डिंकांचा उल्लेख ‘श्लेष्म’ म्हणून केला जात असे, परंतु डिंक व श्लेष्म यांमध्ये रासायनिक दृष्टीने फरक नसल्यामुळे डिंक ही एकच संज्ञा दोन्हींकरिता आता वापरली जाते. अनेक डिंक चिकट असतात व वस्तू चिकटविण्यासाठी वापरले जातात, तथापि सर्वच डिंक चिकट असतात, असे मात्र नाही.

जे डिंक वनस्पतींपासून साध्या प्रक्रियांनी मिळतात त्यांना नैसर्गिक डिंक ही संज्ञा दिली जाते व जे रासायनिक द्रव्यांपासून रासायनिक विक्रियांनी बनविले जातात त्यांना कृत्रिम डिंक म्हणतात. मूलतः ज्यात डिंकांचे गुणधर्म नाहीत अशा सृष्ट पदार्थावर (उदा., स्टार्च, सेल्युलोज) काही रासायनिक विक्रिया करून जे बनविले जातात, त्या डिंकांचा उल्लेख रूपांतरित डिंक असा केला जातो. काही डिंक प्राणिज पदार्थांपासूनही मिळतात.

नैसर्गिक डिंक : यामध्ये (१) वनस्पतींच्या निःस्रावापासून मिळणारे उदा., अरेबिक, ट्रॅगकांथ, कराया, घाटी इ. डिंक (२) बियांपासून मिळणारे, उदा., लोकस्ट बीन, इसबगोल (सिलियम सीड), अळशी (लिनसीड) इ. (३) सागरी वनस्पतींपासून मिळणारे, उदा., आगर, आल्जिन (४) फळांपासून मिळणारे, उदा., पेक्टीन (५) प्राण्यांची कातडी, हाडे इत्यादींपासून मिळणारे, उदा., सरस व जिलेटीन.

रासायनिक दृष्ट्या वनस्पतिज डिंक हे अस्फटिकी व जटिल पॉलिसॅकॅराइडे [→ कार्बोहायड्रेटे] होत. कार्बोहायड्रेटामध्ये कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे जे परस्पर प्रमाण असते तेच त्यांमध्येही असते. डिंकांच्या रेणूमध्ये काही प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कित्येकदा इतर धातूही आढळतात. साधारणपणे असे दिसून येते की, विविध प्रकारच्या शर्करा व हेक्झुरोनिक अम्ले यांच्यापासून बनलेल्या जटिल कार्बनी संयुगांच्या रूपात डिंकांचे नैसर्गिक अस्तित्व असते. डिंकांना ठराविक वितळबिंदू किंवा उकळबिंदू नाहीत. त्यांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाचे तुकडे पडण्याची क्रिया) केल्यास मोनोसॅकॅराइडांचे मिश्रण मिळते. D- गॅलॅक्टोज व L-अरॅबिनोज ह्या शर्करा बहुतेक सर्व डिकांत संयुगांच्या रूपात असतात. डिंकांच्या रेणुरचनेत विविध गटांची (उदा., D-गॅलॅक्टोपायरॅनोज, L-अरॅबोफ्युरॅनोज, L- ऱ्हॅम्नोपायरॅनोज, D-ग्लुकोपायरोयुरोनिक अम्ल) यांची पुनरावृत्ती झालेली असते.

उत्पत्ती : डिंकांची उत्पत्ती निसर्गात कोणती कामगिरी बजावते याबद्दल एकमत नाही. काही शास्त्रज्ञांच्या मते झाडास जखम झाली असता, जखमी भागाचे संसर्गापासून संरक्षण व्हावे म्हणून झाडातून एक प्रकारचा निःस्राव होतो. काही शास्त्रज्ञ असे मानतात की, जखमी भागातील कोशिकांचा (पेशींचा) सूक्ष्मजंतू व कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) यांच्यामुळे ऱ्हास होतो व त्यामुळे डिंक तयार होतो. तथापि असे दिसून आले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत उदा., अती उष्ण किंवा अती कोरड्या हवामानात जखमी झाडापासून जास्त डिंक मिळतो. जखमी भागातील कोशिकांचा ऱ्हास होत असता, तर प्रतिकूल परिस्थितीत झाड जगले नसते किंवा त्याची वाढ नीट झाली नसती, पण तसे आढळत नाही. यावरून या मतास आधार नाही.

झाडातील द्रव्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून भेगांतून निःस्राव होतो व तो पृष्ठभागावर पसरून बाष्पीभवन नियंत्रित करतो, असे सर्वसाधारणपणे मानले जाते.

उत्पादन, अभिज्ञान व मूल्यमापन : झाडापासून जास्तीत जास्त डिंक मिळावा म्हणून झाडाला खाचा पाडण्यात येतात. खाचा पाडल्यावर काही ठाराविक दिवसांनी डिंक गोळा केला जातो. डिंक गोळा करण्याचे काम कोरड्या ऋतूत म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर ते जून या काळात करतात. खाचातून बाहेर पडलेला डिंक ओघळ किंवा लहान-मोठ्या गोळ्या, कपटे अथवा बहुकोनी तुडे यांच्या आकारात असतो. डिंक एकत्र जमविल्यावर तो मोठ्या शहरी असलेल्या व्यापारी केंद्रास पाठविला जातो. तेथे त्याची प्रतवारी लावतात. डिंक ज्या कामासाठी वापरावयाचा असेल त्याला अनुसरून त्याचे जाड अथवा बारीक चूर्ण करणे आवश्यक असते. म्हणून तो दळून, जाड बारीक चाळण्यांनी चाळून व कणांच्या आकारावरून त्यांच्या प्रती लावून त्यांना विविध नावे देण्यात येतात.

निरनिराळ्या ठिकाणांहून आलेल्या डिंकात भेसळ असण्याची शक्यता असते. म्हणून विविध उद्योगांत ते वापरण्याआधी त्यांचे मूल्यमापन करणे जरूरीचे असते. या कामी उपयोगी पडणारा एक गुण म्हणजे डिंकाची श्यानता (विद्राव रूपात असताना आढळणारा कमी अधिक घट्टपणा किंवा दाटपणा). निरनिराळ्या डिंकांच्या श्यानतेत फरक असतो व त्यावरून नमुना कोणत्या जातीच्या डिंकाचा आहे ते ठरविता येते. श्यानता मापनासाठी केशनलिकेसारखे सूक्ष्म छिद्र असलेल्या शोषनलिकेतून विशिष्ट घनफळाचा डिंकाचा विद्राव जाऊ देतात व त्यासाठी लागणारा वेळ मोजतात. त्याची तुलना प्रमाण मानलेल्या डिंकाच्या विद्रावास लागणाऱ्या वेळाबरोबर केली म्हणजे डिंकाची प्रत ठरविता येते. काही रासायनिक कसोट्याही यासाठी वापरतात. क्लोरोझिंक आयोडाइड, रुदेनियम रेड, टिंक्चर आयोडीन, सल्फ्यूरिक अम्ल, मिथिलीन ब्ल्यू. इ. विक्रियाकारकांबरोबर होणाऱ्या वर्णप्रक्रियेवरून डिंकाची जात ठरविता येते. उदा., रुदेनियम रेडमुळे कराया डिंकाचा रंग गुलाबी होतो, पण ट्रॅगकांथ डिंकाला निळा रंग येतो. डिंकातील आर्द्रता, त्याची अम्लता, पाण्यात विरघळणाऱ्या भागाचे प्रमाण, डिंकविद्रावाचा रंग, वास इ. गुणधर्मही यासाठी उपयोगी पडतात.

औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे नैसर्गिक डिंक : अरेबिक किंवा ॲकेशिया डिंक : हा सर्वांत प्राचीन व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा डिंक होय. याचा उल्लेख प्राचीन ईजिप्शियन वाङ्‌मयात वारंवार आढळतो. त्या वेळी तो कामी (KAMI) या नावाने ओळखला जाई. रंगकामात तो वापरीत. यास तुर्की डिंक, सेनेगल, कोर्डोफॅन इ. स्थानिक नावे आहेत.


लेग्युमिनोजी कुलातील ॲकेशिया वंशात मोडणाऱ्या झाडांपासून हा डिंक मिळतो. उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात विशेषत्वाने आढळणाऱ्या या झाडांच्या जवळजवळ ५०० जाती आहेत. उत्तम प्रतीच्या अरेबिक डिंकाचे उत्पादन मुख्यत्वे सूदान व प. आफ्रिकेतील प्रदेशात होते. ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका व भारत यांमध्ये होणारा डिंक कमी प्रतीचा असतो. भारतात तो बाभळीच्या (ॲकेशिया अरेबिका) झाडापासून मिळतो.

याच्या रासायनिक संरचनेचे निश्चित स्वरूप समजलेले नाही, तथापि तो जटिल कार्बनी अम्लांच्या सोडियम, पोटॅशियम व कॅल्शियम लवणांच्या स्वरूपात असतो, असे सिद्ध झाले आहे. याचा रेणुभार २,४०,००० ते ३,००,००० च्या दरम्यान असतो. खाद्यपदार्थ, औषधे वगैरेंच्या उत्पादनात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

ट्रॅगकांथ डिंक : लेग्युमिनोजी कुलातील ॲस्ट्रॅगलस वंशात सापडणाऱ्या विविध जातींच्या झाडापासून हा डिंक मिळतो. बासोरा, हॉग व सिरियन डिंक या नावांनीही हा ओळखला जातो. काटेरी झुडपासारख्या या झाडांच्या खाचांमधून होणारा निःस्राव वाळल्यावर पांढऱ्या किंवा पिवळसर कपट्यांच्या रूपात हा डिंक मिळतो.

इराण, तुर्कस्तान, इराक, रशिया, सिरिया व भारत या देशांतून त्याची निर्यात होते. इराणमधील डिंक उत्तम प्रतीचा असतो. 

याचीही रासायनिक संरचना निश्चित झालेली नाही, पण संशोधकांच्या मते यात दोन प्रमुख घटक असावेत. पाण्यात फुगणारा बासोरीन हा एक (प्रमाण ६०–७०%) व पाण्यात विरघळणारा ट्रॅगकांथीन हा दुसरा. ह्याखेरीज ह्यात प्रथिने, स्टार्च व सेल्युलोज थोड्या प्रमाणात आढळतात. याचा रेणुभार सु. ३,१०,००० आहे. पाण्यात फुगल्यावर त्यापासून मिळणाऱ्या श्यान, कलिलवृत्ती द्रवाची क्रिया संरक्षक कलिलाप्रमाणे (तापमानातील चढ-उतार, हालचाल इत्यादींचा अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून वापरलेल्या कलिलाप्रमाणे) होते. औषधी जेली, पायसे (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांची विशेष प्रकारची मिश्रणे), त्याचप्रमाणे लाकडी समान व फरशी यांसाठी लागणारी पॉलिशे, तसेच सौंदर्यप्रसाधने व जंतुनाशक पायसे बनविणे अशा विविध क्षेत्रांत ट्रॅगकांथ डिंक वापरतात.

कराया डिंक : बिक्सेसी कुलातील स्टर्क्युलिया वंशातील स्टर्क्युलिया यूरेंस जातीच्या झाडापासून हा डिंक मिळतो. ही झाडे भारतात मुबलक आढळतात व या प्रकारचा बहुतेक सर्व डिंक येथेच होतो. म्हणून यास इंडियन गम, भारतीय ट्रॅगकांथ, स्टर्क्युलिया डिंक किंवा कराया डिंक असेही म्हणतात. या झाडापासून पावसाळ्याखेरीज इतर सर्व ऋतूंत डिंक गोळा करता येतो, परंतु मार्च ते जूनमध्ये मिळणारा उत्तम प्रतीचा असतो. झाडाच्या बुंध्याला साधारण ०·६ मी. लांबीच्या ५-६ खाचा पाडतात किंवा छिद्रे पाडतात. बाहेर पडलेला निःस्राव झाडावरच वाळतो. उत्तम प्रतीची डिंक पांढरा व अर्धपारदर्शक असून कमी प्रतीचा पिवळ्या ते विटकरी रंगाचा असतो. याचा रेणुभार ९५,००,००० असून ह्यात L- ऱ्हॅम्नोज, D-गॅलॅक्टोज व D-गॅलॅक्ट्युरोनिक अम्ल अनुक्रमे ४ : ६ : ५ या प्रमाणात असतात. यात ट्रायमिथिल अमाइनही थोड्या प्रमाणात आढळून आले आहे. पाण्यात मिसळल्याने याचा कलिलवृत्ती विद्राव मिळतो. औषधे, कागद, कापड, खाद्यपदार्थ इ. विविध उद्योगांत याचा उपयोग केला जातो.

घाटी डिंक : हा डिंकही इंडियन गम म्हणून ओळखला जातो. काँब्रेटेसी कुलातील ॲनोजिसस वंशातील धावडा (ॲनोजिसस लॅटिफोलिया) या झाडापासून घाटी डिंक मिळतो. ही झाडे भारत व श्रीलंकेमध्ये आढळतात.

झाडांपासून हा कराया डिंकाप्रमाणेच मिळविण्यात येतो परंतु झाडावरून काढल्यावर हा उन्हात बरेच दिवस वाळवतात. डोंगराळ प्रदेशातील घाटातून हा डिंक मुंबईस व्यापारासाठी आणला जातो म्हणून त्यास ‘घाटी’ हे नाव पडले आहे. वाटोळ्या थेंबाच्या स्वरूपात मिळणारा हा डिंक फिकट विटकरी रंगापासून गडद विटकरी रंगापर्यंत अनेक रंग छटांचा आढळतो. फिकट रंगाचा डिंक चांगल्या प्रतीचा समजला जातो. घाटिक अम्लाच्या कॅल्शियम लवणाच्या स्वरूपात ह्या डिंकांची रासायनिक संरचना असावी. अम्लाच्या साहाय्याने जलीय विच्छेदन केल्यावर L- अरॅबिनोज, D-गॅलॅक्टोज व D- मॅनोज, D-झायलोज व D-ग्लुकोरॉनिक अम्ल हे घटक अनुक्रमे ५ : ३ : १ : ०·५ : १ ग्रॅमरेणुभार (ग्रॅममध्ये व्यक्त केलेला रेणुभार) या प्रमाणात मिळतात. या डिंकाचा सु. ९०% भाग पाण्यात विरघळतो. जलविद्राव्य भागाचा रेणुभार ११,८६० आहे. इतर डिंकांप्रमाणेच खाद्यपदार्थ व औषधे या उद्योगांत हा डिंक वापरतात. स्फोटक द्रव्यात जलाभेद्यता दायक (पृष्ठभागातून पाणी आत शिरू न देण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) म्हणूनही हा उपयोगात आणला जातो.

लोकस्ट बीन डिक : हा डिंक देणारे सेरॅटोनिया सिलीका [→ कॅरोब वृक्ष] हे झाड लेग्युमिनोजी कुलातील सीसॅल्पिनिऑइडी ह्या उपकुलातील होय. स्पेन, इटली, ग्रीस, अल्जीरिया, पोर्तुगाल, तुर्कस्तान ह्या ठिकाणी लोकस्ट बीन डिंक तयार होतो. ट्रॅगसोल, रुबी गम, लुपो गम, कॅरोब गम अशा इतरही काही नावांनी हा ओळखला जातो. झाडाच्या शेंगेमध्ये १०–१२, तांबड्या रंगाच्या बिया असतात. शेंगा वाळल्यावर त्यातील बियांवरील टरफले काढून टाकून त्या दळतात. दळलेली भुकटी पांढरी किंवा गुलाबी असते. हाच लोकस्ट बीन डिंक. गॅलॅक्टोमॅनन हे बहुवारिक (एकाच प्रकारचा अणुसमुच्चय पुनःपुन्हा जोडला जाऊन बनलेले जटिल संयुग) या डिंकात असते. ह्या बहुवारिकात चार D–मॅनोजाचे रेणू व प्रत्येक चौथ्या D–मॅनोजाच्या रेणूवर एक D–गॅलॅक्टोजाचा रेणू आढळतो. याचा रेणुभार ३,१०,००० आहे. यामध्ये काही प्रमाणात प्रथिन व इतरही अशुद्धी असल्याने हा डिंक पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. गार पाण्यात तो फुगतो व सु. ८२° से.ला तापविल्यावर त्याची श्यानता खूपच वाढते व थंड केल्यावर श्यानता पुन्हा वाढलेली आढळते. पटलरूप होण्याच्या याच्या गुणधर्मामुळे कापड उद्योगात अखेरचा लेप देण्यासाठी व खळ बनविण्यासाठी याचा फार उपयोग होतो. कागद उद्योगात कागदाची बळकटी वाढविण्यासाठी, छायाचित्रणाचा कागद, बेकरी पदार्थ, औषधे, खाद्यपदार्थ इ. विविध क्षेत्रांत लोकस्ट बीन डिंकाचा उपयोग केला जातो. 


गवार डिंक : लेग्युमिनोजी कुलातील स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा (गवार किंवा बावची) ह्या झाडाच्या बियांपासून गवार डिंक मिळवतात. हे झाड मूळचे भारतातले असून भारतात बहुतेक सर्व ठिकाणी याची लागवड होते [→ गवार]. ह्यात निरनिराळे प्रकार आढळतात. उत्तर भारतात सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या सुमारास कापणी करतात, तर काही ठिकाणी फेब्रुवारी मध्ये कापणी होते. विशिष्ट पद्धतीने दळून बियांच्या बाह्यावरणापासून त्यांचे पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) वेगळे करतात व दळून त्याची बारीक भुकटी करतात. तीच ‘गवार डिंक’ म्हणून विकण्यात येते. गवार डिंकाच्या जलविद्राव्य (पाण्यात विरघळणाऱ्या) भागात गॅलॅक्टोमॅनन हे संयुग आहे. त्यात ३४·५% D-गॅलॅक्टोज ॲनहायड्राइड व ६३·४% D- मॅनोज ॲनहायड्राइड असते. याचा रेणुभार २,२०,००० आहे. गवार डिंकाच्या भुकटीचे गार व गरम पाण्यात झालेले विसरण (सूक्ष्म पण रेणूपेक्षा मोठ्या कणांचे एखाद्या माध्यमात पसरणे) अत्यंत श्यान असते. कमी संहतीला (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी असताना) श्यानता जास्त असते. क्षार (अल्कली) किंवा तीव्र अम्ल यांमुळे श्यानता कमी होते. कागद उद्योगात गवार डिंकाचा उपयोग फार होतो. आइसक्रीम व बेकरी मिश्रणे यांत घनतादायक (घट्टपणा आणणारे) आणि स्थिरकारी (पदार्थाची मूळची स्थिती कायम ठेवणारा पदार्थ) म्हणून गवार डिंकाचा उपयोग करतात. पोस्टाच्या तिकिटांच्या मागील बाजूस लावण्यासाठी गवार डिंक वापरण्यात येतो. यांशिवाय औषधे, कीटकनाशके, सौंदर्यप्रसाधने व स्फोटक द्रव्ये यांत हा डिंक वापरतात.

चिंचोक्याचा डिंक : लेग्युमिनोजी कुलातील टॅमॅरिंडस इंडिका (चिंच) या झाडाच्या बिंयापासून हा डिंक तयार करतात. चिंचेची झाडे भारतात विपुल प्रमाणात आढळतात तसेच श्रीलंका, पाकिस्तान, ब्रह्मदेश, ईजिप्त, सूदान, मलेशिया, फॉर्मोसा इ. देशांतही ही झाडे आढळतात. चिंचोक्याचे बाह्य कवच काढून टाकल्यावर आतील भागाची भुकटी म्हणजेच चिंचोक्याचा डिंक (खळ) होय. प्रथम चिंचोके पाण्याने धुवून त्यांना चिकटून राहिलेला चिंचेचा गर काढून टाकतात. चिंचोक्यांची टरफले काढून टाकण्याच्या अनेक पद्धती आहेत. एका पद्धतीत चिंचोके भट्टीमध्ये वा वाळूत घालून सु. ६५° से. तापमानाला १०–१५ मिनिटे भाजतात. त्यामुळे टरफल ठिसूळ होऊन हलकेच ठोकले असता निघून येते. दुसऱ्या एका पद्धतीत टरफल काढून टाकण्यासाठी चिंचोके १०–२५% मिठाच्या पाण्यात १५ तास भिजत ठेवतात नंतर वितळलेल्या पॅराफिनामध्ये सु. ९३°से. तापमानाला २० सेकंद ठेवतात व शेवटी उकळत्या पाण्यात पाच मिनिटे ठेवतात. टरफल काढल्यावर आतील पांढऱ्या भागाची दळून पूड करतात. चिंचोक्याच्या डिंकात पॉलिसॅकॅराइडे, प्रथिने, वसा (स्निग्ध पदार्थ) व अकार्बनी लवणे, तसेच मुक्त शर्करा व टॅनिने हे घटक असतात. ह्यांतील पॉलिसॅकॅराइडांमध्ये D-झायलोज, D-गॅलॅक्टोज व D-ग्लुकोज यांचा समावेश असतो. भारतात हा डिंक कापसाच्या आणि तागाच्या कापडाला खळ म्हणून लावण्यासाठी वापरला जातो.

क्वीन्स बियांपासून मिळणारा डिंक : रोझेसी कुलातल्या सिडोनिया व्हल्गॅरिस किंवा सि. ऑब्लाँगा [→ बिही] ह्या झाडांपासून हा डिंक तयार करतात. जगातील बहुतेक उष्ण प्रदेशांत क्वीन्स झाडांची वाढ होते. सर्वांत जास्त क्वीन्स डिंक इराणमध्ये व त्या खालोखाल इराक, भारत, स्पेन व पोर्तुगाल येथे तयार होतो. झाडाची फळे वाळवून किंवा कुजवून त्यांतील अंडाकृती लालसर तपकिरी रंगाच्या बिया काढून त्यांपासून हा डिंक तयार करतात. गार पाण्यापेक्षा गरम पाण्यात हा डिंक जास्त विरघळतो. रासायनिक दृष्ट्या सेल्युलोज आणि जलीय विच्छेदन सुलभतेने होणारे पॉलिसॅकॅराइड ह्यांच्या जटिल संयोगापासून हा डिंक बनला असावा. विरल अम्लाने जलीय विच्छेदन केले असता त्यापासून सेल्यिलोज, L-अरॅबिनोज व अल्डोबाययूरोनिक अम्ल हे मिळतात. सौंदर्यप्रसाधनांत याचा फार उपयोग होतो तसेच खाद्यपदार्थ व औषधे यांतही हा वापरतात.

सिलियम बियांचा डिक : (इसबगोल डिंक). प्लँटॅजिनेसी कुलातील प्लँटॅगो वंशातील निरनिराळ्या झाडांपासून इसबगोल डिंक तयार होतो, उदा., भारतात प्लँटॅगो ओव्हॅटा [→ इसबगोल], फ्रान्समध्ये प्लँ. इंडिका, स्पेनमध्ये प्लँ. सिलियम. अमेरिकेतही प्लँ. ओव्हॅटाची लागवड होते. झाडांच्या बियांची टरफले पाण्यात उकळून हा डिंक तयार करतात. अम्लधर्मी पॉलिसॅकॅराइड व उदासीन पॉलिसॅकॅराइड यांचे मिश्रण ह्या डिंकात आढळून येते. या डिंकामध्ये D-झायलोज, L- अरॅबिनोज, L-ऱ्हॅम्नोज व D-गॅलॅक्ट्युरॉनिक अम्ल हे घटक सापडतात. झाडाच्या जातीप्रमाणे हे घटक बदलतात. आमांश, अतिसार अशा रोगांवर मुख्यत्वे इसबगोल डिंकाचा इलाज करतात.

लिनसीड डिंक : (अळशीचा किंवा जवसाचा डिंक). लायनेसी कुलातील, लायनम वंशात आढळणाऱ्या ह्या लायनम युसिटॅटीसिमम [→ अळशी] या झाडापासून लिनसीड डिंक मिळतो. अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, झेकोस्लोव्हाकिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, भारत ह्या देशांत अळशीच्या झाडांची पैदास होते. फ्लॅक्स या नावानेही ही झाडे ओळखली जातात. इसबगोल डिंकाप्रमाणेच बियांच्या टरफलांपासून हा डिंक मिळतो. अळशीपासून मुख्यत्वे तेल मिळत असल्याने डिंकाचे उत्पादन दुय्यम ठरते. जलीय विच्छेदनाने डिंकापासून D-गॅलॅक्ट्युरॉनिक अम्ल व L-ऱ्हॅम्नोजाचा प्रत्येकी एक रेणू असलेले अल्डोबायोनिक अम्ल मिळते. अरॅबिनोज, गॅलॅक्टोज, ऱ्हॅम्नोज, झायलोज व अल्प प्रमाणात फ्युकोज या शर्करा आढळतात.

आइसलँड मॉस : आइसलँड मॉस (सिट्रारिया आइसलँडिका) ह्या एक प्रकारच्या दगडफुलापासून हा डिंक मिळतो. आइसलँड, स्वीडन व नॉर्वे या ठिकाणी हे दगडफूल सापडते. ह्यातील कडू पदार्थ जाण्यासाठी प्रथम ते पाण्याने धुवून घेतात व नंतर सोड्याच्या किंवा पोटॅशियम कार्बोनेटच्या पाण्यात भिजत ठेवून त्यातील सायट्रिक अम्ल काढून टाकतात. रासायनिक दृष्ट्या हा डिंक हेमिसेल्युलोज असून त्यात यूरोनिक अम्ल, गॅलॅक्टोज, मॅनोज व ग्लुकोज असतात. आइसलँड मॉसच्या राखेचे विश्लेषण केले असता त्यात तांबे, चांदी, लोखंड, जस्त, कोबाल्ट, मँगॅनीज, ॲल्युमिनियम, क्रोमियम वगैरे अनेक धातू आढळून आल्या आहेत. हा डिंक सौंदर्यप्रसाधनांत व कापड उद्योगात वापरतात.

आगर डिंक गेलिडियम कार्टिलाजिनियम, गे. कोनियम, गे. कौलटेरी  वगैरे शैवलांपासून अगर डिंक तयार करतात. हे शैवल जपान, चीन, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, कॅलिफोर्निया, मेक्सिको येथील सागरकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळते. सागराच्या तळाशी हे शैवल उगवते व पाणबुडे मे ते ऑक्टोबरमध्ये ते गोळा करतात. खारे पाणी व इतर घाण निघून जाईपर्यंत शैवल थंड पाण्याने धुतात. नंतर ३०–४० तास पाण्यात उकळून न हलविता ठेवून दिले म्हणजे वरील ७०% विद्रावापासून उच्च प्रतीचे आगर मिळते. हा विद्राव उथळ पात्रात ओतून थंड होऊ देतात त्यामुळे त्याची जेली तयार होते. उघड्यावर ही जेली ठेवली असता ती वाळून वर्णहीन होते. पट्ट्या, तुकडे किंवा भुकटीच्या स्वरूपात आगर विकले जाते. हा डिंक गॅलाक्टनाच्या सल्फ्यूरिक एस्टराच्या स्वरूपात असतो. हा थंड पाण्यात अविद्राव्य असून गरम पाण्यात विरघळतो. ह्याचा विरल (१–२%) व उदासीन (अम्लधर्मी वा क्षारधर्मी नसलेला) विद्राव थंड केल्यावर त्याची जेली तयार होते व ३५° ते ५०° से. ला परत तो घट्ट होतो  व ९०°–१००° से. ला वितळतो. आगर हे जटिल स्वरूपाचे पॉलिसॅकॅराइड आहे. अन्नपदार्थात वापरावयाची पायसे व जेली यांसाठी आगर वापरतात. औषधी गोळ्या न फुटता टिकाव्यात म्हणून आगर वापरतात, तसेच विरेचक म्हणूनही त्याचा उपयोग होतो [→ आगर].


चिकल बालाटा : हे डिंक वस्तुतः नैसर्गिक डिंक या संज्ञेच्या कक्षेत येत नाहीत कारण त्यांची रेणुरचना शर्करांशी संबंधित नाही परंतु व्यवहारात त्यांचा उपयोग डिंकासारखा करतात. सॅपोटेसी या कुलातील दोन वेगवेगळ्या झाडांपासून मिळणाऱ्या वाळलेल्या चिकाला (लॅटेक्स) चिकल गम व बालाटा ही नावे आहेत. सॅपोडिला [ॲक्रस सॅपोटा → चिकू] व मायूसोपस ग्लोबोसाया झाडांपासून अनुक्रमे चिकल गम व बालाटा मिळतात. मेक्सिको, वेस्ट इंडिज, ग्वातेमाला व मध्य अमेरिका या ठिकाणी ही झाडे आढळतात. चीक आटवून त्यातील पाण्याचे प्रमाण ४०% खाली आणून नंतर त्याचे तुकडे करतात. मेक्सिसन चिकल गम गुलाबी रंगावर असते. बालाटा अशुद्धावस्थेत धूसर पांढऱ्या रंगाचे असून त्यावर विटकरी रंगाचे ठिपके किंवा शिरा आढळतात. शुद्ध केल्यावर त्याची अस्फटिकी भुकटी मिळते. बालाटा ४०°से.ला मऊ होते आणि त्यास हवा तो आकार देता येतो. चिकल गम आणि बालाटा च्युईंगगममध्ये वापरतात. यंत्रामध्ये एका चाकाच्या योगाने दुसरे चाक फिरविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या पट्ट्यांच्या निर्मितीत बालाटाचा उपयोग होतो.

प्राणिज डिंक : सामान्यपणे डिंकाचे जे गुणधर्म वर वर्णिले आहेत, त्यांच्याशी साधर्म्य असलेले प्राणिज डिंक म्हणजे जिलेटीन, सरस व केसीन. सरस हे जिलेटिनाचेच अशुद्धरूप होय. प्राणिशरीरातील संयोजी ऊतकात (कार्यकारी कोशिकांना आधार देऊन त्यांना एकत्र ठेवण्याचे कार्य करणाऱ्या कोशिका समूहात) सापडणाऱ्या कोलॅजेन नावाच्या पदार्थापासून जिलेटीन तयार करतात. चांगल्या प्रतीचे जिलेटीन वर्णहीन, गंधहीन व रुचिहीन असते. त्याला निश्चित वितळबिंदू नाही १४०° से. तापमानाला ते मऊ होते. गार पाण्यात ते फुगते व गरम पाण्यात विरघळते. जिलेटनामध्ये मुख्यत्वे प्रथिने असतात. खाद्यपदार्थात जिलेटिनाचा विशेष उपयोग केला जातो. जेलीरूप होण्याच्या गुणामुळे जेलीयुक्त मांस, जेलीयुक्त कँडी अशा पदार्थांत ते वापरले जाते. आइसक्रीम बनविताना दुधातील पाण्याचे बर्फ-स्फटिक बनू नयेत म्हणून त्यात जिलेटीन घालतात. प्रथिनयुक्त अन्न म्हणूनही जिलेटिनाचा उपयोग केला जातो. छायाचित्रणाच्या काचांना किंवा फिल्मांना जो प्रकाशसंवेदी (प्रकाशाचा परिणाम होणारा) लेप दिलेला असतो, त्यात जिलेटीन असते. रंगधंद्यात संरक्षक कलिल म्हणून तसेच टूथपेस्ट, कापड छपाई अशा अनेक क्षेत्रांत जिलेटिनाचा उपयोग होतो [→ जिलेटीन सरस].

केसीन दुधातील मुख्य प्रथिन होय. ज्या कामासाठी केसीन वापरावयाचे असेल, त्यास अनुसरून ते तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. केसिनाच्या संघटनेत निदान १५ ॲमिनो अम्ले असल्याचे आढळून आले आहे. ते फॉस्फरसयुक्त प्रथिन असून त्याचा रेणुभार ७५,००० ते ३,७५,००० च्या दरम्यान आहे. खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यप्रसाधने, प्लॅस्टिके, मानवनिर्मित धागे व रंग या धंद्यांत केसीन वापरले जाते [→  केसीन].

उपयोग : विविध उद्योगांत डिंकांचा निरनिराळ्या कामांसाठी उपयोग होतो. डिंक विद्राव बुळबुळीत असून भाजलेल्या किंवा भेगाळलेल्या त्वचेस मऊपणा आणून दाह होऊ न देण्याचा गुण त्याच्या अंगी असल्यामुळे सौंदर्यप्रसाधनांत व औषधी द्रव्यांत डिंकांचा उपयोग होतो. पायसीकारक (पाणी किंवा तत्सम पदार्थ आणि तेले किंवा तत्सम पदार्थ यांचा मिलाप घडविणारे द्रव्य) म्हणून डिंकांचा उपयोग क्रिमे, लोशने, मलमे व इतर सौंदर्यप्रसाधने यांमध्ये करतात. डिंक-विद्रावातील पाणी निघून गेल्यावर तो पातळ पटल रूपाने शिल्लक राहतो. या गुणामुळे व योग्य घटकांच्या सानिध्यात मऊ होण्याच्या गुणामुळे डोक्यावरील केस चापून चोपून बसविता यावे किंवा ते कायमचे कुरळे व्हावे म्हणून वापरतात त्या मिश्रणात डिंक हा एक घटक असतो.

सिलियम डिंक सौम्य रेचक व मूत्रवर्धक असल्यामुळे तो औषधात वापरतात. जखमेवर लावण्याच्या काही औषधांत ट्रॅगकांथ डिंक वापरतात. रक्त गोठण्याचे प्रमाण कमी करण्याच्या औषधात आगर डिंक वापरला जातो. औषधी गोळ्यांचा आकार कायम टिकण्यासाठी बंधक म्हणून त्यात डिंक घालतात. रंग वाळल्यावर पृष्ठभाग चकचकीत व्हावा म्हणून किंवा पृष्ठभागावर त्याचे पटल बनावे म्हणून डिंकांचा उपयोग केला जातो. अग्निरोधक रंगात बंधक म्हणून डिंक वापरतात.

अरेबिक व तत्सम डिंक कापड छपाईच्या कामी रंगाला दाटपणा यावा म्हणून व पृष्ठभाग सफाईदार व्हावा म्हणून कापड उद्योग व कागद निर्मिती यांमध्ये वापरले जातात. वस्तूला जलाभेद्यता येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिश्रणात लोकस्ट बीन डिंक वापरतात. ह्या डिंकाची लेड व ॲल्युमिनियम ॲसिटेट व बायक्रोमेट यांच्याशी विक्रिया होऊन जलाभेद्य पटल तयार होते. सुताला व रेयॉनाला खळ म्हणून वापरल्या जाणाऱ्या मिश्रणात डिंक असतो. कागदाच्या पृष्ठभागाला लावण्याच्या खळीत डिंक, शर्करा व बोरिक अम्लाचे मिश्रण वापरतात. इतरही काही प्रकारची डिंक असलेली मिश्रणे वापरतात. शोभेचा कागद तयार करताना रंजकद्रव्याचे वाहक डेक्स्ट्रीन, ग्लुकोज, सुक्रोज या पदार्थांप्रमाणेच डिंकाचाही उपयोग होतो. पोस्टाची पाकिटे व तिकिटे चिकटविण्यासाठी त्याला डिंक लावलेला असतो. कागदी फुले, पाने करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदावर चकाकी येण्यासाठी लोकस्ट बीन डिंकाचा उपयोग करतात. ॲस्बेस्टसाचा कागद बनविताना बंधक म्हणून डिंक घालतात.

बहुतेक सर्व प्रकारच्या मिठायांमध्ये (चॉकोलेट, च्युईंगगम, गोळ्या वगैरे) तसेच मुरंबे, जेली यांत डिंक वापरला जातो. मादक पेये, आइसक्रीम, काही विशिष्ट प्रकारची बिस्किटे ह्यांतही डिंक वापरतात. दूध टिकविण्यासाठी व चीज तयार करताना ट्रॅगकांथ डिंकाचा उपयोग करतात. स्वाददायक तेले व पाणी यांचे पायस तयार करण्यासाठी त्यांत डिंक घालतात. बेरी, द्राक्षे, चेरी यांसारखी फळे टिकविण्यासाठी प्रथम ती डिंकाच्या पाण्यात धुतात. अन्नपदार्थ टिकविण्यासाठी त्यावर ट्रॅगकांथ डिंकाचे आवरण देतात.

मृत्तिकाशिल्पाच्या चिकणमातीत बंधक म्हणून डिंक घातलेला असतो. शाईमध्येही डिंक वापरतात. यांशिवाय धातुपाषाण स्वच्छ करण्यासाठी वापरावयाची निर्मलके (मळ धुवून काढण्यास साहाय्य करणारे पदार्थ), पाण्याखालील स्फोटक द्रव्ये यांमध्ये व बाष्पित्रात (बॉयलरमध्ये) अफेनद पाणी (साबणाचा फेस ज्यामध्ये होत नाही असे पाणी) वापरल्यामुळे तयार होणाऱ्या आणि बाष्पिपत्राच्या बाजूस चिकटून बसणाऱ्या पुटावर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा अनेक क्षेत्रांत डिंकांचा विविध तऱ्हेने उपयोग होतो.


भारताची आयात व निर्यात : भारतात एप्रिल १९७० ते मार्च १९७१ पर्यंत सु. एक कोटी रुपयांचा ॲकेशिया, ट्रॅगकांथ वगैरे प्रकारचा डिंक आयात झाला. त्याच काळात भारताने सु. पाच कोटी रुपयांचे कराया वगैरे प्रकारचे डिंक निर्यात केले. गवार डिंकाची निर्यात सु. पाच कोटींची केली. यांशिवाय इसबगोलाची टरफले व बिया यांची सु. पाच कोटींची आणि चिंचोके व चिंचोक्यांची भुकटी यांची सु. दोन कोटींची निर्यात केली. हिंदुस्थान गम अँड केमिकल्स लि. या हरियाणातील कारखान्याने १९५६ मध्ये गवार डिंकाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ही कंपनी अमेरिकेत व युरोपात गवार डिंकाची निर्यात करीत असून तिने १९७०-७१ मध्ये दोन कोटी रुपयांची निर्यात केली.

रूपांतरित किंवा अर्धसंश्लेषित डिंक : स्टार्च, सेल्युलोज, यांसारख्या नैसर्गिक पदार्थांवर निरनिराळ्या प्रक्रिया करून त्यांची जलविद्राव्यता व इतर गुणधर्म बदलता येतात. विविध क्षेत्रांतील उपयुक्ततेनुसार आवश्यक त्या गुणधर्माचे अनुजात (संयुगाच्या रासायनिक गुणाचा उपयोग करून त्यापासून बनविलेली दुसरी संयुगे) त्यापासून तयार करता येतात. स्टार्च व सेल्युलोज हे पदार्थ सहज व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांपासून औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे डिंक तयार करणे फायदेशीर होते.

स्टार्चांचे अनुजात : घनीभवन (घनरूप होणे), जेलीभवन (जेलीचे रूप घेणे) आणि पातळ पापुद्रा तयार होणे या गुणधर्मांमुळे तसेच सहज उपलब्धता व कमी किंमत यांमुळे स्टार्चाचे निरनिराळे अनुजात बनविणे फायद्याचे होते. नवीन गुणधर्म आणण्यासाठी किंवा मूळचे गुणधर्म सुधारण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया करतात. उदा., अम्ल, क्षार, ऑक्सिडीकारक [→ ऑक्सिडीभवन] किंवा इतर रासायनिक विक्रियाकारकांच्या विक्रिया. या पद्धतींनी नवीन कार्यकारी अणुगटांचा स्टार्चाच्या रेणूत समावेश होतो किंवा रेणूचा आकार बदलतो. स्टार्चाच्या जलविद्रावात अमायलोजाचे रेणू असल्यास त्यांच्या रेणूंच्या साखळ्या एकमेंकीस समांतर राहून एकीतील हायड्रोक्सिल गट दुसरीतील हायड्रोक्सिल गटाच्या अगदी जवळ येतात. असे झाले म्हणजे हायड्रोजन बंधामुळे त्यांचे संगमन (एकत्र येणे) होऊन पाण्यात अविद्राव्य असे गट तयार होतात. हे संगमन कमी होण्यासाठी मालेतील सरलता कमी होणे जरूरीचे असते. हायड्रॉक्सिल गटाचे इतर गटांनी प्रतिष्ठापन करून हे साधता येते. स्टार्चाचे ॲसिटेट, ईथर यांसारखे अनुजात तयार करण्याचा हेतू हा असतो. स्टार्चाचे ॲसिटेटामुळे साध्या स्टार्चापेक्षा जेलीभवन जास्त चांगले होते. तर स्टार्चाच्या हायड्रॉक्सिएथिल ईथरामुळे घनीभवन व जेलीभवन होत नाही. सल्फेट, सल्फोनेट किंवा कार्‌बॉक्सिल गट स्टार्चात समाविष्ट केल्याने त्यांची सोडियम किंवा पोटॅशियम लवणे तयार करता येतात. ही लवणे अतिविद्राव्य असून त्यांपासून अतिश्यान, स्वच्छ जेलीरूप न घेणारी व कमी तापमानाला गोठविली असताही विद्राव्य राहणारी विसरणे तयार करता येतात. याशिवाय इतर अनेक पद्धतींनीही स्टार्चाचे रूपांतर करण्यात येते.

सेल्युलोजाचे अनुजात : स्टार्चाप्रमाणेच सेल्युलोजही मुबलक, स्वस्त व शुद्ध स्वरूपात मिळत असल्याने त्यापासून जलविद्राव्य अनुजात बनविता येतात. 

सेल्युलोज व अल्किल हॅलाइडे (उदा., मिथिल क्लोराइड) यांचा सोडियम हायड्रॉक्साइडाच्या उपस्थितीत रासायनिक संयोग होऊन सेल्युलोजाची ईथरे (उदा., मिथिल सेल्युलोज) बनतात. या विक्रियेत प्रथम क्षार सेल्युलोज बनून त्यावर अल्किल हॅलाइडाची विक्रिया होत असली पाहिजे. ईथरीकरणाची मर्यादा विक्रियेच्या वेळी वापरलेले तापमान आणि क्षार सेल्युलोज अल्किल हॅलाइड व पाणी यांची प्रमाणे यांवर अवलंबून असते. क्षार सेल्युलोज व एथिलीन क्लोरोहायड्रिन (अथवा एथिलीन ऑक्साइड) यांच्या विक्रियेने हायड्रॉक्सिएथिल सेल्युलोज म्हणजे सेल्युलोजामध्ये –O–CH2–CH2–OH हा गट समाविष्ट केलेले संयुग बनते.

सीएमसी किंवा ‘सेल्युलोज गम’ म्हणजे कार्‌बॉक्सिमिथिल सेल्युलोज हा अनुजात क्षार सेल्युलोज व सोडियम मोनोक्लोरोॲसिटेट यांच्या विक्रियेने मिळतो. ह्याचा उपयोग घनकारक, पटलकारक व पायस स्थिरकारक म्हणून कापड, निर्मलके, कागद, रंग, खाद्य पदार्थ व औषधे यांच्या उद्योगांत होतो.

सेल्युलोजाचे इतरही अनुजात महत्त्वाचे आहेत. उदा., हायड्रॉक्सिप्रोपिल मिथिलसेल्युलोज, एथिल मिथिल सेल्युलोज, एथिल हायड्रॉक्सिएथिल सेल्युलोज वगैरे.

संश्लेषित डिंक : विविध उद्योगांत डिंकांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असल्यामुळे हल्ली संश्लेषित (कृत्रिम) डिंक तयार करण्यात येत आहेत. वनस्पतिज किंवा रूपांतरित डिंकांसाठी निसर्गावर अवलंबून रहावे लागते त्यामुळे त्यांचा पुरवठा अनिश्चित राहतो. त्याचप्रमाणे त्यांच्या अंगी जे गुणधर्म असतील तेच आपणास पतकरावे लागतात त्यात फारसा फरक घडविता येत नाही. डिंकासारखे पदार्थ रासायनिक विक्रियांनी निर्माण केले म्हणजे या निरनिराळ्या विक्रियांच्या साहाय्याने, विशिष्ट गुणधर्म त्यांना प्राप्त होतील अशी योजना करता येते. हाही आणखी एक फायदा असतो. उदा., पॉलिव्हिनिल अल्कोहॉल वापरून पाण्यात चटकन विरघळणाऱ्या डिंकापासून ते बराच वेळ पाण्यात ठेवूनही न विरघळणाऱ्या डिंकापर्यंतचे विविध प्रकार बनविता येतात. हे कृत्रिम डिंक म्हणजे कार्बनी बहुवारिकेच होत. उदा., पॉलिव्हिनिले, ॲक्रिलिक अम्लाची बहुवारिके, एथिलीन ऑक्साइडाची बहुवारिके वगैरे. 

पॉलिव्हिनिल अल्कोहॉल : (पीव्हीए). हे १९२५ मध्ये जर्मनीत प्रथम तयार करण्यात आले व १९३० मध्ये अमेरिकेत त्याचे सर्रास उत्पादन सुरू झाले. हा डिंक उद्योगधंद्यांत अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा समजला जातो. कोणत्याही पदार्थाचे बहुवारिक तयार करताना साधारणपणे त्याच्या एकवारिकावर (मोनोमर) रासायनिक विक्रिया केल्या जातात, परंतु पॉलिव्हिनिलाचे एकवारिक व्हिनिल अल्कोहॉल हे अस्थिर असल्याने व्हिनिल ॲसिटेटापासून हा डिंक तयार करतात. व्हिनिल ॲसिटेटापासून मिळणाऱ्या पॉलिव्हिनिल ॲसिटेटाचा मिथेनॉलामध्ये विद्राव करून अम्लधर्मी किंवा क्षारधर्मी उत्प्रेरकाच्या (विक्रियेत स्वतः भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थाच्या) साहाय्याने त्याचे अल्कोहॉली विच्छेदन (अल्कोहॉलातील अल्किल गट व हायड्रॉक्सिल गट संयुगात समाविष्ट करून त्याचे तुकडे करणे) करतात. 


पॉलिव्हिनिल ॲसिटेटाच्या अल्कोहॉली विच्छेदनावर योग्य ते नियंत्रण ठेवून हव्या त्या प्रतीचे किंवा गुणधर्माचे

पॉलिव्हिनिल अल्कोहॉल बनविता येते. त्याची श्यानता त्याच्या रेणुभारावर अवलंबून असते व त्यावरून त्याचे तीन प्रकार होतात : उच्च श्यानता-रेणुभार १,७०,००० ते २,२०,००० मध्यम श्यानता-रेणुभार १,२०,००० ते १,३५,००० नीच श्यानता-रेणुभार ३०,००० ते ३५,०००. रेणुभार जसजसा कमी होत जातो तसतशी त्याची जलविद्राव्यता वाढत जाते. उच्च रेणुभाराच्या पॉलिव्हिनिल अल्कोहॉलामध्ये न तुटता ताण सहन करण्याची शक्ती, लवचिकपणा, फाटण्यास विरोध हे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. जलविद्राव्य बहुवारिकांच्या उपयुक्ततेबरोबरच पॉलिव्हिनिल अल्कोहॉलाचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ते दुसऱ्या उपयुक्त पदार्थाच्या निर्मितीत आंतरिक द्रव्य म्हणून वापरता येते. उदा., पॉलिव्हिनिल अल्कोहॉल व ब्युटिराल्डिहाइड यांच्या विक्रियेने मिळणारे पॉलिव्हिनिल ब्युटिराल याचा उपयोग काचेच्या दोन तक्त्यांमध्ये याचे लेपन करून चिकटविण्यासाठी होतो. अशी काच वापरणे बिनधोक असते. कारण आघाताने ती फुटली, तरी तुकडे इतस्ततः उडून जखमा होण्याचा संभव नसतो. तसेच पॉलिव्हिनिल अल्कोहॉल व फॉर्माल्डिहाइडापासून मिळणाऱ्या फॉर्मलाचा उपयोग तारांना वेष्टण म्हणून करतात.

पॉलिव्हिनिलपायरोलिडोन : (पीव्हीपी). १९५६ मध्ये अमेरिकेत पीव्हीपीचे उत्पादन सुरू झाले. त्यासाठी ॲसिटिलीन, फॉर्माल्डिहाइड, अमेनिया व हायड्रोजन हे कच्चा माल म्हणून वापरले जातात. पॉलिव्हिनिल अल्कोहॉलाप्रमाणेच रेणुभारावर याची श्यानता अवलंबून असते. त्याचे १०,००० ४०,००० १,६०,००० व ३,६०,००० रेणुभार असलेले असे चार प्रकार होतात. याचा एक महत्त्वाचा गुणर्धम म्हणजे नायट्रोपॅराफिने, ग्लायकॉल, अमाइने, कीटोन व एस्टर यांसारख्या कार्बनी विद्रावकांत पीव्हीपी विद्राव्य आहे.


पॉलिॲक्रिलिक अम्ल : ॲक्रिलिक अम्ल किंवा त्याची एस्टरे ही एथिलिनापासून तसेच ॲसिटिलिनापासून तयार करता येतात. ॲक्रिलिक बहुवारिकांची रचना पुढीलप्रमाणे दाखविता येईल. 

पॉलिव्हिनिलपायरोलिडोन (पीव्हीपी)

 

 R=H किंवा CH3 R’=H, CH3, C2H5, Na, K, NH4 वगैरे.

निरनिराळ्या पद्धतीने पॉलिॲक्रिलिक अम्ल आणि त्याची लवणे यांचे बहुवारिकीकरण करता येते. उदा., (१) ॲक्रिलिक अम्लाचे एकवारिक,  पाणी, पोटॅशियम परसल्फेट (बहुवारिकीकरणाला चालना देण्यासाठी) व सोडियम थायोसल्फेट (क्रियाप्रवर्तक) यांचे मिश्रण ५०°–१००° से. ला तापविणे. (२) जलविद्रावाचे जंबुपार किरणीयन करणे (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरण विद्रावावर पाडणे). या पद्धतीत उच्च रेणुभाराची बहुवारिके मिळतात. (३) एकवारिकाचा बेंझिनासारख्या विद्रावकातील विद्राव, बेंझॉइल पेरॉक्साइडासारख्या आरंभकारकाच्या (विक्रिया चालू होण्यास मदत करणाऱ्या पदार्थाच्या) उपस्थितीत तापविणे. (४) गॅमा किरणीयन करणे (अतिशय आखूड तरंगलांबीचे व अतिशय भेदक क्ष-किरण वस्तूवर पाडणे). यांशिवाय इतरही अनेक पद्धती वापरात आहेत. पॉलिॲक्रिलिक अम्ल व इतर ॲक्रिलिक बहुवारिकांमध्ये अनेक रासायनिक आणि भौतिक गुणधर्म असल्याने त्यांचे अनेकविध उपयोग होतात. ॲक्रिलोनायट्राइलापासून तयार होणाऱ्या पॉलिॲक्रिल अमाइडाचा विविध उद्योगांत उपयोग होतो.

एथिलीन ऑक्साइडाची बहुवारिके : एथिलीन ऑक्साइडाच्या बहुवारिकीकरणाने पॉलिएथिलीन ग्लायकॉल ही नीच रेणुभाराची बहुवारिके प्रथम तयार केली जात असत. या बहुवारिकांचा रेणुभार २०० ते २०,००० या दरम्यान असतो. कमी रेणुभाराची बहुवारिके द्रवरूप तर ४,००० आणि त्यापेक्षा जास्त रेणुभाराची बहुवारिके मेणासारखी घन असतात, त्यास कार्बोवॅक्स असेही म्हणतात. १९५८ मध्ये अमेरिकेत युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन या कंपनीने एथिलीन ऑक्साइडाच्या उच्च रेणुभाराच्या बहुवारिकांचे उत्पादन सुरू केले. ही बहुवारिके पॉलिऑक्स रेझिने या नावाने ओळखली जातात. कडक, अत्यंत स्फटिकी ऊष्मामृदू (उष्णता दिल्याने मऊ होणारी) अशी ही बहुवारिके क्लोरीनयुक्त हायड्रोकार्बने अल्कोहॉले व पाणी यांची मिश्रणे आणि ॲसिटोॲसिटानायट्राइल यांसारख्या विद्रावकांत विरघळतात.

उपयोग : जीवनोपयोगी व इतर वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बहुतेक सर्व उद्योगांत रूपांतरित व कृत्रिम डिंकांचा अतिशय उपयोग होतो. कागदावरील लेप, वस्त्रांना खळ लावणे ह्यांसाठी ह्या डिंकांचा वापर करतात. बाष्प रोधून धरण्याची क्षमता, पायसीकरणाची क्षमता, घुसळले असता फेस येणे ह्या सर्व गुणधर्मांमुळे कार्‌बॉक्सिमिथिल सेल्युलोज, स्टार्च, पीव्हीपी वगैरेंचा तत्संबंधीच्या क्षेत्रांत उपयोग होतो. पॉलिऑक्स रेझिनांचा वापर टूथपेस्ट, चेहऱ्याला व हाताला लावण्याची क्रिमे, शांपू यांत होतो. कमी विषारी, लवचिक व पटलनिर्माणक्षम असल्यामुळे पॉलिऑक्स रेझिने औषधी उद्योगांत वापरतात. पीव्हीपी टिकाऊ असून शरीर द्रवाबरोबर ते एक जीव होत असल्याने दुसऱ्या महायुद्धाकाळात जर्मनीत ते रक्तद्रव्याच्या ऐवजी ‘प्लास्डोन’ या नावाने वापरले जात असे. त्यामुळे हजारो सैनिकांचे प्राण वाचले आहेत. औषधी गोळ्या तयार करताना बंधक म्हणून यांपैकी काही डिंकांचा उपयोग होतो. रंग, प्रक्षालक (डिटर्जंट), मृत्तिका वस्तू, शिलामुद्रण, पॉलिशे वगैरे अनेक क्षेत्रांत रूपांतरित व कृत्रिम डिंक वापरले जातात. 

भारतीय उद्योग : भारतात डिंकाचे फार मोठे असे कारखाने जवळजवळ नाहीतच. बहुतेक डिंक रानातून गोळा करून शहरात आणला जातो तेथे तो स्वच्छ करून व भुकटी करून ती परदेशात पाठविली जाते. पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश या ठिकाणी डिंकांचे उत्पादन होते. कार्‌बॉक्सिमिथिल सेल्युलोजाचा एक कारखाना अहमदाबाद येथे आहे.

संदर्भं : 1. Davidson R. L. Sitting, M. Water-soluble Resins, New York, 1962.

            2. Mantell, C. L. The Water-soluble Gums,  New York, 1947.

            3. Smith F. Montomery, R. The Chemistry of Plant Gums and Mucilages and Some Related Polysaccharides, New York, 1959.

            4. Whistler, R. L.  Be Miller, J. N. Eds. Industrial Gums : Polysaccharides and Their Derivatives, New York, 1959. 

पटवर्धन, सरिता अ.