तयार कपडे : आपल्या आवडीचे, अंगाला नीट बसणारे, सरळ दुकानात जाऊन खरेदी करावयाचे पँट, शर्ट, कोट यांसारखे कपडे. कापडाच्या दुकानात कापड खरेदी करून त्यातून शिंप्याने आपली मापे घेऊन त्यांनुसार शिवलेल्या कपड्यांपासून भिन्नत्व दर्शविण्यासाठी ही संज्ञा वापरात आहे. अंदाजे १९३० पासून तयार कपडे जरी हिंदुस्थानात मोठ्या शहरांत तुरळक उपलब्ध होत असले, तरी त्यांची आवड व उपलब्धता यांत सु. १९६० पासूनच मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. कापड चांगले दिसणे निराळे व शिवलेला कपडा अंगात चांगला दिसणे निराळे. तयार कपडा घेण्यात आपली अंतिम पसंती वापरता येते,हा या प्रकारच्या कपड्यांतील फायदा होय. शिवाय वाट न पाहता वस्तू लगेच मिळते, हाही आणखी एक फायदा आहेच. तयार कपड्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्यामुळे तसेच सामान्यतःवाया जाण्याची शक्यता असलेल्या कापडाचाही या निर्मितीत योग्य उपयोग करण्यात येत असल्यामुळे त्याच कापडाच्या शिवून घेतलेल्या कपड्यापेक्षा तयार कपडा कधीच महाग पडत नाही, असलाच तर स्वस्तच असतो. या गोष्टींमुळेच आता तयार कपडे घेण्याकडे अधिकाधिक लोक प्रवृत्त होत आहेत.

इतिहास : पुराश्मयुगात यूरोप खंडाच्या उत्तर भागात तेथील लोक कडक थंडीमुळे कातड्याचे शिवलेले कपडे वापरीत असत. कशाने तरी कातड्याला भोके पाडून त्या भोकांतून मग कातड्याची वादी ओवून घेत असत, असे आढळले आहे. दक्षिण यूरोपात त्याच काळातील हाडाच्या बारीक सुया आढळल्या आहेत त्या वनस्पतीचे तंतू किंवा दोरा घेऊन शिवण्यासाठी वापरावयाच्या असाव्यात. नंतरच्या पण पुरातन संस्कृतीत जरी विणाई व भरतकाम या कलांचा विकास झाला होता आणि पुढे कताई व विणाई यांत यांत्रिकीकरण आले, तरी शिवण्याच्या साधनांत सुधारणा झाली नाही.

शिवणाचे यांत्रिकीकरण : शिवणयंत्र शोधून काढण्याच्या प्रयत्नास आठराव्या शतकात सुरुवात झाली. बार्तेल्मी तीमॉन्ये या फ्रेंच यंत्रज्ञांनी आपल्या शोधाचा उपयोग करून यंत्राच्या साहाय्याने लष्करासाठी कपडे बनविण्यास आरंभ केला पण या यंत्रामुंळे बेकारी येईल या भीतीने शिंपी लोकांनी त्याविरुद्ध मोठी निदर्शने केली. तीमॉन्ये यांचा हा प्रयोग अयशस्वी झाला. याच्या पुढचा टप्पा म्हणजे इलाअस हौ या अमेरिकी यंत्रज्ञांचा अडक टाक्याच्या यंत्राचा शोध हा होय. त्यांच्या यंत्रात सुई, दोन दोरे आणि एक धोटा या गोष्टी वापरल्या होत्या. हौ यांनी या यंत्राचे एकस्व (पेटंट) घेतले पण त्याचा प्रसार होऊ शकला नाही. शेवटी अमेरिकी शिंप्यांच्या पसंतीस उतरणारे शिवणयंत्र आयझाक सिंगर यांनी १८५१ मध्ये तयार केले. पुढील काही वर्षात शिंप्याला उपयोगी पडणाऱ्या साधनांत वरील शिवणयंत्राशिवाय कसलीही भर पडली नाही. त्यामुळे दुसरा माणूस कपडा बेतून देईपर्यंत यंत्र चालविणाऱ्याला थांबून रहावे लागे. पण लीड्स (इंग्लंड) येथील जॉन बारन या कल्पक गृहस्थांनी पट्टी कर्तन यंत्र बनवून ही अडचण १८६० मध्ये दूर केली. त्यांनी लाकूड कापण्याच्या पट्टी करवत यंत्रातील करवतीच्या पट्टीचे दाते घासून तेथे धार ठेवली आणि मग या यंत्राच्या साहाय्याने कापडाची थप्पीच कापणे शक्य होऊ लागले. सिंगर व बारन यांच्या शोधांमुळे कपडा कापणे व शिवणे या शिवणकामातील दोन मूलभूत क्रियांचे यांत्रिकीकरण पूर्ण झाले. अमेरिकेच्या रिसी मशिनरी कंपनीने अठराव्या शतकाच्या शेवटी काज करण्याचे यंत्र शोधून काढले. पुढे त्यामध्ये सुधारणा करून सिंगर कंपनीने काजे करण्याची तसेच गुंड्या शिवण्याची यंत्रेही तयार केली. होफमान इस्त्री यंत्राच्या शोधामुळे तयार कपड्यांना जलद इस्त्री करता येणे शक्य झाले. तथापि विशिष्ट प्रकारच्या उच्च दर्जाच्या कपड्यांसाठी अद्यापिही हात इस्त्रीची पद्धत वापरली जाते. या सर्व शोधांमुळे तयार कपडे जलद, अधिकाधिक चांगल्या दर्जाचे आणि विविध प्रकारच्या कापडांचे तयार करता येणे शक्य होऊ लागले.

पुरुषांचे कपडे : कपडे शिवून तयार करण्याच्या धंद्याच्या दृष्टीने विचार करता असे आढळते की, यूरोपातील देशांत आणि त्यानुसार अमेरिकेतही पुरुषांचे कपडे शिवण्यासाठी शिंपी असत. ते मापे घेऊन त्यांनुसार कपडे शिवून देत. बायकांचे कपडे बायका घरीच शिवीतअसत. या पद्धती जवळजवळ सन १८००पर्यंत चालू होत्या व पुढे अगदी हळूहळू त्या प्रचारातून कमी होऊ लागल्या. पुरुषांचे व काही प्रमाणात स्त्रियांचेही कपडे तयार कपड्यांपेक्षा बरेच जास्त महाग पडत असले, तरी ते शिंप्याकडून शिवून घेणे अजूनही चालू आहे. अर्थात ही गोष्ट फक्त समाजाच्या वरच्या थरातील लोकांनाच परवडते.

तयार कपडे विकण्याच्या पद्धतीस अमेरिकेत प्रथम सुरुवात झाली, असे दिसते. जहाजांवरील खलाशांना बंदरात थोडाच वेळ मिळतो आणि कापड खरेदी करून त्याचे कपडे शिवून होईपर्यंत त्यांना वेळ नसतो. म्हणून १८०० पूर्वी काही वर्षे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरगावांत विक्रीसाठी तयार कपडे ठेवण्याची सोय करण्यास सुरुवात झाली. शिंपी गिऱ्हाइकांच्या मागण्या (ऑर्डरी) नोंदवीत, त्यांचे कापड बेतण्यासाठी रोजंदार ठेवीत व कापलेले तुकडे जोडण्यासाठी बाहेर पाठवीत. नंतर काही शिंप्यांनी मंदीच्या मोसमात मागणीशिवाय कपडे तयार करण्यास सुरुवात केली व दुकानात येणाऱ्या गिऱ्हाइकांस असे कपडे ते विकीत पण या पद्धतीत सर्व कामे हातीच होत असत. मच्छिमारी करणाऱ्या विशेषतःव्हेल मासे पकडणाऱ्या बोटींवरील कोळ्यांसाठी पावसाळी कपडे १८०० च्या सुमारास बॉस्टन शहरात बनविण्यात येऊ लागले. पुरुषांचे कपडे बनविण्याचा धंदा १८२२ मध्ये सुरू झाला (पण नेकटाय १८६० पासून बनविण्यात येऊ लागले). कपडे उत्पादक कारखानदारी यातूनच उद्‌भवून तिने १८२८–३० च्या सुमारास चांगले मूळ धरले. याच सुमारास सुरू झालेला लोकरीचे कापड बनविण्याचा घरगुती धंदा व शिवणकामाचे यांत्रिकीकरण या दोन गोष्टींमुळे तयार कपड्यांच्या कारखानदारीला पुष्कळ चालना मिळाली आणि पुरुषांचे तयार कपडे बनविणे सर्रास सुरू झाले. हाताने पडणाऱ्या प्रती मिनिट ३० ते ४० टाक्यांच्या जागी शिवणयंत्रावर ९०० टाके पडू लागले. कपड्यांचा उठाव जलद होऊ लागल्याने यात भरच पडली. अमेरिकेतील यादवीच्या वेळी (१८६१–६५) सैन्याला गणवेष पुरविण्यासाठी ठेके देण्यात आले. त्या वेळी सरकारने गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर पुरुषांच्या कपड्यांच्या मापाचे प्रमाणीकरण करण्यात आले व या प्रमाणीकरणामुळे तयार कपड्यांच्या उद्योगाला खूपच मदत झाली. असे असले तरी युद्धकाळाच्या सुमारासही देशातील कपड्यांच्या एकंदर उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन शिवून घेतलेल्या कपड्यांचेच होते. तयार कपड्यांच्या धंद्याच्या प्रगतीचे पुढील महत्त्वाचे पाऊल यंत्रांच्या सुधारणेमुळे १८७० च्या सुमारास उचलले गेले. कापडाच्या कडा दुमडणारे, घडीला चुण्या घालणारे, कडा आत दुमडून शिवणारे, शिवण न दिसता टीप घालणारे, गुंड्या शिवणारे, काज करणारे, मिनिटाला ४,००० टाके घालणारे वगैरे प्रकारची यंत्रे बनविण्यात आली या सर्व सुधारणांमुळे १९१५ पर्यंत पुरुषांच्या कपड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांच्या वीज वापरात त्याच्या अगोदरच्या २५ वर्षांपेक्षा ६–७ पट वाढ झाली. या सर्व प्रगतीबरोबर या धंद्यातील कामगारांचे कमी वेतन, कामाचे जास्त तास, कामाच्या जागेतील गलिच्छपणा वगैरे गोष्टी कामगार संघटना स्थापून त्यांच्या प्रयत्नांनी दूर केल्या गेल्या.


स्त्रियांचे कपडे : पुरुषांचे कपडे जरी शिंप्याकडून शिवून घेण्याची पद्धती सुरुवातीपासून होती, तरी स्त्रियांचे कपडे त्या स्वतःच घरी शिवीत असत. श्रीमंत कुटुंबातील स्त्रिया आपले कपडे मजुरीने शिवणकाम करणाऱ्या बायकांना घरी बोलावून त्यांच्याकडून शिवून घेत. गरीब वर्गातील बायका तर घरी सूतकाढून, त्याचे कापड विणून त्याचे कपडे स्वतःच शिवीत. ही स्थिती सु. १८०५-०६ पर्यंत अमेरिकेत चालू होती. बायकांच्या कपड्यांच्या बाबतीत पश्चिम यूरोप अमेरिकेच्या पुढे होते. कपड्यांच्या फॅशनींचा जन्म लंडन व पॅरिस येथे होत असे आणि मग कपड्यांनी सजवलेल्या मोठ्या बाहुल्यांच्या द्वारे त्या अमेरिकेत प्रसृत केल्या जात.

महिलांचे तयार कपडे बनवून विक्रीसाठी ठेवण्यास १८०६ च्या सुमारास सुरुवात झाली. आरंभी कोट, डोकीवरचा मोठा रूमाल (मँटीला) यांसारखे बाहेरचे कपडे विकीत. जसजसा धंदा वाढू लागला तसतसे मग इतर कपडेही बनविण्यात येऊ लागले. दुकानदार १८५० पर्यंत स्वतःकपडे बेतीत व मजुरीने बायकांकडून शिवून घेत. या बायका ते कपडे आपल्या घरी नेऊन शिवून आणून देत असत. १८५० सालानंतर मात्र याही धंद्यात हळूहळू यांत्रिकीकरणाने प्रवेश करण्यास सुरुवात केली. या उद्योगाच्या वाढीला एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत मध्य व पूर्व यूरोपीय देशांतील कसबी कामगारांच्या अमेरिकेत येण्यामुळे जोर चढला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इकडे बायका कापलेल्या तुकड्यांची बोचकी काखोटीला मारून शिवण्यासाठी घरी नेत होत्या, तर तिकडे पुरुष पाठीवर शिवणयंत्रे घेऊन कामाच्या शोधात फिरत असत, असे दृश्य दिसत असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीसही महिलांच्या तयार कपड्यांच्या धंद्याला महत्त्व मिळाले नव्हते. पण १९१० च्या सुमारास स्त्री–पोशाख तयार करणाऱ्यांनी परकराला पोलके जोडण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून धंद्याला तेजी यायला लागून १९१४ च्या सुमारास तो पुरुष–पोशाखाच्या धंद्याच्या पुढे गेला. १९१८ पर्यंत या धंद्याचा व्याप खूपच वाढला.

अमेरिका व ब्रिटनसहित यूरोप खंड यांचा घनिष्ट संबंध होता आणि त्यांमध्ये दळणवळणही आताप्रमाणेच खूप असे, त्यामुळे अमेरिकेतील तयार कपड्यांच्या धंद्याच्या तेजीचे प्रतिबिंब तेथे उमटत राहिले असल्यास नवल नाही. चीन, रशिया व पूर्व यूरोपीय देश वगळून जागतिक तयार कपड्यांच्या उत्पादनातील अमेरिका व कॅनडा यांचे मिळून ५२% आणि यूरोपीय समाइक राष्ट्रांचे ३५·८% वाटे आहेत. लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया, ओशिॲनिया यांतील कुठल्याही भागाचे उत्पादन ५% पेक्षा जास्त नाही.

प्रकार : (अ) पुरुषांचे–शर्ट, बुशशर्ट, बुशकोट, कोट, पँट, जाकीट, नाइट सूट, नाइट–गाउन, टाय इत्यादी (आ) स्त्रियांचे–शर्ट, कोट, ब्लाऊज, काचोळी (ब्रेसियर), फ्रॉक, स्कर्ट, गाउन, परकर, स्लॅक्स, जीन्स इत्यादी (इ) मुलांचे–वरीलपैकी मुलामुलींचे लहान आकारमानाचे (ई) इतर–पोहण्याचे कपडे, स्वेटर, ॲप्रन, विविध व्यवसायांतील कपडे, खेळाडूंचे कपडे इत्यादी.

तयार कपडे सुती, लोकरी, रेशमी तसेच पॉलिएस्टर, नायलॉन इ. कृत्रिम तंतूंचे आणि त्यांच्या कापसातील विविध प्रमाणांतील मिश्रणाचे असे सर्व प्रकारचे बनविले जातात.

निर्मिती : तयार कपड्यांच्या निर्मितीची मूलभूत तत्त्वे म्हणजे माणसाची मापे प्रमाणीकरणाने काही थोड्या ठराविक मापांत बसविणे, त्यामुळे शक्य होणारे महोत्पादन व त्यावरून ठरणारी कमी किंमत ही तीत होत. पैकी प्रमाणीकरण हे सांख्यिकीय पाहणीवर आधारलेले असून महोत्पादन तांत्रिक प्रगतीवर अवलंबून आहे. कमी किंमत ही वरील दोन गोष्टींचा परिपाक आहे.

मापांचे प्रमाणीकरण : निर्मितीच्या दृष्टीने तयार कपड्यांचे दोन प्रकार मानण्यात येतात. (१) बाह्यवस्त्रे : कोट, पँट, स्कर्ट, शेरवाणी इत्यादी. (२) अंतर्वस्त्रे : शर्ट, कुडता, ब्लाऊज, फ्रॉक, झोपताना घालावयाचे पायजमे इत्यादी. ग्राहक व विक्रेता यांचे लक्ष विशेषतःबाह्यवस्त्रांकडे जाते. किंमतीने ते महाग असतात पण ते घेणे व विकणे दोघांनाही फायद्याचे असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बाह्यवस्त्रांनाच जास्त महत्त्व आहे. यामुळे बाह्यवस्त्रांच्या मापांची प्रमाणित कोष्टके तयार करण्यात आलेली आहेत व अशी कोष्टके तयार करणे हे तज्ञांचेच काम आहे. अंतर्वस्त्रे व खेळाडूंचे कपडे यांच्या मापांच्या बाबतीत पुष्कळच विविधता असल्यामुळे त्यांची प्रमाणभूत कोष्टके तयार करण्याकडे तितकेसे लक्ष देण्यात आलेले नाही.

उंची, वजन आणि घेर यांनुसार माणसांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करतात : (१) सर्वसाधारण शरीराची माणसे, (२) किंचित स्थूल शरीराची माणसे, (३) स्थूल : छाती व कंबर यांची मापे साधारणतः सारखी असणारी माणसे, (४) ढेरपोटी : कमरेची मापे छातीपेक्षा जास्त असणारी माणसे, (५) खेळाडू आणि व्यायाम करणारी : कमरेपेक्षा छातीची मापे जास्त असणारी माणसे. उंचीच्या दृष्टीने उंच, मध्यम व ठेंगू असे तीन पोटविभाग पाडतात.

पुरुषांच्या बाह्यवस्त्रांच्या आणि शर्टच्या प्रमाणित मापांचे नमुने कोष्टक क्र. १ व २ मध्ये दिलेले आहेत.


कोष्टक क्र. १. पुरुषांच्या बाह्यवस्त्रांची मापे (सेंमी.मध्ये) 

माणसाची उंची 

छाती 

बाही (पाठीच्या मध्यापासून) 

कंबर 

बैठक (नितंब) 

पायाची आतील उंची 

पँटची उंची 

सर्वसाधारण १६५ 

१७० 

८६·५ ९१·५ ९६·५ 

७७·५ 

७८·५ 

८०·० 

७३·५ ७८·५

 ८३·० 

९१·५ 

९६·५ 

१०१·५ 

७६·० 

७७·५ 

७८·५ 

१०१·५ 

१०४·० १०६·५ 

कोष्टक क्र. २. पुरुषांच्या शर्टची मापे (सेंमी.मध्ये) 

माणसाची उंची 

छाती 

शर्टची उंची 

खुबा 

बाही 

हातोपे (कफ) 

गळा 

सर्वसाधारण 

१६५ 

१७० 

८६·५ 

९१·५ 

९६·५ 

७२·५ 

७३·५ 

७५·० 

४२·० 

४४·५ 

४७·० 

५८·५ 

५९·० 

५९·५ 

२३·० 

२३·५ 

२४·० 

३७·० 

३८·० 

३९·५ 

 महोत्पादन : अशा तऱ्हेने मापांचे प्रमाणीकरण करून तयार कपड्यांची गटवारी कमी केल्याने मापांच्या एकाच गटाचे पुष्कळ कपडे तयार करणे शक्य होते. वस्तूंचे महोत्पादन हे केवळ यंत्रानीच शक्य होते. कपडा तयार होईपर्यंतचे टप्पे व त्यांसाठी वापरली जाणारी यंत्रे यांची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.

कापड कापणे : जो कपडा तयार करावयाचा असेल त्याच्या वेगवेगळ्या भागांच्या आकाराचे जाड पुठ्ठ्याचे तुकडे (कोरा) प्रथम कापून घेतात. नंतर कापावयाच्या कापडाचे ५० ते ३०० तुकडे घेऊन त्यांची नीट थप्पी रचतात. मग वरील कोर वरच्या कापडावर ठेवून त्याची परिरेषा (बाह्यरेषा) त्यावर आखून घेतात व सबंधच्या सबंध थप्पी एकाच वेळी यंत्राने कापतात. शिवणकामातील सर्व आधुनिक यंत्रे विजेवर चालतात आणि ती काही प्रमाणात स्वयंचलितही असतात. कापड कापण्याच्या यंत्रांचे दोन वर्ग आहेत : (अ) अखंडित (काम न थांबता) कार्याची व (आ) अंतरित (काम बंद–चालू) कार्याची. पहिल्या वर्गात पुढील प्रकार आहेत : (१) पश्चाग्र गती असलेल्या उभ्या सुरीची, (२) गोल पात्याची (धारेच्या चाकाची) आणि (३) पट्टी सुरीची (पूर्वी उल्लेख आलेली). अंतरित कार्याच्या यंत्रांचे पुढील प्रकार आहेत : (१) मुद्रा  कर्तक यंत्र व क्लिकर यंत्र, (२) शियर (छापखान्यातील कागद कापावयाच्या यंत्रासारखे) यंत्र, (३) सुरी आणि (४) नॉच व ड्रिल (कापड कापताना कापावयाच्या आकाराला सोयीस्कर वाटेल ते यंत्र कापणीसाठी वापरले जाते). ख्रुसस अँड रायशर्ट या कंपनीचे विजेचे, गोल पात्याचे यंत्र १६० मिमी. जाडीची थप्पी एका वेळी कापू शकते तसेच पश्चाग्र गतीचे कापणी यंत्र ६५ ते ३०० मिमी. जाडीच्या थप्प्या कापू शकते.

तुकडे जोडणे : तुकडे कापून घेतल्यावर ते एकत्र शिवून निरनिराळे भाग (हात, पाठ वगैरे) तयार करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या यंत्रांचा ताफा तयार असतो यंत्राची पायफळी अलगद दाबली की, यंत्रांची सुईभराभर शिवीत जाते.

भागांची जुळणी व इस्त्री : वरील वेगवेगळ्या भागांची जुळणी करण्यात येते. कॉलर असल्यास तीही लावून झाली की, कपड्याला काजे करणे, बटणे लावणे वा झिप बंधक लावणे या क्रियाही नंतर यंत्रानीच केल्या जातात. यांनतरचा टप्पा म्हणजे कपड्याला इस्त्री करण्याचा. यासाठी वाफ व हवेच्या दाबावर चालणारी यंत्रे वापरतात. इस्त्रीनंतर कपडा पूर्णपणे तयार होतो.

अलीकडे कायम इस्त्री (घडी) नावाचा एक प्रकार निघालेला असून त्याचा उपयोग सुती कपड्यासाठी करतात. ज्या कापडापासून कपडा बनवावयाचा त्या कापडावर रेझिनाची प्रक्रिया केली जाते. कापडातील जलांश ९०° ते १००° से. तापमानाला काढून टाकण्यात येतो. या कापडाला ‘संवेदनक्षम’ कापड म्हणतात. या कापडाचा कपडा तयार झाल्यावर त्याला पाहिजे त्या ठिकाणी १५०° से. तापमानात इस्त्री केली की, ती (घडी) कायम राहून पुनःपुन्हा इस्त्री करावी लागत नाही.

भारतातील उद्योग : भारतातील निरनिराळ्या भागांत राहणाऱ्या लोकांच्या चालीरीती व आवडी–निवडी पुष्कळच भिन्न असल्याने तयार कपड्याच्या उद्योगाची प्रगती येथे फारच मंद गतीने झाली. पहिल्या महायुद्धापूर्वी मद्रास आणि अलीपूर (कलकत्ता) येथे सैन्याकरिता लागणारे कपडे तयार करणारे दोन कारखाने होते व त्यांची एकूण उत्पादनक्षमता मासिक ४०,००० कपडे एवढी होती. पहिले महायुद्ध चालू असताना तयार कपड्यांचे १८ तात्पुरते कारखाने सैन्याकरिता काढण्यात आले. १९३१ मध्ये शाहजहानपूर येथे फक्त महिन्याला ७५,००० कपडे तयार करणारा एक कारखाना होता.


इ. स. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर शाहजहानपूर येथील कारखान्याखेरीज पेरांबूर (मद्रास) व मोगलपूर (लाहोर) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांचे कपडे तयार करण्याकरिता दोन लहान कारखाने काढण्यात आले. त्यावेळी ब्रह्मदेश, द. आफ्रिका व अतिपूर्वेकडील देशांना तयार कपडे निर्यात केले जात होते. महायुद्धाच्या काळात सैन्याच्या कपड्यांची मागणी अतिशय वाढली. त्यामुळे शाहजहानपूर येथील कारखान्याचा विस्तार करण्यात आला, तसेच लाहोर, मद्रास, कलकत्ता, आग्रा, मुंबई इ. ठिकाणी एकूण ८ कारखाने काढण्यात आले. यूरोप, आशिया व आफ्रिका येथील दोस्त राष्ट्रांच्यासैन्याला तयार कपड्यांचा पुरवठा प्रमुख्याने भारतातूनच झाला. या महायुद्धकाळात भारतामध्ये एकूण ४० कोटी तयार कपडे बनविण्यात आले. डिसेंबर १९४४ मध्ये निरनिराळ्या लष्करी तयार कपड्यांच्या कारखान्यांत कुशल, अर्धकुशल, अकुशल आणि पर्यवेक्षक असे मिळून एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सु. ३३,००० होती. याशिवाय निरनिराळ्या कंत्राटदारांतर्फे सु. २ लक्ष लोक संबंध देशभर काम करीत होते.

पहिल्या महायुद्धानंतर १९२० च्या सुमारास मुंबई येथे महिंद्रकर ब्रदर्स यांनी सामान्य नागरिकांना लागणारे तयार कपडे विकण्याचे दुकान काढले पण ते चार–पाच वर्षात बंद झाले. पण या प्रयत्नांमुळे लहान मुलामुलींचे कपडे शिवून ते विकण्यास चालना मिळाली. १९३९ च्या सुमारास काही मध्यम कारखाने मोठ्या शहरांत निघाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर तयार कपडे करण्याचा धंदा मूळ धरू लागला व त्याची हळूहळू वाढ होऊ लागली. सॅम्सन या कंपनीने बंगलोर येथे प्रथम तयार कपड्यांचा कारखाना काढला. १९६० पर्यंत भारतातील तयार कपडे बनविणारे बहुतेक कारखाने लहान स्वरूपाचे होते. मोठे म्हणण्यासारखे फार थोडे होते. पुढे भारतातील शहरांतून व परदेशातून तयार कपड्यांना मागणी येऊ लागल्याने या धंद्याची वाढ होऊ लागली. १९६८ मध्ये मफतलाल, टाटा, बाँबे डाईंग, रेमंड, बिन्नी इत्यादींसारख्या मोठ्या कापड गिरण्यांनी तयार कपडे बनविण्यास स्वतःच सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी सुती कपडे बनविले. पुढे त्यांनी लोकर, रेशीम, कृत्रिम तंतू व मिश्रित तंतू यांचेही कपडे बनविण्यास सुरुवात केली. बाँबे डाईंग, डीसीएम, टाटा इ. कापड गिरण्या असे कपडे तयार करतात.

इ. स. १९७३ अखेर भारतात तयार कपड्यांचे सु. १२०० कारखाने होते. त्यांपैकी सु. १०० मोठ्या स्वरूपाचे होते. या सर्व कारखान्यांमध्ये सु.७५ कोटी रुपयांचे सर्व प्रकारचे मिळून कापड वापरून दर वर्षी सु. १२५ कोटी रुपयांचे कपडे तयार होतात. भारतातील कारखान्यांपैकी सु. ६०% कारखाने महाराष्ट्रात असून त्यांपैकी निम्मे मुंबईत व उरलेले पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर इ. ठिकाणी आहेत. बंगलोर, कलकत्ता, दिल्ली, मद्रास इ. शहरांतून सु. ४०% कारखाने आहेत.

तयार कपड्यांचा जागतिक व्यापार प्रतिवर्षी सु. ६०० कोटी डॉलरचा आहे. भारतातून त्याच्या १% हून कमी तयार कपड्यांची निर्यात होते. तयार कपड्यांची निर्यात वाढावी म्हणून केंद्र सरकारने कॉटन टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (मुंबई) या मंडळामार्फत त्यांची निर्यात करण्याचे ठरविले. या मंडळाने जून १९७० मध्ये रेडिमेड गार्मेंट पॅनेलची स्थापना केली. तयार कपडे निर्यात करणाऱ्यांना या मंडळाकडे (पॅनेलकडे) नावे नोंदवावी लागतात. सध्या या मंडळाकडे १,१५० निर्यातदारांची नावे नोंदविण्यात आलेली असून त्यांपैकी फक्त ६०० जण तयार कपडे बनवितात. या मंडळाशिवाय हँडलूम एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (मद्रास), सिल्क अँड रेयॉन टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (मुंबई) आणि वुल अँड वुलन्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (मुंबई) ही मंडळेही तयार कपड्यांच्या निर्यातीस मदत करतात.

भारतातून ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, स्कँडिनेव्हिया, रशिया, फ्रान्स प. जर्मनी, हॉलंड, इटली, स्वित्झर्लंड, वेस्ट इंडिज, केन्या, सूदान, इथिओपिया, मध्य पूर्वेकडील देश इ. देशांना कपडे निर्यात केले जातात. निर्यात होणाऱ्या तयार कपड्यांत पुढील प्रकारांचा समावेश आहे. : शर्ट, बुशशर्ट, पँट, कुडता, जाकीट, प्रवासी जाकीट, पायजमा, नाइट गाउन, नाइट शर्ट, खलाश्यांची पँट इ. पुरुषांचे कपडे ब्लाऊज, शर्ट, स्लॅक्स इ. स्त्रियांचे कपडे लहान मुलांचे कपडे खेळाडूंचे कपडे डॉक्टरांचे कोट होजिअरी विशेषतःहातमागाच्या सुती व रेशमी तयार कपड्यांना परदेशात जास्त मागणी आहे. निर्यात होणाऱ्या मालाची योग्य तपासणी केल्यानंतरच निर्यात करण्यात येते.


कोष्टक क्र. ३.मध्ये भारतातून निर्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या तयार कपड्यांच्या किंमतीचीआकडेवारी  

वर्ष 

सुती कपडे 

कृत्रिम तंतूंचे कपडे 

लोकरी कपडे 

रेशमी कपडे 

मिश्र कपडे 

एकूण 

१९६८ 

१९६९ 

१९७० 

१९७१ 

१९७२ 

१९७३ 

१९७४ 

१९७५ 

१९७६

(जुलै

अखेर) 

३०३ 

४३७ 

७७४ 

१,१७७ 

२,४८२

१ 

१२९ 

९० 

६० 

२३ 

८७ 

५१ 

५७ 

३३ 

३० 

२० 

४० 

५३ 

५५ 

८५ 

९९ 

१४२ 

१७७ 

२२७ 

३१२ 

५१० 

७९९ 

१,१५१ 

१,५५२ 

२,९३२ 

६,३७७ 

९,५०० 

१८,४००

 ८,७२५ 

१९७३ ते ७६ या काळातील फक्त एकूण निर्यातीची आकडेवारी दिली आहे.

या धंद्याची जरी वाढ होत असली, तरी तयार कपडे वापरण्याचे प्रमाण अद्यापिही भारतात अल्पच आहे. भारताच्या निरनिराळ्या राज्यांतही हे प्रमाण वेगवेगळे आहे. मुंबई येथील सिल्क अँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च ॲसोसिएशन या संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, पंजाबी लोकांत शे. ३०, तर गुजराती आणि इतर उत्तर भारतीय लोकात शे. १५ लोक तयार कपडे वापरतात. महाराष्ट्रीय लोकांत हे प्रमाण वरील दोन्हींच्या मधे आहे.

द क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स ॲसोसिएशन ऑफ इंडिया : तयार कपड्यांच्या धंद्याची वाढ व्हावी, त्यास संघटितपणा प्राप्त व्हावा, निर्यातीला चालना मिळावी म्हणून सरकारकडून काही सोयी आणि सवलती उपलब्ध करून घेणे, धंद्याचे व्यावहारिक प्रश्न व अडचणी यांचे निवारण करणे, तयार मालाची प्रत राखणे इ. हेतूंसाठी १९६३ मध्ये मुंबई येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. तयार कपडे बनविणारे भारतातील सर्व उत्पादक व तसेच निर्यातदार या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेला केंद्र व महाराष्ट्र सरकार यांची मान्यता आहे. कॉटन टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, वुल अँड वुलन्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, भारतीय मानक संस्था इ. मंडळांवर अथवा संस्थांत या संस्थेला प्रतिनिधीत्व देण्यात आलेले आहे.

धंद्याच्या वाढीच्या दृष्टीने ही संस्था विविध जागतिक प्रदर्शनांत भाग घेते. कुशल कारागीर तयार करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्मेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कुर्ला (मुंबई) या शिक्षण संस्थेला ॲसोसिएशनने यंत्रे दिलेली आहेत व त्या यंत्रांच्या साहाय्याने धंद्यासाठी लागणारे कुशल कारागीर शिकविण्यात येतात. संस्थेतर्फे क्लोदिंग न्यूज बुलेटिन ही मासिक पत्रिका प्रसिद्ध करण्यात येते.

देसाई, जे. जे. (इं.) ओगले, कृ. ह. (म.) साळवी, अ. स.

कापड कापण्याचे यंत्र


मिनिटाला ५,००० टाके घालणारे विद्युत् शिवणयंत्र

भरतकाम करणारे स्वयंचलित यंत्र.

नागमोडी भरतकाम (झिगझॅग) करणारे यंत्र.


कडा एकमेकात दुमडून आतून शिलाई करणारे यंत्र

काजी करणारे अर्ध-स्वंयचलित यंत्र

गुंड्या लावणारे अर्ध-स्वयचलित यंत्र पँटच्या बैठकीला इस्त्री करणारे यंत्र