आग निवारण:  आग लागू नये म्हणून अवश्य ती काळजी घेणे आणि ती लागली तर तिचा सुगावा लागावा व प्राथमिक अवस्थेतच ती विझविली जावी अशी तजवीज करणे, इमारतीतील मनुष्यांना बचावाकरिता बाहेर पडणे सोपे होईल आणि इमारतीची व तिच्यातील सामानाची हानी शक्यतो टळेल अशा योजना करणे या गोष्टींचा अंतर्भाव आगनिवारणात होतो. यांखेरीज आग विझविणे, तिचा प्रसार होऊ न देणे आणि आगीत सापडलेले जीवित आणि चीजवस्तू यांचा बचाव करणे, ही कार्यही त्यात समाविष्ट होतात.

इतिहास : आतापर्यंत जगातील विविध भागांत लावलेल्या मोठमोठ्या आगी व त्यांमध्ये झालेले प्रचंड नुकसान ह्यांमुळे आगनिवारणाच्या कार्याचे महत्त्व सर्व मानवजातीला पटले आहे. इतिहासात नोंदविलेली सर्वांत जुनी प्रचंड आग म्हणजे इ.स.पू. ६४ मध्ये सम्राट नीरो यांनी रोम शहराला लावलेली आग होय. जगातील विविध भागात लागलेल्या मोठमोठ्या आगी व त्यांमध्ये झालेले नुकसान यांची माहिती शेजारी कोष्टकात दिली आहे.

लंडन येथील १६६६च्या भयंकर आगीनंतर पाश्चिमात्त्य देशांना आगीपासून होणाऱ्या हानीची जाणीव झाली व आगीसंबंधी दक्षता घेण्याचे उपाय मूर्तस्वरूप घेऊ लागले. १६९० नंतर आगविमा-कंपन्या स्थापन होऊ लागल्या. त्यांना असे दिसून आले की विमा उतरलेल्या घरांचे रक्षण करण्याकरिता नेमलेल्या कामगारांना आग विझविण्याचे शिक्षण दिल्याखेरीज आगविम्याचा धंदा तग धरणार नाही. म्हणून प्रत्येक कंपनीने असे प्रशिक्षण दिलेले आपापले अग्निशामक दल तयार केले. त्यानंतर १८३२ च्या सुमारास सर्व कंपन्यांची दले एकत्र करून ‘द लंडन फायर एंजिन एस्टॅब्लिशमेंट’ ही संस्था अस्तित्वात आली. हे आगनिवारणाचे काम फार खर्चाचे असल्यामुळे १८८६ मध्ये सरकारने ते आपल्याकडे घेतले व ‘द मेट्रोपॉलिटन फायर ब्रिगेड’ ह्या दलाची स्थापना झाली. या दलाचे १९०४ मध्ये ‘लंडन फायर ब्रिगेड’ मध्ये रूपांतर करण्यात आले.

ईजिप्तमध्ये ४,००० वर्षांपूर्वीदेखील आगनिवारणाची सुसंघटित व्यवस्था होती व आगनिवारणासाठी प्रशिक्षणाची व्यवस्थाही होती असे दिसून आले आहे. तथापि त्या वेळच्या तंत्राबद्दल माहिती उपलब्ध नाही. आग विझविण्यासाठी वापरावयाच्या पहिल्या यांत्रिक उपकरणाचा शोध ॲलेक्झँड्रिया येथील सेझिबियस यांनी लावला. रोमन सम्राट ऑगस्टस सीझर यांनी आपल्या साम्राज्यात प्रथमच वेगळे आगनिवारण खाते सुरू केले. त्या काळी आग विझविण्यासाठी धातूच्या तोट्या बसविलेल्या मोठ्या कातडी पिशव्या, तसेच हाताने चालवावयाचे पंप, कातडी नळ, शिड्या, बादल्या इ. सामग्री वापरीत. हे काम मुख्यत: गुलामांकडूनच करून घेतले जाई. सतराव्या शतकापर्यंत ईजिप्त व रोम वगळता इतरत्र आग विझविण्यासाठी फारशी संघटित व्यवस्था अस्तित्वात नव्हती. त्यामुळे लंडन, कॉन्स्टंटिनोपल यांसारख्या अनेक शहरांचे आगीमुळे फार नुकसान झाले.

आगीवर पाण्याचा झोत सोडू शकणाऱ्या साधनांपैकी वापरात आलेले पहिले साधन म्हणजे पिचकारी. कालांतराने चाकांवर बसविलेल्या पिचकाऱ्या प्रचारात आल्या. १६५० मध्ये एका जर्मन अभियंत्याने पाण्याचा झोत २५ मी. पर्यंत जाऊ शकेल, असा हाताने चालविण्याचा पंप तयार केला. १७२५ मध्ये रिचर्ड न्यूशॅम यांनी आग विझविण्यासाठी सुधारलेले एंजिन तयार केले. १७५२ मध्ये व्हॅन डर हायडेन या डच बंधूंनी पाणी उपसून दूरवर नेऊन सोडणारे कातडी नळ व त्यांचे तुकडे जोडणारी युग्मके (कपलिंग्ज) तयार केली. त्यामुळे पंप प्रत्यक्ष आगीजवळ न नेता लांबून पाण्याचा अचूक मारा करून आग विझविणे शक्य होऊ लागले.

जगातील विविध भागांत लागलेल्या मोठ्या आगी व त्यांमुळे झालेले नुकसान

एकोणिसाव्या शतकात यांत्रिक शक्तीवर चालणारी एंजिने प्रचारात आली. त्यानंतर स्वयंचल-अभियांत्रिकी (मोटारगाडी, ट्रॅक्टर इ. सारख्या वाहनांचा अभ्यास करणारी अभियांत्रिकीची शाखा) आणि पंप यांच्या तंत्रात झालेल्या प्रगतीमुळे एंजिनाच्या शक्तीने चालविता येणाऱ्या शिड्या, पंप इ. सामग्री वापरात आली.

आधुनिक काळात या क्षेत्रात खूपच संशोधन झाले आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत अंडररायटर्स लॅबोरेटरी लि. ही संस्था १८९४ मध्ये स्थापन झाली. आगनिवारणासाठी वापरात येणाऱ्या निरनिराळ्या उपकरणांचे प्रमाणीकरण करण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करीत आहे.

संशोधनाच्या या क्षेत्रात यूरोप नेहमीच आघाडीवर राहिला आहे. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड येथील अशा संस्थांच्या संशोधनातूनच आजच्या उपयुक्त आगनिवारक यंत्रणा वापरात आल्या आहेत. कॅनव्हासचे नळ, आकडे लावलेली शिडी, समांगी युग्मक (एकसारखी संरचना असलेले जोड), संपीडित (दाबयुक्त) हवेची श्वसनयंत्रणा इत्यादींचा वापर प्रथम फ्रान्समध्ये सुरू झाला. यंत्रशक्तीवर चालणारे पंप व टाकीची गाडी तसेच यंत्राने फिरविता येणारी शिडी इ. उपकरणे प्रथम इंग्लंडमधील ग्रिनिच येथील मेरीवेदर संस्थेत तयार करण्यात आली. रस्त्यावर बसवावयाच्या आगीच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या यंत्रणा, तेलांना लागलेल्या आगी विझविण्यासाठी फेसयुक्त अग्निशामके (फेसाच्या साहाय्याने आग विझविण्याची साधने) तसेच ऑक्सिजनयुक्त-श्वसन-उपकरणे इत्यादींचा वापर जर्मनीमध्ये सर्वप्रथम करण्यात आला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आगीमुळे होणाऱ्या जबरदस्त नुकसानीचा अनुभव येऊनसुद्धा या क्षेत्रात उल्लेखनीय असे संशोधन झाले नाही. त्यानंतर मात्र उत्तरोत्तर या क्षेत्रात प्रगती होत आहे.

आग लागल्याची सूचना देणाऱ्या स्वयंचलित यंत्रणा : आग लागू नये म्हणून शक्य ते सर्व उपाय योजिले तरीही आग लागण्याचा संभव पूर्णपणे नाहीसा होत नाही. म्हणून आगीला सुरुवात झाल्यास ताबडतोब कळावे यासाठी जागरूक पहारा ठेवला पाहिजे. कारण आगीच्या सुरुवातीची पाच मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. या वेळात आग विझल्यास नुकसान सर्वात कमी होते. पहारा करणाऱ्या लोकांना आग विझविण्याचे प्राथमिक शिक्षण दिलेले असावे. आग लागल्याची सूचना देणाऱ्या उष्णतासंवेदनक्षम किंवा इलेक्ट्रॉनीय पद्धतीच्या स्वयंचलित यंत्रणाही उपलब्ध आहेत. ज्या इमारतीचे आगीपासून रक्षण करावयाचे असेल तिचे महत्त्व आणि प्रकार लक्षात घेऊन शक्य असेल तर ती दूरध्वनीने नजीकच्या अग्निशामक स्थानकास जोडलेली असावी व त्याचा दूरध्वनिक्रमांक कर्मचाऱ्यांना पक्का माहीत असावा किंवा ज्या प्रकारचा धोका संभवत असेल त्यानुसार आगसूचक स्वयंचलित यंत्रणाच अग्निशामक स्थानकाला जोडून ठेवलेली असावी म्हणजे आगीची वर्दी स्थानकाला परस्पर आणि तत्काल दिली जाईल.

आग लागल्याची सूचना देणाऱ्या स्वयंचलित यंत्रणांचे कार्य : अशा यंत्रणांमुळे आग लागताच तिची बातमी ताबडतोब मिळते आणि तिचा ठावठिकाणाही कळतो. या यंत्रणांचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारातील यंत्रणांचे कार्य आगीमुळे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेवर व दुसऱ्यातील आगीमुळे उत्पन्न होणाऱ्या धुरावर अवलंबून असते.

आग लागताच तिची सूचना देणारे उपकरण ज्या खोल्यांचे रक्षण करावयाचे असेल त्यांच्या छतावर बसवितात. इमारतीच्या अशा सर्व खोल्यांतील उपकरणांचा संबंध नियंत्रण-कार्यालयातील व जरूर तर जवळच्या अग्निशामक स्थानकातील एका दर्शक फलकाशी जोडलेला असतो. त्या फलकावर खोल्यांचे क्रमांक असलेले निर्देशक असतात. एखाद्या खोलीत आग लागताच त्या खोलीतील उपकरणाचा, दर्शक फलकावरील त्या खोलीचा क्रमांक असलेला, निर्देशक कार्यान्वित होतो व आग कोठे लागली आहे ते कळून येते.

पहिल्या प्रकारच्या यंत्रणेतील मुख्य भाग म्हणजे उष्णतेमुळे प्रसरण पावणारी एक धातूची डबी किंवा नळी. आग लागताच तिच्या उष्णतेने डबी तापून प्रसरण पावते व विजेचा स्विच चालू व्हावा त्याप्रमाणे कार्य घडते. त्यामुळे खोलीतील धोक्याची सूचना देणारा विजेचा गजर वाजू लागतो व नियंत्रण-कार्यालयातील निर्देशक कार्यान्वित होतो.

दुसऱ्या प्रकारच्या यंत्रणेतील कार्य पुढीलप्रमाणे आहे : यात धुराचा उपयोग करणाऱ्या उपकरणांचे दोन उपप्रकार आहेत. एकात प्रकाशविद्युत् (प्रकाशाच्या क्रियेने विद्युत् प्रवाह निर्माण होऊन कार्यान्वित होणाऱ्या) घटाच्या नळीवर पडणाऱ्या किरणांच्या मार्गात धुरामुळे अडथळा येतो व त्यामुळे आग लागल्याची सूचना मिळते. दुसऱ्या उपप्रकारातील उपकरणात विद्युत् प्रवाहाला जोडलेल्या आयनीकरण कोठ्या (अणू, रेणू वा अणूगट विद्युत भारित करणाऱ्या किरणांचा शोध घेऊन त्यांचे विश्लेषण करणारी उपकरणे) असतात. त्यांत एखाद्या किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर फेकण्याचा गुणधर्म असणाऱ्या) पदार्थाने (सामान्यत: रेडियम क्लोराइडाने) भरलेली नळी ठेवलेली असते. किरणोत्सर्गामुळे नळीच्या भोवतालच्या वातावरणात विजेचा सूक्ष्म प्रवाह तयार होत असतो. आगीचा धूर या कोठीत शिरताच त्या प्रवाहात चढ-उतार होतो व त्यामुळे उपकरणास जोडलेले अभिचालित्र (प्रवाहातील चढ-उतारानुसार उपकरणातील प्रवाहात योग्य तो बदल करणारे उपकरण) सुरू होऊन धोक्याचा गजर वाजू लागतो.

आ. १. शिडकाव-तोटीचे काचेच्या गोळ्याने बंद केलेले तोंड, (१) शिडकाव पसरविणारा भाग, (२) टोपण, (३) काचेचा गोळा

शिडकाव-पद्धती : या पद्धतीच्या स्वयंचलित उपकरणांनी आग लागल्याची सूचना तर मिळतेच, पण शिवाय लागलेली आग विझविण्याचे किंवा निदान तिचे नियंत्रण करण्याचे कार्यही सुरू होते. त्यांकरिता इमारतीतील खोल्यांच्या छताजवळून जाणारे पाण्याचे अनेक नळ असतात व त्यांना जागोजाग शिडकाव-तोट्या लावलेल्या असतात. उष्णतेने सहज वितळतील अशा धातूंनी किंवा इतर पदार्थांनी या तोट्यांची तोंडे बंद केलेली असतात. आग लागताच तिच्या उष्णतेमुळे तोट्या बंद करणारे पदार्थ वितळून जातात व त्यांची तोंडे खुली होऊन नळातील पाण्याचा शिडकाव सभोवार होऊ लागतो व आग विझते. काही ठिकाणी तोट्या बंद ठेवण्यासाठी प्रसरणशील द्रवाने भरलेले काचेचे गोळेही वापरतात. (पहा: आ. १). आगीच्या आचेने तापमान वाढताच हे गोळे फुटतात व तोट्यांची तोंडे खुली होतात. नळांतील पाणी वाहू लागले म्हणजे त्याच्या प्रवाहामुळे घंटा वाजू लागेल अशी व्यवस्थाही केलेली असते.

सामान्यत: सु. १० चौ.मी.स. एक या प्रमाणात शिडकाव-तोट्या बसविलेल्या असतात, पण आगीचा संभव अधिक असल्यास तोट्यांच्या वाटणीच्या तपशिलात फेरफार करतात.

शिडकाव-पद्धतीचा एक वेगळा प्रकार म्हणजे पाण्याचा फवारा. ज्वालाग्राही (जलद पेट घेऊ शकणाऱ्या) तेलांचे किंवा अल्कोहॉलांचे लहानसहान साठे व विद्युत्‌गृहांतील तेलांनी भरलेली मोठी रोहित्रे (विद्युत् दाब विशिष्ट प्रमाणात कमी वा जास्त करणारी साधने) (पहा : आ. २) यांना लागणाऱ्या आगीसाठीही फवारा-पद्धती जास्त उपयोगी पडते. फवारा देणाऱ्या तोट्या आग लागण्याचा संभव असलेल्या वस्तूंच्या सभोवार बसविलेल्या असतात.

आग केव्हा लागेल याला नियम नसतो, म्हणून या पद्धतीत नळांना पाण्याचा भरपूर पुरवठा नेहमीच असावा लागतो, शिवाय उंच जागी असलेल्या तोट्यांनाही पुरेशा

आ. २. आग लागलेल्या रोहित्रावर सभोवारच्या तोट्यांमधून उडणारा फवारा

दाबाचा पाणीपुरवठा मिळणे जरूर असते. त्यासाठी पुरेशा उंच जागी टाक्या बांधाव्या लागतात किंवा पाणी जोराने ढकलणारे पंप बसवावे लागतात. नळातील पाणी गोठण्याचा संभव असलेल्या प्रदेशातील इमारतीतील शिडकाव-तोट्यांना पाणी पुरविणाऱ्या नळात हवा दाबून भरतात. आगीने तोट्यांची तोंडे खुली होताच त्यांच्यातील हवा प्रथम बाहेर पडते व नंतर पाणी येऊ लागते.

स्नापन-पद्धती : शिडकाव-किंवा फवारा-पद्धती ही इमारतींच्या आत असलेल्या आगी विझविण्यासाठी असते. पण स्नापन (भिजवून

आ. ३. स्नापन-पद्धतीच्या तोट्या. (अ) खिडकीकरिता, (आ) भिंती अथवा पडदे यांकरिता, (इ) छपराकरिता

ओलीचिंब करण्याची)-पद्धती ही आसपासच्या इमारतींच्या आगींपासून एखाद्या इमारतीचा बचाव करण्यासाठी उपयोगी पडते. या पद्धतीचे तत्त्व शिडकाव-पद्धतीसारखेच असते, पण पाण्याच्या तोट्या इमारतीच्या छपरावर, खिडक्यांवर किंवा बाहेरच्या भिंतीच्या बाह्य पृष्ठावर पाण्याचा वर्षाव होईल अशा रीतीने बसविलेल्या असतात. इष्ट भागावर पाण्याचा योग्य प्रकारचा, लहानमोठ्या क्षेत्राचा किंवा पडद्यासारख्या आकाराचा वर्षाव होईल अशी तोंडे नळ्यांना लावलेली असतात (पहा : आ. ३). स्वयंचलित किंवा नियंत्रकाने स्वत: सुरू करावयाच्या अशा दोन्ही प्रकारच्या स्नापन-पद्धती वापरात आहेत.

शहरातील आगीची सूचना देणारी यंत्रणा : १८५२ मध्ये जर्मनीत प्रथम ही यंत्रणा वापरली गेली. या यंत्रणेत शहरात निरनिराळ्या ठिकाणी रस्त्यावर काचेची खिडकी असलेल्या पेट्या बसविलेल्या असतात. या पेट्या गजबजलेल्या वस्तीत ९० मी. व इतर ठिकाणी १५० मी. अंतरावर बसविलेल्या असतात. आग लागली असता काच फोडून आतला दट्ट्या ओढला असता अग्निशामक दलाला आगीची सूचना मिळते. त्याचबरोबर त्या ठिकाणी गजर सुरू होऊन आजूबाजूच्या लोकांनाही पेटी वापरण्यात येत आहे हे कळते. एकाच वेळी दोन-तीन ठिकाणांहून संदेश आल्यास गोंधळ होण्याचा संभव असतो, तो टळावा म्हणून नवीन पद्धतीच्या पेट्या वापरण्यात येतात, त्यांना ‘अनुगामी प्रकार’ म्हणतात. यात पहिल्या पेटीचा संदेश पोचेपर्यंत दुसऱ्या पेटीचा संदेश थांबवून ठेवला जातो. मुख्य केंद्रामध्ये या पेट्यांकडून आलेला संदेश घंटेच्या आवाजाने व एका कागदाच्या पट्टीवर भोके पाडून रेषांच्या रूपात नोंदविला जातो.

प्राथमिक अवस्थेत असलेली आग विझविणे : प्राथमिक अवस्थेत असलेली आग विझविण्याकरिता उपयोगी पडणारी सुटसुटीत साधने उपलब्ध असणे हेही आगप्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कोणते उपकरण कोणत्या ठिकाणी उपयोगी पडेल हे आग कोणत्या प्रकारची आहे यावर अवलंबून असते. सामान्यत: आगींचे पुढीलप्रमाणे चार वर्ग केले जातात : (अ) लाकूड, कागद, कापड यांसारख्या सामान्य वस्तूंना लागणाऱ्या आगी. (आ) बाष्पनशील (सामान्य तापमानाला उडून जाणाऱ्या) व ज्वालाग्राही पदार्थांच्या आगी. (इ) विजेच्या उपकरणांच्या आगी. उदा., विजेची चलित्रे (मोटरी), स्विच इत्यादींपासून उद्भवणाऱ्या. (ई) धातूंच्या आगी.  प्रकारच्या आगीकरिता दर ९० मी. क्षेत्रफळास प्रत्येकी १० लि. पाणी भरलेल्या  बादल्या असाव्यात. एका मजल्यावर कमीत कमी चार बादल्या असणे आवश्यक आहे. याशिवाय दर २४० चौ.मी. क्षेत्रफळास किंवा त्याच्या भागास १० लि. धारणेचे एक  सोडा-अम्ल (सोडा व अम्ल यांनी युक्त असलेले) अग्निशामक उपकरण किरकोळ आगीकरिता असावे. कोणत्याही ठिकाणाहून त्याचे अंतर लांबच्या मार्गाने गेले तरीही ३० मी. हून जास्त होणार नाही, अशा जागी ते ठेवावे. सामान्य आगीकरिता हेच उपकरण ११५ चौ.मी. क्षेत्रफळास किंवा त्याच्या भागास एक याप्रमाणे असावे व त्याचे अंतर कोणत्याही ठिकाणाहून १५ मी. पेक्षा जास्त नसावे. मोठी आग लागण्याचा संभव ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात या उपकणाचे वितरण वाढवावे, जरूर तर ते दुप्पटही करावे.  प्रकारच्या आगीकरिता फेस निर्माण करणारी किंवा कोरड्या रसायनांची अग्निशामके उपयोगी पडतात. दर ११५ चौ. मी. च्या क्षेत्रास एक याप्रमाणे किंवा परिस्थित्यनुरूप जास्त उपकरणांचीही योजना करतात.  प्रकारच्या आगींकरिता कार्बन डाय-ऑक्साइड वायूची अग्निशामक उपकरणे समाधानकारक ठरतात. कार्बन टेट्राक्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, क्लोरो-ब्रोमो-मिथेन, ब्रोमो-क्लोरो डायफ्ल्युओरोमिथेन इ. बाष्पनशील द्रव-पदार्थांचा उपयोगही या प्रकारात करता येतो. यांपैकी पहिली दोन रसायने विषारी असल्यामुळे त्यांचा वापर हळूहळू बंद होत आहे. हे पदार्थ वापरणाऱ्या उपकरणांचे वितरण-प्रमाण निश्चित केलेले नाही. उपकरण केवढे असावे आणि त्यांची संख्या किती असावी, हे आगीच्या धोक्याच्या प्रमाणावर अवलंबून राहते. तथापि दर ११५ चौ. मी. क्षेत्रास कमीत कमी एक उपकरण कोठूनही १५ मी. च्या टप्प्यात येईल अशा ठिकाणी ठेवणे समाधानकारक होईल. प्रकारच्या आगींकरिता, उच्च तापमानास टिकणाऱ्या धातूच्या क्लोराइडांचा वापर करणारी शुष्क अग्निशामके वापरतात. त्यांचे वितरण  प्रकारच्या आगींकरिता करतात, त्याचप्रमाणे करणे इष्ट ठरते.

हल्ली शुष्क अग्निशामकात आग विझविणारा पदार्थ म्हणून सोडियम बायकार्बोनेटाऐवजी पोटॅशियम बायकार्बोनेट वापरतात. कारण ते दुप्पट परिणामकारक आहे. याशिवाय धातूंची क्लोराइडे, हॅलोजनीकृत हायड्रोकार्बने व बोरॉन संयुगे असलेली चूर्णेही वापरतात.

मुख्य घटक पोटॅशियम असलेल्या रसायनांची चूर्णे कोणतीही आग विझविण्यास उपयोगी पडतात. मुख्य घटक क्लोराइडे असलेली चूर्णे विशेषत: धातूंना लागलेल्या आगी विझविण्यासाठी

आ. ४. सोडा-अम्ल-अग्‍निशामक. (१) मूठ, (२) अम्लकुपी, (३) धातूची जाळी, (४) प्रोथ, (५) बायकार्बोनेट-विद्राव, (६) धातूची गाळणी. आ. क्र. ५. कार्बन डाय-ऑक्साइडाची कुपी असलेला फेस- अग्‍निशामक. (१) दांडा, (२) संपीडित वायूची कुपी, (३) नळी, (४) तयार झालेला फेस. आ. ६. जल (वायुकुपी)- अग्‍निशामक. (१) दांडा, (२) प्रोथ, (३) वायुकुपी, (४) नळी.

वापरतात. ट्रायमिथॉक्सी बोराक्झाइन या बोरिक अम्ल आणि कार्बनी क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारा पदार्थ) यांपासून बनलेल्या संयुगाच्या रूपाने अग्निशामक पदार्थांत एका अभिनव द्रव्याची भर पडली आहे. हे द्रव्य आगीच्या संपर्काने प्रथम पेटते, परंतु नंतर त्याच्यापासून एक प्लॅस्टिक आवरण निर्माण होते व ते जळत्या भागावर पसरून आग विझविते. मॅग्नेशियमाची आग विझविणे फार कठीण असते. त्यासाठी हे संयुग उपयोगी पडते. बाष्पनशील अग्निशामक पदार्थांत ब्रोमो-क्लोरो डायफ्ल्युओरोमिथेन (बी सी एफ) व ब्रोमो ट्रायफ्ल्युओरोमिथेन (बी टी एम) ही नवीन संयुगे इतर बाष्पनशील अग्निशामक द्रव्यांपेक्षा जास्त कार्यक्षम व कमी विषारी असल्याचे दिसून आले आहे.

अग्निशामक उपकरणे : (१) सोडा-अम्ल अग्निशामके : ही अग्निशामक उपकरणे १० लि. धारणेची असतात. ती वृत्तचित्याकार (दंडगोलाकार) किंवा शंक्वाकार असून १६ते १८ गेजाच्या पोलादी पत्र्याची बनविलेली असतात. त्यांना आतून शिशाचा थर दिलेला असतो. ह्या पात्रांत निर्देश चिन्हांपर्यंत सोडियम बायकार्बोनेटाचा विद्राव भरलेला असतो. संहत (जास्त प्रमाणात असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाची एक सीलबंद काचेची कुपी धातूच्या जाळीत टोपणाजवळ ठेवलेली असते. पात्रास पितळेची एक मूठ असते ती आपटली असता कुपी फुटते व सल्फ्युरिक अम्ल बाहेर पडते. त्याची बायकार्बोनेटाच्या विद्रावाशी विक्रिया होऊन उच्च दाबाचा (सु. ७ किग्रॅ. दर चौ. सेंमी.) कार्बन डाय-ऑक्साइड तयार होते. त्यामुळे सु. ८ मी. लांबीपर्यंत कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त विद्रावाचा फवारा प्रोथातून (फवाऱ्याला योग्य दिशा देणाऱ्या नळीतून) जोराने उडविता येतो व तो सु. मिनिटे टिकतो.

(२) फेस-अग्निशामके : या प्रकारच्या अग्निशामकांमध्ये मुख्यत्वेकरून १३% ॲल्युमिनियम सल्फेट व % सोडियम बायकार्बोनेट ह्या विद्रावांच्या विक्रियेने तयार झालेला कार्बन डाय-ऑक्साइड फेसाच्या रूपाने वापरतात.ॲल्युमिनियम सल्फेटाचा विद्राव आतील पात्रात साठविलेला असून अग्निशामकाच्या बाहेरील भागात % स्थिरकारक (विद्रावातील घटकांची विक्रिया होऊ न देणारे) द्रव्य मिसळून सोडियम बायकार्बोनेटाचा विद्राव ठेवलेला असतो. यांतच फेस देणारे एखादे द्रव्यही मिसळलेले असते. फेस-अग्निशामक उपयोगात आणतेवेळी आतील पात्राचे सील काढून दोन्ही विद्राव मिसळू देतात. शामक उलटा करून हलवितात, त्यामुळे तयार झालेल्या कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त फेसाचा सु. मी. लांब जोरदार फवारा उडतो. जळणाऱ्या इंधनाच्या भांड्यांच्या आतील भागावरच फेसाचा फवारा जाऊ दिला जातो. ही शामके सामान्यपणे दहा लिटर धारणेची असतात. त्यात अंदाजे ८० लि. फेस तयार होऊ शकतो, आणि तो सु. ·५ मिनिटे टिकतो.

फेस-अग्निशामकाचा आणखी एक प्रकार आहे. त्यात रासायनिक विक्रियेने कार्बन डाय-ऑक्साइड किंवा तत्सम वायू कुपीबंद अवस्थेत शामकाच्या आत ठेवलेला असतो (पहा : आ. ५). जलविच्छेदित (पाण्याच्या विक्रियेने घटक सुटे झालेल्या) प्रथिनांसारख्या फेस देणाऱ्या द्रव्यांचा विद्रावही त्यात भरलेला असतो. संपीडित वायू त्यामध्ये मिसळल्याने शामकाला जोडलेल्या रबरी नळीच्या तोंडाशी फेस तयार होतो व तो आगीवर सोडता येतो.

(३) जल (वायुकुपी)-अग्निशामके : यांच्या १० लि. धारणेच्या मुख्य पात्रात केवळ पाणी भरलेले असते. त्याच्या मागे सामान्यत: दर चौ. मी. ला २२७ किग्रॅ. इतक्या दाबाखाली · ग्रॅ. इतका कार्बन डाय-ऑक्साइड वायू भरलेली एक सीलबंद कुपी पिळून घट्ट बसविलेली असते. कुपी आपटून किंवा धक्का देऊन फोडली म्हणजे वायू मुक्त होतो व त्याच्या दाबामुळे अग्निशामकाला जोडलेल्या रबरी नळीच्या तोटीवाटे पाण्याचा जोरदार फवारा उडतो.

(४) बाष्पनशील-द्रव-अग्निशामके : या प्रकारच्या अग्निशामकात कार्बन टेट्राक्लोराइड, द्रवीकृत कार्बन डाय-ऑक्साइड, क्लोरो-ब्रोमो मिथेन, द्रवीकृत मिथिल ब्रोमाइड यांसारखे रासायनिक पदार्थ आग विझविणारे म्हणून वापरलेले असतात. ते पदार्थ आगीवर सोडले म्हणजे त्यांचा तप्त वस्तूशी संपर्क येतो व बाष्पीभवन होते. त्यांच्या वाफेत ज्वलन होऊ शकत नाही व त्यामुळे आग विझते.

(५) कार्बन डाय-ऑक्साइड-अग्निशामके: यांत मुख्यत: द्रवीकृत कार्बन डाय-ऑक्साइड वापरलेला असतो. निरनिराळ्या ते २३ किग्रॅ. पर्यंतच्या धारणेच्या कठीण मँगॅनीज-पोलादाच्या पात्रात तो साठविलेला असतो. पात्राला एक झडप बसविलेली असून तिला लवचिक रबरी नळी जोडलेली असते व ती एक चिमटा बसवून बंद केलेली असते. चिमटा सैल केला म्हणजे दर चौ. सेंमी. ला ५२ किग्रॅ. इतक्या उच्च दाबाने कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर फेकला जातो. द्रवीकृत वायू वातावरणात शिरल्याबरोबर वायुरूप होतो. आगीभोवती त्याचे आवरण झाल्यामुळे आगीचा ऑक्सिजनाशी संबंध तुटतो व ती विझते.

वर उल्लेखिलेल्या नेहमीच्या अग्निशामकांशिवाय आणखीही काही अग्निशामके वापरता आहेत. ती तेल अगर वीज यांच्यामुळे लागणाऱ्या

आ. ७. अग्निशामक दलाची सुसज्ज गाडी. ( १ ) चमक-दिवा, ( २ ) घंटा, ( ३ ) प्राथमिक मदतीसाठी नळाचे भेंडोळे, ( ४ ) चाकांवर बसविलेल्या शिड्या, ( ५ ) शिडी-नियंत्रक यंत्रणा, ( ६ ) शोधक दीप, ( ७ ) शिड्यांची चाके, ( ८ ) नळ व इतर सामग्री ठेवण्याची जागा, ( ९ ) पंप-नियंत्रणदर्शक, ( १० ) दोन पंपांकरिता आगम मार्ग, निर्गम मार्ग व नियंत्रक. आ. ८. यंत्राने फिरविता येणाऱ्या टेबलावरील शिडी. ( १ ) तिसरी शिडी, ( २ ) दुसरी शिडी, ( ३ ) पहिली शिडी, ( ४ ) मुख्य शिडी , ( ५ ) उचालक स्क्रू, ( ६ ) फिरते टेबल, ( ७ ) उत्थापक (जॅक ).

लहान आगी विझविण्यासाठी वापरतात. त्यांमध्ये सोडिमय बायकार्बोनेटाचे बारीक चूर्ण, तसेच थोडे मॅग्नेशियम स्टिअरेट व ट्रायकॅल्शियम फॉस्फेट ही शुष्क रसायने वापरलेली असतात. ही शामके फेस, कार्बन डाय-ऑक्साइड किंवा इतर अग्निशामकांपेक्षा आग विझविण्यास कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे. काही शामकांमध्ये सोडियम किंवा पोटॅशियम बाय-कार्बोनेटाऐवजी काही धातूंची क्लोराइडे आग विझविणारे पदार्थ म्हणून वापरलेली असतात. एका कुपीत उच्च दाबाचा कार्बन डाय-ऑक्साइड ठासून भरलेला असतो. ती कुपी फोडल्यावर वरील पदार्थाचे बारीक चूर्ण उडविता येते. जरूरीप्रमाणे शुष्क चूर्ण पुरविता यावे म्हणून योजना केलेली असते. जितका चूर्णाचा साठा असेल त्याप्रमाणे १५ सेकंदांत किंवा कमी वेळात ते फेकता येते. ह्या चूर्णाच्या माऱ्याने आगीचा ऑक्सिजनाशी संबंध तुटतो व ती विझते. हे चूर्ण विजेचे निरोधक असते. २७ ते -२ से. या तापमानाच्या दरम्यान शामकाच्या फवाऱ्याचा पल्ला  ते ४.५ मी. इतका राहतो. ही अग्निशामके सामान्यतः  ते १० किग्रॅ. वजनाची असतात. चाकावर बसविलेली २३ किग्रॅ. वजनाची चल शामकेही उपलब्ध आहेत.

आणीबाणीच्या क्षणी भरवसा ठेवून उपयोग करता यावा म्हणून अग्निशामक उपकरणांची नियमित निगा राखणे अत्यंत जरूर असते. त्याकरिता फेस व सोडा-अम्ल या प्रकारची उपकरणे एकदा वापरल्यानंतर काळजीपूर्वक साफ करून पुन: भरून ठेवली पाहिजेत. उपकरणांचे हालणारे सर्व भाग (कुपी फोडणारा दट्ट्या वगैरे) व्यवस्थित काम देतात की नाही, याची अधूनमधून चाचणी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे तोटीमध्ये काही अडकणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. तीन महिन्यांतून एकदा साऱ्या उपकरणांचे आतील भाग तपासले पाहिजेत. झाकणाला तडा गेला आहे का, वॉशर्स कठीण झाले आहेत का, छिद्रे घाणीने बंद झाली आहेत का, धातूचा दट्ट्या सैल वा घट्ट झाला आहे का, तसेच अम्लकुपी, तिचे सील इ. गोष्टीही तपासल्या पाहिजेत. वर्षातून एकदा एकूण अग्निशामकांपैकी २५% उपकरणे प्रत्यक्ष वापरून कार्यक्षम आहेत का, हे तपासले पाहिजे. कार्बन डाय-ऑक्साइड वापरलेल्या शामकांच्या बाबतीत दरमहा आग विझविणाऱ्या पदार्थांचे वजन करणे महत्त्वाचे आहे. कार्बन टेट्राक्लोराइड किंवा क्लोरो-ब्रोमो मिथेन यांसारखे बाष्पनशील द्रव वापरणाऱ्या अग्निशामक उपकरणांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. दट्ट्याला वंगण घालणे, द्रवाची गळती होते की काय हे दर आठवड्यास पाहणे, महिन्यातून एकदा आतील द्रवाची रासायनिक तपासणी करणे, द्रव नेहमी ठराविक पातळीपर्यंत ठेवणे, उपकरणाच्या तळाशी साठलेला गाळ व घाण काढणे इ. गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

अग्निशामक दल व दलाची यंत्रणा : प्राथमिक उपायांनी आग विझली नाही म्हणजे अग्निशामक दलाचे साहाय्य घेणे अपरिहार्य असते. अग्निशामक स्थानकाला वर्दी मिळाल्याबरोबर दलाचे कर्मचारी आवश्यक त्या साधनसामग्रीसह आग विझविण्याच्या मोहिनेवर निघतात.

आग विझविणे व आगीत सापडलेल्यांची सुटका करणे या कामांसाठी वापरली जाणारी उपकरणे म्हणजे (१) दुकामी पंप, (२) मोटारीवरील व तिला जोडलेल्या गाड्यावरील पंप, (३) यंत्राने फिरवता येणाऱ्या टेबलावरील शिडी, (४) विमानतळावरील टाकीची गाडी व (५) अग्निशामक वायु-टरबाइने, ही होत.

(१) दुकामी पंप : हा अपमध्य (मध्यापासून दूर ढकलणाऱ्या प्रेरणेच्या)-तत्त्वाप्रमाणे कार्य करतो. ह्यात उच्च दाब वापरून पाण्याच्या सूक्ष्म तुषारांचा धुक्यासारखा फवारा किंवा मध्यम दाब वापरून पाण्याची एकसंध चिळकांडी सोडता येते किंवा असे दोन्ही फवारे एकाच वेळी निर्माण करता येतात. धुक्याचा फवारा सामान्यत: प्राथमिक उपाय म्हणून वापरला जातो. उच्च आणि मध्यम दाबांकरिता पूर्वी निरनिराळे पंप वापरीत असत. पण सुधारून तयार केलेला दुकामी पंप त्या दोहोंइतकाच कार्यक्षम आहे.

(२) अग्निशामक पथकांचे पंप : हे चार-चाकी व मागील आसाला दिलेल्या गतीने चालणाऱ्या मोटारीवर बसविलेले असतात आणि मागची चाके जुळी असतात. पंप अपमध्य-प्रकारचा असून एंजिनाच्या शक्तीने चालतो. त्याची धारणा दर मिनिटास १,८०० किंवा २,७०० लि. पाणी ढकलण्याइतकी असते.

पंप चढविलेल्या गाडीचे बाह्यावरण व झाकण ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूच्या पत्र्याचे केलेले असते. तिच्या बांधणीत लाकूड वापरीत नाहीत. पंपाची गाडी ताबडतोव सुरू होऊन त्वरेने वेगात येऊ शकेल अशी असते. आग विझविणारे कर्मचारी, प्रथमोपचाराची व इतर उपकरणे, यांसह ही गाडी सपाट रस्त्यावरून ताशी ८० किमी. वेगाने भरधाव जाऊ शकते.

आगीच्या स्थानी जाण्याचा मार्ग दुर्गम असेल अशा प्रसंगी ‘लँड रोव्हर’ प्रकारच्या गाड्यावर बसविलेली हलकी अग्निशामक एंजिने व दोन-चाकी गाड्यावर बसविलेला अपमध्य-पंप वापरतात. त्यांची क्षमता कमी म्हणजे दर मिनिटास १,८०० लि. पर्यंतच असते. २,२७० लि. पाण्याने भरलेल्या टाक्या व लहान अपमध्य-पंप असणाऱ्या गाड्या किंवा मोटारीही असतात. पंप स्वतंत्र शक्तीने चालवावा लागतो व त्याची धारणा दर मिनिटास २७० लि. इतकी असते.

पंप व सुटकेंची साधने यांनी सज्ज असलेली वाहने अवजड व मोठ्या आकारमानाची असतात. त्यांची एंजिने १२० पेक्षा अधिक अश्वशक्तीची असतात. त्यांच्यात प्रत्येक मिनिटास ३२०० लि. इतक्या क्षमतेचा अपमध्य-पंप असून १६ मी. लांबीच्या शिड्या असतात व आगीच्या जागी पोचताच त्या इष्ट जागी लावण्याची व्यवस्था असते. पाणी उडविण्याचे मोठे नळ (होज पाईप), शिड्या, प्रथमोपचाराची साधने व कर्मचारी ह्यांसह हे वाहनही सपाट रस्त्यावरून ताशी ८० किमी. वेगाने धावू शकते.

(३) यंत्राने फिरविता येणाऱ्या टेबलावरील शिडी : ही पोलादी व चार विभागांची असून पूर्ण उघड्यावर तिची लांबी ३० मी. होते. वाहनाच्या गाड्यावर बसविलेल्या व गोल फिरविता येऊ शकणाऱ्या एक टेबलावर ती बसविलेली असते. ती यांत्रिक रीत्या चालविता येते व गाडीबाहेर रस्त्यावर उभे राहून कोणत्याही दिशेला ७८ पर्यंतचा कोन करून लावता येते. उंच जागेतील माणसे किंवा वस्तू उतरवून घेण्यासाठी लागणारी उपकरणेही शिडीबरोबर असतात व उंच जागी पाण्याचा झोत सोडावयाचा असल्यास पाण्याचा नळ इष्ट जागी बसविण्याचे उपकरणही शिडीवर असते.

शिडी प्रत्यक्ष वापरताना एखाद्या धोक्याच्या परिस्थितीत सापडली तर तिची हालचाल आपोआप नियंत्रित करणारी स्वयंचलित सुरक्षा-कळ या यंत्रणेत असते, त्या कळीच्या मदतीने चालकाकडून शिडी सुरक्षित स्थितीत आणली जाईपर्यंत शिडीची हालचाल बंद ठेवता येते.

(४) विमानतळावरील अपघातांसाठी टाकीची गाडी : ही विमानतळावर विमानांच्या अपघातात लागलेल्या आगींकरिता वापरतात. विमानांना होणारे अपघात सामान्यत: धावपट्टीपासून बऱ्याच दूरच्या जागी असतात व अपघाताच्या जागी जाताना वाळूतून, चिखलावरून किंवा बर्फावरून गाडीला जावे लागते. म्हणून या गाड्यांना शक्तिशाली पेट्रोल एंजिन जोडलेले असते. गाडी चारचाकी असते. अगदी थोड्या वेळात पुष्कळ फेस तयार होऊ शकेल व फेसाचे नियंत्रण करता येईल अशा प्रकारची उपकरणे या गाडीबरोबर असतात. त्यांच्या साहाय्याने जळत्या पेट्रोलवर किंवा तेलावर फेसाचा जाड थर होईल अशा रीतीने ३० मी. अंतरापर्यंतच्या जळणाऱ्या पदार्थावर वर्षाव करता येईल, अशी व्यवस्था असते. वर्षाव करताना उपयोग करण्यासाठी एक घडीचा मनोरा या गाडीत असतो. या गाडीत प्रत्येकी २२· किग्रॅ. कार्बन डाय-ऑक्साइड वायू असणाऱ्या चार टाक्याही जरूर पडल्यास उपयोग करण्यासाठी असतात.

(५) अग्निशाम वायु-टरबाईन : यांचा उपयोग अलीकडेच होऊ लागला आहे. तथापि त्यांचा पुरेसा विकास झालेला नाही. वायु-टरबाइने आटोपशीर व हलकी असतात व त्यांच्याकडून होणाऱ्या कार्याचे परिमाण मोठे असते. केवळ ९० किग्रॅ. वजनाच्या सहज वाहतूक करता येणाऱ्या टरबाइनाने १३· किग्रॅ. दाबाखाली दर तासास १,००० टनांपेक्षा अधिक पाण्याचा पुरवठा होतो. हे पंप अंतर्ज्वलन (ज्यातील इंधन एंजिनातील सिलिंडरामध्येच जाळले जाते अशा)-एंजिनाऐवजी संपीडित वायूने चालविले जातात. त्यांच्यात एक एक टप्प्याचा अपमध्ये संपीडक असून तो उच्च दाबाने पाणी ढकलतो. जर्मनी आणि इतर यूरोपीय देशांत हे पंप उत्कृष्ट ठरलेले आहेत. पण अद्यापि ते भारतात फारसे प्रचारात आलेले नाहीत.

अग्निप्रतिकारक इमारत : एखादी इमारत आगनिवाराणाच्या दृष्टीने समाधानकारक ठरावयाची तर केवळ आग लागली असता मनुष्यांस तिच्यामधून सुकरतेने बाहेर पडता येईल अशी व्यवस्था असणे आणि प्राथमिक स्वरूपाची आग विझविण्याच्या साधनांची सिद्धता ठेवणे एवढ्याने भागणार नाही, तर आग उद्भवण्याचा संभव आणि ती पसरण्याची शक्यता सर्वांत कमी होईल, अशा योजनाही तिच्यामध्ये असल्या पाहिजेत.

एखाद्या इमारतीची अग्निप्रतिकारक शक्ती ती इमारत प्रमाणभूत मानलेल्या आगीत किती काळ तग धरते यावरून ठरवितात. अग्निप्रतिकारक शक्ति ही, इमारत कोसळण्याची शक्यता, ज्वाला किंवा उष्ण वायू ज्यामधून पार जातील अशी भगदाडे भिंतीना पडण्याचा संभव आणि इमारतीत ज्वालाग्राही पदार्थांचा साठा असेल तर तो पेटण्याइतके किंवा धुमसू लागण्याइतके तापमान वाढण्याची शक्यता, या गोष्टींवर अवलंबून असते.

इमारतीच्या रचनेतील अग्निप्रतिकारक योजना यथायोग्य असतील, तर इमारत जळून जायची, आग फैलावण्याची आणि जीवितनाश होण्याची शक्यता कमी होते. एखाद्या इमारतीला अग्निभय किती आहे ते तिच्या अग्निभारावरून ठरते. इमारत व तिच्यामधील सामानसुमान पूर्णपणे जळाले तर जी उष्णता निर्माण होईल तिचे प्रमाण इमारतीच्या तळजमिनीच्या दर चौरस मीटरास किती पडते, यावरून इमारतीचा अग्निभार निश्चित होतो. वरील योजना इमारतीवर अग्निभार किती आहे यावर अवलंबून असतात.

इमारतींचे वर्गीकरण हे आगीचा प्रकार आणि अग्निभार यांवरून करतात. अतितीव्र, तीव्र, मध्यम, मंद व अतिमंद असे आगींचे पाच प्रकार कल्पिले आहेत. इमारतींच्या अग्निप्रतिकार-शक्तीवरून त्यांचे पाच वर्ग केलेले असून ते उतरत्या क्रमाने तासांच्या रूपात लिहितात. जसे ६, ४, २, १ व अर्धा तास. म्हणजे आगीत सहा तास टिकू शकणाऱ्या इमारतीची अग्निप्रतिकारशक्ती सर्वांत अधिक व अर्धा तास टिकणाऱ्या इमारतीची सर्वांत कमी. इमारतींची रचना व त्यांच्या बांधकामात वापरलेला माल वरील अपेक्षांनुसार असतील, तरच इमारतींचे वर्गीकरण अचूक करता येईल.

घरे, हॉटेले, कचेऱ्या इ. इमारतींचा अग्निभार सर्वात कमी म्हणजे दर चौ.मी.ला सु. २,८०,००० किलोकॅलरी इतपत असतो. कारखान्यांच्या इमारती मध्यम अग्निभाराच्या असून त्यांचा अग्निभार दर चौ. मी. ला २,८०,००० किलोकॅलरींपेक्षा जास्त असतो. मालाचा साठा करणारी गुदामे, कोठारे इत्यादींचा अग्निभार उच्च म्हणजे दर चौ.मी.ला ५,६०,००० किलोकॅलरीपेक्षाही जास्त असतो.

आग लागली असता जीव बचावण्याच्या दृष्टीने आवश्यक योजना म्हणजे इमारतीतून बाहेर पडण्याच्या सोयी होत. याकरिता इमारतीतील रहिवाश्यांना आगीच्या प्रसंगी बाहेर पडणे सुलभ होईल असे दरवाजे, व्हरांडे व जिने यांच्या जागा, आकार आणि संख्या यांची योजना असावी.

एका इमारतीस लागलेली आग तिच्या शेजारच्या इमारतींना विभागणाऱ्या उभ्या व आडव्या भागामधून तसेच त्यांच्या सभोवतालच्या हवेतून संक्रमण होणाऱ्या उष्णतेमुळे त्या दुसऱ्या इमारतींत पसरते. इमारतीच्या बांधकामांचा प्रकार, उंची, भिंतीत व छपरात असणाऱ्या खिडक्या व झरोके इ. उघडे भाग, दोन इमारतींमधील अंतर, इमारतीचा अग्निभार आणि तीमध्ये ठेवलेल्या ज्वालाग्राही मालाचे स्वरूप, यांचा परिणाम आग पसरण्यावर होतो.

इमारतीतील मालाचे आगीपासून रक्षण व्हावे या दृष्टीने इमारतीत योग्य ठिकाणी भिंती घालून विभाग पाडणे, सामानाचा साठा आणि खिडक्या, झरोके मर्यादित ठेवणे आणि अग्निभार लक्षात घेऊन अग्निरोधक मालाचा वापर बांधकामात करणे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

काही विशिष्ट माल अग्नीपासून सुरक्षित ठेवावयाचा असेल, तर तो ज्या खोलीत ठेवला असेल त्या खोलीत ज्वालाग्राही पदार्थाचे एकत्र समुदाय शक्य तितके लहान-लहान असावेत. शिवाय त्या खोलीच्या बाहेर आग लागल्यास ती खोलीतील वस्तूंपर्यंत पोचणार नाही याची काळजी घेतलेली असावी. याकरिता या खोलीच्या निकटवर्ती भागाचा अग्निरोध कमीतकमी या खोलीच्या अग्निभाराच्या प्रमाणात तरी असावा.

तथापि अग्निरोधी खोल्या अथवा दालने इमारतीच्या पायापासूनच थेट वरपर्यंत बांधलेली असणे श्रेयस्कर. त्यांच्या भिंती विटांच्या किंवा सिमेंट काँक्रीटच्या असून जाडी २३ सेंमी. पेक्षा कमी नसावी. दारे किंवा खिडक्या यांमधील अंतर कमीत कमी  मी. असावे आणि त्या अग्निरोधी असाव्यात. भिंतीत ठेवावयाचा सर्वात मोठा उघडा भाग (दरवाजा)  चौमी. पेक्षा जास्त मोठा नसावा. त्याची रुंदी व उंची अनुक्रमे  व  मी. पेक्षा जास्त असू नये व त्यास धातु-आच्छादित कवाडे असावीत.

किरणोत्सर्गी पदार्थाचा साठा असणाऱ्या इमारतीला–उदा., किरणोत्सर्गी उपचाराची इस्पितळे, प्रयोगशाळा वगैरेंना–जर आग लागली तर आग विझविणाऱ्या लोकांना किरणोत्सर्गापासून संसर्ग होऊ शकतो तो टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. प्रत्यक्ष किरणोत्सर्गी पदार्थासमोर आल्याने, नाकातोंडावाटे, शरीरावरील जखमांमधून किंवा पदार्थ पोटात गेल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. याकरिता अशा ठिकाणची आग विझविताना काय काळजी घ्यावी याविषयीच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिलेल्या असतात. धूर, धूळ वा वाफेने भरलेल्या जागेत जाऊ नये, आगीवरून येणारा वारा टाळावा, किरणोत्सर्गी पदार्थावर पाण्याचा प्रत्यक्ष मारा न करता फक्त आजूबाजूची जागा थंड ठेवावी, जखमांना पट्ट्या बांधून त्या पूर्णपणे झाकाव्या अशा स्वरूपाच्या त्या सूचना असतात. अशा आगीचा संपर्क आलेल्या जागेतील व्यक्तींनी प्रारण (तरंग किंवा कण या स्वरूपात उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जाविषयक) तंत्रज्ञाचा सल्ला घेतल्याविना खाणे-पिणे अथवा धूम्रपान इ. करू नये किरणोत्सर्गी पदार्थापासून शक्ततो दूर, जाड आडोशाला राहावे, फूट-तूट झालेल्या वस्तूंना स्पर्श करू नये. सर्व उपकरणे, कपडे इ. प्रारण-संसर्गापासून मुक्त झाले आहेत याची खात्री करून ध्यावी व मगच ते वापरावे.

कारखान्यांची आगनिवारण-व्यवस्था : निरनिराळ्या प्रकारच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांची आगनिवारण-व्यवस्था पुढील गोष्टींवर अवलंबून असते. (१) माल-उत्पादनाच्या प्रक्रिया जेथे केल्या जातात त्या व कच्चा माल साठवण्याच्या इमारतींचे प्रकार. (२) कच्चा माल व प्रक्रिया यांचे स्वरूप म्हणजे कच्चा माल कितपत ज्वालाग्राही किंवा ज्वलनक्षम आहे, प्रक्रियांमध्ये पेट घेणारे पदार्थ निर्माण होतात काय इ. तपशील. (३) आग एखाद्या विशिष्ट भागात कोठे लागण्याची शक्यात आहे व ती कितपत आहे. (४) पाण्याचा उपलब्ध पुरवठा. (५) यंत्राकरिता वापरलेली शक्ती विजेची किंवा वाफेची, दिवे विजेचे की गॅसचे इ. तपशील. (६) आगीच्या प्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग. प्रारंभी विवेचन केलेल्या तत्त्वांनुसार आगनिवारणाच्या योजना आखल्या जातात.

खनिज तेलावर संस्कार करणाऱ्या कारखान्यांतील आगी : कच्चे खनिज तेल व त्यावर संस्कार करून मिळणारे पदार्थ हे बहुतेक सर्व ज्वालाग्राही असल्यामुळे खनिज तेल-शुद्धीकरण-कारखान्यांना आग निवारणाच्या योजना सुसज्ज ठेवाव्या लागतात.

अशा कारखान्यांत कच्चे खनिज तेल ५१० से. पर्यंत तापवून व भंजन करून (तुकडे पाडून) प्राप्त होणारे द्रवरूप व वायूरूप पदार्थ पुढील संस्करणासाठी कारखान्याच्या वेगवेगळ्या विभागांत नळांच्या योगाने न्यावे लागतात. त्या वेळी त्यांचे तापमान ते सहज पेट घेतील त्यापेक्षाही उच्च असते व त्यामुळे वाहक नळ जर गळके असतील तर आग लागण्याचा फार संभव असतो. कारखान्यातील विभाग एकमेकांस या नळांमुळे जोडले गेलेले असल्यामुळे एका ठिकाणी लागलेली आग इतर विभागांतही त्वरेने पसरण्याची आणि स्फोट होण्याची शक्यता असते.

कोणत्याही विभागात आग लागली, तर तेथील कर्मचाऱ्यांनी काय करावयाचे, याचे शिक्षण त्यांना दिलेले असते. आग विझविण्याचा प्रयत्न करणे व कारखान्याच्या अग्निशामक दलास वर्दी देणे याबरोबरच आग पसरू नये म्हणून इतर विभागांशी असलेला संबंध तोडणे हे येथे आवश्यक असते.

पाण्याची धार इष्ट त्या दिशेने सतत उडवितील असे नळ कारखान्याच्या विभागांत बसविलेले असतात. प्रत्येक विभागानजीक कापडी नळ्यांची भेंडोळी व धुक्याच्या रूपात पाण्याचा वर्षाव करता यावा म्हणून आवश्यक ती नळांना जोडावयाची तोंडे पेट्यांत ठेवलेली असतात.

विजेची ठिणगी पडू नये किंवा वस्तूंच्या आघाताने ठिणगी पडू नये याविषयी काळजी घेण्यात येते. धूम्रपान न करणे व कचरा साठू न देणे इ. गोष्टी कसोशीने आचरणात आणणेही आगनिवारणाच्या दृष्टीने श्रेयस्कर असते.

वणवे : हे मुख्यत: उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच आणि विशेषत: जेथे पालापाचोळा पुष्कळ आहे किंवा तेलाचा अंश जास्त असणारी झाडे आहेत अशा भागांत लागतात. पुष्कळदा ते मनुष्याच्या निष्काळजीपणामुळे लागतात. उदा., वनात सुकी पाने किंवा लाकडे योग्य काळजी न घेता जाळणे, स्वयंपाक केल्यावर विस्तव पूर्णपणे न विझविता धुमसणारे कोळसे मागे ठेवणे, विड्यांची जळत असलेली थोटके फेकणे इ. गोष्टीमुळे. कधी कधी आगगाडीच्या एंजिनातून उडणाऱ्या ठिणग्यांमुळेही वणवे लागतात वीज पडूनही ते उत्पन्न होतात. कोणत्याही कारणाने लागलेला वणवा वेगाने, विशेषत: वारा असेल तर त्याच्या दिशेने, पसरण्याचा संभव असतो व तो विझविणे कठीण असते.

वनातील आगी विझविताना पुढील गोष्टी लक्षात घ्यावा लागतात : वणव्याच्या ठिकाणी पोचण्यास मार्ग व आग विझविण्यास लागणारे पाणी ही मिळण्यासारखी आहेत की नाही? नसल्यास ती कशी उपलब्ध करून घेता येतील? वनात वाटा क्वचितच असतात म्हणून लँड रोव्हरच्या गाड्यावर बसविलेली अग्निशामक यंत्रे किंवा त्यांच्यासारखी हलकी व दणकट यंत्रे न्यावी लागतात. कधी कधी पाण्याच्या टाक्याही बरोबर न्याव्या लागतात. वनांची क्षेत्रे मोठी असतात व वर उल्लेख केलेल्या अडचणींमुळे वणवे विझविण्यासाठी कोणते उपाय योजावेत यासंबंधीच्या योजना आधीच कराव्या लागतात. वनाच्या निरनिराळ्या भागांतील वाटांची, पाण्याची व जमिनीच्या स्वरूपाची माहिती देणारे नकाशे तयार करुन ठेवावे लागतात. एखाद्या भागात आग लागली तर नकाशावरून त्या भागाची परिस्थिती चटकन कळून येते व योग्य ते उपाय शक्य तितक्या लौकर व सुलभपणे करता येतात.

समुद्रात प्रवास करणाऱ्या बोटीवरील आग : आग विझविण्याकरिता बोटीत साठविलेले गोडे पाणीच वापरावे लागते व ते फार वापरले गेल्यास बोटीचा तोल जाऊन ती कलंडून बुडण्याची भीती असते. समुद्रात असताना बाहेरून कोणाची मदत मिळणे जवळजवळ अशक्य, बोटीवरील जागा अगदी मर्यादित व त्यामुळे उष्ण वायू, धूर व ज्वाला यांना तोंड देत आग विझविणाऱ्या कर्मचाऱ्यांना हालचाल करण्यास पुरेसा वाव मिळणे फार कठीण असते. शिवाय कर्मचाऱ्यांची संख्याही मर्यादित असते. अशा परिस्थितीत आगीशी झगडत जवळचे बंदर शक्य तितक्या लवकर गाठणे हा एकच मार्ग पुष्कळदा उरतो. बोटींवर वारंवार लागणाऱ्या आगींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

(१) मालाला लागणाऱ्या आगी : ज्याला आग लागू शकेल असा पुष्कळ माल बोटीत, विशेषत: मालबोटीत, असतो. ज्वालाग्राही माल नेणाऱ्या बोटींना आगीचा धोका सर्वांत अधिक असतो. (२) एंजिनाच्या खोलीतील आग: एंजिन किंवा बॉयलर फुटल्याने, तेल पुरविणाऱ्या नळ्या फुटल्याने किंवा टाकीत जास्त तेल होऊन ते बाहेर सांडू लागल्यामुळे आगी लागतात. या तेलाचा बॉयलरच्या भट्टीशी संपर्क झाल्यास तेल पेटते. त्याच्या ज्वाला ताबडतोब विझविल्या नाहीत तर एंजिन बंद पडून बोटीला जेथच्या तेथेच थांबावे लागते. बोट भर समुद्रात असताना अशी परिस्थिती निर्माण होणे

अग्निशामक बोट

फारच धोक्याचे असते. (३) प्रवाशांच्या खोल्या, स्वयंपाकाच्या व इतर खोल्या यांतील आगी : यांच्यातील आगी मुख्यत: जळत्या काड्या व विड्यांची थोटके निष्काळजीपणे इतस्तत: टाकण्यामुळे लागतात. विद्युत् उपकरणे सदोष असली तर त्याच्या ठिणग्या पडूनही विशेषत: लाकडी भागांना आगी लागतात.          (४) तेलवाहू बोटींना लागणाऱ्या आगी : ह्या बहुधा तेल भरताना किंवा काढताना लागतात. कच्चे खनिज तेल नेणाऱ्या बोटींच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर त्यांना आग लागण्याचा विशेष संभव असतो. तथापि तेलवाहू बोटींवरील कर्मचाऱ्यांना काळजीपूर्वक काम करण्याची सवय असते व त्या बोटींना आग लागण्याची दुर्घटना क्वचितच घडते.

बोटीवरील आगी टाळण्याचे व त्या विझविण्याचे उपाय : (१) बोटीत कुठलाही कचरा, कागदाचे चिटोरे, जळत्या सिगरेटींची थोटके इ. राहू न देणे, बोटीवरील विद्युत् उपकरणे वारंवार तपासून ती सुस्थितीत ठेवणे, टाकाऊ माल न स्वीकारणे, जळाऊ किंवा ज्वालाग्राही माल बंदोबस्तात ठेवणे इ. गोष्टी कडकपणे पाळण्याने आग लागण्याचा संभव पुष्कळ कमी होतो. (२) आकस्मिक कारणाने आग लागल्यास तिची ताबडतोब वर्दी देणारी स्वयंचलित यंत्रणा बोटीवर असावी. बोटीत शिडकाव-यंत्रणा असली तर ती लौकर विझविणे सोपे होते. आग विझविण्यासाठी काय केले पाहिजे, याचे प्रशिक्षण खलाशांना देणे आवश्यक असते. अग्निशामक उपकरणे व प्रथमोपचाराची साधने सहज उपलब्ध होतील अशा प्रकारे ती बोटीवर ठेवली पाहिजेत.

समुद्रात प्रवास करणाऱ्या बोटी व बंदरे येथील आगी विझविण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची अग्निशामक बोट वापरतात. ही मोठ्या आकाराच्या टग (खेचणाऱ्या बोटीच्या) प्रकारची असून तिच्यावर ११,५०० ते ४५,००० लि. धारणेचे पंप बसविलेले असतात. पूर्वी बोटी व तिच्यावरील पंप वाफेच्या एंजिनाने चालवीत. आधुनिक बोटीमध्ये अंतर्ज्वलन एंजिन बसविलेले असते. या एंजिनाद्वारे पंपही चालविले जातात. १४ नॉट वेगाने जाणारी ३,५०० लि. धारणेची अशी बोट सु. ३७ मी. लांब व ८ मी. रुंद असून तिचा २·५ मी. भाग पाण्याखाली बुडालेला असतो.

भारतातील अग्निप्रतिबंधक कायदे : भारतात सध्या पुढील कायदे अस्तित्वात आहेत : (१) १९३४ चा पेट्रोलियम कायदा व नियम, (२) कार्बाइड ऑफ कॅल्शियमसंबंधीचे नियम, (३) १८३८ चा सिनेमॅटोग्राफ कायदा व (४) १९४० चा स्फोटकांसंबंधीचा कायदा आणि प्रत्येक राज्यात असलेले तत्सम कायदे.

१९३४ चा पेट्रोलियम कायदा सर्वात महत्त्वाचा व व्यापक असून त्यात नेहमीच्या वापरण्यात आलेल्या अनेक भयावह पदार्थांच्या वैशिष्ट्यांचा विचार केलेला आहे. त्यांचा साठा कसा करावा व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती दक्षता घ्‍यावी याचा तपशीलही दिला आहे. कार्बाइड ऑफ कॅल्शियमसंबंधीचे नियम या कायद्याखालीच येतात व त्यामध्ये अल्कोहॉले, ॲसिटोन, कार्बन डाय-सल्फाइड इ. ज्वालाग्राही रसायनांचा समावेशही केलेला आहे.

१९४०चा स्फोटक द्रव्यांसंबंधीचा कायदा हाही महत्त्वाचा आहे. त्यात या द्रव्यांचा साठा, वाहतूक, निर्मिती, आगीपासून रक्षण आणि सुरक्षितपणे वापर कसा करावा यांसंबंधीचे नियम आहेत. स्फोटक द्रव्यांचा प्रमुख निरीक्षक हा अनुज्ञापक प्राधिकरण (लायसेन्सिंग ॲथॉरिटी) अधिकारी असतो. तथापि जिल्हा दंडाधिकारी हाही काही मर्यादेपर्यंत साठा करण्याकरिता आपल्या अधिकारात अनुज्ञापन (लायसेन्स) देऊ शकतो.

स्फोटकांचा मुख्य निरीक्षक किंवा त्याचा प्रतिनिधी हा स्फोटक द्रव्यांचा साठा अनुज्ञापनात दिल्याप्रमाणे आहे किंवा नाही याची तपासणी करू शकतो. अनुज्ञापनाशिवाय स्फोटकांचे उत्पादन, व्यापार किंवा वाहतूक करणे किंवा अनुज्ञापनात उल्लेखिलेल्या अटी मोडणे हा गुन्हा असून त्याबद्दल जबर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात केलेली आहे.

जगातील व भारतातील आगनिवारण-व्यवस्था : बहुतेक देशांत आगनिवारणाचे कार्य स्थानिक संस्थांच्यावरच सोपविलेले असते. कारण त्यांना आपल्या भागाची व तेथील धोक्यांची चांगली माहिती असते. परंतु सरकारी देखरेखीखाली आणि त्यांच्या अधिकारी वर्गाच्या सहकार्यानेच त्या काम करीत असतात.

काही ठिकाणी हे काम नगरपालिकांच्याकडे सोपविलेले असते तर ऑस्ट्रेलिया, अमेरिका, यांसारख्या काही देशांत हे काम काही व्यावसायिक संस्था किंवा स्वयंसेवकांची पथके करतात. आगविमा-कंपन्यांची स्वत:चीही अग्निशामक दले असतात. ह्या संस्थांवर शासनाचे नियंत्रण असते.

भारतातील आगनिवारण-व्यवस्थेचा इतिहास १५० वर्षांपेक्षा जास्त नाही. भारतातील आगनिवारण-व्यवस्था मुळात ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार चालणाऱ्या कलकत्ता व मुंबई या महत्त्वाच्या बंदरांमध्ये एकोणिसाव्या शतकात सुरू झाली. यूरोपाप्रमाणे भारतातही विमा-कंपन्यांमुळेच आगनिवारण-व्यवस्थेला चालना मिळाली. पोलीस खात्याच्या नियंत्रणाखाली असलेली ‘कलकत्ता फायर ब्रिगेड’ १८६२ मध्ये स्थापन झाली. आग विझविण्यासाठी १८६५ मध्ये पाच एंजिने आयात करण्यात आली. १८७१ मध्ये ज्यूट वेअरहाउस-कायद्यान्वये पाच अग्निशामक स्थानके बांधण्यात आली व त्यांचे नियंत्रण कलकत्ता नगरपालिकेकडे सोपविण्यात आले. १९१० मध्ये सरकारने अग्निशामक दल सुसंघटित करण्यासाठी एक खास समिती नेमली. ‘कलकत्ता फायर ब्रिगेड’ सुधारण्यासाठी १९१२ मध्ये कॅ. वेस्टब्रुक यांची नेमणूक झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील अग्निशामक दलाचे आधुनिकीकरण करण्यात आले.

मुंबई येथील ‘फायर ब्रिगेड’ ची स्थापना १८५० साली झाली. सुरुवातीला घोड्याने ओढावयाची फक्त चार एंजिने दलाकडे होती. सदतीस वर्षानंतर ही संख्या दुप्पट झाली. ह्या दलाची जबाबदारी १८६५ मध्ये नगरपालिका व पोलिस यांच्यात विभागण्यात आली. १८७२ व १८७८ च्या कायद्यांनुसार विमा-कंपन्यांकडून आगनिवारण-व्यवस्थेसाठी सक्तीने रु. ५०० ते १,००० वसूल करीत. १८८८ मध्ये आगनिवारण कर बसविण्यात आल्यावर विमा-कंपन्यांवरील हा भार कमी झाला.

मुंबई व कलकत्ता येथे १९०३ मध्ये स्वयंचलित एंजिने वापरात आली. १९४८ पर्यंत मुंबई व कलकत्ता येथील अग्निशामक दलांत सर्व अधिकारी वर्ग यूरोपीय होता. त्यानंतर मात्र भारतीयांच्या या जागांवर नेमणूका होऊ लागल्या. मद्रास येथे १९०८ मध्ये फायर ब्रिगेडची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर या दलाचे आधुनिकीकरण झाले. १९६७ पासून तमिळनाडू सरकारने आगनिवारण-व्यवस्थेकरिता वेगळे खाते सुरू केले आहे.

नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आगनिवारणाचा समावेश होत असल्यामुळे देशातील अग्निशामक दलांच्या प्रगतीस बराच हातभार लागला. अहमदाबाद, कानपूर, दिल्ली इ. ठिकाणच्या नगरपालिकांच्या विकासाबरोबरच तेथील आगनिवारण-व्यवस्थेचीही प्रगती झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर आगनिवारण-व्यवस्था ही नागरी संरक्षण-संघटनेचा एक महत्त्वाचा भाग झाली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील निरनिराळ्या आगनिवारण-व्यवस्थांची विविध आधुनिक सामग्री व प्रशिक्षित अधिकारी वर्ग यांच्या साहाय्याने पुनर्रचना करण्यात आली.

भारतीय संविधानानुसार आगनिवारण-व्यवस्थेची जबाबदारी घटक राज्यांवर असल्यामुळे देशव्यापी अशी एकच एक आगनिवारण-व्यवस्था अस्तित्वात नाही. भारतातील आगनिवारण-व्यवस्थेचे खालील चार वर्ग केले आहेत :

(१) संरक्षण, रेल्वे, संदेशवहन आणि वाहतूक (नागरी हवाई वाहतूक, गोद्या, टपाल व तार खाते इ.) यांसारख्या केंद्रीय खात्यांच्या देखरेखीखालील (२) राज्य सरकारांच्या प्रत्यक्ष अधिकाराखालील  (३) नगरपालिका, जिल्हा व इतर स्थानिक मंडळे आणि इतर स्थानिक संस्था यांच्या नियंत्रणाखालील आणि (४) खाजगी व्यक्ती, गिरण्या, इतर औद्योगिक व व्यापारी संस्थांच्या मालकीची खाजगी व्यवस्था.

आगनिवारण-प्रशिक्षण – व संशोधन-संस्था : आगनिवारण आणि तदनुषंगाने येणाऱ्या इतर तांत्रिक गोष्टींचे प्रशिक्षण देणाऱ्या व त्यांवर संशोधन करणाऱ्या संस्था सर्व जगभर असून त्यांपैकी खालील संस्थांचे कार्य उल्लेखनीय आहे : (१) डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, अंडर द फायर सर्व्‍हिस रिसर्च अँड ट्रेनिंग ट्रस्ट, लंडन. (२) इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनिअर्स, लीस्टर. (३) फायर सर्व्‍हिस ट्रेनिंग कॉलेज अंडर फायर मार्शल, आँटॅरिओ (कॅनडा). (४) नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन, बॉस्टन (अमेरिका). (५) नॅशनल बोर्ड ऑफ फायर अंडररायटर्स, अमेरिका.

अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी व संशोधन करणारी भारतातील महत्त्वाची संस्था म्हणजे नागपूर येथील ‘नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज‘ होय. भारत सरकारच्या गृहखात्याने चालविलेली आगनिवारणाचे प्रशिक्षण देणारी ही एक मध्यवर्ती संस्था आहे. आग-प्रतिबंध, आग विझविणे, आगीत सापडलेल्यांची सुटका करणे आणि अग्नि-अभियांत्रिकी या विषयांचे सशास्त्र आणि अत्याधुनिक प्रशिक्षण या संस्थेत दिले जाते. १९५६ मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथे या महाविद्यालयाची स्थापना झाली. तथापि नागपूर हे ठिकाण मध्यवर्ती असून तेथे इतर अनेक सोयी आहेत म्हणून १९५७ मध्ये संस्था नागपूरला हलविण्यात आली.

हे महाविद्यालय सुरुवातीपासून अग्निप्रतिबंध आणि अग्निशमन यांचे प्रशिक्षण घेतलेले व कार्यक्षम कर्मचारी तयार करीत आहे आणि नागरिक आणि उद्योगधंदे यांना आवश्यक असलेली आगनिवारण-व्यवस्था देशभर निर्माण करण्यास बहुमोल साहाय्य करीत आहे. अग्निशामक दलात काम करणारा कर्मचारीवर्ग, श्रेष्ठ व कनिष्ठ अधिकारी, उद्योगधंद्यातील सुरक्षाअधिकारी, पोलीस, नागरी संरक्षण निदेशक इत्यादींना उपयुक्त असे कमीअधिक मुदतीचे अभ्यासक्रम या महाविद्यालयात वर्षभर चालू असतात.

महाविद्यालयाच्या अध्यापकवर्गात देशातील प्रमुख आगनिवारण-व्यवस्था-विभागातील अनुभवी व प्रशिक्षित अधिकारी असून त्यांच्या साहाय्याने सर्व तऱ्हेच्या आगविषयक प्रश्नांवर संस्था सल्ला देते.

संस्थेजवळ अत्याधुनिक पद्धतीची आगविषयक उपकरणे, संकटप्रसंगी वापरता येणारी बिनतारी संदेशवहन-साधने, ज्वलनासंबंधी प्रयोग करण्याची साधनसामग्री इ. असून अभ्यासक्रमात त्यांचा प्रत्यक्ष उपयोग केला जातो. संस्थेजवळ तांत्रिक ग्रंथांचा मोठा संग्रह असून दर सहा महिन्यांनी संस्था एक नियतकालिकही प्रसिद्ध करते.

देशातील आगनिवारण-व्यवस्था-विभागाच्या अनेक अधिकाऱ्याचे प्रशिक्षण या महाविद्यालयात झाले आहे, इतकेच नव्हे, तर कोलंबो-योजना किंवा तत्सम शिक्षणयोजनांनुसार परदेशांतील अनेक विद्यार्थी येथे येऊन शिक्षण घेऊन गेलेले आहेत.

पहा: अग्निरोधन.

संदर्भ : 1. Birchall, J. D. The Classification of Fire Hazards and Extinction Methods, London, 1961.

2. British Home Office Publication Ships and Fires,

3. National Fire Protection Association Fire Protection Hand Book, London, 1962.

4. U.K. Home Office, Fire Service Dept. Manual of Firemanship, Parts 1, 4, 5 &amp 7.

5. Williamson, J. J. General Fire Hazards and Fire Prevention, 1958.

गुप्ता, रामस्वरूप (इं.) देशपांडे ज. र. (म.)