कात : मुख्यतः खैर वृक्षाच्या (ॲकेशिया कॅटेच्यू) लाकडापासून काढलेला अर्क गाळून वाळविल्यावर जो धन पदार्थ मिळतो त्यास `कात’ असे म्हणतात. खैराशिवाय थोडया प्रमाणात ताज्या सुपाऱ्या, आवळी फळ, गॅंबिअर झाडाची (युन्कॅरिया गँबीर) पाने कात तयार करण्यासाठी वापरतात. खैर झाडापासून `कात’ व `कच्छ’ असे दोन पदार्थ मिळतात. ज्यामध्ये कॅटेचीन जास्त प्रमाणात असते त्यास `कात’ व ज्यामध्ये कॅटेच्यू टूनिक अम्ल जास्त असते त्यास `कच्छ’ असे म्हणतात. भारतामध्ये कात विड्यातून खातात तसेच त्याचा औषधातही उपयोग करतात. कच्छचा उपयोग कपडे रंगविण्यासाठी व कापड छपाईमध्ये तसेच गॅंबिअर काताऐवजी कधीकधी करतात. सामान्यतः `कात’ आणि `कच्छ’ या दोहोंनाही कात म्हणूनच ओळखले जाते. खैर वृक्ष भारत व ब्रह्मदेश या देशांतील जंगलात आढळतात.

सरळ झाडापेक्षा वेड्यावाकड्या झाडांपासून कात जास्त मिळतो. नुकत्याच तोडलेल्या झाडापासून मिळणाऱ्या काताचे प्रमाण वाळलेल्या झाडापेक्षा जास्त असते. मेलेल्या झाडापासून कात निघत नाही. शरद ऋतूत व हिवाळ्यात तोडलेल्या झाडांपासून कात जासत मिळतो. झाडाचा बुंधा ६०-१२० सेंमी. व्यासाचा झाल्यावर व झाडावर पांढऱ्या रेषा किंवा ठिपके दिसल्यास ती तोडतात. एका झाडापासून त्याच्या लाकडाच्या ७%   कात मिळतो.

खैर झाडामध्ये एल एपिकॅटेचीन, रॅसेमिक ॲककॅटेचीन व कॅटेच्यू टूनिक अम्ल ही संयुगे असतात. जून झाडात `खीरसळ’ हे करडे पांढरे स्फटिकीय चूर्ण सापडते. त्यात प्रामुख्याने एल एपिकॅटेचीन हे संयुग आढळते. कात तयार होत असताना एपिकॅटेचिनाचे रॅसेमिक ॲककॅटेचिनामध्ये रुपांतर होते. ते थंड पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे), तर उष्ण पाण्यात विद्राव्य असून पाण्याच्या सानिध्यात त्याचे ऑक्सिडीकरण  [ऑक्सिडीभवन] होऊन कॅटेच्यू टूनिक अम्ल बनते.

उत्पादन:खैरकात : कुटिर उद्योगात हा कात एकाच प्रकाराने करतात. यामध्ये कच्छ मिळविण्याचा प्रयत्न केला जात नाही. साधारणपणे नोव्हेंबर-फेब्रुवारीमध्ये कात तयार करण्यात येतो. खैराची झाडे तोडून त्याचे बारीक बारीक तुकडे करतात. त्यावरील आवरण काढून टाकतात व आतील लाल लाकडाचे आणखी बारीक आकाराचे तुकडे करतात. हे तुकडे मातीच्या भांड्यात पाण्याबरोबर शिजवून त्यातील अर्क काढतात. ही मातीची भांडी भट्टीवर किंवा चुलवणवर एका ओळीत ठेवतात. साधारणः एकाच वेळी सु.२५ भांडयांचा उपयोग करतात. प्रत्येक भांडयात सु.७ किग्रॅ.तुकडे भरतात.

लाकडापासून पहिला अर्क काढण्यास तीन तास लागतात. तीन तासांनंतर भांड्यातील पाणी ओतून काढतात व दुसरे पाणी घालून परत शिजवितात. असे ३-५ वेळा पाणी बदलतात. शेवटच्या खेपेचे पाणी नवीन लाकडाबरोबर शिजवितात. अर्कयुक्त पाणी मसलिन कापडातून गाळतात व या विद्रावाची संहती (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण) मातीच्या भांडयात वाढवितात. नंतर हा विद्राव बरेच दिवस तसाच ठेवतात. नंतर तो वाळू व मातीयुक्त स्तर असलेल्या भांडयात ठेवून किलतानाने बंदिस्त करतात व १५ दिवस तो तसाच ठेवतात. बिद्रावातील विद्राव्य टूनीन बाहेर पडते व कात आत राहतो. त्याचे ठोकळ्यांत रुपांतर करुन त्याच्या आवश्यक त्या आकाराच्या वडया करतात. ह्या वडया सावलीत वाळवितात. उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये काताला चव येण्यसाठी विद्रावात सेमुळ झाडाची लागडे एक आठवडाभर ठेवतात व नंतर कात घट्ट करतात.

   

कात तयार करण्याची वरील पध्दत वेळखाऊ व खर्चिक असून तयार होणाऱ्या कातात टूनिनाचे प्रमाण वेगवेगळे असते, तसेच कातात मलिनता जासत असते. शिवाय त्यात कच्छ हा उपपदार्थही मिळत नाही. डेहराडून येथील `फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट’ मध्ये झालेल्या संशोधनानुसार कात बनविण्याच्या पध्दतीत सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारलेल्या पध्दतीत कच्छही मिळतो. या पध्दतीमध्ये लाकडाचे तुकडे (२५ किग्रॅं. पर्यंत) तांब्याच्या जाळीवर ठेवतात. ही जाळी तांब्याच्या भांडयात ठेवलेली असते. त्यात पाण्याच्या साहाय्याने (३० लि. पाणी) अर्क काढतात. पहिला अर्क निघण्यास दिड ते दोन तास लागतात. नंतर दोन वेळा अर्क काढतात. यावेळी तीस मिनिटे लाकडे शिजवितात. तिसऱ्या वेळेचा अर्क सौम्य असतो. तो नवीन लाकडाबरोबर वापरतात. सर्व अर्क एकत्रित करुन उघडया काहिलीत त्याची संहमी (घनता १.०७-१.१३ ग्रॅ./घ.सेंमी. होईपर्यंत) वाढवितात व नंतर अर्क २-३ दिवस तसाच ठेवतात. यावेळी काताचे स्फिअक बनतात. ते काढून घेतात व दुसऱ्यांदा स्फटिक मिळवितात. सर्व स्फटिक पाण्याने धुवून ते कॅन्‌व्हासमधून गाळून हातदाब यंत्राने दाबून वडया तयार करतात. प्रथम वडया सावलीत व नंतर ४०  से. वर वायूच्या साहाय्याने जाळीवर वाळवितात. वरील सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास एक आठवडा लागतो व मिळणाऱ्या मालाचा दर्जा उत्तम असतो. मूळ विद्रावाची संहती तांब्याच्या काहिलीत वाढवून, तो विद्राव लाकडी चौकटीत ओततात. यामुळे कच्छ उत्तम प्रतीचा मिळतो. एकाच झाडाच्या लाकडापासून एकाच वेळी ३-३.५%  कात व ८-१०% कच्छ मिळतो.

  

मोठया प्रमाणावर कात बनविण्याचे काम यांत्रिक पध्दतीने करतात. मोठया प्रमाणात अर्क काढण्यासाठी तांब्याचे ऑटोक्लेव्ह (दाबाखाली शिजविण्याचे पात्र) वापरतात. यामध्ये एका ऑटोक्लेव्हमधून पाणी दुसऱ्यात जाण्याची योजना केलेली असते व अशा रीतीने १२ तासांत अर्क निघतो. अर्काची संहती निर्वातावस्थेत वाढवितात व प्रशीतकामध्ये तो थंड करुन काताचे स्फिअक मिळवितात व ते स्फटिक विद्रावापासून दाब-गाहणीने अगर केंद्रोत्सारणाने (केंद्रापासून दूर जाणाऱ्या प्रेरणेने) बाजूला काढतात. त्याच्या वडया करुन उष्ण हवेने वाळवितात. पटल बाष्पीभवन पात्रात विद्रावाची संहती वाढवून कच्छ मिळवितात.

   

 सुपारीलाकात : हा कात ताज्या सुपाऱ्या सोलून व किंचित दुखवून पाण्यात घालून शिजवितात. यावेळी जो लाल व दाट विद्राव मिळतो तो आटवून सुपारीचा कात यार करतात. कापी व चिकणी सुपारी तयार करण्याच्या कारखान्यात हा कात उपपदार्थ म्हणून मिळतो.

आवळीचाकात : आवळीच्या फळापासून व लाकडापासून हा तयार करतात. हा काळसर पांढऱ्या रंगाचा असतो.

गॅंबिअरकिंवामलायीकात : हा कात फिक्कट पिवळया रंगाचा असतो. सिंगापूर-मलायामध्ये गॅंबिअर या झाडाच्या पानांपासून हा कात खैर काताप्रमाणेच तयार करतात.


काताचेप्रकार : फूल कात, जनकपुरी कात, गल्ला कात, मधई कात, पापडी कात, गोरा कात इ. काताचे प्रकार बाजारात आढळतात. फूल कात वजनाला हलका व फिक्कट रंगाचा असतो. गोरा कात हा कच्छ, गॅंबिअर व तांबडी माती यांचे मिश्रण असतो. पापडी कातामध्ये खडू व अरेबिक डिंक असतो. सुवासिक कातात बडीशेप, अजमोदा, वेलची, दालचिनी, लवंग, धने, चंदन, केशन, केवडा इ. पदार्थ मिसळतात. बाजारात येणारा कात हा फिक्कट तांबड्या रंगाचा, विविध आकारांमध्ये किंवा चौकोनी वड्यांच्या स्वरुपाचा असतो. तो तुरट असतो. अतिशुध्द काताचे स्फटिक असतात. पण बाजारी कातात सामान्यतः अर्जुनाची साल (चूर्ण), गॅंबिअर कात, कच्छ, हिरडा, गॉल नट, चिनी माती, खडू, स्टार्च, अरेबिक डिंक, तांबडी माती, लोहाचा तांबडा ऑक्साइड इ. मिसळतात. बाजरी काताचे विश्लेषण केल्यास आर्द्रता ११.२ %, कॅटेचीन २१.४ %, कॅटेच्यू टूनिक अम्ल ३४.७ %, इतर कार्बनी पदार्थ २७.१५ % व राख ५.५ % आढळते तर चांगल्या प्रतिच्या कातात कॅटेचीन ६० %, थंड पाण्यात विद्राव्य असणारा भाग ३० %, आर्द्रता ९.२५ %, अविद्राव्य भाग ०.७५ % व राख ०.५ %  आढळते.

कच्छ हा करड्या किंवा नारिंगी काळसर रंगाच्या लहान धनाच्या वा ठोकळ्यांच्या स्वरुपात मिळतो. हा कठीण व गंधहीन असून तुरट चवीचा असतो. त्याचे विश्लेषण केल्यास आर्द्रता १०-१२.५ % टूनीन ४५-५० %, टूनीनविरहित भाग २४-३२ %, राख २-३ % मिळते.

उपयोग : भारतात काताचा उपयोग विडयातून खाण्यासाठी फार प्राचीन काळापासून केला जात आहे. तसेच त्याचा आयुर्वेदीय औषध म्हणूनही उपयोग करतात. त्याच्यात शीतक, पाचक, जंतुनाशक गुणधर्म आहेत. व्रण, रक्तस्त्राव, त्वचारोग, उपदंश, मूळव्याध व कातडीच्या भेगा यांवर त्याचा पोटातून घेण्यासाठी व बाहेरुनही उपयोग करतात. काताचा इतर औषधांबरोबर चूर्ण, गोळया, आसव, अरिष्ट, मलम इ. स्वरुपांतही उपयोग करतात.

कच्छचा उपयोग रंजकक्रियेत व कातडे कमावण्यासाठी करतात. तसेच पाण्याशी वारंवार संबंध येणाऱ्या बोटींना व कोळयांच्या जाळ्यांना संरक्षक पदार्थ म्हणून लावतात. कॅलिको कापड छपाईत, लगदा व कागद रंगीत करण्यासाठी, पाणी मृदू करण्यासाठी, स्टेन्सिल व छपाई यांच्यासाठी लागणाऱ्या शाईच्या निर्मितीत, बाष्पित्राच्या (बॉयलरच्या) आतील भागांवर बसणारे पाण्यातील लवणांचे थर नाहीसे करण्यासाठी व खोल असणाऱ्या तेलाच्या विहिरी खोदताना चिखलाची श्यानता (दाटपणा) कमी करण्यासाठीही कच्छचा उपयोग करतात. कातडी कमावण्यासाठी कच्छ वापरल्यास त्यांचा रंग जाऊन ती कठीण होतात.

भारतीयकातउद्योग :  भारतात ॲकेशिया कॅटेच्यू प्रकार-कॅटेच्यू प्रॉपर (महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश), कॅटेच्यू ऑइडस (प.बंगाल) व सुंद्रा (आंध्र प्रदेश) या झाडांपासून कात बनवितात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, प.बंगाल, ओरिसा, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश व बिहार या राज्यांत कात तयार करतात. हा उद्योग प्रामुख्याने कुटिरोद्योग म्हणून गणला जातो. इझ्झतनगर व हलदावनी (उत्तर प्रदेश), शिवपुरी (मध्ये प्रदेश), राजपिपला, देरोळ, डहाणू व मुंबई (महाराष्ट्र), कारवार (कर्नाटक) येथे मोठया प्रमाणात कारखान्यात कात व कच्छ तयार करतात.

भारतातील कात उत्पादन, कारखान्यांची संख्या इ. आकडेवारी फारशी उपलब्ध नाही. तयार होणारा कात भारताततच वापरला जातो. मात्र कच्छची आयात व निर्यातही होते. भारतातून ब्रिटनला कच्छ व गॅंबिअर कात निर्यात करण्यात येतो, तर ब्रह्मदेश व सिंगापूर येथून त्याची काही प्रमाणात आयात करण्यात येते.

पहा:खैर.

संदर्भ: C.S.I.R.The Wealth of India, Industrial Products Vol.V.New Delhi,1960

मिठारी, भू.चिं.