पॉलिश : वस्तूच्या पृष्ठभागाला चकाकी यावी, धुळीचे कण किंवा वस्तू वापरताना होणारा हाताचा संपर्क इत्यादींच्या अनिष्ट परिणामांपासून पृष्ठभागाचे रक्षण व्हावे किंवा गेलेली चकाकी पुन्हा यावी या हेतूने वापरली जाणारी मिश्रणे म्हणजे पॉलिशे होत. पॉलिशे वड्या, ठोकळे किंवा चूर्णे या घणरूपात, थिजलेल्या लोण्यसारख्या अर्धघनरूपात आणि खळीसारख्या दाट किंवा पाण्यासारथ्या पातळ द्रवरूपात असतात. धातूच्या घरगुती वस्तूंना चकाकी आणण्यासाठी वापरण्यात येणारी रांगोळी, विटकरीची पूड, काव इ. काचेच्या वस्तूंकरिता वापरण्यात येणारी खडूची पूड दागिन्यांना चकाकी आणण्यासाठी सोनार वापरीत असलेली विशिष्ट प्रकारची माती ही पॉलिशांची प्रथमिक उदाहरणे म्हणता येतील.

पॉलिशांच्या उपयोगाची दोन क्षेत्रे आहेत त्याना अनुसरून पॉलिशांचे वर्गीकरण (१) घरगुती पॉलिशे व (२) औद्योगिक पॉलिशे असे करता येते. दोन्ही तर्‍हेच्या पॉलिशांच्या घटकांत व उद्दिष्टांत फरक नाही, फक्त वापरण्यात आहे. औद्योगिक पॉलिशे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. ती वापरण्यास थोडी फार यंत्रसामग्री लागते किंवा त्यासाठी एकामागून एक अशा अनेक क्रिया कराव्या लागतात.

घटक : (१)अपघर्षक पदार्थ [⟶ अपघर्षक] वस्तूच्या पृष्ठभागावर घासल्याने पृष्ठभाग गुळगुळीत बनतो. याचे कमीअधिक कठिणता  असलेले अनेक प्रकार आहेत. गुळगुळीत करावयाच्या पृष्ठापेक्षा अपकर्षक जास्त कठिण असावा लागतो तसेच तो आवश्यकतेप्रमाणे जाड किंवा बारिक कणांच्या रूपात वापरावा लागतो. (२) वस्तूच्या पृष्ठभागावर ज्यांचा चकचकीत व टिकाऊ थर बसेल असे पदार्थ. उदा., विविध प्रकारची मेणे [⟶ मेण]. (३) पॉलिश होण्याच्या क्रियेत प्रक्षालनाचा (धुवून काढण्याचा) अंतर्भाव असेल, तर एखादे प्रक्षालक [⟶ प्रक्षालके]. (४) पॉलिशातील घटकांना एकत्र ठेवतील असे बंधक विद्रावक (विरघळविण्याचा गुण असलेला पदार्थ) किंवा पायस-माध्यम [ ज्यामध्ये पायसीकृत पदार्थ सूक्ष्म बिंदूंच्या रूपाने तरंगत असतो तो द्रव उदा., तेल-पाणी पायसात पाणी ⟶ पायस] व पायसीकारक (माध्यम व तरंगणारा पदार्थ यांचा मिलाफ घडवून आणणारा पदार्थ).

घरगुती पॉलिशे : फर्निचरची पॉलिशे : घरातील खुर्च्या-टेबले, कपाटे, दरवाजे व इतर लाकडी सामान प्रथम चकचकीत असले, तरी लवकरच मलिन होते. धुळीच्या कणांमुळे लाकडाच्या पृष्ठावर सूक्ष्म चरे पडतात व त्यात धूळ जाऊन बसते. वस्तू वापरतानाही त्यांचे पृष्ठभाग घासले जाऊन त्यांची जकाकी जाते. कोरड्या अथवा ओल्या फडक्याने वस्तू पुसल्याने कार्यभाग साधत नाही. येथे पृष्ठभाग गुळगुळीत करावयाचा नसतो. तो स्वच्छ व्हावा व चकाकी देईल अशा पदार्थाचा टिकाऊ थर त्यावर बसावा अशी अपेक्षा असते. म्हणून या पॉलिशात अपघर्षके नसतात. ही पॉलिशे पाणी-तेल (तेल या माध्यमात पाण्याचे बिंदू तरंगत असलेले) किंवा तेल-पाणी (पाण्यात तेलाचे बिंदू असलेले) या स्वरूपाची कमीअधिक दाट द्रवरूप किंवा अर्धघन पायसे असतात.

मधमाशीच्या मेणासारखे नरम मेण व कार्नोबा मेणासारखे एखादे कठीण मेण, स्टिअरिक अम्ल, नॅप्था, ट्रायएथॅनॉल अमाइन किंवा मॉर्फोलीन आणि पाणी यांपासून पायसरूप पॉलिशे बनतात. ती लाकडी पृष्ठभागाला लाऊन तो मऊ फडक्याने घासला महणजे त्याला लकाकी येते व ती दीर्घकाल टिकते. 

सु.४% सिलिकोन [⟶ सिलिकोने] व नॅप्थामध्ये विरघळविलेले मेण अल्प प्रमाणात घेऊन बनविलेले पॉलिश उपलब्ध आहे. ते वस्तूला लावल्यास त्वरीत वाळते व त्यामुळे जो थर पृष्ठभागावर बसतो तो न घासताही चकचकीत होतो. 

लाकडी जमीन तसेच लिनोलियम यांना लावावयाची पॉलिशी ही बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणार्‍या) विद्रावकात मेणमिश्रणे विरघळवून केलेले विद्राव अथवा तेल-पाणी या स्वरूपाची पायसे असतात. नृत्य करावयाच्या पृष्ठभागासाठी वापरावयाच्या पॉलिशामध्ये कार्नोबा किंवा तत्सम कठीणमेण व संगजिर्‍याची पूड यांचा समावेश असतो.

मोटार गाड्यांची पॉलिशे : धुराळा, पाऊस, इंजिनाची उष्णता इत्यादींचा परिणाम होऊन मोटारगाड्यांच्या बाह्य भागांची चकाकी नाहीशी होते. पृष्ठभागावर सूक्ष्म खाचखळगेही निर्माण झालेले असतात. 

मोटारीच्या पायसरूप पॉलिशांमध्ये मेणे, विर्दवक, पाणी आणि एखादा अपघर्षक यांचा समावेश असतो. अपघर्षकाच्या योगाने पृष्ठभागावरील खाचखळगे घासले जाउन तो नितळ बनतो. मात्र येथे वापरावयाचा अपघर्षक पृष्ठभागाला अपाय करणार नाही असा सोम्य आणि सु. ३२५ मेश इतका बारीक चूर्णरूप (एका चौरस इंचात-६.२५ चौ. सेंमी. मध्ये -३२५ छिद्रे असलेल्या जाळीतून पार जातील इतक्या बारीक कणांचा) असावा लागतो. मुलतानी माती (फुलर्स अर्थ), सिलिका, डायाटमाइट (डायाटम नावाच्या एकपेशिय शैवालांच्या सिलीकामय कवचांची बनलेली माती) इ. अपघर्षक या कामी योग्य होत. विशिष्ठ गुणधर्माची डायमिथिल सिलोक्सेनाची बहुवारिके [⟶ बहुवारिकीकरण सिलिकोने], डायाटमाइट हे अपघर्षक, नॅप्था, पाणी, ओलेइक अम्ल व मॉर्फोलीन यांपासून बसविलेले पायसरूप पॉलिश मोटांरीचे रंगविलेले, तसेच धातुविलेपित पृष्ठभाग चकचकित व जलरोधी बनविण्यासाठी फार उपयोगी पडत.

कातडी वस्तूंसाठी पॉलिशे : पादत्राणे, हातपिशव्या, प्रवासी-सामान यांसाठी वापरावयाच्या पयलिशाने त्यांच्य पृष्ठभागावर पातळ, लवचिक, पाण्याने किंवा घर्षणानेसहजासहजी नाहीसा न होणारा थर बसवा व चकाकी यावी हा हेतू असतो. बुटासारखी पादत्राणे वापरताना कातड्याला विशिष्ट ठिकाणी वारंवार घड्या पडतात व त्यमुळे त्या ठिकाणी कातडे तडकून फाटण्याचा फार संभव असतो. म्हणून कातड्याला नरमपणा यावा हाही एक उद्देश येथे पॉलिश वापरण्यात असतो. या पॉलिशामध्ये अपघर्षकांना स्थान नसते. मधमाशीचे मेण व शिवाय कार्नोबा, मॉटान, लाखेचे मेण, ऊस-मेण यांसारख्या कठीण मेणांची मिश्रणे व विद्रावक म्हणून टर्पेटइन व उच्च उकळबिंदू अससलेला नॅप्था यांचा या पॉलिशात उपयोग केलेला असतो.

बुटपॉलिशे सामान्यत: थिजलेल्या लोण्यसारखी अर्धवट घनरूपात असतात. ती बंद डब्यांत दीर्घकाल टिकतात. आशा पॉलिशात सु. १५ % कार्नोबासारखे मेण, १०% पॅराफिन, ५% सेरिसीन अथवा ओझोकेराइट मेण, ६० ते ७०% नॅप्था किंवा टर्पेटाइन हे विद्रावक आणि ०.५% रंग असतो. खळिसारखी दाट पॉलिशे (क्रिम) ही पाणी आणि मेणे यांची पायसे असून त्यांत विद्रावकांचाही समावेश असतो. अशा पॉलिशांमध्ये सुवासिक द्रव्ये व काही वेळ रंजकद्रव्ये वा रंगद्रव्येही घातलेली असतात. द्रवरूप बुटपॉलिशेही उपलब्ध आहेत. पांढर्‍या कातडी वस्तूंसाठी उपयोगी पडणारी खळीसारखी पॉलिशे ही मेणाची पायसे असून त्यामध्ये टिटॅनियम डाय-ऑक्साइड, लिथोपोन, झिंक ऑक्साइड यांसारखी पांढरी रंगद्रव्ये तरंगत ठेवलेली असतात. ती वेगळी होऊन तळाशी बसू नयेत म्हणून बाभळीचा किंवा कराया डिंक, केसिन, मिथिल सेल्युलोज इ. द्रव्ये वापरून त्यांचा दाटपणा वाढविलेला असतो.

धातुपॉलिशे : दरवाजांच्या मुठी, नावाच्या पाट्या, पुष्पापात्रे, छायाचित्रांच्या चौकटी, तबके इ. पितळेच्या, ब्रॉंझच्या किंवा निकेल आणि क्रोमियम विलेपित वस्तू हवेने थोड्या फार काळवंडतात. त्यासाठी उपयोगी पडणारी पॉलिशे द्रवरूप, खळीसारखी दाट वा ठोकळ्यांच्या रूपात मिळतात. वस्तूचा पृष्ठभाग घासला जावा व त्यावर जमलेला गंजाचा थर निघून जाऊन पृष्ठभागास मूळची चकाकी यावी, ही अपेक्षा येथे असते. 


द्रवरूप पॉलिशाचे घटक मुख्यत: अपघर्षक (उद., बारीक चूर्णरूप सिलीका) व विद्रावक असून, अपघर्षक तरंगत राहावा यासाठी साबण व पृष्ठभागावर अगदी पातळ संरक्षक थर बसावा म्हणून मेदाम्लाचा [⟶ वसाम्ले] समावेश यात केलेला असतो. 

चांदी-सोन्याच्या वस्तूंसाठी उपयोगी पडणारी पॉलिशे ही मुख्यत: निरनिराळ्या अपघर्षकांची मिश्रणे असतात. यांच्या वड्या किंवा ठोकळे बनविण्यासाठी साबण हा बंधक वापरतात. काहींमध्ये ऑक्झॅलिक, टार्टारिक अथवा सायट्रिक अम्लही मिसळलेले असते. या धातूंसाठी मृदू अपघर्षके आवश्यक असतात. उदा., अल्युमिना, मॅग्नेशियम कार्ब्रोनेट, सिलिका, खडू वगैरे. ग्लिसरीन व ओलेइक अम्ल यांचा समावेश करून खळीसारखी दाट पॉलिशेही बनवितात.

चांदीच्या पृष्ठभागावर असलेला ऑक्साइडाचा व सफ्लाइडाचा थर निघून जाइल अशा तर्‍हेच्या पॉलिशामध्ये सु. ४०% खडू, पॉलिऑक्सिमिथिलीन ग्लायकॉल (रेणुभार ४०० पेक्षा जास्त), मेद, अक्लोहॉल, सल्फेट व पाणी हे घटक असतात.

अल्युमिनियमाची भांडी  लखलखीत करण्यासाठी ती साबणाचे पाणी वापरून स्टीलवूलसारख्या (पोलादाच्या तंतुमय किसासारख्या) घर्षकाने घासणे पुष्कळदा पुरेसे पडत नाही. यासाठी खडू, डायटमाइट, मॅग्नेशियम ऑक्साइड यांसारखे अपघर्षक आणि टार्टारिक अम्ल, नवसागर व नॅप्था यांपासून बनविलेली पॉलिशे उपयोगी पडतात. 

अंगज (स्टनलेस) पोलादाच्या वस्तूंना चकाकी आणण्यासाठी सुक्ष्म कणयुक्त सौम्य अपघर्षक आणि एखादे वंगणद्रव्य यांचे मिश्रण असलेली पॉलिशे वापरतात. 

काचसामानासाठी पॉलिशे : या पॉलिशांचे कार्य मुख्यत: प्रक्षालनाचे असते, तथापि काही पॉलिशांत अतिमृदू अपघर्षक अल्प प्रमाणात वापरलेले असतात. काहींमध्ये नॅप्थासारखे कार्बनी विद्रावक पाण्याबरोबर पायसरूपात असतात. आरसे, तावदाने, दुकानांच्या प्रदर्शनी खिडक्या यांच्यासाठी ही पॉलिशे उपयोगी पडतात.

पॉलिशे वापरण्याच्या पद‌्धती : घरगुती पॉलिशे ब्रशाने अथवा कपड्याने वस्तूला लावणे व शेवटी मऊ कपड्याने तकाकी येइपर्यंत घासणे असा सामान्य प्रघात आहे. तथापी पॉलिश भरलेल्या डब्यातूनच प्रत्यक्ष वस्तूवर फवारता येतील अशी फर्निचरची आणि मोटारगाड्यांची द्रवरूप पॉलिशेही प्रचारात आहे. अशा पॉलिशांच्या घटकात फ्रिऑनासारखे एखादे प्रचालक (पुढे ढकलणारी प्रेरणा निर्माण करणारे) द्रव्य आणि सावकाश बाष्पीभवन होणारा विद्रावक यांचा समावेश अशतो. फ्रिऑनाच्या बाष्पीभवनाने निर्माण होणार्‍या बाष्पामुळे डब्यातील पॉलिशाच्या पृष्ठावर दाब निर्माण होतो व त्यामुळे डब्याला जोडलेला चाप ओढला किंवा दाबला म्हणजे डब्याच्या तोंडातील फवार्‍यातून पॉलिश जोराने बाहेर पडू लागते व वस्तूवर उडविता येते. वस्तूवर ठेवून चोळले असता चकाकी देईल असे कोरडे कापडही बनविण्यात आले आहे. त्यासाठी प्रथम गरम द्रवरूप पॉलिशामध्ये मऊ व शोषक कापड बुडवितात. नंतर त्यामधील अतिरिक्त पॉलिश व विद्रावक काढून टाकले म्हणजे पॉलिशयुक्त कापड मिळते. बुटांसाठी व चांदीच्या वस्तूंसाठी उपयोगी पडणारी पॉलिश करण्याची विशेष कापडे प्रचलित आहेत.

औद्योगिक पॉलिशे : लाकडी वस्तूंचे पॉलिश : लाकडी फर्निचर तयार झाल्यावर अपघर्षक कागदाने घासून त्याचे पृष्ठभाग प्रथम गुळगुळीत करतात आणि त्यावर जवसाच्या तेलाचा हात देतात. तो वाळल्यावर पृष्ठभागाला असलेल्या सूक्ष्म चिरा भरल्या जाव्या म्हणून व्हायटिंग (शुद‌्ध पांढरा खडू) व स्पिरीट यांचे मिश्रण लावतात. फ्रेंच पॉलिश हा मिथिलेटेडस्पिरीटमध्ये केलेला मुख्यत: लाखेचा विद्राव असतो. वस्तूला पॉलिश लावल्यावर स्पिरीट उडून जाते व लाखेचा चकचीत थर पृष्ठभागावर बसतो व वस्तू उठावदार दिससते.

बुटाच्या कारखान्यातील पॉलिश : कारखान्यात बूट तयार झाल्यावर त्यांचे तळ व कडा यांना चकाकी आणावयाची असते. त्यासाठी वापरावयाच्या पॉलिशामध्ये मधमाशीचे मेणे, थोडे टर्पेंटाइन व तेलात विरघळणारे रंग यांचा अंतर्भाव असतो. पॉलिश करण्यासाठी फ्लॅनेलची चाके वापरतात. त्यांना उजळन चाके (बफिंग व्हील्स) म्हणतात. त्यांच्या कडांना वरील पॉलिश लागेल अशा तर्‍हेने धरून चाके जोराने फिरवतात व बुटांचे तळ अथवा कडा चाकाला लागून धरतात. त्यामुळे त्यांना पॉलिश लागते व चकाकी येते.

लोखंड व पोलादाच्य वस्तू : या वस्तूंना पॉलिश करण्यासाठी आयर्न ऑक्साइड, एमरी, ट्रिपोली इ. अपघर्षकांचे चूर्णरूप मिश्रण किंवा त्यात ओलेइक अम्ल किंवा ग्रीज मिसळून केलेले दाट मिश्रण वापरतात. उजळून चाकांच्या योगाने चकाकी आणतात [⟶ पृष्ठ अंत्यरूपण, धातूंचे]. 

प्लॅस्टिक वस्तूंचे पॉलिश : या वस्तूंचे पृष्ठभाग चकचकीत व्हावेत यासाठीउजळण चाके किंवा कोलांट पिपे (फिरती पिपे, टंबलिंग बॅरल्स) वापरतात. 

वस्तूचे आकारमान मोठे असेल, तर मलमल किंवा फ्लॅनेलच्या जोराने फिरणार्‍या उजळण चाकांना खडू, क्रोमियम ऑक्साइड, पमीस इ. अपघर्षक व पॅराफीन, मधमाशांचे मेण यांचे मिश्रण लावतात व त्यवर प्लॅस्टिकच्या वस्तूचा पृष्ठभाग टेकवितात. त्यामुळे चकाकी येते. वस्तू लहान असतील तर कोलांट पिपे वापरतात. ही पिपे कमीजास्त वेगाने वेगाने एका आसाभोवती फिरविता येतील अशी योजना असते. पिपात काही जागा मोकळी राहील अशा तर्‍हेने वस्तू भरून ते फिरविले म्हणजे वरच्या वस्तू खाली व खालच्या वर अशा तर्‍हेने त्यांचे स्थलांतर होत राहाते. हे होत असताना पिपात भरलेल्या इतर पदार्थांशी व पॉलिशाशी त्यांचा संपर्क होतो व घर्षणाने त्यांना चकाकी येते. 

प्लॅस्टिकच्या वस्तूंना पॉलिश करणयासाठी कोलांट पिपात अर्ध्यापेक्षा कमी भागात मऊ लाकडाचे खुंट्यासारखे तुकडे एक भाग वस्तू व एक भाग पमीस डगडाची पूड किंवा रॉटनस्टोन अथवा तत्सम एखादा अपघर्षक भरून पीप काही काळ फिरवितात. लाकडी तुकडे व अपघर्षक यांच्यामुळे वस्तूचे पृष्ठभाग चकचकीत बनतात.

रत्ने : विविध प्रकारचे अपघर्षक व उपकरणे रत्नांना पॉलिश करण्यासाठी वापरतात [⟶ रत्ने]. 

भारतीय उत्पादन : सर्वसाधारण प्रकारचे फर्निचर, पादत्राणे, धातूंचे पृष्ठभाग, काचसामान यांना लागणारी सर्व तर्‍हेची पॉलिशे भारतात मुबलक तयार होतात. त्यांचा दर्जा चांगला असून किंमतीही प्रमाण शीर आहेत. सिलिकोनयुक्त पॉलिशेही अलिकडे तयार होऊ लागली आहेत परंतू ती महाग आहेत. भारताचे हवामान, आवडीनिवडी, घटकद्रव्यांची उपलब्धता व अपेक्षित गुणधर्म यांनुसार पॉलिशांच्या घटकांत काही फेरफारही करण्यात आले आहेत.

संदर्भ : 1. Burkart, W. Mechanical Polishing, Teddington, 1960.

   2. Kirk, R. E. Othmer, D. F., Ed. Encyclopedia of Chemical Technology, Vol. 10, Tokyo, 1953.

लवाटे, वा. वि.